फोटो – ट्विटर/BCCI

त्यानं महेंद्रसिंह धोनीच्या शेवटच्या टेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या 6 टेस्टमध्ये सिडनी, कोलंबो आणि किंग्सटन अशा तीन वेगळ्या खंडातील ग्राऊंडवर त्यानं सेंच्युरी केली. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला दोन वर्ष थांबावं लागलं. पण पहिल्याच वन-डेमध्ये त्यानं सेंच्युरी झळकवत या फॉरमॅटसाठी देखील आपण योग्य असल्याचं दाखवून दिलं. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणातच सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय असलेल्या केएल राहुलचा आज वाढदिवस (KL Rahul Birthday) आहे. आजच्या दिवशी (18 एप्रिल 1992) रोजी त्याचा जन्म झाला.

गफलतीनं ठेवलं नाव

राहुलच्या नावाची गोष्ट देखील थोडी मजेशीर आहे. राहुलचे वडील हे सुनील गावस्कर (Sunil Gavasakar)  यांचे फॅन आहेत. त्यांना गावस्करांच्या मुलाचं नाव स्वत:च्या मुलाला ठेवायचं होतं. गावस्करांच्या मुलाचं नाव राहुल आहे, अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव देखील राहुल ठेवलं.

राहुलनं वयाच्या 10 वर्षापासून शालेय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तो 2010 साली अंडर-19 टीमचा सदस्य होता. राहुलसाठी 2013-14 हे वर्ष टर्निंग पॉईंट ठरलं. त्यावर्षी त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 1033 रन केले. त्यानंतर पुढच्या वर्षी दुलिप ट्रॉफीत दोन सलग सेंच्युरी केल्यानंतर 2014 च्या शेवटी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या टीम इंडियात त्याची निवड झाली.

पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यानंतर परतल्यानंतर त्यानं रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) उत्तर प्रदेश विरुद्ध 337 रनची खेळी केली. त्याचबरोबर फायनलमध्ये तामिळनाडू विरुद्ध 188 रन करत कर्नाटकला रणजी विजेतेपद मिळवून दिले. राहुलनं 2014-15 च्या रणजी सिझनमध्ये 93.11 च्या सरासरीनं रन केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात

राहुलनं (KL Rahul Birthday) 2014 च्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. ती महेंद्रसिंह धोनीची शेवटची टेस्ट होती. पहिल्या टेस्टमध्ये राहुल अपयशी ठरला. त्या टेस्टमध्ये त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 3 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 1 रन काढला.

त्यानंतर पुढच्या सिडनी टेस्टमध्ये राहुलला पहिल्यांदाच टेस्टमध्ये ओपनिंग करण्याची संधी मिळाली. त्यानं या टेस्टमध्ये ओपनिंगला येताच सेंच्युरी (110) झळकावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 108 तर किंग्सटनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं 158 रन काढले. वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्ट इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणारा राहुल हा पहिला भारतीय आहे. 2017 साली सलग 7 टेस्ट इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्डही राहुलच्या नावावर आहे.

राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा!

वन-डे पदार्पण लांबले पण फळले

केएल राहुलची (KL Rahul Birthday)  2015 साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या वन-डे सीरिजसाठी निवड झाली होती, पण त्याला त्या सीरिजमधून डेंग्यूमुळे माघार घ्यावी लागली. त्यानंतर त्याला वन-डे पदार्पणासाठी आणखी एक वर्ष थांबावे लागले. अखेर 2016 साली झिम्बाब्वे विरुद्ध हरारेमध्ये त्यानं पदार्पण केलं. त्या पहिल्याच वन-डे त्यानं सेंच्युरी (100, नाबाद) झळकावली. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणातच सेंच्युरी झळकावणारा राहुल हा एकमेव भारतीय आहे. त्याचबरोबर ओपनिंग बॅट्समन म्हणून पहिल्याच टेस्ट आणि वन-डे मध्ये सेंच्युरी झळकावणाराही तो एकमेव भारतीय आहे.

सर्व फॉरमॅटमध्ये सेंच्युरी

केएल राहुलनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्येही दोन सेंच्युरी केल्या आहेत. टेस्ट, वन-डे आणि T20 या क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये सेंच्युरी करणारा तो सुरेश रैना (Suresh Raina) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह तिसरा भारतीय आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 39.22 असून तो सरासरीचा विचार केला तर सहाव्या क्रमांकावर आहे.

वन-डे आणि T20 क्रिकेटमध्ये त्यानं काही काळ विकेट किपिंग देखील केली आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये तो काही काळ या फॉरमॅटमधील भारताचा व्हाईस कॅप्टन देखील होता.

राहुलच्या करियरमधील उतार

केएल राहुल (KL Rahul)  हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत ‘कॉफी विथ करन’ या शो मध्ये सहभागी झाला होता. या शो मधील वादग्रस्त मजकुरामुळे बीसीसीआयनं त्याच्यावर कारवाई केली होती. दोन सीरिजमधून त्याला वगळण्यात आले.

भारताच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन-डे आणि T20 सीरिजमध्ये त्याला फार कमाल करता आली नाही. टेस्ट क्रिकेटमधील अपयशानंतर त्याला 2018 नंतर अद्याप टेस्ट टीममधील अंतिम 11 मध्ये जागा मिळालेली नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) आणि भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये राहुलला बेंचवरच बसावे लागले.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या T20 सीरिजमध्येही राहुल अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका झाली. त्यानंतर वन-डे सीरिजमध्ये त्यानं एक हाफ सेंच्युरी आणि हाफ सेंच्युरी झळकावत कमबॅक केलं आहे.

Explained: 4 मॅचमध्ये 1 रन काढल्यानंतरही केएल राहुल टीम इंडियामध्ये का हवा?

राहुलचा आयपीएल रेकॉर्ड

राहुलचं KL Rahul Birthday आयपीएल करियर 2013 साली सुरु झालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)  आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन आयपीएल टीमकडून खेळलेला राहुल सध्या पंजाब किंग्ज (PBKS) टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन, ओपनर आणि विकेट किपर या तीन्ही जबाबदाऱ्या राहुलच्या खांद्यावर आहेत.

राहुलच्या नावावर आयपीएलमधील सर्वात जलद हाफ सेंच्युरी आहे. त्यानं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना 2016 साली फक्त 14 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. 2020 च्या आयपीएलमध्ये त्यानं 1 सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरीसह 670 रन करत ऑरेंज कॅप पटकावली. मागील सिझनमध्ये त्यानं आरसीबी विरुद्ध नाबाद 132 रन काढले. हा आयपीएल स्पर्धेत आजवर कोणत्याही भारतीय बॅट्समननं केलेला सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.

राहुल या आयपीएल सिझनमध्येही (IPL 2021) पंजाबचा कॅप्टन असून पंजाबच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या अपेक्षा राहुलच्या चांगल्या खेळाशीच निगडीत आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

.

error: