आज जी पिढी कर्त्या वयात आहे, त्या पिढीतील बहुतेकांसाठी क्रिकेटमधील पहिली बलाढ्य टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया म्हणजे सर्वच्या सर्व 11 मॅच विनर्सची टीम. ऑस्ट्रेलिया म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हार न स्वीकारणारी टीम. ऑस्ट्रलिया म्हणजे मैदानात आपल्याच मस्तीत खेळणारी आणि वावरणारी टीम. ऑस्ट्रेलिया म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन. या साऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दलच्या त्यांच्या आठवणी आहेत. एकेकाळी खचलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला नवी उभारी देणारा माजी कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डरचा आज वाढदिवस (Allan Border Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 जुलै 1955) बॉर्डरचा जन्म झाला. क्रिकेट कारकिर्दीमध्ये AB या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉर्डरनंच ऑस्ट्रेलियाला विजयाची बाराखडी नव्यानं शिकवली.

अवघड काळात पदार्पण

अ‍ॅलन बॉर्डरनं वयाच्या 23 व्या वर्षी मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्व टॉप क्रिकेटर्स कॅरी पॅकरच्या (Kerry Packer) यांच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट या बंडखोर लीगमध्ये सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या 100 वर्षांच्या गौरवशाली इतिहासातील तो सर्वात बाका कालखंड होता.

बॉर्डरनं त्याच्या कारकिर्दीमधील दुसऱ्या टेस्टमध्ये सिडनीमध्ये नाबाद 60 आणि 45 रन काढले. बॉर्डरच्या या इनिंग त्याच्या पुढील अर्ध्या दशकातील बॅटींगचे पहिले उदाहरण होत्या. शेवटपर्यंत झुंजणे, नाबाद राहणे, एकट्यानंच लढणे, फक्त तळाच्या बॅट्समन्सची साथ, विपरित परिस्थितीमध्ये दाखवलेलं धैर्य आणि या सर्वानंतरही टीमचा पराभव. हे बॉर्डरच्या पुढील कारकिर्दीमधील सर्व वैशिष्ट्य त्याच्या सिडनी टेस्टमधील दोन इनिंगमध्ये सापडतात.  

बॉर्डरच्या या इनिंगमुळेच त्याला ओळख मिळाली. 1980 मध्ये ग्रेग चॅपेल (Greg Chappell), डेनिस लिली (Dennis Lillee), रॉड मार्श यांच्यासह सर्व ऑस्ट्रेलियन दिग्गज परतले. त्यावेळी नव्या टीममधील फक्त बॉर्डरची जागा अबाधित राहिली.

रन, रन आणि रन!

बॉर्डरनं त्याच्या चौथ्या टेस्टमध्ये पाकिस्तान विरुद्ध 382 रनचा पाठलाग करताना पहिली सेंच्युरी झळकावली. या खेळीच्या दरम्यान तो सव्वा सहा तासांपेक्षा जास्त मैदानात ठाण मांडून खेळत होता. बॉर्डरच्या सेंच्युरीमुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 3 आऊट 305 अशी भक्कम होती. त्यानंतर सर्फराज नवाजनं फक्त 1 रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या सात विकेट्स घेतल्या. 3 आऊट 305 वरुन ऑस्ट्रेलियाची इनिंग 310 रनवर संपुष्टात आली.

बॉर्डरनं (Allan Border Birthday) विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी पाकिस्तान विरुद्ध लाहोरमध्ये झळकावली. त्या टेस्टमध्ये इम्रान खान, सर्फराज नवाज, इक्बाल कासिम, तौसिफ अहमद या पाकिस्तानच्या अटॅक समोर त्यानं पहिल्या इनिंगमध्येन नाबाद 150 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 153 रन काढले. एका टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये 150 पेक्षा जास्त रन काढणारा बॉर्डर हा आजही एकमेव बॅट्समन आहे. अँडी फ्लॉवर (142 आणि नाबाद 199),  तिलकरत्ने दिलशान (162 आणि 143) यांनी दोन्ही इनिंगमध्ये 140 चा टप्पा पार केला, पण त्यांना बॉर्डरच्या रेकॉर्डची बरोबरी करता आली नाही.

बॉर्डरनं मद्रास टेस्टमध्ये भारतीय स्पिनर्ससमोर 6 तास 56 मिनिटं बॅटींग करत 162 रन काढले. बॉर्डरची ही मॅरेथॉन खेळी भारतीय बॉलर्सनी नाही तर पार्टरनरनं चुकीचा कॉल दिल्यानं रन आऊट होऊन संपली.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 1981 ची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 1981) ही इयान बोथमच्या (Ian Botham) ऑल राऊंड खेळामुळे गाजली. क्रिकेटच्या इतिहासात ती सीरिज बोथम अ‍ॅशेस म्हणून ओळखली जाते. इंग्लंडनं जिंकलेल्या त्या सीरिजमध्ये बॉर्डर (Allan Border Birthday)  हा एकटाच ऑस्ट्रेलियाकडून सातत्यानं लढत होता. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये त्याने नाबाद 123 रन काढले. ती कोणत्याही ऑस्ट्रेलियन बॅट्समननं झळकावलेली सर्वात संथ सेंच्युरी होती. त्यानंतर ओव्हलवर नाबाद 106 आणि 84 रनची खेळी बॉर्डरनं केली.

इंग्लंड विरुद्ध 1982 साली झालेल्या मेलबर्न टेस्टमध्ये बॉर्डरनं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम इनिंग खेळली. चौथ्या इनिंगमध्ये 292 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 आऊट 212 अशी झाली होती. त्यावेळी बॉर्डरनं 11 व्या नंबरवर बॅटींगला आलेल्या जेफ थॉमसनबरोबर नाबाद 62 रनची पार्टरनरशिप केली. बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांनी 2019 साली हेंडिग्ले टेस्टमध्ये केलेल्या पार्टनरशिपसारखीच त्यांनी लढत दिल. फक्त यामध्ये एक मोठा फरक होता. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 4 रन बाकी असताना जेफ थॉमसन इयान बोथमच्या बॉलवर फसला. बॉर्डरची 62 रनची नाबाद खेळी व्यर्थ ठरली. ( या लेखासाठी वापरण्यात आलेला फोटो बॉर्डर ही इनिंग खेळून परतत असताना काढलेला आहे.)

त्यानंतरच्या वर्षी पोर्ट ऑफ स्पेन टेस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर नाबाद 98 आणि नाबाद 100 रन काढले. रॉडनी हॉग आणि टेरी अ‍ॅलेंडरामन या 10 आणि 11 नंबरच्या बॅट्समनसोबत बॉर्डर 160 मिनिटं लढला. त्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अन्य एकाही बॅट्समनला 50 चा आकडा पार करता आला नव्हता. पहिल्या इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्त रननं पिछाडीवर पडूनही बॉर्डरच्या (Allan Border Birthday) शर्थीच्या प्रयत्नामुळेच ऑस्ट्रेलियानं त्या टेस्टमध्ये पराभव टाळला.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची धुलाई, धोनीचा खास मित्र आणि मिस्टर क्रिकेट!

कॅप्टन बॉर्डर

किम ह्यूजनं 1984 साली इमोशनल पत्रकार परिषद घेत ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टनसी सोडली. त्यानंतर बॉर्डर ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन झाला. बॉर्डरला कॅप्टनसी स्वीकारण्याची इच्छा नव्हती. त्याची सुरुवात खराब झाली. तो कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या पहिल्याच टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाचा 191 रननं पराभव केला. इंग्लंडनं अ‍ॅशेस सीरिजमध्ये 3-1 नं हरवलं.

इंग्लंडमध्ये 1985 साली झालेल्या त्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं एकमेव लॉर्ड्स टेस्ट जिंकली. त्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे बहुतांशी रन हे बॉर्डरनंच काढले. पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 आऊट 24 अशी होती त्यावेळी तो मैदानात आला. त्यानंतर ती 4 आऊट 101 अशी आणखी बिकट झाली. बॉर्डरनं त्या परिस्थितीमध्ये एकाकी लढत देत 196 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 425 पर्यंत नेला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये 127 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 67 अशी झाली होती. त्यावेळी बॉर्डरनं नाबाद 41 रन काढत विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर मेलबर्न टेस्टमध्ये भारताविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 182 रननं पिछाडीवर असताना  410 मिनिटं बॅटींग करत 163 रन काढले. त्यानंतर पाऊस आणि सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथच्या संथ बॅटींगमुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला. मेलबर्न टेस्ट ड्रॉ झाली.

सूर सापडला, वर्ल्ड कप जिंकला

भारताविरुद्ध 1986 साली मद्रासमध्ये झालेली मद्रास टेस्ट बॉर्डरच्या कॅप्टनसीच्या करियरमधील टर्निंग पॉईंट ठरली. त्या टेस्टमध्ये मैदानावर ओकारी करत असलेल्या डीन जोन्सचा स्वाभिमान बॉर्डरनच डिवचला. त्यानंतर जोन्स त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम इनिंग खेळून गेला. बॉर्डरनंही 106 रन काढले. मॅच समान परिस्थितीमध्ये असताना इनिंग घोषित करण्याचं धैर्य दाखवलं. ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा योग्य वापर केला. मॅच संपण्यास फक्त 1 बॉल बाकी असताना ग्रेग मॅथ्यूजनं मनिंदर सिंगला आऊट केलं. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच टेस्ट टाय झाली.

मद्रासमधील त्या टेस्टमध्ये बॉर्डरला कॅप्टन म्हणून फॉर्म सापड़ला. त्यानंतर वर्षभरानं 1987 साली कोलतातामध्ये वर्ल्ड कप उंचावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन कॅप्टन बनला. डेव्हिड बून (David Boon) हा भक्कम ओपनिंग बॅट्समन, डेथ ओव्हर्स गाजवणारा स्टीव्ह वॉ (Steve Waugh), फास्ट बॉलर क्रेग मॅकडरमॅट यासह संपूर्ण टीमचा योग्य वापर करणारा आणि परिस्थितीनुसार सतत डावपेच बदलणाऱ्या अ‍ॅलन बॉर्डरची कॅप्टनसी (Allan Border Birthday)  या विजेतपदामध्ये निर्णायक ठरली. कोलकातामध्ये झालेल्या फायनलमध्ये माईक गॅटींगला (Mike Gatting) रिव्हर्स स्विपच्या मोहात बॉर्डरनचं पाडलं. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देणारी गॅटींगची विकेट बॉर्डरनंच घेतली. इंग्लंडचा फायनलमध्ये फक्त 7 रननं पराभव झाला.

शेवटपर्यंत लढणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा नेता

बॉर्डरची भरारी

वर्ल्ड कप विजेतेपदानंतर बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियन टीमनं भरारी घेतली. 1989 साली झालेल्या सिडनी टेस्टमध्ये वेस्ट इंडिजची अवस्था 1 आऊट 144 अशी भक्कम होती. त्यानंतर बॉर्डरनं हातामध्ये बॅट नाही तर बॉल घेत चित्र बदललं. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 7 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला ती टेस्ट जिंकून दिली.

बॉर्डरनं त्यानंतर सलग दोनदा इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस सीरिज जिंकली. ही कामगिरी करणारा दुसऱ्या महायुद्धानंतरचा पहिला ऑस्ट्रेलियन कॅप्टन बनला. मार्क टेलर, मार्क वॉ, ब्रुस रिड, शेन वॉर्न यासारखे दिग्गज खेळाडू याच काळात ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये आले. बॉर्डरच्या कॅप्टनसीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीचे धडे गिरवले. या टीमला नंतरची काही वर्ष अ‍ॅशेस सीरिज सतत जिंकण्याची सवय लागली.

1989 च्या सिडनी टेस्टपर्यंत बॉर्डरनं 37 टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टनसी केली होती. त्यामध्ये फक्त 6 विजय, 13 पराभव आणि 17 ड्रॉ अशी त्याची कामगिरी होती. त्यानंतरच्या पाच वर्षातील 56 टेस्टमध्ये बॉर्डरनं 26 जिंकल्या आणि 9 गमावल्या. फक्त वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्या सीरिजमध्ये देखील ऑस्ट्रेलिया विजयाच्या अगदी जवळ आली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 1 विकेट आणि वेस्ट इंडिजला 2 रन अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी वॉल्शच्या बॅटला निसटता लागलेला बॉल फोर गेला आणि वेस्ट इंडिजनं टेस्ट जिंकली.  

बॉर्डरचे रेकॉर्ड

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन काढण्याचा सुनील गावसकरचा (Sunil Gavaskar) रेकॉर्ड बॉर्डरनं मोडला. तो टेस्टमध्ये 11 हजार रनचा टप्पा पार करणारा पहिला बॅट्समन होता. सर्वात जास्त रन (11,174), सर्वात जास्त टेस्ट (156), सर्वात जास्त सलग टेस्ट (153), सर्वाधिक टेस्टमध्ये कॅप्टनसी (93) हे सर्व रेकॉर्ड बॉर्डर (Allan Border Birthday) रिटायर झाला तेव्हा त्याच्या नावावर होते.

बॉर्डरचा घरच्या मैदानापेक्षा विदेशातील पिचवर खेळ जास्त बहरला. त्याची ऑस्ट्रेलियामधील सरासरी 45.94 असून विदेशातील सरासरी 56.57 आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 13 तर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर 14 सेंच्युरी झळकावल्या आहेत.

सेकंड इनिंगमधील प्रभाव

 अ‍ॅलन बॉर्डर रिटायर झाल्यानंतर काही वर्षांनी निवड समितीचा सदस्य झाला. स्टीव्ह वॉला वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरुन काढण्याचा निर्णय घेण्यात त्याचा वाटा होता. इयान हिली आणि मार्क वॉ यांच्या गडबडीत रिटायरमेंट घेण्यासही तोच कारणीभूत होता. त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा कारभार चालवताना, टीमची निवड करताना भावनेला महत्त्व दिलं नाही. सर्वोत्तम कामगिरी हाच बॉर्डरचा टीम निवडीचा निकष होता. त्यामुळेच तो निवड समितीमध्ये असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं यशाची नवी शिखरं सर केली.

महायुद्धानंतरच्या काळातील ऑस्ट्रेलियाचा बेस्ट बॅट्समन कोण? असा प्रश्न विचारल्यावर नील हार्वे, ग्रेग चॅपेल, स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह स्मिथ यांचं नावं वेगवेगळ्या काळातील मंडळी घेतात. यामध्ये बॉर्डरचं नाव सहसा कुणाला पटकन आठवत नाही. ठराविक कालखंडानं चर्चेत येणाऱ्या ‘ऑल टाईम ग्रेट’ टीममध्येही बॉर्डरचा समावेश नसतो. तरीही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील बॉर्डरचा प्रभाव खूप मोठा आहे.

2000 सालापासून वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला अ‍ॅलन बॉर्डर मेडलनं गौरवण्यात येते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठेच्य़ा टेस्ट सीरिजलाही सुनील गावसकरांच्या बरोबरीनं बॉर्डरचं नाव आहे.

‘सुनील गावसकरने नेहमी स्वत:ची आवड नाही तर टीमचे हित जपले’

बॉर्डर त्याच्या बॅटींग स्टाईलसाठी कधीही लक्षात राहणार नाही. त्याने आक्रमक फटकेबाजी अगदी क्वचित केली असेल. पण, ठप्प पडलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटला चालना देणारा, कित्येक टेस्ट एकाकी लढणारा, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा आणि ऑस्ट्रेलियातील चॅम्पियन क्रिकेटपटूंची पिढी घडवणारा क्रिकेटपटू म्हणून अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border Birthday) नेहमी सर्वांच्या लक्षात राहणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: