फोटो – BCCI/IPL

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ची वार्षिक सर्वसाधारण सभा अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) दहा टीम खेळण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, आयपीएलमध्ये पुढच्या वर्षी नाही तर 2022 पासून 10 टीम असतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. पुढच्या वर्षी 14 व्या सिझनमध्ये आठ टीममध्येच आयपीएल स्पर्धा होईल.

सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या आठ टीम आहेत. आता आणखी दोन टीम 2022 पासून वाढणार असून त्यामुळे स्पर्धेतील सामने आणि रंगत आणखी वाढणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये 10 टीम्समध्ये आयपीएल स्पर्धा झाली होती. सध्याच्या आठ टीम्ससह पुणे आणि कोच्चीच्या टीम तेंव्हा खेळल्या होत्या. या दोन्ही टीम नंतर काही कारणांमुळे बाद झाल्या. त्यामुळे आयपीएल स्पर्धा ही पुन्हा एकदा आठ टीम्समध्येच होत आहे.

(वाचा : IPL 2021- CSK साठी पुढच्या वर्षीही ‘रैना है ना’! )

कोणत्या शहरांमध्ये चुरस?

दोन नव्या टीममध्ये एक टीम अहमदाबादची असेल हे जवळपास निश्चित आहे. अहमदाबादमध्ये नुकतेच जगातील सर्वात मोठे सरदार पटेल स्टेडियम बांधण्यात आले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील आगामी टेस्ट सीरिजमधील दोन टेस्ट आणि पाच T20 सह अनेक मॅच या स्टेडियमवर भविष्यकाळात होणार आहेत. वर्ल्ड कप 2023 ची फायनल देखील याच ठिकाणी खेळवली जाण्याची शक्यता आहे. हे स्टेडियम नव्या टीमचे होम ग्राऊंड असेल.

अहमदाबादची एक टीम नक्की झाली तर दुसऱ्या टीमसाठी पुणे, राजकोट, लखनौ, कानपूर आणि गुवाहटी या शहरांमध्ये चुरस असेल. नव्या टीमसाठी होणारा लिलाव जिंकणारा उद्योगसमुह यामधील कोणत्या शहरांची निवड करतो यावरही 10 व्या टीमचं भवितव्य ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना दिलासा का?

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेवर सुरुवातीपासून फायनलपर्यंत वर्चस्व गाजवत विजेतेपद जिंकलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी मुंबई इंडियन्सची टीम ही आयपीएलमधीलच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वातील एक बलाढ्य टीम मानली जाते. पुढच्या वर्षी नव्या टीमसह खेळाडूंचा नव्यानं लिलाव झाला असता तर यामधील अनेक खेळाडू दुसऱ्या टीममध्ये जाण्याची शक्यता होती. मुंबई इंडियन्सची बसलेली घडी पुढच्या वर्षी मोडण्याची भीती त्यांच्या फॅन्सना होती.

( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )

 आता पुढच्या वर्षीच्या आयपीएलपूर्वी एक छोटा लिलाव होणार आहे. मुंबईची टीम सेट असल्यानं त्यांच्या फॅन्सना या लिलावाची काळजी नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या बेस्ट टीमला आणखी एक सिझन एकदा घरच्या मैदानावर खेळताना पाहण्याचा आनंद मिळणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: