
गेल्या 10 वर्षात टीम इंडियानं जगाला तीन मोठे क्रिकेटपटू दिले. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin). यापैकी विराट आणि रोहितला त्यांच्या चांगल्या खेळानं प्रसिद्धी, ग्लॅमर हे भरपूर मिळालं. त्या दोघांची टीममधील जागा देखील फिक्स आहे. पण अश्विनचं तसं नाही. ज्या टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनच्या जोरावर टीम इंडियानं मायदेशात प्रत्येक टीमला लोळवलं आहे. त्याच अश्विनची जागा टेस्ट टीममध्ये नक्की नसते. 400 पेक्षा जास्त विकेट्स आणि 5 सेंच्युरी झळकावणाऱ्या अश्विनवर कारकिर्दीमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतानाही सलग चार टेस्ट बाहेर बसण्याची वेळ येते. कोणत्याही अवघड परिस्थितीत कष्टानं आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करत यशस्वी होणाऱ्या भारताचा बेस्ट आणि जगातील ‘ऑल टाईम ग्रेट’ ऑफ स्पिनर आर. अश्विनचा आज वाढदिवस (Ashwin Birthday) आहे. आजच्या दिवशी (17 सप्टेंबर 1986) रोजी अश्विनचा जन्म झाला.
बॅट्समन फर्स्ट
अश्विन त्याच्या बिनतोड ऑफ स्पिन बरोबरच चिवट बॅटींगसाठीही ओळखला जातो. कोलकाता असो सिडनी अश्विननं चिवट बॅटींग करत टीमला संकटातून बाहेर काढलं आहे. अश्विनच्या या बॅटींगचं रहस्य हे त्यानं सुरुवातीला घेतलेल्या ट्रेनिंगमध्ये आहे. त्यानं ओपनिंग बॅट्समन म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे नवीन बॉलचा सामना करण्याचं चांगलं शिक्षण त्यानं घेतलं आहे.
तो 14 वर्षांचा असतानाच त्याला मोठी दुखापत झाली. या दुखापतीमध्ये त्याचं क्रिकेट थांबणार अशी वेळ आली होती. अश्विन त्यामधून सावरला. त्यानं पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पण, त्याची टीममधील ओपनिंग बॅट्समनची जागा गेली. त्यानंतर आईच्या सल्ल्यानं तो ऑफ स्पिनकडं वळला. अभ्यासात हुशार असलेल्या अश्विननं स्पिन बॉलिंगचे बारकावे चटकन आत्मसात केले.
अजंथा मेंडिसनं (Ajantha Mendis) भारतीय बॅटींग ऑर्डर एकहाती उद्धवस्त करण्याच्या काही वर्ष आधीच त्यानं मेंडिसकडून प्रेरणा घेतली होती. चेन्नईतील प्रदर्शनीय मॅचमध्ये अश्विननं मेंडिसला पहिल्यांदा पाहिले. त्याच्या कॅरम बॉलनं तो प्रभावित झाला. पुढे अश्विननं ती विद्या देखील आत्मसात केली. मेंडिस कालांतरानं लुप्त झाला. पण, प्रयोगशील आणि स्वत:ला सतत अपडेट ठेवणाऱ्या अश्विननं स्वत:ला मोठं केलं. आज तो सध्याच्या क्रिकेटमधील जगातील सर्वश्रेष्ठ स्पिनर (Ashwin Birthday) आहे.
Explained: रवीचंद्रन अश्विन स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड का आहे?
IPL मार्गे टीम इंडिया
इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) सर्वप्रथम प्रकाशात आल्यानंतर टीम इंडियात दाखल झालेला अश्विन हा सर्वात मोठा क्रिकेटपटू आहे. त्यानं 2009 साली चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले. पहिल्या वर्षी अश्विन फक्त 2 मॅच खेळला. तो 2010 पासून चेन्नईचा मेन स्पिनर बनला. त्यानं मुरलीधरनची जागा घेतली.
चेन्नईनं 2010 आणि 2011 अशी सलग दोन वर्ष आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या काळात अश्विन हे महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) प्रमुख शस्त्र होते. त्यानं चेन्नईसाठी पॉवर प्ले मध्ये, मिडल ऑर्डरमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये अशा प्रत्येत टप्प्यावर बॉलिंग केली. अगदी सुपर ओव्हर देखील टाकली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अश्विननं ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच 2010 साली त्याची झिम्बाब्वेमधील तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली.
लक्षवेधी पदार्पण
अश्विननं 2010 साली झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सह आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचमध्ये त्यानं तैबूची महत्त्वाची विकेट घेतली. वन-डे टीममध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याचे पदार्पण आणखी जोरात झाले. त्यानं आठव्या क्रमांकावर येत 32 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली आणि नंतर 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतामध्ये झालेल्या वन-डे सीरिजमध्येही अश्विननं चांगली कामगिरी करत टीम इंडियातील जागा पक्की केली.
अश्विननं 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तोपर्यंत तो T20 स्पेशालिस्ट म्हणून उदयाला आला होता. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये किती यशस्वी होईल, याबाबत शंका होती. अश्विननं दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 3 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्या. पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं 128 रन देत 9 विकेट्स घेतल्या. नरेंद्र हिरवाणीच्या 16 विकेट्सनंतर कोणत्याही भारतीय बॉलरनं केलेलं हे सर्वात यशस्वी पदार्पण होते. त्याबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला. पहिल्याच टेस्टमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार पटकावणारा तो तिसरा भारतीय (Ashwin Birthday) ठरला.
टेस्ट क्रिकेटमधील सातत्य
अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) निवृत्तीनंतर आणि हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) उतरत्या काळात अश्विन टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये आला. भारतीय स्पिन बॉलिंगची धुरा त्यानं त्याच्या खांद्यावर पेलली. सुरुवातीच्या काळात प्रग्यान ओझा आणि नंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) बरोबर अश्विननं भारतीय स्पिनर्सचा जगभर दबदबा कायम ठेवला. इंग्लंड विरुद्ध 2012-13 च्या सीरिजमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली. मुंबई टेस्टमध्ये केविन पीटरसननं अश्विनची धुलाई केली. पण त्यामधून तो लगेच सावरला. 2013 साली बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया टीमला त्यानं तडाखा दिला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली टेस्ट अश्विनच्या होम ग्राऊंडवर (Ashwin Birthday) म्हणजेच चेन्नईमध्ये होती. महेंद्रसिंह धोनीच्या 224 रनमुळे ती टेस्ट सर्वांच्या लक्षात आहे. त्या टेस्टमध्ये अश्विननं पहिल्यांदा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. होमग्राऊंडवर 10 विकेट्स घेणारा अश्विन हा पहिला भारतीय बनला. त्या सीरिजमध्ये अश्विननं 29 विकेट्स घेतल्या. टेस्ट सीरिजमध्ये 25 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा अश्विनन हा इरापल्ली प्रसन्ना आणि हरभजन सिंग यांच्यानंतरचा तिसरा ऑफ स्पिनर आहे. या सीरिजमधील यशानंतर अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये मागं वळून पाहिलं नाही.
अश्विनचे रेकॉर्ड्स
टीम इंडिया 2013 पासून भारतामध्ये एकही टेस्ट सीरिज हरलेली नाही. त्यामध्ये अश्विनच्या बॉलिंगचा मोलाचा वाटा आहे. अश्विननं (Ashwin Birthday) आत्तापर्यंत 79 टेस्टच्या कारकिर्दीमध्ये 8 वेळा ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार मिळवला आहे. या यादीमधील तो पहिला भारतीय आणि एकूण तिसरा क्रिकेटपटू आहे.
भारताकडून 50 पासून ते 400 पर्यंतचे विकेट्सचे सर्व टप्पे सर्वाधिक वेगानं पूर्ण करण्याची कामगिरी अश्विननं केली आहे. यापैकी काही बाबतीमध्ये तो जगातही नंबर 1 आहे. इनिंगमध्ये 5 विकेट्स आणि सेंच्युरी अशी कामगिरी तीनवेळा करणारा तो एकमेव भारतीय आहे. तसंच एका होम सिझनमध्ये सर्वाधिक 79 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड देखील अश्विनच्या नावावर आहे.
बॅट्समन अश्विन
सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) वेस्ट इंडिज विरुद्धची रिटायरमेंट सीरिज अश्विननं बॉलिंगप्रमाणेच बॅटींगमध्येही गाजवली. त्या सीरिजमधील पहिली टेस्ट ही कोलकातामध्ये होती. वेस्ट इंडिजनचं पहिल्या इनिंगमध्ये 234 रन केले. त्याला उत्तर देताना टीम इंडियाची अवस्था 6 आऊट 156 अशी झाली होती. त्या टेस्टमध्ये अश्विननं रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सातव्या विकेट्ससाठी 280 रनची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपमुळे टीम इंडियानं 453 पर्यंत मजल मारली. पुढे ती टेस्ट एक इनिंग आणि 51 रननं जिंकली. यामध्ये अश्विननं 124 रनची खेळी केली. टेस्ट क्रिकेटमधील अश्विनचा हा हायेस्ट स्कोअर आहे.
ऑफ स्पिनर म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त रन असून 5 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरी आहेत. त्यानं यावर्षी सिडनी टेस्टमध्ये दुखापतग्रस्त असूनही हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत झुंजार पार्टनरशिप करत टीम इंडियाचा पराभव टाळला. त्यानंतर होम ग्राऊंड चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध सेंच्युरी झळकावली.
IND vs ENG : अद्भुत अश्विनच्या अविस्मरणीय सेंच्युरीमुळे चेन्नई टेस्टवर टीम इंडियाची घट्ट पकड
परदेशातील अश्विन
टीम इंडियानं 2015 साली श्रीलंकेतील टेस्ट सीरिज 2-1 नं जिंकली. 1993 नंतर या शेजारच्या देशात भारतीय टीमनं पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकली होती. त्यामध्ये अश्विन 21 विकेट्ससह ‘मॅन ऑफ द सीरिज’ होता. असं असलं तरी अश्विन भारतीय उपखंडाच्या बाहेर यशस्वी नाही, असा आरोप टीकाकार करत असतात. अनेक भारतीयांचा देखील तसा समज आहे.
भारतीय टीमनं 2015 ते 2017 या कालावधीमध्ये प्रामुख्यानं देशातच क्रिकेट खेळले. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये 2014 साली झालेल्या दौऱ्यानंतर अश्विनला नंतरची काही वर्षे विदेशात टेस्ट क्रिकेट खेळायला मिळालेच नाही.
अश्विन आणि अँडरसन
इंग्लंडचा सर्वात महान बॉलर आणि सध्या टेस्ट क्रिकेट खेळत असलेल्या मंडळींमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनच्या (James Anderson) कामगिरीशी अश्विनची तुलना करुया. अॅशेस सीरिज म्हणजे इंग्लंडसाठी सर्वस्व असते. त्यातही ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करणे हे इंग्लंडच्या प्रत्येक क्रिकेटपटूचे ‘लाईफ मिशन’ आहे. अँडरसननं आजवर ऑस्ट्रेलियातील 18 टेस्टमध्ये 60 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनच्या नावावर 10 टेस्टमध्ये 39 विकेट्स आहेत. अश्विनला ऑस्ट्रेलियात आजवर एकदाही एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेता आलेल्या नाहीत. पण त्याच्यापेक्षा 200 टेस्ट विकेट्स जास्त असणाऱ्या अँडरसनलाही ही कामगिरी करणे फक्त 1 वेळा जमली आहे.
न्यूझीलंडमध्ये अश्विन आजवर फक्त 1 टेस्ट खेळला आहे. त्यात त्यानं 3 विकेट्स घेतल्यात. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या न्यूझीलंडच्या पिचवर अँडरसनला 7 टेस्टमध्ये 26 विकेट्स मिळाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतही अश्विनला फक्त 3 टेस्ट संधी मिळाली आहे. त्यात त्यानं 7 विकेट्स घेतल्यात. अँडरसनच्या नावावर 10 टेस्टनंतर 34 विकेट्स आहेत. वेस्ट इंडिजमध्ये अश्विन दक्षिण आफ्रिकेपेक्षा एक जास्त म्हणजे 4 टेस्ट खेळला असून त्यात त्यानं 17 विकेट्स घेतल्या आहेत. तर अँडरसननं 10 टेस्टनंतर 36 विकेट्स घेतल्या आहेत.
त्यामुळे अश्विन भारतीय उपखंडाच्या बाहेर यशस्वी नाही हे पाहत असताना त्याला तिथं किती टेस्ट खेळण्याची संधी मिळाली? जगातील सध्याच्या महान टेस्ट बॉलरची त्या पिचवर काय कामगिरी आहे? हे तपासले पाहिजे. अश्विनच्या यशात (Ashwin Birthday) भारतामधील टर्निंग पिचचा वाटा आहे, हे जाहीर करत असताना जेम्स अँडरसन हा देखील इंग्लंडमधील पिचवर ढगाळ वातावरणात यशस्वी होणारा ‘क्लाऊडी बेबी’ आहे हे देखील मान्य केलं पाहिजे.
‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य!
कोहलीच्या काळात अन्याय
भारतीय उपखंडाच्या बाहेर अश्विनला किती संधी मिळाली आहे, हे न तपासता त्याच्यावर टीका केली जाते. याचे सविस्तर विश्लेषण यापूर्वीच्याच परिच्छेदामध्ये केले आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील खराब कामगिरीनंतर अश्विनला लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधून वगळण्यात आले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात धोकादायक स्टीव्ह स्मिथला वारंवार जाळ्यात अडकवताना अश्विनची उपयुक्तता दिसली होती. इंग्लंडमधील नुकत्याच सीरिजमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) अश्विन हा भारताचा सर्वात प्रभावी बॉलर होता. त्यानंतरच्या ब्रेकमध्ये सर्व खेळाडू सुट्टीवर असताना अश्विन कौंटी क्रिकेट खेळला. तिथंही यशस्वी झाला. असं असूनही अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या चारपैकी एकाही टेस्टमध्ये खेळवण्यात आलं नाही. 400 पेक्षा जास्त टेस्ट विकेट्स घेणारा आणि फॉर्मात असलेला अश्विन संपूर्ण सीरिज बेंचवर होता. विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये अश्विनवर अन्याय झाल्याचा दावा टीम इंडियाचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यापूर्वी केला आहे. टीम मीटिंगमध्ये स्पष्ट बोलण्याची शिक्षा अश्विनला मिळते, असं त्यांचं मत आहे.
Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का?
T20 वर्ल्ड कपसाठी पुनरागमन
अश्विनचं 4 वर्षानंतर T20 क्रिकेटमध्ये आणि ते देखील थेट वर्ल्ड कपसाठी आगमन झालं आहे. अश्विनचा अनुभव आणि यूएई पिचवरील त्याची उपयुक्तता लक्षात घेता त्याचा निवड समितीनं टीममध्ये समावेश केला आहे. पण, टीम मॅनेजमेंटचं धोरण पाहाता त्याला अंतिम 11 मध्ये किती संधी मिळते? यावर शंका आहे.
अर्थात अश्विनला जितकी संधी मिळेल त्यामध्ये त्याचा सर्वोत्तम खेळ करण्यासाठी टीम इंडियाचा बेस्ट आणि जगातील ‘ऑल टाईम ग्रेट’ खेळाडू अश्विन सज्ज (Ashwin Birthday) असेल याची त्याचा आजवरचा खेळ पाहाता पूर्ण खात्री आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.