
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील काळा अध्याय असलेल्या बॉल टेम्पिरिंग प्रकरणानं (Ball Tampering scandal) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तीन वर्षांपूर्वी एका नवोदीत खेळाडूचा तत्कालिन कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि व्हाईस कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी या प्रकरणात एक प्यादं म्हणून वापर केला होता. स्मिथ, वॉर्नर बंदीनंतर टीममध्ये परतले आणि स्थिरावले. पण, तो प्यादं म्हणजेच कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) यानं एक नवा गौप्यस्फोट केला आहे. या नव्या गौप्यस्फोटाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीममधील आणखी पाच दिग्गज रडारवर आले आहे.
काय होते प्रकरण?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात 22 मार्च ते 25 मार्च या काळात झालेली केपटाऊन टेस्ट ही बॉल टॅम्परिंग स्कँडलनं (Ball Tampering scandal) गाजली. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन कॅमेरुन बॅनक्राफ्ट बॉल जास्त स्विंग व्हावा म्हणून सँडपेपरच्या मदतीनं खराब करत होता. त्याचा हा गुन्हा टीव्हीच्या कॅमेऱ्यात Live कैद झाला. बॅनक्रॉफ्ट सँडपेपरनं बॉल खराब करत होता. त्यामुळे या बॉल टेम्परिंग स्कँडलला सँडपेपर गेट (Sandpaper Gate) असंही म्हणतात.
ऑस्ट्रेलियन टीमचा काळा चेहरा Live मॅचमध्ये सर्व जगानं पाहिला. या प्रकरणाची चौकशी झाली. त्यामध्ये डेव्हिड वॉर्नरच्या इशाऱ्यानं आणि स्टीव्ह स्मिथच्या संमतीनं हे सर्व केल्याची कबुली बॅनक्रॉफ्टनं दिली. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्ष तर बॅनक्रॉफ्टवर 10 महिने क्रिकेट खेळण्यास बंदी घातली. तर हे सर्व दृश्य पाहणारा ऑस्ट्रेलियन टीमचा कोच डॅरेन लेहमनची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
नवा गौप्यस्फोट काय?
बॅनक्रॉफ्टनं ‘गार्डियन’ या इंग्लंडमधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. बॅनक्रॉफ्टनं या प्रकरणात स्वत:ची चूक मान्य केली आहे. मात्र त्याचवेळी तो करत असलेल्या कामाचा सर्व फायदा टीमच्या बॉलर्सना होणार होता. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणाची माहिती होती. असा गौप्यस्फोट केला. बॅनक्रॉफ्टनं यावेळी कोणत्याही बॉलर्सचं नाव घेतलेलं नाही. हा फायदा कुणाला होणार होता हे ‘Self-explanatory’ आहे असं सांगितलं.
कुणावर संशय?
केपटाऊन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिचेल मार्श आणि नॅथन लायन हे पाच बॉलर होते. या सर्वांवर बॅनक्रॉफ्टच्या ताज्या गौप्यस्फोटानंतर संशय निर्माण झाला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची घोषणा
बॅनक्रॉफ्टच्या या मुलाखतीचे सर्वात जास्त पडसाद ऑस्ट्रेलियामध्ये उमटले आहेत. ऑस्ट्रेलियानं शेवटची टेस्ट सीरिज जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळली. त्या सीरिजमध्ये खेळलेले ऑस्ट्रेलियाचे चारही बॉलर्स (स्टार्क, हेजलवुड, कमिन्स आणि लायन) संशयात आले आहेत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं
‘क्रिकेट ऑस्ट्रेलियानं यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे की केपटाऊनमध्ये 2018 साली झालेल्या टेस्टबद्दल कुणाकडं नवी माहिती असेल तर त्यांनी ती पुढं येऊन बोर्डाला द्यावी. या प्रकरणाची तेव्हा अतिशय सविस्तर चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी संपल्यानंतर आजवर कुणीही बोर्डाला नवी माहिती दिलेली नाही.’ असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलंय.
कांगारुंचं शेपूट वाकडंच, ब्रिस्बेन टेस्टमध्येही भारतीय खेळाडूंना शिवीगाळ
बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे (Ball Tampering scandal) ऑस्ट्रेलियन बॅटींग ऑर्डरचे कणा असलेले दोन प्रमुख बॅट्समन (स्मिथ आणि वॉर्नर) एक वर्षांसाठी टीमच्या बाहेर होते. त्याचा मोठा फटका ऑस्ट्रेलियन टीमला बसला. आता बॅनक्रॉफ्टच्या ताज्या गौप्यस्फोटानंतर त्यांच्या टेस्टमधील संपूर्ण बॉलिंग अटॅकवरच संशय आला आहे. त्यामुळे या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलिया तीन वर्षांपूर्वी घेतली तशीच कठोर भूमिका घेतं का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.