भारतीय क्रिकेटचा हरवलेला हिरो विनोद कांबळीचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (18 जानेवारी 1972) रोजी त्याचा जन्म (Vinod Kambli Birthday) झाला. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत (Mumbai) विनोद क्रिकेट शिकला. शारदाश्रम शाळेचा तो विद्यार्थी. रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) हे त्याचे क्रिकेटचे कोच. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विनोदचा शालेय मित्र. सचिन-विनोद जोडीनं शालेय क्रिकेटमध्ये 664 रन्सची नाबाद भागिदारी केली होती, हे आज सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच मॅचमध्ये नंतर विनोदनं 37 रन्समध्ये 6  विकेट्स घेतल्या होत्या हे खूप कमी जणांना माहिती आहे. असमान्य प्रतिभेचा धनी असलेल्या विनोदला आचरेकर सर अनेकदा सचिनपेक्षा चांगला क्रिकेटपटू मानत असत.

आक्रमकता स्थायी भाव

आक्रमकता हा विनोदच्या खेळाचा स्थायी भाव होता. त्याने रणजी क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्सर लगावत पदार्पण केलं होतं. त्याचा शालेय मित्र सचिनची 1989 साली राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. विनोदला आणखी दोन वर्ष थांबावं लागलं. 1991 साली विनोदनं सचिनप्रमाणेच पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

शेन वॉर्नच्या एका ओव्हरमध्ये 22 रन्स!

विनोदनं T20 क्रिकेटच्या पूर्वीच्या जमान्यात शेन वॉर्नच्या (Shane Warne) एका ओव्हरमध्ये 22 रन्स काढले होते. सलग दोन टेस्टमध्ये दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावणारा विनोद हा पहिला भारतीय (Vinod Kambli Birthday) होता. त्याने पहिल्या सात टेस्टमध्ये चार सेंच्युरी झळकावल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार रन्स पूर्ण करण्याचा विक्रमही विनोदनं केला होता. विनोद वयाच्या 24 व्या वर्षी 1996 मध्ये शेवटची टेस्ट खेळला त्यावेळी त्याची टेस्टमधील सरासरी होती 54.20.  प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही विनोदनं 129 मॅचमध्ये 59.67 च्या सरासरीनं 35 सेंच्युरी आणि 44 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत.

मैदानावर वाट्टेल तो विक्रम करण्याची क्षमता असलेला, कोणत्याही बॉलर्सची धुलाई करण्याची गुणवत्ता असलेला विनोद क्रिकेटबाह्य कारणांमुळेच आज अनेकांच्या लक्षात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाल्यानंतर मिळालेलं यश, प्रसिद्धी त्याला पचवता आली नाही, असा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळेच लेट नाईट पार्ट्यांच्या गॉसिपमध्ये विनोदचं नाव अडकलं. कौटुंबिक जीवनातही वादळं आली या सर्वांचा परिणाम त्याच्या क्रिकेटवर झाला.

विनोदचा ‘तो’ चेहरा कुणीही विसरणार नाही!

1996 च्या वर्ल्ड कप (Cricket World Cup 1996) सेमीफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची इनिंग अचानक गडगडली. विनोद एका बाजूने उभा होता. टीम इंडियाच्या आठ विकेट्स गेल्यानंतर कोलकाताच्या प्रेक्षकांनी संतप्त होऊन हुल्लडबाजी सुरु केली. प्रेक्षकांच्या गोंधळामुळे मॅच तिथेच थांबवून श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. त्यावेळी रडत-रडत मैदान सोडणाऱ्या विनोदचा चेहरा (Vinod Kambli Birthday) 1990 च्या दशकात क्रिकेट पाहणारा कोणताही क्रिकेट फॅन कधीही विसरणार नाही.

1996 च्या वर्ल्ड कपनंतर विनोद टीम इंडियात कधी स्थिरावलाच नाही. टीम इंडियाच्या वन-डे टीममध्ये नऊ वेळा कमबॅक करणारा विनोद वयाच्या 28 व्या वर्षी 2000 साली शेवटची आंतरराष्ट्रीय वन-डे खेळला. अखेर 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि 2011 साली प्रथमश्रेणी क्रिकेटमधून विनोदने निवृत्ती घेतली.

विनोदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती रन्स काढले यापेक्षा त्याला किती रन्स काढता आले नाहीत याचीच आठवण विनोदसह (Vinod Kambli Birthday) सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सला नेहमीच सतावत राहील.

वाढदिवस स्पेशल : वेस्ट इंडिजच्या सुवर्णयुगाचा अखेरचा साक्षीदार! )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: