फोटो- ट्विटर

भारताकडून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ( Border- Gavaskar Trophy) परत घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया टीम सज्ज झालीय. ऑस्ट्रेलियन टीमच्या या मिशनचा प्रमुख मार्गदर्शक आहे त्यांचा कोच जस्टीन लँगर. लँगरच्याच (Justin Langer) मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये अँशेस टेस्ट सीरिज जिंकली होती. लँगर त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये लढवय्या खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याची खेळाबद्दलची कमिटमेंट इतकी टोकाची होती की एका टेस्टमध्ये तो अक्षरश:  जीवाची पर्वा न करता मैदानात उतरणार होता!  लँगरचा जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा तेंव्हाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं तर इनिंग घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेट लेखक/इतिहासकार अभिषेक मुखर्जी यांनी लँगरच्या लढाऊपणाचा तो किस्सा सांगितला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2006 साली जोहान्सबर्गमध्ये झालेली ती टेस्ट होती. जस्टीन लँगरची 100 वी टेस्ट! दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग दुसऱ्या दिवशी 303 रन्सवर संपुष्टात आली. लँगरला त्याची शंभरावी टेस्ट मोठी खेळी करुन संस्मरणीय करण्याची चांगली संधी होती. लँगरनं बॅटिंग सुरु करुन जेमतेम दहा मिनिटेच झाली होती की, मखाया एंटीनीचा एक उसळता बॉल खेळण्याचा लँगरचा प्रयत्न फसला. त्याच्या हॅल्मेटच्या मागच्या बाजूला तो बॉल लागला. लँगर जमिनीवर आडवा झाला. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने त्याला मैदानाच्या बाहेर नेले.

लँगरला दोन टाके, ऑस्ट्रेलिया अडचणीत!

लँगरच्या डोक्यावर रक्त दिसत होते. त्याला दोन टाके पडले होते. त्यामुळे तो आता परत बँटिंगला येण्याची शक्यता नव्हती. मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही….चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आणखी 44 रन्सची आवश्यकता होती. डेमियन मार्टीन आणि स्टुअर्ट क्लार्क ही जोडी मैदानात होती.

जस्टीन लँगर बॅटिंगला येण्याची शक्यता कमी आहे, असं ऑस्ट्रेलियाच्या मीडिया मॅनेजरने जाहीर केलं होतं. लँगरच्या अनुपस्थितीत इनिंग ओपन करणाऱ्या माईक हसीचंही तसंच मत होतं. ‘काहीही झालं तरी क्रिकेट हा फक्त खेळ आहे. लँगरची घरी बायको आणि चार मुलं वाट पाहतायत’ असं हसीने सांगितले होते.

( वाचा : ‘स्मिथला या पद्धतीनं आऊट करा’; सचिनचा भारतीय बॉलर्सना सल्ला )

दक्षिण आफ्रिकेचा इशारा!

पाचव्या दिवशी मार्टिन त्याची सेंच्युरी काढून आऊट झाला. त्यानंतर क्लार्कने दोन चौकार मारले, पण त्यालाली एंटिनीने आऊट केले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 16 रन्सची आवश्यकता होती. त्यावेळी ब्रेट ली – कॅस्प्रोविझ जोडी मैदानात होती.

या जोडीनंतर फक्त जस्टीन लँगर हा एकच बॅट्समन शिल्लक होता. ‘त्याला आम्ही कोणतीही दया दाखवणार नाहीत. त्याच्या अंगावर उसळलते बॉल टाकू’ हे दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर मार्क बाऊचर याने आदल्या दिवशीच जाहीर केले होते. त्यामुळे जखमी लँगर पुन्हा मैदानात उतरला तर त्याच्या जीवाला धोका होता!

( वाचा : ॲडलेडच्या आठवणी : एक कॅच सोडला आणि गिलख्रिस्ट लगेच निवृत्त झाला! )

लँगर खेळण्यासाठी तयार

हे सर्व सुरु असताना जखमी जस्टीन लँगर पॅड बांधून गरज पडली तर अकराव्या क्रमांकावर खेळण्यास तयार होता. लँगरला मैदानात जाण्यापासून रोखण्याचा एकच उपाय आहे हे त्याचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगला माहिती होते. नववी विकेट पडली की इनिंग घोषित करायची हे त्याने मनाशी ठरवले होते.

ऑस्ट्रेलियाच्या आणि लँगरच्या सुदैवाने तशी वेळ आली नाही. ली-कॅस्प्रोविझ जोडीने उरलेले रन्स काढत ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून दिली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: