फोटो – ट्विटर/@PakPassion

फास्ट बॉलर्सच्या विश्वात वासिम अक्रम (Wasim Akram) हे नाव नेहमी आदराने घेतले जाते. अगदी साध्या वाटणाऱ्या बॉलिंग अ‍ॅक्शनच्या जोरावर वेगाने आणि वैविध्यपूर्ण बॉलिंग टाकण्याची त्याच्यात क्षमता होती. अक्रम 1984 ते 2003 अशी 19 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्या काळात किंवा अगदी आजही त्याच्यासारख्या दर्जाचा क्रिकेटपटू टीममध्ये असावा असं प्रत्येक टीमचं स्वप्न असतं. स्विंगचा सुलतान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्रमचा आज वाढदिवस (Wasim Akram Birthday) आहे. आजच्याच दिवशी (3 जून 1966) साली अक्रमचा जन्म झाला.

पैसे किती सोबत घेऊ?

पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान (Imran Khan) हा अक्रमचा मेंटॉर. पण त्याला शोधण्याचं काम इम्रानचा प्रतिस्पर्धी जावेद मियाँदाद (Javed Miandad) याने केले. अक्रमची वयाच्या 18 व्या वर्षी राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्यात मियाँदादचा मोठा वाटा होता.

न्यूझीलंडची टीम 1984 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात अक्रम खेळला. त्याने पहिल्याच इनिंगमध्ये सात विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर वन-डे टीममध्ये त्याचा समावेश झाला. या मालिकेनंतर पाकिस्तानची टीम लगेच न्यूझीलंडला जाणार होती. तो अक्रमचा पहिला पूर्णवेळ दौरा. या दौऱ्याच्या पूर्वी त्याने मियाँदादला खर्चासाठी पैसे किती सोबत घेऊ? असा प्रश्न विचारला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड राष्ट्रीय टीममध्ये निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा खर्च करतं हे त्याला माहिती देखील नव्हतं.

लेफ्ट आर्म इम्रान खान

वासिम अक्रम टीमध्ये आला त्यावेळी तो तरुणपणीच्या इम्रान खानची लेफ आर्म फास्ट बॉलिंग करणारा कॉपी वाटत असे. त्याच्या जडणघडणीमध्ये इम्रानचा मोठा वाटा आहे. रिव्हर्स स्विंगची कला तो इम्रानकडूनच शिकला. इम्रानने त्याचा वेग, त्याचा फिटनेस याकडे सुरुवातीच्या काळात लक्ष दिले. अक्रमच्या गुणवत्तेला इम्रानने पैलू पाडले.

अक्रमने क्रिकेट कारकिर्दीमधील दुसऱ्याच टेस्टमध्ये न्यूझीलंड विरुद्ध एका इनिंगमध्ये 5 आणि एका टेस्टमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर महिनाभरातच चॅम्पियन्स सीरिजमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध 21 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या पाचही टॉपच्या बॅट्समनना त्याने त्या वन-डेमध्ये आऊट केले होते.

अक्रम 1986-87 मध्ये भारतामध्ये टेस्ट खेळण्यासाठी आला. त्यावेळी त्याने इनस्विंगर आणि बाऊन्सवरवर सुनील गावसकर, श्रीकांत आणि दिलीप वेंगसरकर यांना सातत्याने चकवलं. त्याने 1989 आणि 1990 साली शारजामध्ये झालेल्या वन-डे मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली. या दोन्ही हॅटट्रिकमधील सर्व सहा विकेट्स त्याने बॅट्समनची दांडी उडवून घेतल्या आहेत. या सर्व कामगिरीनंतरही 1990 सालापर्यंत अक्रमच्या (Wasim Akram Birthday) कालखंडातील सर्वोत्तम कालखंड सुरु झालाच नव्हता.

पाकिस्तान क्रिकेटमधील मिस्टर अनफिट!

1992 वर्ल्ड कप

क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देण्याचे इम्रान खानचे स्वप्न वासिम अक्रमशिवाय पूर्ण होऊच शकले नसते. त्याने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1992) इम्रान खानला वर्ल्ड कपची गुरुदक्षिणा द्यायची या एकाच ध्येयानं बॉलिंग केली.

वासिम अक्रमने (Wasim Akram Birthday) 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये फक्त 3.76 च्या इकॉनॉमी रेटनं सर्वात जास्त 18 विकेट्स घेतल्या. इंग्लंड विरुद्ध झालेल्या फायनलमध्ये त्याने इयान बोथम (Ian Botham) अ‍ॅलन लॅम्ब आणि कार्ल लुईस यांना आऊट करत पाकिस्तानच्या पहिल्या विजेतपदावर शिक्कामोर्तब केले.

अक्रमचा बेस्ट कालखंड

1992 वर्ल्ड कपनंतर अक्रमच्या जोडीला वकार युनूस (Waqar Younis) आला. वासिम- वकार या फास्ट बॉलर्सच्या जोडीनं 1990 च्या दशकात क्रिकेट विश्वावर राज्य केले. अक्रमने 1990 ते 1997 या काळात 48 टेस्टमध्ये 240 विकेट्स घेतल्या. यामध्ये 16 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेटस आणि 3 वेळा एका टेस्टमध्ये 10 विकेट्सचा समावेश आहे. या काळात तो 12 टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच होता.

अक्रमचा दबदबा 1997 नंतरही सुरुच होता. चेन्नईत 1998 साली झालेल्या अविस्मरणीय टेस्टमध्ये तो पाकिस्तानचा कॅप्टन होता. त्याने त्या टेस्टमध्ये एका अप्रतिम बॉलवर राहुल द्रविडला (Rahul Dravid) आऊट केलं. सचिनच्या झुंजार सेंच्युरीनंतरही पाकिस्तानला मॅचमध्ये परत आणलं आणि टेस्ट जिंकली.

1999 साली श्रीलंकेविरुद्ध सलग दोन टेस्टमध्ये हॅट्ट्रिक घेत अक्रमनं (Wasim Akram Birthday) पाकिस्तानला आशिया कप टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून दिली. त्याचवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अक्रमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने फायनलपर्यंत धडक मारली होती. टेस्ट असो वा वन-डे बॉलिंगमधील अनेक रेकॉर्ड अक्रमनं या काळात स्वत:च्या नावावर केले.

‘रिव्हर्स स्विंगसाठी वकार युनूस लबाडी करत होता’ पाकिस्तानच्या बॉलरचा घरचा आहेर

बेभरवशाचा धोकादायक बॅट्समन

वासिम अक्रमने त्याच्या बॅटींग कौशल्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याने 1996 साली झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये 22 फोर आणि 12 सिक्सच्या मदतीनं नाबाद 257 रनची खेळी केली होती. यावेळी त्यानं ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताकसोबत (Saqlain Mushtaq) सोबत 8 व्या विकेट्ससाठी 313 रनची पार्टरनरशिप केली.

अक्रमनं (Wasim Akram Birthday) फक्त झिम्बाब्वे सारख्या कमकुवत टीमला बॅट्नं तडाखा दिला असा नाही. त्याने 1990 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेडमध्ये पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली होती. त्याचवर्षी त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन-डेमधील त्याची सर्वोच्च 86 रनची खेळी केली. 1986 साली फैसाबाद टेस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या धोकादायक बॉलिंग अटॅकसमोर 66 रनची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. 1989 साली नेहरु कप स्पर्धेत रिचर्डसच्या बॉलिंगवर सिक्स लगावत पाकिस्तानच्या विजेतेपदावर अक्रमनेच शिक्कामोर्तब केले.

फिक्सिंगचा संशयित

वासिम अक्रमच्या या महान क्रिकेट कारकिर्दीवरही मॅच फिक्सिंगची सावली आहे. तो 1996 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 1996) पाकिस्तानचा कॅप्टन होता. भारताविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये फिक्सर्सच्याच संगनमताने दुखापतीचं कारण देत त्यानं माघार घेतली असा आरोप तेव्हा झाला होता. अक्रम कॅप्टन असताना 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्ध धक्कादायक पराभव झाला होता. त्या पराभवावर देखील फिक्सिंगचा आरोप झाला होता.  

जेव्हा जडेजानं केली होती पाकिस्तानची धुलाई, VIDEO

मॅच फिक्सिंगच्या चौकशीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नेमलेल्या न्या. कय्यूम (Justice Qayyaum) य़ांनी अक्रमवर संशय व्यक्त केला होता. या अहवालानंतर सलीम मलिक आणि आता-उरृ-रहेमान यांच्यावर पाकिस्तान बोर्डाने आजीवन बंदी घातली. तर अक्रमची कॅप्टनसी काढून घेण्यात आली तसंच त्याच्यावर आर्थिक दंडही ठोठावला.

वासिम अक्रम (Wasim Akram Birthday) 2003 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शेवटचा खेळला. त्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे आव्हान सुपर सिक्समध्येच संपुष्टात आले. त्यानंतर अक्रमची टीममधून हकालपट्टी करण्यात आली. वयाच्या 30 व्या वर्षी मधूमेहाची लागण झाल्यानंतरही तो पुढे सात वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्यामुळे त्याने बॉलिंगचा वेग कमी केला, पण घातकता तशीच होती. टेस्ट क्रिकेटमध्ये 414 आणि वन-डे क्रिकेटमध्ये 502 जवळपास सारख्या (23.62  आणि 23.52) च्या सरसरीने घेतलेल्या विकेट्स अक्रमच्या महानतेची साक्ष देतात. त्याचवेळी कय्यूम रिपोर्टनंतर मॅच फिक्सिंगचा संशयित ही ओळख अक्रमला त्याच्या ‘महान क्रिकेटपटू’ या उपाधीसह नेहमी मिरवावी लागणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: