
तो स्पिनर्सचा कर्दनकाळ होता. ऑफ साईडचा देव होता. शॉर्ट पिच बॉलवर त्याचं तंत्र उघडं पडतं म्हणून टीका झाली. लॉर्ड्सवर शर्ट काढण्याच्या त्याच्या बेडर वृत्तीचं ज्यांनी कौतुक केलं, त्याच फॅन्सनी नागपूर टेस्टमध्ये ऐनवेळी माघार घेण्याच्या निर्णयावर टीका केली. त्याला टीममधून वगळल्यानंतर लोकसभेत पडसाद उमटले. ज्या व्यक्तीला त्याने कोच केलं त्यानेच त्याला बाहेर काढलं. त्याच्याच नाकावर टिच्चून त्यानं यशस्वी कमबॅक केलं. त्यानंतर काळाजी पावलं ओळखून तो रिटायर झाला. पण त्याचवेळी आयपीएल सुरू झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमधील कॉर्पोरेट कल्चरचा तो पहिला बळी ठरला. आज त्याच भारतीय क्रिकेटचं तो प्रशासकीय नेतृत्त्व करत आहे. टीम इंडियाला नवी उर्जा देणाऱ्या, क्रिकेटपटूंची एक टीम तयार करणाऱ्या आणि लढायला शिकवणाऱ्या दादाचा म्हणजेच सौरव गांगुलीचा आज वाढदिवस (Sourav Ganguly Birthday) आहे. आजच्याच दिवशी (8 जुलै 1972) सौरव गांगुलीचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या इतका टोकाचा प्रवास खूप कमी क्रिकेटपटूंनी अनुभवला असेल.
दादा होण्यापूर्वीचा महाराजा
सौरव गांगुलीनं वयाच्या 17 व्या वर्षी बंगालकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली (Snehashish Ganugly) ची जागा घेतली. त्यानंतर वर्षभरानी टेस्ट क्रिकेटमध्ये हाच प्रसंग मार्क वॉ आणि स्टीव्ह वॉ यांच्यात घडला. दिल्ली विरुद्ध झालेल्या रणजी फायनलमध्ये गांगुलीनं 3 विकेट्स घेतल्या. तसंच दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात मनोज प्रभाकर आणि अतुल वासन या अनुभवी बॉलर्सचा सामना करत नाबाद 22 रन काढले.
तो गांगुलीचा दादा होण्यापूर्वीचा काळ होता. त्यावेळी त्याची महाराजा अशी ओळख होती. गांगुलीच्या लांब सिक्सची चर्चा कोलकातामध्ये सुरू झाली. बंगालची टीम त्याच्याकडे बॅटींग ऑल राऊंडर म्हणून पाहत होती. त्याने दुलिप ट्रॉफी स्पर्धेत बलाढ्य वेस्ट झोन विरुद्ध सेंच्युरी झळकावली. रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये श्रीनाथ, प्रसाद आणि कुंबळे यांचा सामना करत कर्नाटक विरुद्ध 74 रन काढले. एका रणजी सिझनमध्ये 570 रन काढल्यानंतर त्याची 1991 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने ड्रिंक्स घेऊन जाण्यास नकार दिला अशी चर्चा होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकमेव वन-डेमध्ये तो फक्त 13 बॉल मैदानात टिकला. दोन प्रॅक्टीस मॅचमध्ये त्याला कमाल करता आली नाही. त्यामुळे त्यानंतर चार वर्ष त्याला टीममध्ये पुन्हा संधी मिळण्याची वाट पाहावी लागली.
स्वप्नवत पदार्पण
क्रिकेट वर्ल्ड कप 1996 (Cricket World Cup 1996) नंतर निवड समितीनं नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) सोबत गांगुलीचीही इंग्लंड दौऱ्यावर निवड झाली. इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या एजबस्टन टेस्टमध्ये चार जणांनी भारताकडून पदार्पण केले. त्यात गांगुली-द्रविड नव्हते. त्यानंतर पुढच्या लॉर्ड्स टेस्टवर दोघांना टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
गांगुलीनं टेस्ट पदार्पणातच सेंच्युरी (Sourav Ganguly Birthday) झळकावली. द्रविड सोबत मॅच वाचवणारी पार्टरनरशिप केली. त्यानंतर नॉटींगहॅम टेस्टमध्ये 136 रन काढले. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याची ज्या महाराजा नावानं हेटाळणी होत असे तेच नाव त्याला आदराने घेतले जाऊ लागले. त्यानंतरच्या दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये सलग तिसरी सेंच्युरी झळकावण्याची संधी गांगुलीला होता. पदार्पणानंतर पहिल्या तीन टेस्टमध्ये सेंच्युरी करण्याचा पराक्रम फक्त अझहरुद्दीननं केला होता. मात्र गांगुलीची ही संधी हुकली. तो 66 रनवर ब्रॅड हॉगच्या बॉलिंगवर संशायस्पद कॅच आऊट झाला.
गांगुलीची ऐतिहासिक सेंच्युरी, द्रविडनं टेस्ट क्रिकेटमध्ये खेळला पहिला बॉल
शेजाऱ्यांवर विशेष प्रेम
सौरव गांगुलीचं पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन शेजारी देशांवर विशेष प्रेम होते. श्रीलंकेविरुद्ध 1997 साली चार टेस्टमध्ये त्यानं तीन सेंच्युरी झळकावल्या. पाकिस्तान विरुद्ध टोरंटोमध्ये झालेल्या सहारा कप स्पर्धेत तो सलग चार वन-डे मॅचमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ होता.
टोरंटोमध्ये 1997 साली झालेला सहारा कप हे गांगुलीच्या ऑल राऊंडर म्हणून करियरमधील सर्वोच्च शिखर (Sourav Ganguly Birthday) होते. 5 वन-डे मॅचच्या त्या सीरिजमध्ये तिसरी वन-डे अर्धवट रद्द झाल्यानं एकूण 6 वन-डे खेळल्या गेल्या. त्यामध्ये गांगुलीनं 55.5 च्या सरासरीनं 222 रन काढले आणि 15 विकेट्स घेतल्या. त्या सीरिजमध्ये अन्य 10 जणांनी मिळून 6 मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त रन काढले आणि 15 विकेट्स घेतल्या होत्या.
1998 मध्येच पाकिस्तान विरुद्ध ढाकामध्ये झालेल्या फायनलमध्ये गांगुलीनं 315 रनचा पाठलाग करताना 124 रन काढत विजयाचा पाया रचला. त्यानंतर वर्षभरानी 1999 साली क्रिकेट वर्ल्ड़ कपमध्ये (Cricket World Cup 1999) श्रीलंकेविरुद्ध मुरलीधरन आणि कंपनीची धुलाई करत 183 रन काढले. कपिल देवचा 175 रनचा रेकॉर्ड त्याने मोडला. सईद अन्वरचा 194 रनचा रेकॉर्ड मोडण्याच्या प्रयत्नात आऊट होण्यापूर्वी गांगुलीनं 17 फोर आणि 7 सिक्सचा वर्षाव केला होता. त्याच वन-डेमध्ये त्याने राहुल द्रविडसोबत वन-डे क्रिकेटच्य इतिहासातील पहिली 300 पेक्षा जास्त रनची पार्टरनरशिप केली.
गांगुलीचं शेजाऱ्यावरील प्रेम नव्या शतकातही सुरु होते. राजेश चौहानच्या सिक्समुळे गाजलेल्या कराची वन-डेमध्ये गांगुलीनं 89 रन काढले. वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च 183 श्रीलंकेविरुद्ध काढणाऱ्या गांगुलीनं 2007 साली पाकिस्तान विरुद्ध बंगळुरु टेस्टमध्ये 239 रनची सर्वोच्च खेळी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये गांगुलीची (Sourav Ganguly Birthday) ती एकमेव डबल सेंच्युरी आहे.
सचिन, द्रविड सोबत पार्टनरशिप
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या जोडीनं वन-डे क्रिकेटमध्ये पार्टरनरशिपचे अनेक रेकॉर्ड केले. त्यांनी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 21 वेळा शतकी पार्टनरशिप केली आहे. यापैकी 3 वेळा या जोडीनं 240 पेक्षा जास्त रनची पार्टरनरशिप केली आहे. त्याचबरोबर या दोघांनी एकत्र 8227 रन काढले आहेत. हे दोन्ही रेकॉर्ड आजही कायम आहेत.
गांगुली-सचिन जोडीची लक्षात न राहणारी बाब म्हणजे या जोडीनं टेस्ट क्रिकेटमध्ये 61.36 च्या सरासरीनं 4173 रनची पार्टनरशिप केली आहे. यामध्ये 12 शतकी पार्टनरशिपचा समावेश आहे. गांगुलीनं राहुल द्रविड सोबत वन-डे क्रिकेटमध्ये 11 शतकी पार्टनरशिपसोबत 4363 रन जोडले आहेत.
कॅप्टन गांगुली
भारतीय क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणानंतरच्या कठीण काळात सौरव गांगुली (Sourav Ganguly Birthday) टीमचा कॅप्टन बनला. त्याच्याच काळात नवी टीम इंडिया तयार झाली. त्या टीममध्ये वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, युवराज सिंग, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ हे मॅच विनर तयार झाले. सचिन, द्रविड, लक्ष्मण यांचा खेळ त्याच्याच कॅप्टनसीमध्ये बहरला. कुंबळेला नवा फॉर्म मिळाला. सेहवागला स्थिरता लाभली आणि महेंद्रसिंह धोनीचा उदय झाला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये फॉलोऑन मिळाल्यानंतरही टीम इंडियाने ती टेस्ट जिंकण्याचा पराक्रम गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये केला. 2000 साली झालेल्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पावसानं वाहून गेल्यानंतर संयुक्त विजेतेपद मिळवले. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज बरोबरीत सोडवली. पाकिस्तानात ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत गांगुलीनं शर्ट काढून केलेला जल्लोष क्रिकेट फॅन कधीही विसरणार नाहीत.
गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये भारताने बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या देशात टेस्ट मॅच जिंकल्या. टीम इंडियाने विदेशात विशेषत: भारतीय उपखंडाच्या बाहेर त्याच्या कॅप्टनसीमध्ये टेस्ट जिंकण्यास सुरुवात केली. 2003 साली 20 वर्षांनी (Cricket World Cup 2003) वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल गाठली.
सौरव गांगुलीच्या कारकिर्दीमध्ये टीम इंडियानं 49 पैकी 21 टेस्ट जिंकल्या तर 13 गमावल्या. तर 146 पैकी 76 वन-डे जिंकल्या आणि 65 गमावल्या. त्याने कॅप्टनसी सोडली तेव्हा तो टीम इंडियाचा टेस्टमधील पहिल्या क्रमांकाचा तर वन-डेमध्ये निसटत्या अंतरानं दुसऱ्या क्रमांकाचा कॅप्टन होता.
वीरेंद्र सेहवागनं शिकवला कॅप्टनसीचा मोठा धडा, गांगुलीचा गौप्यस्फोट
चॅपेलसोबत वाद
सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांच्यातील वाद हा 21 व्या शतकातील पहिल्या दशकात भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा होता. ग्रेग चॅपेलच्या मार्गदर्शनामुळेच गांगुलीनं ऑस्ट्रेलियात 2003 साली पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. ब्रिस्बेन टेस्टमध्ये गांगुलीनं काढलेल्या 144 रनमुळेच संपूर्ण सीरिजची दिशा निश्चित झाली होती. गांगुलीच्या शिफारशीमुळेच जॉन राईटनंतर चॅपेल टीम इंडियाचे कोच बनले.
चॅपेल येण्यापूर्वीच गांगुलीचा बॅट्समन म्हणून फॉर्म कमालीचा घसरला होता. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होम गाऊंडवर 35 वर्षांनी टेस्ट सीरिज गमावली. त्यानंतर पाकिस्ताननंही भारतामध्ये येत भारतीय टीमला पराभूत केले.
गांगुलीचा बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून बॅड पॅच सुरु असताना चॅपेल यांचे कोच म्हणून आगमन झाले. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात त्यांच्याकडे शिकायला आलेला गांगुली हा नाहीच, असं त्यांचं मत झालं. चॅपेल यांच्या मते गांगुलीला कोचची गरज नव्हती. तर एक राजकीय सहकारी हवा होता.
झिम्बाब्वेच्या दौऱ्यात गांगुली-चॅपेल वादाचा वणवा पटेला. गांगुलीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारा ईमेल चॅपेल यांनी निवड समितीच्या सदस्यांना पाठवला. तो ईमेल लीक झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला. गांगुलीनं दौरा सोडून देण्याचा इशारा दिला. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर किरण मोरेंच्या (Kiran More) अध्यक्षतेखालील निवड समितीनं गांगुलीची टीममधून हकालपट्टी केली.
टीम इंडियातच्या माजी कोचनं पुन्हा गरळ ओकली, गांगुलीवर केले असंख्य आरोप
हकालपट्टीनंतरचे वादळ
गांगुलीच्या हकलपट्टीचे पडसाद कोलकातामधील सडकेपासून ते संसदेपर्यंत ((Sourav Ganguly Birthday) उमटले. कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी टीम इंडियाची हुर्रै उडवत आफ्रिकेच्या खेळाडूंना पूर्ण पाठिंबा दिला. त्यातच चॅपेल यांनी प्रेक्षकांना उद्देशून मधले बोट दाखवल्यानं परिस्थिती आणखी चिघळली.
भारत कोलकाता टेस्ट हरत असतानाच गांगुलीनं पुण्यात महाराष्ट्राविरुद्ध कमाल केली. 159 रन काढले आणि 5 विकेट्स घेतल्या. इडन गार्डनच्या स्कोअरबोर्डवर त्या मॅचचे अपडेट्स नियमित अंतराने दाखवण्यात येत होते. यापूर्वी कोणत्याही आंतरराष्ट्रीय मॅचच्या दरम्यान स्थानिक मॅचचा स्कोअर दाखवण्याचा प्रकार कोलकातामध्ये घडला नव्हता.
दमदार कमबॅक
सौरव गांगुलीनं 2005-06 च्या देशांतर्गत क्रिकेटच्या सिझनमध्ये 52.10 च्या सरासरीने 521 रन काढले आणि 19 विकेट्स घेतल्या. किरण मोरेंनंतर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) निवड समितीचे अध्यक्ष झाले. हा खांदेपालट होताच दक्षिण आफ्रिकेत जाणाऱ्या सीरिजमध्ये गांगुलीची टीममध्ये निवड झाली.
गांगुलीनं दरम्यानच्या काळात बॅटींगमधील तंत्र बदलले होते. आफ्रिकेत त्याला त्याचा फायदा झाला. वाँडर्स स्टेडियमवर झालेल्या टेस्टमध्ये 4 आऊट 110 अशी अवस्था असताना मैदानात आलेल्या गांगुलीनं 51 रन काढत टीम इंडियाला 249 पर्यंत नेले. पुढील टेस्टमध्ये त्याला सहाव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर प्रमोशन देण्यात आले. त्यावेळी त्याने 66 रन काढले.
यशस्वी वर्ष आणि रिटायरमेंट
गांगुलीनं (Sourav Ganguly Birthday) त्यानंतर वन-डे क्रिकेटमध्येही कमबॅक केले. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये 69.40 च्या सरासरीनं 347 रन काढले. श्रीलंकेविरुद्ध तो ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरला. गांगुलीने 2007 साली 12 हाफ सेंच्युरींसह 32 वन-डेमध्ये 1,240 रन काढले.
पाकिस्तान विरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये 102 आणि त्यानंतर बंगळुरु टेस्टमध्ये त्याची सर्वोच्च 239 रनची खेळी खेळली. कानपूरमध्ये 2008 साली दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन, मखाय एंटिनी, मोर्ने मॉर्केल आणि जॅक कॅलिस यांच्या आग ओकणाऱ्या बॉलिंगवर प्रतिकुल पिचवर 87 रनची झुंजार खेळी केली. हरभजन सिंगनं त्या टेस्टमध्ये नंतर 7 विकेट्स घेऊनही ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार गांगुलीनं पटकावला.
ऑस्ट्रेलियात झालेल्या सीबी सीरिजमध्ये तरुणांना संधी देण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या टीममधून गांगुलीला वगळण्यात आले. त्यानंतर गांगुलीनं काळाची पावलं ओळखून रिटायरमेंट घेतली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूरमध्ये खेळलेल्या शेवटच्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये गांगुलीनं 85 रन काढले. तर शेवटच्या टेस्ट इनिंगमध्ये तो डॉन ब्रॅडमन यांच्या प्रमाणे पहिल्याच बॉलवर आऊट (Golden Duck) झाला.
गांगुलीची सेकंड इनिंग
सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर आयपीएलमध्ये फार यशस्वी झाला नाही. त्यानंतर तो क्रिकेट प्रशासनात रमला. बंगाल क्रिकेट असोसिशनचं अध्यक्षपद सांभाळल्यानंतर तो आता बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष आहे.
राजकारणी किंवा व्यावसायिक व्यक्तींनी या अध्यक्षपदाची खूर्ची अनेक वर्ष उबवली होती. त्या बीसीसीआयमध्ये लोढा समितीच्या शिफारशीनंतर झालेल्या बऱ्याच उलथापालथीनंतर गांगुली अध्यक्ष बनला. त्याच्याच अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये भारतामध्ये पहिली डे-नाईट टेस्ट झाली. कोरोना काळात आयपीएल स्पर्धा (IPL 2020) यशस्वी करण्यासाठी गांगुलीनं धावपळ केली. यावर्षीची आयपीएल कोरोना उद्रेकानंतर स्थगित झाल्यानंतर व्यस्त वेळापत्रकामधून त्याने आयपीएलसाठी पुन्हा जागा निर्माण केली.
भारतीय महिलांनी तब्बल 7 वर्षांनी टेस्ट मॅच खेळली. इंग्लंड नंतर महिला टीम ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून तिथे पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट खेळणार आहे. गांगुली राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. तरीही तो क्रिकेटमध्ये ठामपणे उभा आहे. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल करण्याची आणखी गरज आहे, याची त्याला जाणीव आहे. हे बदल होण्यासाठी खेळाडूंचे प्रश्न ओळखणारा गांगुलीसारखा अनुभवी व्यक्ती जास्तीत जास्त काळ अध्यक्षपदी राहण्याची गरज आहे. भारतीय क्रिकेटला त्याच्या दादाची म्हणजेच सौरव गांगुलीची (Sourav Ganguly Birthday) या शतकाच्या सुरुवातीला होती त्याच्यापेक्षा जास्त आज गरज आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.