फोटो – ट्विटर/WisdenCricket

तुम्ही एखाद्या गोष्टीला लायक असूनही कोणत्या कारणामुळे तुम्हाला ती गोष्ट मिळत नसेल तर होणारा त्रास, येणारी निराशा आणि यामुळे होणारा स्वभावातील बदल हे प्रकार अनेकांना टाळता येत नाही. कोणत्याही खेळाडूसाठी त्याच्या करियरचा कालखंड हा अन्य क्षेत्रातील करियरपेक्षा कमी असतो. अन्य क्षेत्रात वयाच्या तिशीनंतर लोकांचा जम बसण्यास सुरुवात होते. काही जण याच काळात नवी वाट शोधतात आणि त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देतात. खेळाडूंसाठी वयाची तिशी ओलांडल्यानंतर हे करण्याची संधी नसते. सध्याच्या अती स्पर्धात्मक काळात वयाच्या तिशीमध्ये पदार्पण करुनही सातत्यपूर्ण खेळाचा ठसा उमटवलेला ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन माईक हसीचा आज वाढदिवस (Mike Hussey Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 मे 1975) रोजी हसीचा जन्म झाला.

हसीचे पदार्पण का लांबले?

हसीने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्याने सातत्याने रन केले. राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळत नाही, हे पाहून वेळेचा उपयोग करण्यासाठी त्याने इंग्लंडमध्ये जाऊन कौंटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तिथंही तो भरपूर रन काढत होत, पण त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी 30 वर्षांचा होईपर्यंत वाट पाहावी लागली.

हसीला तब्बल 10 वर्ष वाट पाहावी लागली याचे कारण म्हणजे त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सुवर्णकाळ सुरु होता. प्रत्येक नंबरवर खेळणाऱ्या खेळाडूंच्या जागा फिक्स होत्या. हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, लँगर, डेमियन मार्टिन, मार्क वॉ, स्टीव्ह वॉ, मायकल क्लार्क या दिग्गजांमुळे हसीला ऑस्ट्रेलिया टीमचे दार उघडण्यासाठी एक दशक वाट पाहावी लागली.

लेट आला आणि थेट भिडला!

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत रन करुनही राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळत नसेल तर खेळात शिथिलता येऊ शकते. हसीमध्ये ती कधी आलीच नाही. तो सतत रन करत होता. अखेर त्याला 2004 साली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळाली. तोपर्यंत आधुनिक क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन काढणारा बॅट्समन होण्याचा रेकॉर्ड हसीच्या नावावर होता.

पहिल्या संधीनंतर दुसरी आंतरराष्ट्रीय मॅच आणि पहिली टेस्ट खेळण्यासाठी त्याला आणखी एक वर्ष थांबावे लागले. आता हसीकडे  प्रयोग करण्याची, चाचपडण्याची संधी नव्हती. त्यामुळे त्याने तो यापूर्वी जे काम करत होता तेच काम करण्यास सुरुवात केली.

फिनिशर शब्दाची क्रिकेटला ओळख करुन देणारा मायकल बेव्हन

रनमशीन

हसीमध्ये (Mike Hussey Birthday) रन काढण्याची भूक प्रचंड होती.  वेस्ट इंडिज विरुद्ध ब्रिस्बेन टेस्टमध्ये 2005 साली पदार्पण करण्यापूर्वी तो सर्व प्रकारच्या कसोटीतून तावून सुलाखून बाहेर पडला होता. बहुतेक काळ ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळणाऱ्या हसीला ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळावे लागले. तो तिथे सहज सेट झाला.

हसीने फक्त 166 दिवसांमध्ये आणि 11 टेस्टमध्ये 1 हजार रनचा टप्पा पूर्ण केला. त्यावेळी त्याची सरासरी 70 च्या घरात होती. त्यानंतर त्याने 20 टेस्टमध्ये 2 हजारचा टप्पा ओलांडला. त्यावेळी त्याची सरासरी झाली होती, 84.80! टेस्ट प्रमाणेच वन-डेमध्येही हसीची रनमशिन धडधडत होती. 32 व्या वन-डे नंतर त्याने 102 च्या सरासरीने 902 रन काढले होते. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 100 होता.

मिस्टर क्रिकेट

हसीचे सातत्य क्रिकेट पंडितांना आश्चर्यचकीत करणारे होते. त्याचे सुरुवातीचे आकडे सांख्यिकी तज्ज्ञांना (statistician) विश्वास बसणार नाही असे होते. हे सारं होऊनही हसीचे पाय जमिनीवर घट्ट होते. कोणत्याही नंबरवर स्वत:ला पूर्ण झोकून देऊन बॅटींग केल्यानंतर फिल्डिंगही तो तितक्याच कमिटमेंटने करत असे. त्याच्या चेहऱ्यावरील स्मित रेषा कधीही ढळली नाही. टिपिकल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये असलेला माज त्याच्यात नव्हता. तो संधी मिळाली तर सलग आठवडाभर बॅटींग करेल असे म्हंटले जात असे. त्याच्या या स्वभावामुळेच त्याला ‘मिस्टर क्रिकेट’ (Mr. Cricket) हे टोपणनाव मिळाले. या नावामागे गंमत आणि त्यापेक्षा जास्त आदर दडला आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या ‘या’ मॅचपूर्वी धोनी 12 रात्र जागा होता !

पाकिस्तानची धुलाई

हसीने (Mike Hussey Birthday) टेस्ट आणि वन-डे प्रमाणेच टी20 मध्ये देखील दबदबा निर्माण केला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2010  साली झालेल्या T20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये हसीचा जलवा खऱ्या अर्थाने दिसला.

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 192 रनचे आव्हान दिले होते. हसी 13 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 105 अशी नाजूक होती. त्यानंतर हसीने खेळाची सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा असलेला पाकिस्तानचा लेगस्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) मॅचची शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 18 रन हवे होते. मिचेल जॉन्सनने पहिल्या बॉलवर एक रन काढून हसीला स्ट्राईक दिली. त्यानंतरच्या चार बॉलवर हसीने 6,6,4 आणि 6 अशी 3 सिक्स आणि 1 फोरचा वर्षाव करत 22 रन काढले आणि ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपची फायनल गाठून दिली. त्या मॅचमध्ये हसीने फक्त 24 बॉलमध्ये 3 फोर, 6 सिक्स आणि 250 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 60 रन काढले.

धोनीचा खास मित्र

माईक हसी (Mike Hussey Birthday) 2008  साली झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) सदस्य बनला. त्याने आयपीएल पदार्पणातच सेंच्युरी झळकावली. त्यानंतरही पहिले तीन सिझन मॅथ्यू हेडन टीममध्ये असल्याने (Matthew Hayden) हसीला बहुतेक काळ बेंचवरच बसावे लागले. तो पहिले 3 आयपीएल सिझन मिळून फक्त 7 मॅच खेळला. मॅथ्यू हेडन रिटायर झाल्यानंतर त्याची सीएसकेच्या टीममधील जागा फिक्स झाली.

भारतामधील प्रत्येक गोष्टीत Negativity Unlimited शोधणाऱ्या मंडळींना मॅथ्यू हेडनचं खणखणीत उत्तर

हसीने 2011 साली 414 रन काढत टीमच्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावली. तो 2013 पर्यंत सीएसकेकडे होता. 2013 च्या सिझनमध्ये त्याने 733 रन काढले. पुढील वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने (MI) करारबद्ध केले. मुंबईकडून 1 सिझन खेळल्यानंतर तो पुन्हा एकदा 2015 साली त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील शेवटचा सिझन सीएसकेकडून खेळला. महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) हसीवर खूप विश्वास आहे. हसी टीममध्ये असताना तो होताच, पण रिटायर झाल्यानंतरही हसी सीएसकेसोबत आहे. तो सध्या सीएसकेचा बॅटिंग कोच आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: