फोटो – ट्विटर/ICC

1990 च्या दशकातील क्रिकेट हे अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण होते. कपिल, इम्रान, बोथम, बॉर्डर हे दिग्गज क्रिकेटपटू यांच्या करियरचा त्या काळात उतार सुरु झाला. ते रिटायर झाले. सचिन, द्रविड, लारा, पॉन्टिंग यांचं यूग याच दशकात सुरु झालं. सचिनचं सातत्य, द्रविडचा भक्कम बचाव, गांगुलीच्या ऑफ साईडच्या शॉट्सची श्रीमंती किंवा लाराचं श्वास रोखून धरणारी फटकेबाजीनं ते दशक गाजलं. क्रिकेट विश्वातील अनेक उलथापालथी करणाऱ्या या दशकातील सर्वात आक्रमक बॅट्समन कोण? असा प्रश्न विचारला तर निर्विवाद एकच नाव आहे. ते म्हणजे सनथ जयसूर्या (Sanath Jaysuriya). जयसूर्या इतकी सातत्यपूर्ण आणि बॉलर्सचं खच्चीकरण करणारी फटकेबाजी कुणीही केली नाही. श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा पाया रचणाऱ्या जयसूर्याचा आज वाढदिवस (Sanath Jaysuriya Birthday) आहे. आजच्याच दिवशी (30 जून 1969) जयसूर्याचा जन्म झाला.

1989 मध्ये पदार्पण पण…

जयसूर्यानं वन-डे क्रिकेटमध्ये ओपनिंग बॅट्समनची व्याख्या बदलली. पण त्याने, त्याच्या क्रिकेट करियरची सुरुवात 1989 साली ऑफ स्पिनर आणि लोअर ऑर्डर बॅट्समन म्हणून केली होती. त्याच्या करियरची सुरुवातीची वर्ष साधारण होती. श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक डेव्ह वॉटमोर (Dev Watmore) आणि कॅप्टन अर्जून रणतुंगा (Arjun Ranatunga) या जोडीनं 1996 च्या वर्ल्ड कपसाठी टीमची नव्यानं बांधणी सुरु केली होती. त्या योजनेमध्ये त्यांनी जयसूर्याला ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळवण्याचं ठरवलं.

न्यूझीलंड विरुद्ध 1994-95 मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेल्या मंडेला ट्रॉफीतील मॅचमध्ये जयसूर्यानं पहिल्यांदा ओपनिंग बॅट्समन म्हणून चुणूक दाखवली. त्या मॅचमध्ये त्याने 143 बॉलमध्ये 140 रन काढले. जे त्या काळातील क्रिकेटच्या तुलनेत वेगवान रन होते. त्या मॅचमध्ये श्रीलंकेचा एकूण स्कोअर होता 238. ती मॅच पावसानं वाहून गेली. पण, न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे नं सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर आणखी एक महान वन-डे ओपनर (Sanath Jaysuriya Birthday) जगाला मिळाला.

1996 वर्ल्ड कप

श्रीलंकेनं 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1996) टीम सेट केली होती. जयसूर्या-कालुवितरणा हे आक्रमक ओपनर. भक्कम मिडल ऑर्डर, चामिंडा वास आणि अन्य स्पिनर्स. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांनी बहिष्कार घातल्यानं श्रीलंकेला 4 पॉईंट्स मॅच न खेळताच मिळाले. जयसूर्या झिम्बाब्वे विरुद्ध स्वस्तात आऊट झाला.

भारताविरुद्ध दिल्लीमध्ये झालेल्या मॅचमध्ये जयसूर्याच्या बॅटींगची पॉवर जगाने पाहिली. भारतानं पहिल्यांदा बॅटींग करताना सचिनच्या सेंच्युरीच्या जोरावर 3 आऊट 271 असा त्या काळातील सुरक्षित स्कोअर उभा केला. त्याचा पाठलाग करायला जयसूर्या-कालुवितरणा जोडी मैदानात उतरली. या जोडीनं भारताचा त्या वर्ल्ड कपमधील सर्वात सिनियर बॉलर मनोज प्रभाकरवर (Manoj Prabhakar) बेफाम हल्ला केला. त्याच्या पहिल्या दोन ओव्हर्समध्येच 33 रन काढले. प्रभाकरनं त्या मॅचमध्ये बॉलिंगचे सर्व प्रकार केले. शेवटी तर थेट ऑफ स्पिन टाकली. त्या मॅचनंतर प्रभाकर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही.

जयसूर्या वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धही जोरात खेळला. त्याने 44 बॉलमध्ये 82 रन काढले. इंग्लंडच्या 236 रनचा पाठलाग करताना जयसूर्या आऊट झाला तेव्हा 13 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा स्कोअर 2 आऊट 113 होता. मॅचचा निकाल तेव्हाच स्पष्ट झाला होता. जयसूर्याच्या त्या खेळीनं श्रीलंका पहिल्यांदाच वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचले. इंग्लंडला पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलच्या आत घरी जावे लागले.

 भारताविरुद्ध कोलकातामध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये जवागल श्रीनाथनं (Javagal Srinath) जयसूर्याला लगेच जाळ्यात अडकवले. त्याची कसर त्यानं बॉलिंगमध्ये भरुन काढली. इडन गार्डनच्या फिरत्या पिचचा उत्तम वापर केला. सचिन तेंडुलकर, संजय मांजेकर या दोन सेट झालेल्या बॅट्समनसह अजय जडेजाला त्याने आऊट केलं. भारताची घसरगुंडी झाली. संतप्त प्रेक्षकांनी मॅच बंद पाडली.

जयसूर्या (Sanath Jaysuriya Birthday) त्या वर्ल्ड कपचा ‘मॅन ऑफ द टुर्नामेंट’ होता. त्याने 221 रन काढले, 7 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट होता 131.5. वन-डे क्रिकेटमधील पहिल्या 15 ओव्हर्सच्या बॅटींगची व्याख्याच त्याने बदलून टाकली. त्याची वर्ल्ड कपमधील आक्रमक बॅटींग फ्लूक नव्हती, हे जयसूर्यानं नंतर वारंवार सिद्ध केले.

चामिंडा वास, श्रीलंकेचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर

पाकिस्तानला तडाखा

1996 च्या वर्ल्ड कपनंतर लगेच सिंगापूरला झालेल्या सिंगर कपमध्ये जयसूर्यानं पाकिस्तानला तडाखा दिला. वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 50 पेक्षा कमी बॉलमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड त्याने केला. त्यानंतरच्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्धच 17 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50, 100 आणि 150 रन करण्याचा रेकॉर्ड ऐकेकाळी जयसूर्याने केला आहे.

जयसूर्याने सिंगापूरमध्येच आमिर सोहेलच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 30 रन करण्याचा रेकॉर्ड केला. त्यानंतर 2001 साली शारजामध्ये ख्रिस हॅरीसच्या एका ओव्हरमध्येही तितकेच रन काढले. अखेर 2007 मध्ये हर्षल गिब्जनं एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावत तो रेकॉर्ड मोडला.

भारताची डोकेदुखी

क्रिकेटमधली कोणत्याही काळाप्रमाणे त्या काळातही भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) क्रिकेट सातत्याने होत असे. जयसूर्या हा भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरला. त्याचा वन-डे क्रिकेटमधील (189) आणि टेस्ट क्रिकेटमधील (340) हा हायसेस्ट स्कोअर भारताविरुद्ध आहे. त्याच्या 28 वन-डे सेंच्युरीपैकी 7 भारताविरुद्ध आहेत.

जयसूर्याने (Sanath Jaysuriya Birthday) शारजामध्ये भारतीय टीममला नामोहरम करणारी खेळी खेळली होती. त्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 28 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 116 स्कोअर होता. टॉप ऑर्डरचे चार बॅट्समन फक्त 35 रन काढून आऊट झाले होते. ओपनिंगला आलेला जयसूर्या एका बाजूने आरामात खेळत होता. त्यानंतर रसेल अर्नोल्डबरोबर त्याची जोडी जमली. अर्नोल्ड साथ द्यायला आहे लक्षाच येताच जयसूर्याने काही क्षणात सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसचा वेग पकडला. जयसूर्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारण्याच्या प्रयत्नात 189 रनवर आऊट झाला. त्यावेळी सईद अन्वरचे 194 रन आणि वन-डेमध्येमधील पहिली डबल सेंच्युरी हे दोन्ही रेकॉर्ड त्याच्या आवाक्यात होते.

श्रीलंकेच्या 299 रनमध्ये 189 रन एकट्या जयसूर्याने केले होते. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाचे इतके खच्चीकरण झाले होते की नंतर संपूर्ण टीम फक्त 54 रनवर ऑल आऊट झाली. श्रीलंकेनं ती मॅच 245 रननं जिंकली.

श्रीलंकेच्या सर्वाधिकमधील सर्वोच्च

जयसूर्या वन-डे क्रिकेटमध्येच चमकला असं नाही तर टेस्ट क्रिकेटमध्येही त्याने ठसा उमटवला. तो वन-डे प्रमाणेच टेस्टमध्येही ओपनिंग बॅट्समन म्हणून लगेच सेट झाला. बॅट्समनसाठी वरदान ठरलेल्या भारताविरुद्धच्या कोलंबो टेस्टमध्ये जयसूर्याने 340 रनची खेळी केली. त्याने त्या टेस्टमध्ये रोशन महानामासोबत (Roshan Mahanama) 576 रनची पार्टरनरशिप केली. टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी झालेली तेव्हाची ती सर्वोच्च पार्टरनरशिप होती. त्या टेस्टमध्ये जयसूर्याने 578 बॉल आणि 799 मिनिटे बॅटींग केली. श्रीलंकेनं 6 आऊट 952 असा विशाल स्कोअर केला. त्यात जयसूर्याचे सर्वात जास्त रन होते.

टेस्ट क्रिकेटच नाही तर क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये जेव्हा श्रीलंकेनं सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड केला त्यावेळी जयसूर्यानं (Sanath Jaysuriya Birthday) सर्वात जास्त रन काढले. श्रीलंकेनं 2006 साली नेदरलँड्स विरुद्धच्या वन-डेमध्ये 443 रन काढले होते. त्यात जयसूर्याचे सर्वाधिक 157 रन होते. त्यानंतर वर्षभराने पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2007) श्रीलंकेनं 260 रन काढले. त्यात जयसूर्यानं 44 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली होती.

VIDEO: इंग्लंड दौऱ्यावर केला गुन्हा! 3 श्रीलंकन क्रिकेटपटूंची मायदेशी रवानगी

टेस्टमधील अविस्मरणीय खेळी

भारताविरुद्ध कोलंबो टेस्टमध्येच नाही तर जयसूर्यानं अन्य देशांविरुद्धही टेस्टमध्ये अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध 2004 साली फैसलाबाद टेस्टमध्ये श्रीलंका पहिल्या इनिंगमध्ये 21 रननं पिछाडीवर होती. दुसऱ्या इनिंगमध्ये श्रीलंकेच्या 438 पैकी 253 रन एकट्या जयसूर्याने काढले. श्रीलंकेनं ती टेस्ट 201 रननं जिंकली.

त्यापूर्वी 2000 साली कोलंबोमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलिंग अटॅकसमोर जयसूर्याने 156 बॉलमध्ये 148 रन काढले. रन काढण्यासाठी सोप्या नसलेल्या त्या पिचवर आक्रमक बॅटींग करत जयसूर्यानं चित्र बदललं. पहिल्या सिझनमध्ये सेंच्युरी करण्यासाठी त्याला फक्त 4 रन कमी पडले. इंग्लंड विरुद्ध 1998 साली झालेल्या ओव्हल टेस्टमध्ये जयसूर्याने डबल सेंच्युरी करत 213 रन काढले होते. इंग्लंडच्या 445 रनचा पाठलाग करताना जयसूर्यानं ही खेळी केली.

जयसूर्याचे काही रेकॉर्ड्स

वन-डे क्रिकेटमध्ये फास्ट 50, 100 आणि 150 करण्याच्या जयसूर्याच्या रेकॉर्डचा उल्लेख लेखात यापूर्वी झालाच आहे. त्याचबरोबर वन-डे क्रिकेटमध्ये 10000 रन आणि 300 विकेट्स घेणारा तो (Sanath Jaysuriya Birthday) एकमेव क्रिकेटपटू आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये 10 पेक्षा जास्त सेंच्युरी करणाऱ्या कोणत्याही बॅट्समननं एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी 2 पेक्षा जास्त वेळा केलेली नाही. जयसूर्यानं हा पराक्रम 4 वेळा केला आहे. एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त 30 रन करण्याची त्याने कामगिरी दोनदा केली हे लेखात यापूर्वी आले आहे. पण एका वन-डे मॅचमध्ये सर्वात जास्त 11 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड तब्बल 12 वर्ष त्याच्या नावावर होता. जयसूर्यानं वन-डे क्रिकेटमध्ये थरंगासोबत 286 रनची ओपनिंग पार्टरनरशिप केली आहे. त्याचबरोबर 2007 साली त्याच्या शेवटच्या टेस्ट इनिंगमध्ये जेम्स अँडरसनच्या (James Andereson) एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड जयसूर्यानं केला आहे.

वटवृक्षाची सावली आधारवड बनते तेव्हा…

कारकिर्दीचा शेवटचा टप्पा

जयसूर्या मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धेत खेळला. पहिल्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2008) तो 38 वर्षांचा होता. तरुणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्या प्रकारात जयसूर्याने 14 मॅचमध्ये 166.34 च्या स्ट्राईक रेटनं 514 रन काढले. त्याने चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध 45 बॉलमध्ये सेंच्युरी देखील झळकावली. त्याचवर्षी झालेल्या आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेच्या विजयाच जयसूर्याचे मोलाचे योगदान होते.

 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेनं निवडलेल्या 30 सदस्यांच्या प्राथमिक टीमचा तो सदस्य होता. अंतिम 15 मध्ये त्याला जागा मिळाली नाही. त्याचवर्षी इंग्लंड विरुद्धच्या वन-डे टीममध्ये त्याने कमबॅक केले. 42 वर्ष पूर्ण करण्यास 2 दिवस कमी असताना तो शेवटची वन-डे मॅच खेळला.

जयसूर्या (Sanath Jaysuriya Birthday) श्रीलंकेच्या संसदेत खासदार म्हणून निवडला गेला होता. त्याचबरोबर निवड समितीचा अध्यक्ष म्हणून देखील त्याने काम केले आहे. 2019 साली ICC च्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं त्याच्यावर क्रिकेटसंबंधी कोणत्याही कामकाजात सहभागी होण्यासाठी 2 वर्षांची बंदी घातली. 

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: