
तो बॅटींगला येण्याच्या पूर्वीपासूनच त्याच्यावर फोकस असतो. टार्गेट कितीही मोठं असलं तरी तो ते टार्गेट पूर्ण करेल असा त्याच्या टीमचा त्याच्यावर विश्वास आहे. तो बॅटींग करत असताना आपण मॅच जिंकली असं प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना वाटत नाही. अवघ्या काही बॉलमध्ये मॅचचं चित्र पालटण्याची त्याची क्षमता आहे. त्याच्या बॅटींगचा पट्टा सुरु झाला की समोरचा प्रत्येक बॉलर त्यात भरडला जातो. त्यानं T20 क्रिकेटमध्ये दोन ओव्हर्समध्ये पाच विकेट्स तसंच एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. गेल्या काही सिझनपासून त्याचा फॉर्म म्हणजेच त्याच्या आयपीएल टीमचा फॉर्म समजला जातो. वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे. आजच्याच दिवशी (29 एप्रिल 1988) रसेलचा जन्म झाला.
करियर सुरु झालं आणि थांबलं!
जमेकाचा रसेल वेस्ट इंडिजच्या टीममध्ये बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून आला. त्याच्या करियरच्या सुरुवातीला तो टेस्ट क्रिकेटमध्ये कमाल करेल, असा जमेकातील मंडळींचा दावा होता. त्याला वेस्ट इंडिजच्या टीममध्येही पहिल्यांदा टेस्टमध्येच संधी मिळाली.
श्रीलंकेविरुद्ध 2010 साली गॉलमध्ये झालेल्या टेस्टमध्ये रसेलनं पदार्पण केलं. दहाव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या रसेलनं फक्त 2 रन काढले. तसंच त्यानंतरच्या दोन इनिंगमध्ये फक्त 1 विकेट घेतली. रसेलच्या क्रिकेट करियरमधील ती पहिली आणि एकमेव टेस्ट आहे. त्यानंतर तो कधीही वेस्ट इंडिजकडून टेस्ट खेळलेला नाही.
वर्ल्ड कपमध्ये ओळख
क्रिकेट वर्ल्ड कप 2011 (Cricket World Cup 2011) मध्ये रसेलनं वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं वन-डे करियरच्या दुसऱ्याच मॅचमध्ये इंग्लंड विरुद्ध चेन्नईमध्ये 4 विकेट्स घेतल्या. तसंच आठव्या क्रमांकावर येत 49 रन काढले. वेस्ट इंडिजचा त्या मॅचमध्ये पराभव झाला, पण ऑल राऊंडर रसेलची क्रिकेट विश्वाला ओळख झाली.
वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली. त्या दौऱ्यातील वन-डे मॅचमध्ये वेस्ट इंडिजची अवस्था 7 आऊट 95 अशी झाली होती. त्यावेळी रसेलनं 9 व्या क्रमांकावर येत 64 बॉलमध्ये नाबाद 92 रन काढले. वन-डे क्रिकेटमध्ये 9 व्या क्रमांकावरील बॅट्समननं केलेला हा सर्वोच्च स्कोअर आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेटमधील मतभेदाचा परिणाम रसेलच्या वन-डे करियरवरही झाला. तो गेल्या दहा वर्षात वेस्ट इंडिजकडून फक्त 56 वन-डे (Andre Russell Birthday) खेळला आहे. सर्वात कमी बॉलमध्ये 1 हजार रन करण्याचा रेकॉर्डही रसेलच्या नावावर आहे. त्यानं 767 बॉलमध्ये 1000 चा टप्पा ओलांडला आहे.
एका वर्षात 5 विजेतेपद
आंद्रे रसेलच्या T20 कारकीर्दीमध्ये 2016 हे वर्ष सर्वात यशस्वी वर्ष ठरलं. त्या वर्षात वेस्ट इंडिजला T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2016) जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सेमी फायनलमध्ये भारताला बाहेर काढण्याचं अखेरचं काम रसेलच्या बॅटनंच केलं होतं. T20 वर्ल्ड कपसह कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL), बिग बॅश लीग (BBL), पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) या पाच T20 स्पर्धा एकाच वर्षात जिंकणाऱ्या टीमचा रसेल सदस्य (Andre Russell Birthday) होता. याच वर्षी रसेलनं CPL मध्ये फक्त 42 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत रेकॉर्ड केला. त्यानंतर दोन वर्षांनी 40 बॉलमध्ये सेंच्युरी करत स्वत:चाच रेकॉर्ड मोडला. सिडनी थंडर्सकडून बिग बॅशमध्ये 186.86 च्या स्ट्राईक रेटनं रन केले आणि 16 विकेट्सही घेतल्या. रसेलला या ऑल राऊंड कामगिरीमुळे ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
रसेलच्या या यशाला पुढच्याच वर्षी ग्रहण लागलं. जानेवारी 2017 मध्ये तो डोपिंग प्रकरणात दोषी आढळला. यामध्ये त्याच्यार एक वर्षांची बंदी लादण्यात आली.
व्हिव रिचर्ड्सना मैदानात खुन्नस देणारा क्रिकेटपटू
केकेआरची लाईफलाईन
आंद्रे रसेल आज केकेआरची लाईफ लाईन म्हणून ओळखला जातो. केकेआरची संपूर्ण टीम ही त्याच्या खेळावर अवलंबून असते. रसेल खेळायला लागला की केकेआरची टीमही धावायला लागते. पण रसेलनं आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेयरडेव्हिल्स (DD) या टीमकडून 2012 साली पदार्पण केलं. त्याला 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सनं करारबद्ध केलं.
आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त स्ट्राईक रेट रसेलचाच आहे. त्यानं या स्पर्धेत 132 फोर लगावले असून त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 167 सिक्स लगावले आहेत.* फोर पेक्षा सिक्स जास्त लगावणाऱ्या मोजक्या बॅट्समममध्ये रसेलचा समावेश आहे.
आयपीएल 2019 मध्ये रसेलनं 204.81 च्या स्ट्राईक रेटनं 510 रन केले आणि 11 विकेट्स घेतल्या. या ऑल राऊंड कामगिरीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रसेलला गेल्या काही वर्षात दुखापतीचा फटका बसला आहे. त्याचा परिणाम त्याच्या आयपीएलमधील खेळावरही झाला.
आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं अवघ्या दोन ओव्हर्समध्ये 5 विकेट्स घेतल्या. तर चेन्नई सुपर किंग्स (CSK) फक्त 21 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली होती. रसेलच्या या दोन जबरदस्त खेळ्या केकेआरला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. त्याला टीममधील अन्य मंडळींकडून सहकार्य न मिळाल्यानं केकेआरचा पराभव झाला.
कोलकाता नाईट रायडर्स तळाला जाण्याचं सर्वात मोठं कारण!
केकेआरचं या आयपीएलमध्येही भवितव्य धोक्यात आहे. रसेलनं काही चांगल्या खेळी केल्या, पण त्यामध्ये सातत्य नाही. केकेआरची गाडी रूळावर आणण्यासाठी रसेल आजच्या वाढदिवशी (Andre Russell Birthday) काय संकल्प करतो, आणि त्या संकल्पपूर्तीसाठी किती झपाट्यानं खेळतो यावर केकेआरचं या आयपीएलमधील (IPL 2022) भवितव्य अवलंबून आहे.
* सर्व आकडेवारी ही 28 एप्रिल 2022 पर्यंतची आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.