फोटो – ट्विटर

कोणत्याही क्रिकेटपटूची क्रिकेटच्या मैदानात रिटायर होण्याची इच्छा असते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर, सहकारी खेळाडूंची मानवंदना याच्या साक्षीनं आपली शेवटची मॅच संस्मरणीय करावी असं कुणाला वाटणार नाही?  राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी यापैकी एकही भारतीय क्रिकेटपटू या प्रकारे मैदानात रिटायर झाला नाही. या महान क्रिकेटपटूंना हे भाग्य मिळालं नाही. सचिन तेंडुलकर याबाबतीत सुदैवी ठरला. त्यानं घरच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं थांबवलं. सचिननंतर हे भाग्य फक्त आशिष नेहरा (Ashish Nehra) या भारतीय क्रिकेटपटूला मिळालं. आशिष नेहराचा आज वाढदिवस (Ashish Nehra Birthday) आहे. आजच्याच दिवशी (29 एप्रिल 1979) नेहराचा जन्म झाला.

दुष्काळ संपवला

आशिष नेहरा टीम इंडियात येण्यापूर्वी भारतामध्ये डावखुरा फास्ट बॉलर नव्हता. वासिम अक्रम (Wasim Akram), चामिंडा वास (Chaminda Vaas) यासारखे शेजारच्या देशातील डावखुरे फास्ट बॉलर्स क्रिकेट गाजवत होते. पण भारतात याबाबतीत दुष्काळ होता. भारताकडून करसन घावरी हे भारताचे डावखुरे फास्ट बॉलर 1981 साली रिटायर झाले. त्यानंतर थेट 1999 साली नेहरानं पदार्पण केलं.

दुखापतींमुळे मोठा सेटबॅक

आशिष नेहराकडं बॉल स्विंग करण्याची क्षमता होती. त्यामुळे त्याची तुलना अगदी सुरुवातीपासूनच वासिम अक्रमशी करण्यात आली. नेहरानं त्याच्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याच्यातील क्षमतेला क्वचितच न्याय दिला. याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या करियरला दुखापतींचा मोठा फटका बसल. नेहराची तब्बल 12 ऑपरेशन झाली. ‘शरिराच्या एखाद्या भागाला दुखापत झालेली नाही, तर दोन दुखापतींच्यामध्ये कुठंतरी माझं शरीर आहे,’ असं नेहरा एकदा म्हणाला होता. या प्रत्येक दुखापतीनंतर त्यानं टीममध्ये कमबॅक केलं.

वाढदिवस स्पेशल : भुवनेश्वर कुमार, स्विंगच्या राजाला दुखापतींचा शह!

नेहराच्या क्रिकेटमधील आकडेवारीचा विचार केला तर तो टेस्टपेक्षा वन-डेमध्ये अधिक यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 17 टेस्टमध्ये 44 , तर 120 वन-डेमध्ये 157 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचे दोन वर्ल्ड कप, दोन आशिया कप आणि तीन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमचा नेहरा सदस्य होता.

आशिष नेहरा (Ashish Nehra Birthday)  म्हंटलं की अनेकांना 2003 च्या वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup 2003) इंग्लंड विरुद्धचा स्पेल आठवतो. डबरनमधील ती रात्र फक्त नेहराची होती. नेहरानं इंग्लंड विरुद्ध फक्त 23 रन देत 6 विकेट्स घेतल्या. भारतीय बॉलर्सचा वर्ल्ड कपमधील हा सर्वोत्तम स्पेल आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 2011 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही (Cricket World Cup) नेहरानं टिच्चून बॉलिंग केली. त्यानं 10 ओव्हर्समध्ये 33 रन देत दोन विकेट्स घेतल्या. त्याच सेमी फायनलमध्ये नेहराला फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला फायनल खेळता आली नाही. दुर्दैवानं 2011 ची वर्ल्ड कप सेमी फायनल ही नेहराच्या करियरमधील शेवटची वन-डे ठरली.

T20 मध्ये पुनरागमन

आशिष नेहराला वर्ल्ड कपमधील चांगल्या कामगिरीनंतरही टीम इंडियात संधी मिळाली नाही. तरीही तो निराश झाला नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये तो सातत्यानं त्याच काम करत होता. नेहरा त्याच्या करियरमध्ये पाच आयपीएल टीमकडून खेळला.

सनरायझर्स हैदराबादनं (SRH) 2016 साली आयपीएल स्पर्धा जिंकली. त्या टीमचा तो सदस्य होता. सीएसकेकडूनही त्यानं एक आयपीएल स्पर्धा गाजवली. T20 क्रिकेटमधील ‘पॉवर प्ले’ आणि ‘डेथ ओव्हर्स’ या दोन्ही कसोटीच्या क्षणी उत्तम बॉलिंग करण्याची नेहराची क्षमता होती. त्यामुळे त्यानं पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. तो टीम इंडियाकडून T20 मॅच खेळला.

नेहराची असाधारण कामगिरी

आशिष नेहरा मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, अजय जाडेजा,. सौरव गांगुली, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली अशा सात भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वामध्ये नेहरा खेळलाय. इतक्या विविध कॅप्टनच्या नेतृत्वात खेळलेला यापूर्वीचा भारतीय खेळाडू हा फक्त सचिन तेंडुलकर आहे. (सचिन 6 कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खेळलाय. तो स्वत: ही कॅप्टन होता. तसा हिशेब केल्यास ही संख्या 7 होते)

 नेहरानं पदार्पण केलं (Ashish Nehra Birthday) तेंव्हा विराट कोहली साडेनऊ वर्षांचा होता. तर 1999 साली अवघ्या दीड वर्षाच्या असलेल्या ऋषभ पंत या पोरासोबतही नेहरा एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला आहे.. नेहरानंतर काही महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा एमएसके प्रसाद हा तो शेवटची T20 खेळला तेंव्हा निवड समितीचा अध्यक्ष होता.

IPL 2022, Explained: सर्वांचा अंदाज चुकवत गुजरात टायटन्सनं यश कसं मिळवलं?

आशिष नेहराला अनेकांनी ट्रोल केलं. टीमच्या सांघिक कामगिरीतील चुकांचं खापर अनेकदा त्याच्यावर फोडण्यात आलं. नेहरा त्यामुळे दबला नाही. झहीर खानच्या सोबतीनं त्यानं नवे फास्ट बॉलर तयार करण्याचं काम केलं. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी हे फास्ट बॉलर तयार करण्यात नेहराचा वाटा आहे. त्यानं रिटायरमेंटनंतर कोच म्हणून मोहम्मद सिराजला सर्वप्रथम हेरलं. सिराजच्या खराब काळात त्याला विश्वास दिला. त्याचं फळ आपल्याला आज दिसत आहे.

आशिष नेहरा आता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) टीमचा हेड कोच आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये गुजरातनं निवडलेल्या खेळाडूंवर अनेकांनी टीका केली. पण, ती टीम आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये टॉपवर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये परत येण्याची आणि मॅच जिंकण्याची जिद्द गुजरातचे खेळाडू दाखवतायत. या खेळाडूंमध्ये ही जिद्द निर्माण करण्यात नेहराच्या कोचिंगचा मोठा वाटा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: