फोटो – ट्विटर, मिरर स्पोर्ट्स

विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रिकेट करिअरचा चार वर्षांपूर्वी सोनेरी कालखंड सुरू होता. विराट सर्व देशांविरुद्ध सर्व प्रकारात भरपूर रन करत होता. त्याचवेळी ‘तो इंग्लंडमध्ये यशस्वी झाला नाही, तर मी त्याला ग्रेट समजणार नाही.’ असा दावा वेस्ट इंडिजचा माजी फास्ट बॉलर मायकल होल्डिंगने (Michael Holding)  केला होता. विराटने 2018 च्या सीरिजमध्ये इंग्लंडमध्येही भरपूर रन करत होल्डिंगचे दात घशात घातले. या वर्षात सातत्याने रन करणाऱ्या आणि विराट कोहलीशी स्पर्धा करणारा इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) मात्र अजूनही ऑस्ट्रेलियात एकही सेंच्युरी सेंच्युरी न झळकाणाऱ्या रूटला या सीरिजमध्ये ‘शून्यातून’ सुरूवात (Joe Root Challenge) करावी लागणार आहे.

पहिल्या दिवशी काय झाले?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs Enngland) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजला बुधवारी सुरूवात झाली. ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे 50 ओव्हर्सच खेळ झाला. या खेळात संपूर्ण सीरिजमध्ये काय पिक्चर दिसणार आहे, त्याचे ट्रेलर इंग्लंडच्या टीमला दिसले. पहिल्या दिवशी 50 ओव्हर्समध्येच इंग्लंडची पहिली इनिंग 147 रनवर संपुष्टात आली.

इंग्लंडची अवस्था चौथ्याच ओव्हरमध्ये 2 आऊट 11 अशी होती तेव्हा रूट बॅटींगला आला. या वर्षात इंग्लंडच्या टेस्ट टीमने केलेल्या एकूण स्कोअरपैकी 27 टक्के रन हे रूटने एकट्याने केले आहेत. ब्रिस्बेनमध्ये ढगाळ वातावरणात टॉस जिंकून बॅटींग घेण्याचा स्वत:चा निर्णय बरोबर ठरवण्याची जबाबदारी रूटवर होती.

इंग्लिश टीम आणि फॅन्सलाही त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. टीमचे 27 टक्के रन करणारा रूट 27 रन देखील करू शकला नाही, किंवा त्याल 27 बॉल देखील खेळता आले नाहीत. जोश हेजलवुडनं (Josh Hazlewood) त्याला शून्यावर आऊट (Joe Root Challenge) करत इंग्लंडला मागे ढकललं. त्यातून संपूर्ण इनिंग इंग्लिश टीम सावरलीच नाही.

हा नेहमीचा Root

कोरोना कालखंडला सुरूवात झाल्यापासून पहिल्यांदाच अ‍ॅशेस सीरिज होत आहे. त्या अर्थाने हे  नवे जग आहे. या नव्या जगात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टनही बदलला आहे. इंग्लंडची टीम अजूनही बदललेली नाही. त्यांचा कोसळण्याचा जुनाच मार्ग (Root) या सीरिजमध्येही कायम आहे. हा मार्ग जो रूटच्या विकेटपासून सुरू होतो.

चार वर्षांपूर्वी सिडनीमध्ये झालेल्या अ‍ॅशेस टेस्टमध्ये जो रूट पहिल्या इनिंगमध्ये 83 रन काढून आऊट झाला. तो परतला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर हा 3 आऊट 228 होता. त्यानंतर इंग्लिश टीम 346 रनवर आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने त्याला उत्तर देताना 649 रन करत इंग्लंडच्या परतीचे दरवाजे बंद केले.

‘मोठ्या टीमच्या विरुद्ध कॅप्टनसीसाठी जो रूट लायक नाही’

सर्वात मोठ्या रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

जो रूट यंदा ऑस्ट्रेलियात भरपूर रननं भरलेली बॅग घेऊन आला आहे. त्याने या वर्षातील 13 टेस्टमध्ये 63.26 च्या सरासरीने 1455 रन केले आहेत. 2017 ते 2020 या चार वर्षांमध्ये झळकावलेल्या टेस्ट सेंच्युरी (6) त्याने 2021 मध्येच झळकावल्या आहेत.

रूटच्या या वर्षातील आणखी 5 इनिंग बाकी आहेत. त्यामध्ये त्याला मोहम्मद युसूफचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 334 रन करणे आवश्यक आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता हे रन करणे अशक्य नाही. पण त्याला पाचही इनिंग ऑस्ट्रेलियात खेळायच्या आहेत, हा सर्वात मोठा अडसर (Joe Root Challenge) आहे.

ऑस्ट्रेलियात काय होते?

जो रूट हा आजवर 9 देशांमध्ये टेस्ट क्रिकेट खेळला आहे. यापैकी फक्त 3 देशांमध्ये त्याची सरासरी 50 पेक्षा कमी आहे. या तीन देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. इथं त्याची सरासरी ही 10 टेस्टनंतर 35.62 इतकी आहे. रूटच्या करिअरमधील सर्वात खटकणारी बाब म्हणजे त्याने आजवर ऑस्ट्रेलियात एकही टेस्ट सेंच्युरी लगावलेली नाही.

रूट चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात इंग्लंड टीमचा कॅप्टन म्हणून अ‍ॅशेस सीरिज खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने 5 हाफ सेंच्युरींसह 47. 25 च्या सरासरीने 378 रन काढले होते. त्या सीरिजमध्ये स्टीव्ह स्मिथच्या नावावर 137.40 च्या सरासरीनं 687 रन होते. स्मिथ या सीरिजपूर्वी व्हाईट कॅप्टन झाला असून इंग्लंड विरूद्ध रन करण्यासाठी सज्ज आहे.

स्टीव्ह स्मिथची बेस्ट सेंच्युरी, लाजीरवाण्या प्रसंगानंतर खणखणीत पुनरागमन!

रूटची तुलना होते त्या विराट कोहलीनं आजवर ऑस्ट्रेलियात 54.08 च्या सरासरीनं रन केले आहेत. त्यामध्ये 6 सेंच्युरीचा समावेश आहे. त्याचबरोबर कॅप्टन म्हणून ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज देखील जिंकलीय. बॅटर आणि कॅप्टन म्हणून या सीरिजमध्ये रूटला हे अंतर पार करणे म्हणजे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अंतर समुद्रातून पोहून पार करण्यासारखे आहे, याची (पुन्हा एकदा) जाणीव पहिल्याच दिवशी गटांगळ्या खाल्ल्यानंतर (Joe Root Challenge) नक्कीच झाली असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

   

error: