फोटो – ट्विटर/ICC

आक्रमक बॅट्समन, चपळ फिल्डर आणि उपयुक्त बॉलर असं तो क्रिकेटसाठी पूर्ण पॅकेज होता. या शतकाच्या पहिल्या दशकात रथी-महारथींनी भरलेल्या त्याच्या टीममध्ये तो निर्विवाद मॅच विनर होता. एका खूप मोठ्या आणि चिवट क्रिकेटपटूची जागा त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत घेतली. त्यामुळे देशात वाद झाले. पहिल्याच वर्ल्ड कप मॅचमध्ये 143 रन काढत टीकाकारांची तोंड बंद केली. त्याची क्रिकेटपटू म्हणून प्रचंड क्षमता होती. पण, वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणामुळे त्याचं करियर भरकटलं. त्याच वादात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले. त्यामुळे त्याच्या करियरचे आणि क्रिकेटचेही मोठे नुकसान झाले. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर अ‍ॅण्ड्रयू सायमंड्चा आज वाढदिवस (Andrew Symonds Birthday) आहे. आजच्याच दिवशी (9 जून 1975) रोजी सायमंड्सचा जन्म झाला.

वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया

सायमंड्स मुळचा वेस्ट इंडिजचा. त्यानं इंग्लंडमधील जोडप्यानं दत्तक घेतले. तो लहान असताना ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले. त्याचा जन्म इंग्लंडमधील असल्याने त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट देखील आहे. तो क्वीन्सलँड टीमकडून पहिली फर्स्ट क्लास मॅच इंग्लंड विरुद्ध खेळला. त्यामध्ये त्याने 108 रन काढत झोकात पदार्पण केले.

सायमंड्सनं ऑस्ट्रेलियात 1994 साली फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो इंग्लिश कौंटी खेळू लागला. इंग्लिश कौंटीमधील एका मॅचचम्ये सायमंड्सनं 254 रनची खेळी केली. या खेळीत त्याने 16 सिक्स लगावले. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वात जास्त सिक्स मारण्याचा त्याचा हा रेकॉर्ड जवळपास दोन दशक अबाधित होता.

सायमंड्सकडे ब्रिटीश पासपोर्ट असल्याने इंग्लंडकडून खेळण्यास तो पात्र होता. कौंटी सिझन गाजवल्यानं त्याचे नाव देखील इंग्लंडच्या बोर्डाने नक्की केले होते. पण त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवार ऑस्ट्रेलियात असल्याने सायमंड्सने इंग्लंडच्या जागी ऑस्ट्रेलियाची निवड केली.

शेवटपर्यंत लढणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा नेता

करियरमधील टर्निंग पॉईंट

सायमंड्सनं (Andrew Symonds Birthday)  1998 साली पाकिस्तान विरुद्ध लाहोरमध्ये झालेल्या वन-डे मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिले पाच वर्ष त्याला भरीव कामगिरी करता आलेली नव्हती. तो त्यामुळे 2003 क्रिकेट वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup 2003) त्याची निवड वादग्रस्त ठरली. त्याच्या जागी अनुभवी स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याला संधी द्यावी असं अनेकांचं मत होतं.पण रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) यानं सायमंड्स हवा होता. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला. पॉन्टिंगचा हा विश्वास सायमंड्सनं पहिल्याच वर्ल्ड कप मॅचमध्ये सार्थ ठरवला.

पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये वासिम अक्रम आणि शोएब अख्तर यांच्या स्पेलमुळे सायमंड्स बॅटींगला आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची 16 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 86 अशी अवस्था होती. सायमंड्सनं सुरुवातीला रिकी पॉन्टिंगसोबत 60 रनची पार्टरनरशिप केली. पॉन्टिंग आऊट झाला, पण सायमंड्स सेट झाला होता. तो सेट झाला की काय करु शकतो हे जगाने त्यावेळी पाहिले. त्याने 60 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली. सायमंड्सचे पार्टरनर आऊट होत होते. तो थांबला नाही. त्याने 92 बॉलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी झळकावली. सेंच्युरीनंतर त्याने वेग आणखी वाढवला. अक्रम, अख्तरसह आफ्रिदी आणि वकारचीही धुलाई करत 125 बॉलमध्ये 18 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 143 रन काढले. ऑस्ट्रेलियन खेळाडूचा तो वर्ल्ड कपमधील सर्वोच्च स्कोअर होता.

पाकिस्तान विरुद्धच्या सेंच्युरीनंतर सायमंड्सनं (Andrew Symonds Birthday) मागे पाहिलंच नाही. त्या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये तो टीमसाठी उपयुक्त योगदान देत होता. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 आऊट 51 अशी असताना सायमंड्सने नाबाद 91 रनची खेळी करत टीमला फक्त संकटातून बाहेर काढलं नाही, तर फायनलमध्ये पोहचवलं. भारताविरुद्धच्या फायनलमध्ये त्याला बॅटींगची संधी मिळाली नाही, पण त्याने 7 रनध्ये 2 विकेट्स घेतल्या.

मिडल ऑर्डरमधील भक्कम आधार, बॉल सातत्याने बाऊंड्री लाईनच्या बाहेर मारु शकेल असा बॅट्समन, अशक्य कॅच आणि रन आऊट सहज करणारा फिल्डर आणि उपयुक्त बॉलर असं एक कम्पिलट पॅकेज सायमंड्सच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला मिळाले होते. त्या वर्ल्ड कपपूर्वी 25 पेक्षाही कमी असलेली सायमंड्सची वन-डेमधील सरासरी तो रिटायर झाला तेव्हा 40 च्या वर होती.

सायमंड्सची ‘टेस्ट’

स्टीव्ह वॉ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर 2004 साली श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये सायमंड्सची टेस्ट टीममध्ये निवड झाली. सायमंड्सच्या पदार्पणातील टेस्टमध्ये शेन वॉर्ननं हसन तिलकरत्ने 500 वी विकेट घेतली. त्यावेळी तिलकरत्नेचा कॅच सायमंड्सनंच घेतला होता.

सायमंड्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्या काळात त्याचंच पहिलं नाव असलेला अ‍ॅण्ड्रयू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) इंग्लंडच्या टीममध्ये ऑल राऊंडर म्हणून स्थिरावला होता. फ्लिंटॉफला पर्याय म्हणून ऑस्ट्रेलियन निवड समिती सायमंड्सकडे पाहत होती. त्यामुळे पहिली दोन वर्ष एकही हाफ सेंच्युरी न करता तो टेस्ट टीममध्य टिकून होता. अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टमध्ये त्याने 54 बॉल 72 रन अशी आक्रमक खेळी केली. या पहिल्या टेस्ट हाफ सेंच्युरीमध्ये सायमंड्सनं 6 सिक्स लगावले होते. या हाफ सेंच्युरीनंतरही सायमंड्सचा खराब फॉर्म कायम होता. या खराब फॉर्ममुळे त्याला बांगलादेश विरुद्धच्या सीरिजमधून वगळण्यात आले.

शेन वॉटसन जखमी झाल्यानं 2007 साली सायमंड्सला (Andrew Symonds Birthday)  पुन्हा संधी मिळाली. 2007-08 या वर्षातश श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये त्याने 777 रन काढले. तो आता टेस्ट टीममध्ये स्थिरावत होता. सिडनी टेस्टमध्ये त्याने 162 रनची सर्वोच्च खेळी केली. त्याच टेस्टमध्ये ‘मंकी गेट’ प्रकरण उद्भवले. हरभजनबरोबर त्याचा वाद झाला. त्या संपूर्ण प्रकरणात ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं आपली बाजू घेतली नाही, असं सायमंड्सला वाटले. मंकीगेट प्रकरणानंतर सायमंड्सच्या करियरला ओहोटी लागली.

काय आहे भारत आणि ऑस्ट्रेलियातील सर्वात वादग्रस्त ‘मंकीगेट’ प्रकरण?

 बोट बुडाली आणि…

सायमंड्सच्या करियरमधील वाद पाहण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातील हा किस्सा वाचला पाहिजे. सायमंड्सला मासेमारीचा छंद होता. एकदा तो त्याचा ऑस्ट्रेलियन टीममधील सहकारी मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) आणि आणखी एक मित्र सर्फिंगसाठी खोल समुद्रात आणि त्यांची बोट बुडाली. त्यावेळी हे सर्वजण तब्बल तीन तास पोहून किनाऱ्यावर परतले. हे सर्व जण पोहत होते, त्या पाण्यात शार्क मासे देखील होते.

 सायमंड्स आणि वाद

सायमंड्सवर (Andrew Symonds Birthday)  2005 साली इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत मॅचच्या आदल्या रात्री दारु पिऊन टीमचा नियम मोडल्या प्रकरणी बंदी घालण्यात आली. त्यानंतर 2008 साली टीम मीटिंगच्या वेळी मासेमारी करण्यासाठी गेल्यानं त्याला टीममधून वगळण्यात आले. या हकालपट्टीनंतर तो टीममध्ये परतला, पण त्यानंतर त्याने एका बारमध्ये राडा केला. त्यानंतर 2009 साली दारू पिऊन रेडिओला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकलमला शिवीगाळ केली होती.

वेस्ट इंडिजमध्ये 2009 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपपूर्वी सायमंड्स पुन्हा टीममध्ये आला. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या करारात तो सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार नाही, अशी अट होती. या वर्ल्ड कप दरम्यान एक रग्बी मॅच पाहताना तो टीममधील सहकाऱ्यासह मद्यपान करत होता. करारातील अट मोडल्याने सायमंड्सची टीममधून हकालपट्टी झाली. त्यानंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला नाही.

T20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर मेडन टाकणारा एकमेव बॉलर

आयपीएलमध्ये सायमंड्स

सायमंड्स मंकीगेट प्रकरणामुळे 2008 साली भारतामध्ये बराच बदनाम झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणानंतर महिनाभरातच झालेल्या पहिल्या आयपीएल लिलावात सायमंड्स (Andrew Symonds Birthday)

हा सर्वात महागडा विदेशी क्रिकेटपटू ठरला. त्या लिलावात तो महेंद्रसिंह धोनीनंतरचा सर्वात महागडा खेळाडू होता. सायमंड्सला डेक्कन चार्जर्सनं करारबद्ध केलं. पहिल्या आयपीएल सिझनमध्ये डेक्कन चार्जर्सची टीम शेवटच्या क्रमांकावर होती. पुढच्याच सिझनमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले. या विजेतेपदात सायमंड्सचे देखील योगदान होते.

मुंबई इंडियन्सने 2011 साली सायमंड्सला कराराबद्ध केले. त्या सिझनमध्ये तो आणि हरभजन एकाच टीमकडून खेळले. मंकीगेट प्रकरणाबद्दल हरभजननं ड्रेसिंग रुमध्ये माफी मागितल्याचा दावा सायमंड्सने केला होता. हरभजनने नंतर हा दावा फेटाळला. तो 2011 साली ‘बिग बॉस’ मध्ये देखील सहभागी झाला होता. अखेर 2012 साली सायमंड्स सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर झाला.

कुणाचाही सायमंड्स होऊ शकतो

सायमंड्सचे करियर खराब होण्यात त्याच्या अतिरेकी मद्यपानाचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रेशर, मंकी गेट प्रकरणातील ऑस्ट्रेलियन बोर्डाची भूमिका, मीडियाचा सतत फोकस यामुळे सायमंड्सचे करियर संपले. ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ या दोन खेळाडूंचा उदय झाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याची गरज उरली नाही. अंगातील गुणवत्ता आणि क्षमतेला शिस्तीची जोड नसेल तर कुणाचाही करियरमध्ये  सायमंड्स होऊ शकतो. हेच सायमंड्सच्या वाढदिवशी (Andrew Symonds Birthday)  त्याच्या करियरचा मागोवा घेताना सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: