फोटो – ट्विटर

6 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 18 टेस्ट, 48 वन-डे आणि 22 T20 मॅच. त्याला अवजड देहामुळे ड्रेसिंग रुममध्येच घेऊ नये असं टीममधील माजी सहकाऱ्याचं मत होते. दुखापतींचा ब्रेक. ताण सहन झाला नाही म्हणून घेतलेली रजा. बारमधील वाद. मारहाणीत कोमात आणि दारु पिण्याच्या सवयीमुळे टीममधून कायमची सुट्टी. तो 21 व्या शतकातील ‘बॅड बॉय’ क्रिकेटरची यादी केली तर ती यादी त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही. तरीही त्याचं क्रिकेटवर प्रेम होतं. तो आक्रमक बॅट्समन होता. त्याच्या बॅटनं टीम इंडियाला नेहमीच तडाखे दिले. न्यूझीलंडच्या आक्रमक आणि वादग्रस्त क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या जेस्सी रायडरचा आज वाढदिवस (Jesse Ryder Birthday) आहे. आजच्याच दिवशी (6 ऑगस्ट 1984) रायडरचा जन्म झाला.

तणावात बालपण

रायडर अशांत क्रिकेटपटू का झाला? याचे उत्तर कुठंतरी त्याच्या बालपणात दडलं आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्याची कस्टडी वडिलांकडं होती. पण वडिलांचं मुलाकडं लक्ष नव्हते. त्यामुळे रायडरचा बहुतेक वेळ मित्रांसोबतच जात असे.

रायडर 14 वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला मित्राकडं सोडलं. आपण ऑस्ट्रेलियातून काही दिवसांमध्ये परत येऊन तुला घेऊन जाऊ असं वचन त्यांनी दिलं होतं. रायडरचे वडील परत कधीही आले नाहीत. रायडरनं नंतरची काही वर्ष मित्रांच्या घरातच घालवली. मित्रांसोबत घरातील मागील भागात क्रिकेट खेळणे हा एकच त्याचा विरंगुळा होता. याच काळात त्याला दारुचे व्यसन जडले.

न्यूझीलंडला रामराम

रायडरनं वयाच्या 16 व्या वर्षांपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानं 18 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया अकादमीविरुद्ध 181 रनची खेळी केली होती. 2002 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा तो सदस्य होता. रॉस टेलर (Ross Taylor) हा त्याचा त्या टीममधील सहकारी. त्या वर्ल्ड कपमध्ये रायडरनं न्यूझीलंडकडून सर्वात जास्त रन काढले होते.

अंडर 19 वर्ल्ड कपनंतर रायडरनं न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी केली. तो एक बॅटींग ऑल राऊंडर म्हणून उदयाला आला होता. त्यानंतरही निवड समितीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळत नाही हे पाहून वैतागलेल्या रायडरनं न्यूझीलंड A टीमकडून खेळण्यास नकार दिला. त्याला आयर्लंडनं आकर्षक ऑफर दिली होती. त्यानं न्यूझीलंड सोडून आयर्लंडला जाण्याचा निर्णय घेतला पण तो तिथं वेळेत पोहचला नाही. त्यामुळे त्याचा तो करार रद्द झाला. रायडरच्या वादग्रस्त प्रकरणांची ही सुरुवात होती. त्यानंतर रायडरनं इंग्लिश कौंटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तिथं चांगलं बस्तान बसवलं. दोन्ही आजोबा इंग्लंडचे असल्यानं इंग्लंडकडून खेळण्याचा त्याचा विचार सुरु होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमला त्याची आठवण झाली. 2008 साली त्याची राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली.

‘त्याची ड्रेसिंग रुममध्ये जागा नाही’

जेस्सी रायडरनं (Jesse Ryder Birthday) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम परेरोनं त्याच्यावर जोरदार टीका केली होती. मी नॅशनल टीममध्ये असतो तर त्याच्या सारख्या खेळाडूला कधीही ड्रेसिंग रुममध्ये येऊ दिले नसते. तो नॅशनल टीमकडून खेळण्यासाठी फिट नाही.’ अशी टीका परेरोनं केली होती.

परेरोच्या या टीकेनंतरही रायडरच्या जास्तीच्या वजनानंतरही रिचर्ड हॅडलीच्या निवड समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवला. कारण ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) सोबत तो टीमला आक्रमक सुरुवात करुन देईल असा त्यांना विश्वास होता. रायडरनं नंतरच्या काळात तसा आक्रमक खेळ अनेकदा केला. त्याचबरोबर एक दक्ष फिल्डर म्हणून चांगले कॅच देखील पकडले.  

जोरदार पदार्पण आणि राडा

इंग्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी रायडरची सर्वप्रथम टीममध्ये निवड झाली. दुसऱ्याच वन-डेमध्ये त्यानं 62 बॉलमध्ये 79 रनची खेळी करत उपयुक्ता सिद्ध केली. रायडर-मॅकलम जोडीनं इंग्लंडनं दिलेलं 159 रनचं आव्हान 18.1 ओव्हरमध्येच पूर्ण केले.

रायडरनं वन-डे सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली. ही सीरिज संपल्यानंतर त्याने एका बारमध्ये राडा केला. या वादात त्याचा उजवा हात मोडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथं त्यानं कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. रायडरला तीन महिन्यांसाठी टीममधून निलंबित करण्यात आले. त्याचे टेस्टमधील पदार्पण काही काळासाठी लांबले.

भारताविरुद्ध भरती

रायडरनं पुढे बांगलादेश विरुद्ध पदार्पण केले. त्या सीरिजमध्ये तो एकदा 91 रनवर आऊट झाला. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्येही त्याची सेंच्युरी 11 रननं हुकली. टीम इंडिया 2009 साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेली होती. त्या टीममध्ये झहीर खान, इशांत शर्मा, मुनाफ पटेल असे चांगले बॉलर्स होते. भारताविरुद्धच्या त्या सीरिजमध्ये रायडरच्या बॅटला भरती आली होती.

टीम इंडिया विरुद्ध वन-डेमध्ये 393 रनचा पाठलाग करताना रायडरनं 80 बॉलमध्ये 105 रनची वादळी खेळी केली. त्यानंतर हॅमिल्टनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 60 अशी झाली होती. त्यावेळी रायडरनं पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. त्याने 102 रन काढले. डॅनियल व्हिटोरीनंही त्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली. पुढे सचिन तेंडुलकरची सेंच्युरी आणि हरभजन सिंगच्या 6 विकेट्स यामुळे टीम इंडियानं ती टेस्ट जिंकली.

डॅनियल व्हिटोरी, न्यूझीलंड क्रिकेटचा ‘हॅरी पॉटर’

नेपीयरमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा रायडर (Jesse Ryder Birthday) टीम इंडियाला नडला. 3 आऊट 23 असा स्कोअर असताना रायडरनं रॉस टेलरच्या मदतीनं प्रतिहल्ला चढवला. रायडरनं डबल सेंच्युरी झळकावली. टीम इंडियावर फॉलोऑनची नामुश्की सहन करावी लागली. त्यानंतर गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) 643 मिनिटं किल्ला लढवल्यानं टीम इंडियानं ती टेस्ट ड्रॉ केली.

2008 ते 2010 या काळात रायडर न्यूझीलंड टीमचा नियमित सदस्य होता. त्या काळात त्यानं  सातत्यानं रन केले. 2009 साली त्याला न्यूझीलंड क्रिकेटचा पुरस्कार देखील मिळाला. भारताविरुद्ध 2010 साली झालेल्या अहमदाबादमध्ये झालेल्या टेस्टमध्ये 4 आऊट 137 या अडचणीच्या परिस्थितीतून रायडरनं त्या टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या केन विल्यमसनच्या (Kane Williamson)  मदतीनं टीमला बाहेर काढलं. रायडरनं 103 तर विल्यमसनं 131 रन काढले. त्यानंतर रायडरचा फॉर्म हरपला. न्यूझीलंडचे कोच जॉन राईट सोबत त्याचा वाद झाला. खराब फॉर्म आणि तणावामुळे रायडरनं क्रिकेटचा अधिक अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला.

ब्रेक के बाद ‘बार-बार’ वाद!

जेस्सी रायडर (Jesse Ryder Birthday) न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. त्यामध्ये त्याने भरपूर रन करण्यास सुरुवात केली. तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी स्वत:ला तयार करत होता. त्यावेळी 28 मार्च 2013 रोजी रात्री एका बारच्या बाहेर काही जणांशी त्याचा वाद झाला. या वादात त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तो काही काळ कोमामध्ये होता. रायडर कोमातूनही परतला. त्याच्या मारेकऱ्यांना पुढे 2015 साली कोर्टानं शिक्षा केली.

या प्राणघातक हल्ल्यानंतर तो पुन्हा फिट झाला. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीममध्ये परतला. 2014 या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरे अँडरसननं वेस्ट इंडिज विरुद्ध 36 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. शाहिद आफ्रिदीचा वन-डे क्रिकेटमधील सर्वात वेगवान सेंच्युरीचा रेकॉर्ड त्याने मोडला. त्या वन-डेमध्ये अँडरसननं रायडरसोबत चौथ्या विकेटसाठी 75 बॉलमध्ये 191 रनची पार्टनरशिप केली. रायडरनं 51 बॉलमध्ये 104 रनची खेळी केली.

भारताविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी त्याची निवड झाली. ऑकलंड वन-डे नंतर तो पुन्हा एकदा जीमी नीशमसोबत बारमध्ये सापडला रायडरला टीम मॅनेजमेंटनं वॉर्निंग दिली. टेस्ट सीरिजसाठी त्याची टीममध्ये निवड झाली. त्यावेळी रात्री पुन्हा एकदा तो 2 वाजेपर्यंत बारमध्ये होता. त्याला दुसरी टेस्ट आणि टी20 मधून वगळण्यात आले. त्यानंतर रायडर पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसला नाही.

प्रचंड क्षमतेचा पण वादग्रस्त ऑल राऊंडर!

स्वच्छंदी रायडर

रायडरनं त्यानंतर इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये बस्तान बसवलं. तिथं भरपूर रन केले. तो कौंटी क्रिकेटमध्ये इतका रमला की न्यूझीलंड A टीममध्ये त्याची निवड झाल्यानंतर त्यानं टीममध्ये खेळण्यास नकार दिला. हा नकार देत त्यानं एकप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दार स्वत:साठी बंद केले.

रायडरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फार मोठी ठरली नाही, पण लक्षवेधी ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू शेवटपर्यंत आटापिटा करतात. त्याचा मार्ग त्यानं स्वत:हून बंद केला. त्याच्यासारख्या स्वच्छंदी माणसासाठी क्रिकेट खेळणं हे रेकॉर्ड करणे, टीमचा कॅप्टन होणे हे नव्हते, तर आनंद मिळवणे हे होते. त्यामुळेच त्यानं स्वत:च्या अटीवर क्रिकेट खेळण्याचे ठरवले. आता तो मुलांच्या कोचिंगमध्ये रमलाय. त्यांना बॅटींगचे धडे देण्याबरोबरच त्यानं केलेल्या चुका टाळण्याचा कानमंत्रही जेस्सी रायडर (Jesse Ryder Birthday) भावी क्रिकेटपटूंना देत आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

   

error: