
तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॅट्समन आहे. त्याने फक्त 9 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात मैदानात भरपूर रन काढले. त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर वाद देखील तितकेच घातले. साहेबी पोशाखात, साहेबी थाटात आणि स्वत:च्या धुंदीत रमणाऱ्या देशात तो सर्वार्थाने ‘परदेसी बाबू’ होता. त्याची हेअर स्टाईल, त्याचे टॅटू, त्याचं सेलिब्रेटी स्टेट्स अनेकांना खुपलं. त्याच मंडळींचे डोळे त्याची बॅटींगमधील कल्पकता पाहून दिपले. टीम अडचणीत असताना ती सर्व मंडळी त्याचा धावा करत. आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारत या दोन अवघड दौऱ्यात त्यांनी टेस्ट सीरिज त्याच्याच जीवावर जिंकली. दुर्मिळ वर्ल्ड कप विजेतेपदही पटकावले.
तो आपल्या शर्तीवर क्रिकेट खेळला. आपल्याच मस्तीत टीमच्या बाहेर गेला. आज त्याचीच आक्रमक बॅटींगची पद्धत त्याच्या देशानं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये स्वीकारलीय. ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला, त्या इंग्लंड क्रिकेटची संस्कृती बदलणाऱ्या परदेसी बाबूचा म्हणजेच केव्हिन पीटरसनचा (Kevin Pietresen Birthday) आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी ( 27 जून 1980) पीटरसनचा जन्म झाला.
देश सोडला, कॅप्टननं किट बाल्कनीतून फेकलं
पीटरसनची आई ब्रिटीश तर वडिल आफ्रिकन. तो दक्षिण आफ्रिकेत जन्मला. त्यानं दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. नासिर हुसेनची इंग्लंड टीम 1999 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी सराव सामन्यात त्यानं सुरुवातीला चार विकेट्स घेतल्या त्यानंतर नवव्या क्रमांकावर बॅटींगची संधी मिळूनही 57 बॉलमध्ये नाबाद 61 रन काढले. यामध्ये 4 सिक्सचा समावेश होता. ज्या इंग्लंडच्या टीमविरुद्ध पीटरसननं हा खेळ केला, तोच देश त्याला वर्षभरात गाठावा लागला. आफ्रिकेतील कोटा सिस्टमला कंटाळून त्यानं 2000 साली इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
पीटरसनटची आई इंग्रज असल्यानं त्याला इंग्लंड क्रिकेटमध्ये लगेच प्रवेश मिळाला. तो नॉटींगहॅमशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळू लागला. इंग्लंडकडून खेळण्यासाठी पात्र होण्यासाठी त्याला चार वर्षांचा कालावधी पूर्ण करणे आवश्यक होते. त्याच कालखंडात 2003 साली पीटरसननं ट्रेंटब्रिजच्या पिचवरुन कॅप्टन जेसन गॅलियनशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की जेसननं पीटरसनंचं क्रिकेट किट बाल्कनीतून खाली फेकून दिले होते.
देशद्रोही म्हणून ट्रोलिंग
पीटरसननं चार वर्षांचा आवश्यक कालावधी पूर्ण करताच त्याची इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली. झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी त्याचा भविष्यातील अॅशेस विजयाचा पार्टनर फ्लिंटॉफनं (Flintoof) माघार घेतल्यानं पीटरसनची टीममध्ये निवड झाली. पहिल्याच आंतरराष्ट्रीय वन-डे सीरिजमध्ये त्यानं 104 च्या सरासरीनं रन केले.
पीटरसनची पुढची परीक्षा (Kevin Pietresen Birthday) ही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात होती. त्याचं प्रत्येक मॅचमध्ये आफ्रिकन प्रेक्षकांनी देशद्रोही या शब्दात स्वागत केले. त्याचं अभूतपूर्व ट्रोलिंग केलं. पीटरसननं ट्रोलिंग करणाऱ्या प्रेक्षकांवर हसत आणि आफ्रिकन बॉलर्सना रडवत त्याच्या जन्मदेशाचा पहिला दौरा गाजवला. त्या सीरिजमधील दुसऱ्या वन-डेमध्ये पीटरसननं 96 बॉलमध्ये 108 रन केले. ही सेंच्युरी करुन ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना आफ्रिकन प्रेक्षकांनी त्याची पाठ दाखवत हेटाळणी केली.
पीटरसननं त्या सीरिजमधील पाच वन-डेमध्ये 454 रन काढले. त्यामध्ये 69 बॉलमधील सेंच्युरीचाही समावेश आहे. अखेर दक्षिण आफ्रिकन प्रेक्षकांना त्याच्या खेळाला दाद द्यावी लागली. शेवटच्या वन-डेत पीटरसननं झळकावलेल्या सेंच्युरीला आफ्रिकन प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली.
जिद्द, संघर्ष, गुणवत्तेची कमाल, वर्ल्ड कप व्हिलन बनला देशाचा हिरो!
पहिलीच अॅशेस सीरिज जिंकून दिली
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2005 ची अॅशेस सीरिज (Ashes Series 2005) आजही सर्वांच्या लक्षात आहे. दोन्ही टीमनं अत्यंत चुरशीनं खेळलेल्या त्या सीरिजमध्ये पीटरसननं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. लॉर्ड्सवर पीटरसनचं टेस्ट पदार्पण झालं. त्यानं पहिल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली.
पीटरसननं त्याच्या क्लासचं उदाहण त्या सीरिजमधील अखेरच्या ओव्हल टेस्टमध्ये दाखवलं. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडकडे 73 रनची आघाडी असताना पीटरसन मैदानात उतरला. त्याला ऑस्ट्रेलियन फिल्डर्सनी कॅच सोडून मदत केली, हे खरं आहे. पण त्यानं त्या टेस्टमध्ये ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, शॉन टेट आणि शेन वॉर्न या जगप्रसिद्ध अटॅकवर हल्ला चढवत 7 सिक्सच्या मदतीनं 158 रन केले. पीटरसनच्या पहिल्याच टेस्ट सेंच्युरीमुळे (Kevin Pietresen Birthday) इंग्लंडनं ओव्हल टेस्ट ड्रॉ केली आणि ती अॅशेस सीरिज 2-1 नं जिंकली.
मेणबत्तीमधील 100 व्होल्टचा बल्ब
पीटरसननच्या करियरनं आता वेग घेतला होता. श्रीलंकेची टीम 2006 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर आली. त्यावेळी त्याने एजबस्टन टेस्टमध्ये मुरलीधरनला (Muralitharan) स्विच हिट सिक्स (Switch Hit) मारला. पीटरसनचा तो शॉट पूर्णपणे नवा होता. त्यावेळी त्यावर बराच वाद झाला. अखेर दोन वर्षांनी आयसीसीनं तो शॉट अधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब केले. त्या सीरिजमध्ये पीटरसननं सलग तीन टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली. ही कामगिरी करणारा तो ग्रॅहम गूच (Graham Gooch) नंतरचा पहिलाच इंग्लिश बॅट्समन होता. त्यानंतर पुढे पीटरसननं न्यूझीलंड विरुद्ध स्कॉट स्टायरिसला दोन स्विच हिटवर सिक्स लगावले.
2007 च्या वर्ल्ड कपपूर्वी (Cricket World Cup 2007) झालेल्या ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये पीटरसननं 50 पेक्षा जास्त सरासरीनं रन केले. तो वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्येही फॉर्मात होता. पीटरसननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरी झळकावली. वर्ल्ड कपमध्ये 1996 नंतर सेंच्युरी करणारा पीटरसन (Kevin Pietresen Birthday) हा इंग्लंडचा पहिला बॅट्समन होता. इंग्लंडच्या वर्ल्ड कपमधील शेवटच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने पुन्हा एकदा सेंच्युरी झळकावली. तसंच ब्रायन लाराला (Brian Lara) रन आऊट केले. लाराच्या महान आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट पीटरसनच्या थ्रो मुळे झाला.
पीटरसननं वर्ल्ड कपमध्ये 55.5 च्या सरासरीनं 444 रन काढले. ‘मेणबत्तीच्या प्रकाशातील इंग्लंडच्या टीममधील 100 व्होल्टचा बल्ब’ असं पीटरसनच्या त्या कामगिरचे वर्णन करण्यात आले होते.
कॅप्टन म्हणून निवड आणि हकालपट्टी
मायकल वॉननं (Michael Vaughan) राजीनामा दिल्यानंतर पीटरसनची इंग्लंड टीमचा कॅप्टन म्हणून निवड झाली. ब्रिटीश क्रिकेटचा त्याला ‘आपलं’ म्हणण्याचा तो सर्वोच्च प्रयत्न होता. 2008 साली पीटरसन कॅप्टन म्हणून भारत दौऱ्यावर आला. मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे इंग्लंड टीम 7 वन-डेची मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतली. त्यावेळी पीटरसनची टीम 0-5 नं मागे होती.
इंग्लंडची टीम काही दिवसांनी पुन्हा भारतामध्ये टेस्ट सीरिज खेळण्याठी आली. ‘दहशतवादी वृत्तीचा पराभव करण्यासाठी आपण क्रिकेट खेळलं पाहिजे’, ही आग्रही भूमिका पीटरसननं त्यावेळी घेतली होती. दोन्ही टीममध्ये त्या सीरिजमध्ये चुरशीचा सामना झाला. भारतीय बॅट्समन्सनी चेन्नई टेस्टमध्ये जिद्दीनं खेळ करत मोठ्या स्कोअरचा यशस्वी पाठलाग केला आणि ती सीरिज 1-0 नं जिंकली.
जेंव्हा, वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारतानं चेन्नई टेस्ट जिंकली होती!
या दौऱ्यात कॅप्टन पीटरसनचे (Kevin Pietresen Birthday) इंग्लंडचे हेड कोट पीटर मूर्स (Pieter Moores) यांच्याशी मतभेद विकोपाला गेले. पीटरसननं त्यांच्यावर जाहीर टीका केली. त्यामुळे मूर्स यांची कोचपदावरुन हकालपट्टी झाली. पण इंग्लंड बोर्डानं त्याचवेळी पीटरसनलाही कॅप्टन पदावरुन दूर केले. त्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन बनलेल्या अँण्ड्रयू स्ट्रॉस (Andrew Strauss) आणि अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांच्याशी पीटरसनचे संबंध कायमच तणावग्रस्त राहिले.
मोठ्या विजयांचा शिल्पकार
केव्हिन पीटरसन कॅप्टनपदावरुन दूर झाला असला तरी इंग्लंडची बॅटींग त्याच्यावरच अवलंबून होती. त्याच्या मदतीला आता अॅलिस्टर कूक (Alastair Cook) आला होता. या दोघांनी इंग्लंडसाठी भरपूर रन करण्यास सुरुवात केली. अॅडलेडमध्ये 2010 साली झालेल्या अॅशेस टेस्टमध्ये पीटरसननं त्याच्या करियरमधील सर्वोच्च 227 रन काढले. इंग्लंडने तब्बल 24 वर्षांनी ऑस्ट्रेलियात अॅशेस सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामध्ये पीटरसनचा फॉर्म हा एक फॅक्टर होता.
वेस्ट इंडिजमध्ये 2010 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपचं इंग्लंडनं विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या कपाटातील दुर्मिळ ICC ट्रॉफीतील ती एक ट्रॉफी आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये पीटरसन ‘मॅन ऑफ द टुर्नामेंट’ ठरला. त्याने त्या वर्ल्ड कपमध्ये 62 च्या सरासरीनं 248 रन काढले. यामध्ये फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढलेल्या निर्णायक 47 रनचा समावेश आहे.
पीटरसन भारतामध्ये झालेल्या 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये फिटनेसमुळे खेळू शकला नाही. त्यानंतर वर्षभराने झालेल्या भारत दौऱ्यात त्याने ती कसर भरुन काढली. त्या सीरिजमधील मुंबई टेस्टमध्ये स्पिन बॉलिंगला साध देणाऱ्या पिचवर पीटरसनने 186 रन काढले. कोणत्याही विदेशी बॅट्समननं भारतामधील आव्हानात्मक परिस्थितीमध्ये केलेल्या सर्वोत्तम खेळीपैकी ती खेळी आहे. पीटरसनच्या (Kevin Pietresen Birthday) सेंच्युरीमुळे इंग्लंडने ती टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकली. 1985 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडला भारतामध्ये टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळाला.
वादग्रस्त शेवट
इंग्लंडचा ‘ऑल टाईम ग्रेट’ बॅट्समन असलेल्या पीटरसनचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी वाद सुरुच होते. आयपीएलमध्ये सुपरस्टारचं स्टेटस लाभलेला तो पहिला इंग्लिश क्रिकेटपटू होता. आयपीएल खेळण्यासाठी त्याने 2012 साली काही काळाकरता लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
त्याच काळात पीटरसननं केलेल्या काही वादग्रस्त ट्विट्मुळे आर्थिक दंड सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेची टीम 2012 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर आली त्यावेळी इंग्लंड बोर्डाशी पीटरसनचा वाद शिगेला पोहचला होता. त्या परिस्थितीमध्ये त्याने हेंडिग्ले टेस्टमध्ये 149 रनची सुंदर खेळी केली. या खेळीनंतर लगेच तो वादात सापडला. त्याने अँण्ड्रयू स्ट्रॉसबद्दलचे आक्षेपार्ह मेसेज दक्षिण आफ्रिकन प्लेयर्सना पाठवल्याचं उघड झालं. यामुळे फॉर्मातील पीटरसनला लॉर्डस टेस्टमधून वगळण्यात आले. त्याचवर्षी श्रीलंकेत झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची टीम विजेतेपद राखण्यासाठी उतरली त्यावेळी त्यांच्या विजेतेपदाचा शिल्पकार असलेल्या पीटरसनला (Kevin Pietresen Birthday) टीममध्ये स्थान नव्हते.
पीटरसन 2013-14 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या अॅशेस सीरिजमध्ये अखेरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. ऑस्ट्रेलियानं एकतर्फी जिंकलेल्या त्या सीरिजमध्ये पीटरसननं इंग्लंडकडून सर्वात जास्त रन काढले होते. या मानहानीकारक पराभवानंतर पीटरसनशी ज्यांचं सैदव वाजलं ते हेड कोच अँडी फ्लॉवरनी राजीनामा दिला.तसेच पीटरसनला देखील टीममधून वगळण्यात आले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली.
टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन करण्याची क्षमता असलेल्या पीटरसनच्या कारकिर्दीचा शेवट वयाच्या 32 व्या वर्षी झाला. त्याच्यात आणखी किमान पाच -सहा वर्ष क्रिकेट खेळण्याची क्षमता होती. तो तितकं क्रिकेट खेळला असता तर त्याने आणखी कित्येक विक्रम केले असते, तसंच इंग्लंडला संस्मरणीय विजय मिळवून दिले असते.
पीटरसनला नाकारणे अशक्य!
क्रिकेट असो वा आयुष्य त्यामध्ये जर-तर वृत्तीला जागा नसते. त्यामुळे पीटरसनच्या न झालेल्या कारकीर्दीचा विचार करणे योग्य नाही. पण त्याने जे आक्रमक क्रिकेट इंग्लंडच्या टीममध्ये आणलं त्याच क्रिकेटचं इऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) टीमनं अनुकरण केलं. त्यामुळेच आज इंग्लंडची टीम लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील बलाढ्य टीम बनली आहे. त्यांनी 2019 साली इतिहासात पहिल्यांदाच वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. पीटरसनच्या खेळामुळे (Kevin Pietresen Birthday) त्याचे फॅन्स आणि वादग्रस्त वर्तनुकीमुळे टीकाकार जगभर खूप आहेत. पण त्याचं इंग्लंड क्रिकेटच्या भरारीमध्ये असलेलं सर्वोच्च योगदान कुणालाही नाकारता येणार नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.