फोटो – ट्विटर, आसीसीसी

संपूर्ण क्रिकेट विश्वाला सुन्न करणारी बातमी आहे. महान क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन (Shane Warne Passes away at 52) झाले आहे. वॉर्नचे हार्ट अटॅकनं निधन झाले अशी माहिती आहे. वॉर्नच्या मॅनेजमेंट कंपनीनं देखील त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. थायलंडमध्ये वॉर्नचे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

क्रिकेट विश्वात मृतप्राय होत असलेल्या लेगस्पिनच्या कलेला त्यानं जीवदान दिलं, धडधाकट बनवलं. जास्तीचं वजन, अनियंत्रित खाणे, व्यायाम करण्याचा कंटाळा, हातामधील मोबाईलचा बॉल इतकाच केलेला धोकादायक वापर, मैदानातील स्लेजिंग, अंपायरशी,खेळाडूंशी वाद, बुकींशी संबंध, ड्रग्जचं सेवन आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या कित्येक वास्तविक आणि काल्पनिक स्त्रिया या पलिकडे जाऊन शेन वॉर्न हा जगातील महान लेग स्पिनरच नाही तर महान क्रिकेटपटू बनला.

लहानपणापासूनच व्रात्य

1980 च्या दशकात ऑस्ट्रेलियानं चारपैकी तीन अ‍ॅशेस स्पर्धा गमावल्या होत्या. तर वेस्ट इंडिज विरुद्धची फ्रँक वॉरेल ट्रॉफी जिंकण्यातही पाचपैकी चार वेळा त्यांना अपयश आले होते. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तरुण क्रिकेटपटूंना अकादमीतील प्रशिक्षणावर गांभीर्यानं लक्ष देण्यास सुरुवात केली. व्हिक्टोरिया राज्यातील अशाच एका क्रिकेट अकादमीमध्ये वॉर्ननं लेग स्पिनचा धडा गिरवला. डेमियन मार्टीन आणि जस्टीन लँगर हे वॉर्नचे पुढील काळातील सहकारी त्याला याच अकदामीमध्ये सर्वप्रथम भेटले.

या अकादमीमध्ये देखील वॉर्न हा शिस्तभंगासाठीच प्रसिद्ध होता. त्यामुळे तो अनेकदा बडतर्फीच्या उंबरठ्यावर आला पण सुदैवानं कधी बडतर्फ झाला नाही. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया B टीममध्ये वॉर्नची निवड झाली. त्या टीमच्या कामगिरीच्या आधारावर फक्त 7 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव असलेल्या वॉर्नची जानेवारी 1992 साली झालेल्या सिडनी टेस्टसाठी निवड झाली.

पदार्पणात धुलाई

शेन वॉर्ननं सिडनी टेस्टमध्ये भारताविरुद्ध पदार्पण केलं. त्यावेळी त्याचं वजन 97 किलो होते. नंतरच्या काळात संपूर्ण क्रिकेट विश्वाला बोटावर नाचवणाऱ्या वॉर्नला भारतीय बॅट्समनवर कधीही राज्य करता आले नाही. त्याची सुरूवात त्याच टेस्टमध्ये झाली. भारतीय टीमनं पाच टेस्टच्या त्या सीरिजमधील एकमेव टेस्टवर वर्चस्व गाजवले. रवी शास्त्रीनं (Ravi Shastri) 206  तर सचिन तेंडुलकरनं 148 रन काढले. वॉर्नला एकमेव विकेट घेण्यासाठी 150 रन मोजावे लागले.

भारताविरुद्च्या सीरिजमध्ये अपयशी झाल्यानंच त्यानंतर ऑस्ट्रेलिया टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली तेव्हा वॉर्नकडून कुणाच्या अपेक्षा नव्हती. कोलंबोमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्येही वॉर्नला 107 रन देऊन एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये श्रीलंकेला जिंकण्यासाठी 181 रन हवे होते. यजमानांची अवस्था 7 आऊट 150 अशी झाली असताना ऑस्ट्रेलियन कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डरनं (Allan Border) वॉर्नकडं बॉल दिला. वॉर्ननं 3 झटपट विकेट घेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळे वॉर्नच्या (Shane Warne Passes Away) आंतरराष्ट्रीय करिअरला जीवदान मिळाले.

खचलेल्या ऑस्ट्रेलियाला विजयाची बाराखडी शिकवणारा AB

बॉल ऑफ द सेंच्युरी!

शेन वॉर्न 1993 साली अ‍ॅशेस सीरिजसाठी इंग्लंडला गेला. त्यावेळी झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये सर्व हत्यारांचा वापर करु नकोस असा सल्ला कॅप्टन बॉर्डरनं त्याला दिला होता. त्यामुळे त्या सीरिजमधील ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये शेन वॉर्न इंग्लिश टीमसाठी कोरा पेपर होता.

याच टेस्टमध्ये शेन वॉर्ननं इंग्लंडचा माजी कॅप्टन माईक गॅटींग (Mike Gatting) याला टाकलेला बॉल हा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ (Ball of The Century) म्हणून ओळखला जातो. उजव्या हातानं बॅटींग करणाऱ्या गॅटींगसाठी वॉर्ननं लेग साईडला बॉल पिच केला. तो बॉल बाहेर जाईल म्हणून गॅटींगनं सोडला. अचानक तो बॉल पूर्णत: काटकोनात वळला आणि काही कळण्याच्या आत माईक गॅटींगचा ऑफ स्टंप उडाला. त्या ऐतिहासिक बॉलनंतर त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. शेन वॉर्ननं 1993 साली इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये टाकलेल्या या बॉलचा धसका इंग्लिश टीमनं घेतला. त्यानंतर वॉर्न रिटायर होईपर्यंत  केविन पीटरसनचा (Kevin Pietersen) अपवाद वगळता एकाही इंग्लिश बॅट्समनला वॉर्नवर वर्चस्व गाजवता आलं नाही.

वॉर्नची अद्भुत आकडेवारी

शेन वॉर्ननं ऑस्ट्रेलियाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी इंग्लंडवर नेहमीच हुकूमत गाजवली. 1990 च्या दशकात आणि 21 व्या शतकाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियासाठी अ‍ॅशेस सीरिज हा एकतर्फी मामला होता. ऑस्ट्रेलियाच्या या वर्चस्वात वॉर्नचा मोठा वाटा होता. अ‍ॅशेस इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आजही वॉर्नच्या नावावर आहे. शेन वॉर्ननं 2005 साली एका कॅलेंडर इयरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 96 विकेट्स घेतल्या. हा देखील एक रेकॉर्ड आहे. यापैकी 40 विकेट्स या ऑस्ट्रेलियानं त्या वर्षी गमवालेल्या पाच टेस्टच्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये घेतल्या होत्या.

श्रीलंकन ऑफ स्पिनर मुरलीधरनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये वॉर्नपेक्षा जास्त विकेट्स आहेत. पण मुरलीधरनच्या 800 पैकी 176 विकेट्स या झिम्बाब्वे आणि बांगलादेश या कमकुवत टीमविरुद्ध आहेत. वॉर्न या दोन दुबळ्या देशांविरुद्ध फक्त 3 टेस्ट खेळला. यामध्ये त्यानं 17 विकेट्स घेतल्या. हेच वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर वॉर्ननं टेस्ट क्रिकेटमधील अव्वल देशांच्या विरुद्ध 691 विकेट्स घेतल्या. तर मुरलीधरनच्या या देशांच्या विरुद्ध 624 विकेट्स आहेत.

सचिन विरुद्ध शरणागती

शेन वॉर्न हा आक्रमक बॉलर होता. तो प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला नामोहरम करण्यासाठी चिक्कार स्लेजिंग करायचा. डेरीक कुलीलनशी त्याचं चांगलंच वैर होतं. दक्षिण आफ्रिकेच्या ब्रायन मॅकमिलनलाही त्यानं खास नाव दिलं होतं. तो ग्रॅहम गूचला मिस्टर गूच तर नासिर हुसेनला सद्दाम म्हणत असे. दुखापतग्रस्त ख्रिस क्रेन्सचीही त्यानं नक्कल केली होती. पण तो सचिन तेंडुलकरच्या वाट्याला कधीही गेला नाही.

सचिननं वॉर्न विरुद्ध 12 टेस्टमध्ये 60.45 च्या सरासरीनं 5 सेंच्युरीसह 1209 रन केले. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये सचिननं वॉर्नची धुलाई केली. 1998 साली शाराजामध्ये त्याचं पार वस्त्रहरण केलं. त्याच वर्षी चेन्नईत झालेल्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये वॉर्ननं सचिनला झटपट आऊट केलं. पण दुसऱ्या इनिंगमध्ये सचिननं नाबाद 155 रन काढत तो हिशेब चुकता केला. सचिननं त्या इनिंगमध्ये वॉर्नला सिक्स लगावल्यानंतर कॅप्टन मार्क टेलरकडं जाऊन , “Tubs we are stuffed.’’ असा इशारा वॉर्ननं दिला होता. ज्या माईंड गेमसाठी शेन वॉर्न (Shane Warne Passes Away) प्रसिद्ध होता. तो माईंड गेम सचिनवर कधी चाललाच नाही.

भारतीयांना आजही आनंदी करणारा सचिनचा Desert Storm

भारताविरुद्ध 2001 साली झालेल्या ऐतिहासिक टेस्ट सीरिजमध्येही वॉर्नची जादू फार चालली नाही. कोलकाता आणि चेन्नईत त्याची धुलाई झाली. त्याची भरपाई त्यानं इंग्लंड विरुद्ध 31, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 37 आणि पाकिस्तान विरुद्ध 27 विकेट्स घेऊन केली. 2003 साली ड्रग्ज सेवनामुळे वर्ल्ड कप खेळण्यास बंदी येण्यापूर्वी वॉर्न हा सर्वोत्तम फॉर्मात होता.

वर्ल्ड कपमध्ये वॉर्न

शेन वॉर्न 1996 आणि 1999 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळला. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये प्रवेश केला. या दोन वर्ल्ड कपमधील सेमी फायनल आणि फायनलमधील चार पैकी 3 मॅचमध्ये वॉर्ननं 4 विकेट्स घेतल्या.

96 साली (Cricket World Cup 1996) वेस्ट इंडिज विरुद्ध त्यानं 4 विकेट्स घेत त्यांना पराभूत केलं. 1999 साली (Cricket World Cup 1999) दक्षिण आफ्रिकेला बरोबरीत रोखण्यात वॉर्नच्या 4 विकेट्स महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर पुन्हा फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध याच पराक्रमाची पुनरावृत्ती करत वॉर्ननं ऑस्ट्रेलियाला एकतर्फी वर्ल्ड कप जिंकून दिला. शेन वॉर्न 2003 चा वर्ल्ड कप खेळला असता तर ही आकडेवारी आणखी चांगली झाली असती.

वॉर्नची सेकंड इनिंग

शेन वॉर्नवर 2003 साली वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधी ड्रग्जचं सेवन केल्यानं एक वर्षांची बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर वॉर्न आणखी घातक बनून बाहेर आला. त्यानं बॉलिंग अधिक शार्प केली. त्यानंतर वॉर्ननं 38 टेस्टमध्ये 24.75 च्या सरासरीनं 217 विकेट्स घेतल्या.

2005 साली शेवटपर्यंत रंगलेली अ‍ॅशेस सीरिज इंग्लंडनं जिंकली. शेन वॉर्नचा इंग्लिश कौंटी टीममधील सहकारी केविन पीटरसननं ओव्हल टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सीरिजमध्ये वॉर्ननं (Shane Warne Passes Away) 40 विकेट्स घेतल्या होत्या. 

अ‍ॅशेसमध्ये झालेल्या पराभवानंतर वॉर्न आणखी डिवचला गेला. या पराभवानंतर त्यानं रिटायरमेंट लांबवलं. तो 2007 साली होणाऱ्या अ‍ॅशेस सीरिजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. इंग्लंडचा 5-0 नं फडशा पाडल्यानंतरच त्यानं क्रिकेट विश्वाचा निरोप घेतला. त्या सीरिजमध्ये वॉर्ननं 23 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे 1992 साली ज्या सिडनीच्या मैदानावर वॉर्नचा प्रवास सुरू झाला तिथंच त्यानं क्रिकेट विश्वाचा निरोप घेतला. या दरम्यानच्या 15 वर्षात वॉर्ननं 145 टेस्टमध्ये 708 विकेट्स घेतल्या. यामध्ये एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी 37 वेळा तर 10 किंवा जास्त विकेट्सचा पराक्रम 10 वेळा वॉर्ननं केली होती.

न झालेला सर्वोत्तम कॅप्टन

शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कधीही कॅप्टन झाला नाही. पण त्यानं 1998-99 साली 11 वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टनसी केली. यामध्ये त्यानं 10 वन-डे जिंकल्या. फक्त 1 गमावली. इंग्लिश कौंटी क्लब असो वा राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) दोन्ही टीमना त्यानं विजेतेपद मिळवून दिले. 2008 साली निवृत्त वॉर्न लो प्रोफाईल राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये कॅप्टन म्हणून उतरला. त्यावेळी कुणीही त्याच्याकडून फार अपेक्षा व्यक्त केली नव्हती.

वॉर्ननं सर्वांना चकवत सकारात्मक खेळ, सांघिक कामगिरी आणि अफलातून डावपेच यांच्या जोरावर तरुण पोरांचा भरणा असलेल्या राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाचा न झालेला सर्वोत्तम कॅप्टन अशी ओळख बनली. वॉर्न ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन का बनला नाही? याचे उत्तर त्याच्या वादग्रस्त वर्तनात आहे.

जेंव्हा शेन वॉर्न त्याला म्हणाला, ‘मी तुझी दहा महिने वाट पाहत होतो’

वादग्रस्त वॉर्न

1994 साली श्रीलंकेत सिंगर कप स्पर्धेसाठी खेळत असताना शेन वॉर्न आणि मार्क वॉ (Mark Waugh) यांनी बुकी मुकेश गुप्ताच्या एजंटकडून मॅचपूर्वी पिच आणि हवामानाची माहिती सांगण्यासाठी लाच घेतली होती. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानचा तेव्हाचा कॅप्टन सलीम मलिकनं शेन वॉर्न आणि टीम मे या ऑस्ट्रेलियन टीममधील दोन स्पिनर्सना ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्यासाठी लाच देऊ केली होती. मॅच फिक्सिंगच्या प्रकरणानं वॉर्नचा काय पाठलाग केला. 2011 साली भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेली वर्ल्ड कप मॅच टाय होईल असं भाकित वॉर्ननं केलं होतं. ती मॅच प्रत्यक्षात टाय झाली. त्यावेळी फॉक्स स्पोर्ट्सनं वॉर्नच्या भविष्यवाणीबद्दल Genius or Match Fixer? असं हेडिंग देत वॉर्नवर शंका उपस्थित केली होती.

शेन वॉर्न 2000 साली स्टीव्ह वॉ च्या टीमचा व्हाईस कॅप्टन होता. त्यावेळी इंग्लंडमध्ये त्यानं एका नर्सला दारू पिऊन व्हॉईस मेसेज पाठवले. इंग्लिश मीडियानं SHAME WARNE असं हेडिंग देत त्या बातम्या चालवल्या. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यामुळे वॉर्न कधीही ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला नाही. शेन वॉर्न रिटायर झाल्यानंतरही त्याचे वादग्रस्त वर्तन थांबले नाही. 2013 साली बिग बॅश लीगमध्ये मार्लन सॅम्युल्सशी त्यानं मैदानात हुज्जत घातली होती.

या सर्व वादग्रस्त प्रकरणाता वॉर्ननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर परिणाम होऊ दिला नाही. त्यानं त्याच्या खेळानं क्रिकेटला श्रीमंत बनवले. क्रिकेटच्या इतिहासात एक न टाळता येणारा इतिहास वॉर्ननं (Shane Warne Passes Away) घडवला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: