
हेन्री ओलोंगाची (Henry Olonga) वर्ल्ड कपमधील ‘ती’ ओव्हर आजही भारतीय फॅन्स विसरलेले नाहीत. सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) एका सीरिजमध्ये सतत खून्नस दिलेला आणि नंतर फायनल मॅचमध्ये सचिननं ज्याची भरपूर धुलाई केली, असा ओलोंगाही आपल्याला आठवतो. तर काहींना झहीर खाननं (Zaheer Khan) त्याला एका ओव्हरमध्ये लगावलेले सलग चार सिक्स आठवत असतील. क्रिकेटच्या मैदानातील सर्वात दिग्गज व्यक्तीला आव्हान देणाऱ्या ओलोंगानं नंतर त्याच्या देशाच्या महाबलाढ्य अध्यक्षांना आव्हान दिले. त्याच्या पहिल्या धाडसाची हवा मैदानातच निघाली. दुसऱ्या धाडसामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देश सोडावा लागला. 8 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये जगाला बरच काही देणाऱ्या हेन्री ओलोंगाचा आज वाढदिवस (Henry Olonga Birthday) आहे. आजच्या दिवशी (3 जुलै 1976) त्याचा जन्म झाला.
पहिला ब्लॅक क्रिकेटपटू
वर्णभेदाचा मोठा फटका सहन केलेल्या झिम्बाब्वेकडून टेस्ट क्रिकेट खेळणारा ओलोंगा हा पहिला ब्लॅक क्रिकेटपटू आहे. त्याने 1995 साली वयाच्या 18 व्या वर्षीच पदार्पण केले. तो झिम्बाब्वेकडून टेस्ट खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू होता. त्याचा रेकॉर्ड 6 वर्ष टिकला. या दोन गोष्टींसोबतच आणखी एक इतिहास त्या टेस्टमध्ये घडला. हरारेमध्ये झालेल्या त्या टेस्टमध्ये झिम्बाब्वे पाकिस्तानचा एक इनिंग आणि 64 रननं पराभव केला. झिम्ब्बावेच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला विजय आहे. त्याने त्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये सईद अन्वरला आऊट केले होते.
याच सीरिजमध्ये चुकीच्या बॉलिंग अॅक्शनमुळे ओलोंगानं टाकलेला बॉल नो बॉल देण्यात आला. क्रिकेटच्या इतिहासात तब्बल तीन दशकानंतर या पद्धतीचा निर्णय झाला होता. ओलोंगाला याचा काही प्रमाणात फायदा झाला. त्याला झिम्बाब्वे बोर्डाने डेनिस लिली (Dennis Lillee) यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. लिलींच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्याची बॉलिंग अॅक्शन सुधारली, अधिक घोटीव केली.
ओलोंगा (Henry Olonga Birthday) झिम्बाब्वेचा सर्वात फास्ट बॉलर होता. देशातच नाही तर परदेशातही त्याने चांगली बॉलिंग केली. पण त्याच्या वेगाला स्वैरपणाचा शाप होता. त्यामुळे तो अनेकदा नो बॉल आणि वाईड बॉलची खैरात देखील करत असे. त्याचबरोबर दुखापतींचा फटका देखील त्याच्या कारकिर्दीला बसला.
सर्वात तरुण कॅप्टनच्या करियरचा गेला राजकारणामुळे बळी!
ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार
हेन्री ओलोंगा 1998 पासून झिम्बाब्वेच्या टीमचा नियमित सदस्य झाला. त्या काळात त्यांच्या क्रिकेटचे बरे दिवस होते. या दिवसांमध्ये टीमनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांचा ओलोंगा शिल्पकार होता. 1998 साली झिम्बाब्वेने त्याच्याच बॉलिंगच्या जोरावर परदेशात पहिल्यांदा टेस्ट जिंकली.
पेशावरमध्ये झालेल्या त्या टेस्ट मध्ये पाकिस्तानची पहिली इनिंग 296 रनवर संपुष्टात आली. ओलोंगानं त्या इनिंगमध्ये दोन विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेची पहिल्या इनिंग 238 रनवरच संपुष्टात आली. 58 रनच्या पिछाडीवर असताना ओलोंगानं दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार बॉलिंग केली. त्यानं त्या इनिंगमध्ये आमिर सोहेल, अझर महमूद, इंझमाम-उल हक आणि सईद अन्वर या पाकिस्तानच्या 4 अव्वल बॅट्समन्सना आऊट केले. त्यामुळे पाकिस्तानतची दुसरी इनिंग 103 रनवरच संपुष्टात आली. त्यानंतर झिम्बाब्वेनं पेशावर टेस्ट 7 विकेट्सनं जिंकली.
इंग्लंड विरुद्ध नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2000 मध्ये केपटाऊनला झालेली वन-डे ओलोंगानंच (Henry Olonga Birthday) जिंकून दिली. 212 रन वाचवण्यासाठी उतरलेल्या ओलोंगानं त्या वन-डेमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. यामध्ये टॉप ऑर्डरच्या पहिल्या 5 बॅट्समनचा समावेश होता. झिम्बाब्वेनं ती वन-डे 104 रननं दणदणीत जिंकली.
‘साहेबी’ क्रिकेट संस्कृती बदलणारा ‘परदेसी’ बाबू
भारताशी विशेष कनेक्शन
हेन्री ओलंगाचं भारताशी विशेष कनेक्शन होतं. हरारेमध्ये 1998 साली झालेल्या टेस्टमध्ये झिम्बाब्वेनं भारताचा 61 रननं पराभव केला. त्या टेस्टमध्ये तोच ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. ओलोंगानं पहिल्या इनिंगमध्ये मोंगिया, सिद्धू अझर, गांगुली आणि रॉबिन सिंग अशी निम्मी टीम आऊट केली होती. त्याचवर्षी शारजामध्ये झालेल्या कोका-कोला कप तिरंगी वन-डे सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये ओलोंगानं भारताविरुद्ध 4 विकेट्स घेत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला. त्या मॅचमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला आऊट केल्यानंतर सचिनच्या दिशेनं हातवारे करत सेलिब्रेशन केले होते.
सचिन तेंडुलकरनं त्यानंतर झालेल्या फायनल मॅचमध्ये ओलोंगाच्या धुलाई करत आधीच्या मॅचमध्ये दाखवलेल्या खुन्नसची सव्याज परतफेड केली. फायनलमध्ये सचिन-गांगुली जोडीनं ओलोंगाच्या 6 ओव्हरमध्येच 50 रन काढले. सचिननं त्या मॅचमध्ये 92 बॉलमध्ये 12 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं नाबाद 124 रन काढले. झिम्बाब्वेनं दिलेलं सचिन-गांगुली जोडीनंच पूर्ण केलं. भारतानं ती फायनल 120 बॉल आणि 10 विकेट्स राखून जिंकली.
वर्ल्ड कपमध्ये धक्का
ओलोंगाचं भारताविरुद्धचं नातं हे 1999 च्या वर्ल्ड कपमध्येही (Cricket World Cup 1999) सुरु होतं. सचिन वडिलांचं निधन झाल्यामुळे त्या मॅचमध्ये खेळत नव्हता. टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी 46 ओव्हरमध्ये 253 रनचं टार्गेट होतं. ओलोंगा 45 वी ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 9 रन आवश्यक होते. त्याने एकाच ओव्हरमध्ये सर्व चित्र बदललं.
पहिल्या बॉलवर रॉबिन सिंगनं (Robin Singh) 2 रन काढले. ओलोंगानं दुसरा बॉल ओव्हर पिच टाकला. तो ‘अरांऊड द विकेट’ मारण्याचा रॉबिन सिंगचा प्रयत्न फसला तो कॅच आऊट झाला. त्यानंतर अनिल कुंबळे जवागल श्रीनाथला साथ देण्यासाठी मैदानात आला. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कुंबळेनं 1 रन काढला. चौथ्या बॉलवर श्रीनाथनं 2 रन काढले. आता भारताला विजयासाठी 7 बॉलमध्ये 4 रन हवे होते. ओलोंगानं टाकलेला 5 वा बॉल श्रीनाथच्या बॅट आणि पॅडच्या मधून स्टंपवर आदळला. त्यानंतर भारताचा शेवटचा बॅट्समन व्यंकटेश प्रसाद मैदानात आला.
प्रसादला कुंबळेनं शेवटचा बॉल फक्त खेळून काढण्याचा सल्ला दिला होता. पण तो ओलोंगा आणि झिम्बाब्वेचा दिवस होता. त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ओलोंगानं प्रसादला LBW केले. टीम इंडियाचे क्रिकेटपटू आणि फॅन्स सून्न झाले होते. क्रिकेट विश्वातील दुबळ्या झिम्बाब्वेनं 3 रननं ऐतिहासिक विजय मिळवला. ओलोंगानं (Henry Olonga Birthday) एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्समुळे हा इतिहास घडला होता.
मुगाबेंना आव्हान
दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमध्ये 2003 साली क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2003) झाला. त्या वर्ल्ड कपपूर्वी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी झिम्बाब्वे क्रिकेटचा ताबा घेतला होता. त्यांनी क्रिकेट टीममध्ये रंगाच्या आधारावर कोटा पद्धत लागू केली. त्या टीममधील झिम्बाब्वेचा सर्वात दिग्गज बॅट्समन अँडी फ्लॉवरने (Andy Flower) मुगाबेशाहीचा निषेध करण्यासाठी दंडाला काळी रिबीन लावून उतरण्याचा निर्णय घेतला.
मुगाबेचा निषेध करण्यासाठी गोऱ्या फ्लॉवर सोबत एक ब्लॅक खेळाडू सहभागी झाला तर जगात चांगला संदेश जाईल म्हणून फ्लॉवरने ओलोंगाला साथ देण्याचं आवाहन केलं. ओलोंगाची समज तेवढी व्यापक आहे, याची खात्री फ्लॉवरला होती. ओलोंगानं फ्लॉवरचा विश्वास खोटा ठरवला नाही.
इम्रान ताहीरने पाकिस्तान का सोडले?
ओलोंगानं फ्लॉवरसोबत क्रिकेट वर्ल्ड कपच्या माध्यमातून फ्लॉवरशाहीचा निषेध केला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या काळात त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. तरीही त्याने माघार घेतली नाही. वर्ल्ड कप संपल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ओलंगा फ्लॉवरसह इंग्लंडलमध्ये स्थायिक झाला. झिम्बाब्वेतील हुकूमशाही राजवटीला विरोध करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल 27 वर्ष पूर्ण होण्याआधीच त्याची (Henry Olonga Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.