फोटो – ट्विटर, आयसीसी

जगातील कोणत्याही पिचवर कितीही बलाढ्य बॉलरला आव्हान देणारा पुल आणि समोरच्या टीमनं बनवलेल्या सर्व योजनांना उधळून लावत लगावणरा कव्हर ड्राईव्ह पाहयचा असेल तर रिकी पॉन्टिंगच्या (Ricky Ponting) बॅटींगचे व्हिडीओ पाहयला हवेत. वयाच्या 17 व्या वर्षापासून त्याची भविष्यातील सुपरस्टार अशी ऑस्ट्रेलियात हवा होती. तो रिटायर झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनच्या (Don Bradman) नंतरची जागा त्याने पटकावली होती. क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी खेळाडू आणि कॅप्टन असलेल्या रिकी पॉन्टिंगचा आज वाढदिवस (Ricky Ponting Birthday) आहे. आजच्याच दिवशी (19 डिसेंबर 1974) रोजी पॉन्टिंगचा जन्म झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण सेंच्युरींमध्ये फक्त सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पॉन्टिंगच्या पुढे आहे. 2002 ते 2007 या पाच वर्षाममध्ये पॉन्टिंगनं दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 41 सेंच्युरी झळकावल्या. शेवटच्या तीन वर्षांमध्ये फार कमाल त्याला करता आली नाही. तरीही तो रिटायर झाला तेव्हा टेस्ट क्रिकेटमधील 41 तर वन-डे क्रिकेटमधील 30 अशा एकूण 71 सेंच्युरी पॉन्टिंगच्या नावावर होत्या.

रिकी पॉन्टिंगच्या वाढदिवसानिमित्त (Ricky Ponting Birthday) त्याच्या टेस्ट करिअरमधील 5 बेस्ट सेंच्युरी कोणत्या आहेत हे पाहूया

127 वि. इंग्लंड, लीड्स, 1997

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी टेस्ट क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी खास असते. पॉन्टिंगनं टेस्ट कारकिर्दीमध्ये 41 सेंच्युरी झळकावल्या. पण, त्यामधील त्याची पहिली सेंच्युरी ही खास आहे. इंग्लंडमधील पहिल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये टीम अडचणीत असताना सेंच्युरी झळकावणे ही कोणत्याही ऑस्ट्रेलियनसाठी अभिमानाची बाब आहे. पॉन्टिंगनं ती गोष्ट 1997 साली लीड्स टेस्टमध्ये केली.

पॉन्टिंगला पहिल्या 3 टेस्टमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. सीरिजमधील चौथ्या टेस्टमध्ये त्याला पहिल्यांदा संधी मिळाली. इंग्लंडची पहिली इनिंग 172 रनवर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना पॉन्टिंग मैदानात उतरला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 आऊट 50 अशी नाजूक झाली होती. पॉन्टिंगनं ओपनर मॅथ्यू एलियटसोबत पाचव्या विकेटसाठी 268 रनची पार्टनरशिप केली. यामध्ये पॉन्टिंगचा वाटा 127 रनचा होता. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 9 आऊट 501 रन केले. त्यानंतर ती टेस्ट एक इनिंग आणि 61 रननं जिंकली.

197 वि. पाकिस्तान, पर्थ, 1999

पाकिस्तान सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टमधील तीन इनिंगमध्ये पॉन्टिंगचा स्कोअर होता 0,0 आणि 0. वासिम,वकार आणि शोएब या तीन्ही पाकिस्तानी फास्ट बॉलर्सनी पॉन्टिंगला आऊट केले होते. त्यानंतर पर्थमध्ये झालेल्या सीरिजमधील तिसऱ्या टेस्टमध्ये पॉन्टिंगने त्याच्या कारकिर्दीमधील एक बेस्ट इनिंग खेळली.

पर्थ टेस्टमध्ये पॉन्टिंग बॅटींगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 आऊट 54 अशी होती. त्यावेळी सीरिजमध्ये अजिबात फॉर्ममध्ये नसलेल्या पॉन्टिंगनं पाकिस्तानच्या बॉलर्सना कोणतीही संधी न देता बॅटींग (Ricky Ponting Birthday)  केली. अक्रम, अख्तर, अझर महमूद आणि सकलेन मुश्ताक हे पाकिस्तानचे बॉलर्स त्यापुढे निष्प्रभ ठरले. पॉन्टिंगने पाचव्या विकेट्ससाठी जस्टीन लँगर (Justin Langer) सोबत 327 रनची पार्टनरशिप केली. पॉन्टिंगची डबल सेंच्युरी फक्त 3 रनने हुकली. पण, ऑस्ट्रेलियाने ती टेस्ट 1 इनिंग आणि 20 रनने जिंकली.

लँगरचा जीव वाचवण्यासाठी पॉन्टिंग इनिंग घोषित करणार होता!    

257 विरुद्ध भारत, मेलबर्न, 2003

रिकी पॉन्टिंगने भारतीय बॉलर्सना नेहमीच त्रास दिला आहे. त्याचा टेस्टमधील बेस्ट स्कोअर देखील भारताविरुद्ध आहे. 2003 साली मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये त्याने 257 रनची सर्वोच्च इनिंग खेळली. त्या सीरिजमधील अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही पॉन्टिंगनं डबल सेंच्युरी झळकावली होती. तरीही ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता.

त्यानंतरची टेस्ट मेलबर्नमध्ये होती. वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) धाडसी 195 रनमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 366  रनचा आव्हानात्मक स्कोअर केला होता. त्याला उत्तर देताना पॉन्टिंगनं अ‍ॅडलेडमधीर फॉर्म कायम ठेवला. त्याने तब्बल 458 मिनिटे बॅटींग करत 25 फोरसह 257 रन काढले. पॉन्टिंगच्या या सर्वोच्च स्कोअरमुळे (Ricky Ponting Birthday)  ऑस्ट्रेलियाने ती टेस्ट 9 विकेट्सने जिंकली.

156 विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर 2005

ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या 108 टेस्टचा पॉन्टिंग सदस्य होता. त्याला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये फार कमी वेळा टेस्ट मॅच वाचवण्यासाठी बॅटींग करावी लागली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये 2005 साली प्रचंड चुरशीने झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमधील मँचेस्टर टेस्ट ही अशाच एका दुर्मिळ टेस्टपैकी होती.

मायकल वॉनच्या इंग्लंड टीमनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 4 सेशनमध्ये 423 रनचे टार्गेट ठेवले होते. इंग्लिश टीमच्या विजयाच्या मार्गात पॉन्टिंग पहाडासारखा उभा राहिला. त्याने त्याच्या नैसर्गिक वृत्तीला मुरड घालत मॅच वाचवण्यासाठी बॅटींग केली. पॉन्टिंगनं 411 मिनिटं किल्ला लढवत 275 बॉलचा सामना करत 156 रन काढले.

तीन नंबरला बॅटींगला आलेला पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा आऊट झालेला 9 वा बॅटर होता. ब्रेट ली आणि ग्लेन मॅकग्रा या ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीनं पॉन्टिंगचे हे प्रयत्न व्यर्थ जाऊ दिले नाहीत. त्यांनी ती टेस्ट ड्रॉ केली. त्या इनिंगमध्ये अन्य कोणत्याही ऑस्ट्रेलियन बॅटरला 40 पेक्षा जास्त रन करता आले नव्हते. त्यावरुन पॉन्टिंगनं टेस्टच्या पाचव्या दिवशी आणि चौथ्या इनिंगमधील केलेल्या मास्टर क्लास इनिंगचे (Ricky Ponting Birthday) महत्त्व पटते.

रिकी पॉन्टिंगला वाटत होती भारताच्या एका बॉलरची भीती!

143* विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी, 2006

सिडनी टेस्टमध्ये ग्रॅमी स्मिथने दक्षिण आफ्रिकेची दुसरी इनिंग 6 आऊट 194 रनवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 ओव्हर्समध्ये 287 रनचे टार्गेट दिले. स्मिथचा इनिंग घोषित केली तेव्हा ड्रॉ किंवा दक्षिण आफ्रिकेचा विजय हे दोनच निकाल सर्वांना दिसत होते.

रिकी पॉन्टिंगच्या डोळ्यासमोर फक्त ऑस्ट्रेलियाचा विजय होता. तो पॉन्टिंग आणि ऑस्ट्रेलिया टीमचा सर्वोत्तम काळ होता. 1 आऊट 30 असा स्कोअर होता त्यावेळी बॅटींगला आलेल्या पॉन्टिंगने 159 बॉलमध्ये 16 फोरसह नाबाद 143 रन काढले. त्याने 60.3 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. टेस्टच्या पाचव्या दिवशी चौथ्या इनिंगमध्ये 4.76 च्या स्ट्राईक रेटनं बॅटींग करणे हे कुणालाही सहजासजी जमत नाही. पण, तो रिकी पॉन्टिंग होता. या सारख्याच खेळीमुळे फक्त ऑस्ट्रेलिया नाही तर क्रिकेट विश्वातील बेस्ट बॅटर्समध्ये पॉन्टिंगचे नाव (Ricky Ponting Birthday) हे सुरुवातीला घेतले जाते.

टीप : * ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: