
क्रिकेटमध्ये खेळाच्या भरात होणारं स्लेजिंग (Sledging) हा काही नवा विषय नाही. जगातील सर्व देशात आणि प्रत्येक देशाच्या क्रिकेटपटूंनी ही गोष्ट केलेली आहे. प्रतिस्पर्धी टीममधील एखाद्या खेळाडूला नामोहरम करण्यासाठी स्लेजिंग करणे ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंची जुनी सवय आहे. ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) हा त्यासाठी नेहमी प्रसिद्ध होता. शेन वॉर्नच्या आक्रमकतेचा फटका दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन डॅरेल कुलिलनला (Daryll Cullinan) अनेकदा फटका बसला आहे.
1990 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेच्या मीडल ऑर्डरमधील प्रमुख बॅट्समन असलेल्या डॅरेल कुलिलन (Daryll Cullinan) याचा आज वाढदिवस. आजच्या दिवशी (4 मार्च 1967) रोजी त्याचा जन्म झाला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) यांच्यातील क्रिकेट हे नेहमीच चुरशीनं खेळलं गेलेलं आहे. दोन्ही देशातील टेस्ट सीरिज या नेहमीच गाजल्या. एकमेकांच्या विरुद्ध चांगला खेळ खेळण्यासाठी दोन्ही टीमचे खेळाडू नेहमीच सज्ज असतात.
कुलिलन 1993 ते 2001 या काळात 70 टेस्ट खेळल्या. त्याची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी 44.21 आहे. ज्यामध्ये 14 सेंच्युरी आणि 20 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंडमध्ये 275, कोलकातामध्ये भारताविरुद्ध नाबाद 153, श्रीलंकेत गॉलमध्ये मुरलीधरन (Muralidharan) याच्या विरुद्ध नाबाद 114 अशा काही संस्मरणीय इनिंग त्यांच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेन वॉर्नसमोर त्याचा खेळ नेहमीच घसरलेला होता.
शेन वॉर्नचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमविरुद्ध कुलिललन 7 टेस्ट खेळल्या. यामध्ये त्याला फक्त 153 रन करता आले. या सात टेस्टमधील बारा पैकी फक्त 4 वेळा वॉर्ननं त्याला आऊट केलं. पण त्याच्या संपूर्ण खेळावर वॉर्नचं नियंत्रण होतं.
वाढदिवस स्पेशल : दारुच्या नशेत झिंगला आणि ऑस्ट्रेलियाला तिंबला!
कधी सुरुवात झाली?
1993-94 च्या सीरिजमधील बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मध्ये कुललीननं फिल्डिंग करताना चार कॅच सोडल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा खेळणाऱ्या या नव्या बॅट्समनला ऑस्ट्रेलियन टीमनं माफ करण्याचा प्रश्नच नव्हता. क्रेग मॅकडरमॅटनं त्याला पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट केलं. त्यानंतर पुढील शेन वॉर्ननं त्याच्या विरुद्ध (Warne vs Cullinan) जाळं विणलं.
‘ऑस्ट्रेलियन फोबिया’ चा फायदा
कुलिलनला ‘ऑस्ट्रेलियन फोबिया’ होता, असं शेन वॉर्नचं मत होतं. त्यामुळे त्याच्यावर मानसिक वर्चस्व गाजवण्याचा शेन वॉर्नचा नेहमी प्रयत्न असे. काही वेळा वॉर्ननं मैदानाबाहेरही कुलिलनला डिवचलं आहे. 1997 साली जोहान्सबर्ग टेस्ट संपल्यानंतर मला त्याची (कुलिलन) विकेट मिळाल्यानंतर अन्य किती विकेट मिळाल्या याची पर्वा मी करत नाही, असं वॉर्न जाहीरपणे म्हणाला होता.
मृतप्राय लेगस्पिनमध्ये रंग भरणारा ‘कलरफुल क्रिकेटर’
तुझी वाट पाहत होतो…
1997-98 च्या सीरिजमधील मेलबर्न टेस्टमध्ये वॉर्न आणि कुललीन यांच्या ते ऐतिहासिक संभाषण झाले आहे. त्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कुलिलन 5 रन काढून रन आऊट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तो बॅटींगला आला, त्यावेळी शेन वॉर्न बॉलिंग करत होता.
शेन वॉर्न त्यावेळी त्याला ‘मी तुला बॉलिंग करण्यासाठी दहा महिन्यापासून वाट पाहत आहे,’ असा टोमणा मारला. कुलिलनही शांत बसणारा नव्हता. ‘तू सर्व वेळ फक्त खाण्यात घालवला आहेस असं दिसत आहे,’ असं कुलिलननं वॉर्नला उत्तर दिलं. कुलिललन बॅटींग गार्ड घेऊन तयार होईपर्यंत वॉर्नकडं पुढचं वाक्य तयार होतं, ‘डॅरेल मी या क्षणाची खूप दिवस वाट पाहिली आहे. मी तुला लगेच लेदर कोचवर बसण्यासाठी पाठवणार आहे,’ असं वॉर्न त्याला म्हणाला.
शेन वॉर्न जे म्हणाला ते त्यानं केलं. कुलिलन त्या इनिंगमध्ये फक्त 8 बॉल टिकला. त्याला वॉर्ननं भोपळा फोडण्यापूर्वीच बोल्ड केलं. त्यानंतर तो संपूर्ण सीरिजभर लेदर कोचवरच बसून होता.
अखेर वाद मिटला
डॅरेल कुलिलनं रिटायरमेंटनंतर शेन वॉर्नशी असलेल्या खुन्नवर मत व्यक्त करताना स्वत:ची चूक नेमकी कुठं झाली ते सांगितलं आहे. ‘शेन वॉर्न माझ्यापेक्षा खूप चांगला खेळाडू होता. त्यानं माझ्यावर लक्ष केंद्रीत करणं ही माझ्यासाठी विशेष गोष्ट होती. मी त्याच्या विरुद्ध खेळताना अगदी साधी चूक केली जी मला खूप शेवटी लक्षात आली. तो बॉल कसा सोडत आहे, याकडं मी कधीही पाहिलं नाही. ही चूक लक्षात आली तेंव्हा खूप उशीर झाला होता.’ असं कुलिलननं सांगितलं आहे.
या दोन खेळाडूमधील वाद 2001 साली कुलिलन रिटायर झाला त्यावेळी मिटला. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपपूर्वी कुलिलननं एक विशेष भोजन दिलं होतं. त्यामध्ये शेन वॉर्न सहभागी झाला होता.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.