फोटो – ट्विटर, सनरायझर्स हैदराबाद

खूप कमी क्रिकेटपटूंना एकही फर्स्ट क्लास मॅच न खेळता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. तो आयसीसीचा पूर्ण सदस्य दर्जा लाभलेल्या देशाचा असेल तर ही संधी दुर्मिळच मानावी लागेल. तो या दुर्मिळ गटातील खेळाडू आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये तशी संधी मिळाली. त्यानं पदार्पणातच स्टेन, निटनी, कॅलिस, बोथा, मॉर्केल यांचा समाचार घेत फक्त 43 बॉलमध्ये 89 रन काढले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये आक्रमक खेळानं जगाचं लक्ष वेधणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा आज वाढदिवस (David Warner Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 ऑक्टोबर 1986) वॉर्नरचा जन्म झाला.

‘सेहवाग स्कुल’चा विद्यार्थी

दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Daredevils) ही वॉर्नरची पहिली आयपीएल टीम. 2009 ते 13 तो या टीमचा सदस्य होता. या काळात तो वीरेंद्र सेहवागबरोबर (Virender Sehwag) दिल्लीकडून खेळला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘सेहवाग स्कुल’चा विद्यार्थी आहे. सेहवाग प्रमाणेच तो टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होईल का? असा अनेकांनी प्रश्न विचारला तो याच प्रकारात सर्वाधिक यशस्वी झाला.

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या दिवशी फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर ऑस्ट्रेलियाला 100 पेक्षा जास्त रन काढून देऊन विरोधी टीमला पहिल्या सेशनपासूनच बॅकफुटवर ढकलण्याचं काम वॉर्नरनं अनेकदा केलं आहे.

वॉर्नरनं 2011 साली ब्रिस्बेन टेस्टमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केलं. त्यानं कारकिर्दीमधील  दुसऱ्याच टेस्टमध्ये ‘कॅरी द बॅट’ करण्याचा विक्रम केलाय. होबार्टमध्ये झालेल्या त्या टेस्टमधील चौथ्या इनिंगमध्ये वॉर्नरनं नाबाद 123 रन काढले. त्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅटर्सनी साफ निराशा केल्यानं वॉर्नरचे ते एकाकी प्रयत्न फक्त 7 रननं कमी पडले. पण, त्यानंतर त्यानं (David Warner Birthday) मागं वळून पाहिलं नाही.

मुक्तछंदात बॅटींग करणारा क्रिकेटचा आनंदयात्री!

वॉर्नरच्या बेस्ट इनिंग

डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या दुसऱ्याच टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाविरुद्ध 159 बॉलमध्ये 180 रनची आक्रमक इनिंग खेळली होती. 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेली महेंद्रसिंह धोनीची टीम पहिल्या दोन टेस्ट गमावल्यानं बॅकफुटवर होती. पर्थमध्ये झालेल्या त्या सीरिजमधील तिसऱ्या टेस्टमध्ये वॉर्नरनं ही आक्रमक खेळी खेळली. 180 रनमध्ये त्यानं 110 रन हे फक्त सिक्स आणि फोरमध्ये काढले होते. प्रतिस्पर्धी टीमला संपूर्ण नामोहरम करणारी ती इनिंग होती.

डेव्हिड वॉर्नरची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेहमीच चालली आहे. त्यानं 2014 साली केपटाऊनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये झटपट 135 रन करत ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या स्कोअरचा पाया रचला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं आणखी वेगानं रन जमवत 156 बॉलमध्ये 145 रन काढले. स्टेन, मॉर्केल, फिनलँडर, अबॉट या दक्षिण आफ्रिकन फास्ट बॉलर्सची त्यांच्याच देशात त्यानं धुलाई केली. एका टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणाऱ्या विशेष खेळाडूंच्या क्लबमध्ये वॉर्नरचा समावेश (David Warner Birthday) झाला.

गिलख्रिस्ट आणि सेहवागप्रमाणेच वॉर्नरनं कधीही त्याच्या नैसर्गिक आक्रमकतेला मुरड घातली नाही. 2015 साली त्यानं न्यूझीलंड विरुद्ध पर्थ टेस्टमध्ये त्यानं 88. 46 च्या स्ट्राईक रेटनं 253 रन काढले होते. एक वर्षांच्या बंदीनंतर परतल्यानंतर 2019  पाकिस्तान विरुद्ध अ‍ॅडलेड टेस्टमध्ये वॉर्नरनं नाबाद 335 रन काढले. हा त्याचा टेस्ट कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात मॅथ्यू हेडनच्या 380 रननंतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं एका इनिंगमध्ये काढलेले हे सर्वोच्च रन आहेत. अलिकडच्या काळात सातत्यानं अपयशी होऊनही वॉर्नरनं 159 इनिंगमध्ये 24 सेंच्युरी आणि 30 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. दर तीन इनिंगमध्ये एकदा 50 पेक्षा जास्त रन बनवणाऱ्या वॉर्नरचा टेस्ट क्रिकेटमधील स्ट्राईक रेट 48.09 इतका आहे.

‘वन-डे’मध्ये आधार

ऑस्ट्रेलियाच्या वन-डे क्रिकेटमधील गिलख्रिस्ट पर्व संपल्यानंतर वॉर्नरचा उदय झाला. वॉर्नर हा देखील गिलख्रिस्ट प्रमाणेच डावखुरा, ओपनर आणि आक्रमक खेळाडू. गिलख्रिस्टसोबत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये अनेक ग्रेट खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे त्याला बॅटींगचा भार कधी एकट्यानं वाहावा लागला नाही. वॉर्नरला ते भाग्य मिळालं नाही. विशेषत: 2015 नंतर तर ऑस्ट्रेलियाच्या वन-डे क्रिकेटचा डोलारा हा वॉर्नर भोवतीच उभा आहे.

2016 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाची वन-डे सीरिज प्रत्येक ऑस्ट्रेलियन फॅननं विसरावी अशीच आहे. त्या सीरिजमध्ये पहिल्या 4 वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या पाचव्या वन-डेमध्ये आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 328 रनचं टार्गेट ठेवलं. या टार्गेटचा पाठलाग करताना वॉर्नरनं 136 बॉलमध्ये 173 रन काढले. एकही सिक्सचा समावेश नसलेली ती वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च इनिंग आहे. वॉर्नरनं एकाकी लढत देत 173 रन काढले, पण त्याला दुसऱ्या बाजूनं कुणी साथ दिली नाही. आफ्रिकेनं नियमित अंतरानं विकेट्स घेत ती वन-डे सह सीरिज 5-0 नं जिंकली.

ऑस्ट्रेलियातील ट्राय सीरिजच्या तीन फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध 2 सेंच्युरीसह 311 रन काढण्याची कामगिरी वॉर्नरनं केली आहे. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध 178 रन काढत वॉर्नरनं ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोच्च स्कोअर करुन दिला. 2016 हे वॉर्नरसाठी वन-डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वर्ष ठरलं. त्या एकाच वर्षात त्यानं 7 वन-डे सेंच्युरी झळकावल्या. ही कामगिरी करणारा वॉर्नर (David Warner Birthday) हा पहिला ऑस्ट्रेलियन आहे. तसंच 100 व्या वन-डेमध्ये सेंच्युरी झळकावणारा वॉर्नर हा पहिला ऑस्ट्रेलियन आहे. 128 वन-डेमध्ये वॉर्नरनं 18 सेंच्युरी आणि 23 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यामुळे या प्रकारातही जवळपास 3 पैकी एका वन-डेमध्ये त्यानं 50 चा टप्पा पार केला आहे.

वादग्रस्त वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरची कारकिर्द ही भरपूर रेकॉर्डसोबत वादग्रस्त घटनांनी सजली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर आणि क्रिकेट पत्रकारासोबत त्यानं ट्विटरवर वाद घातला होता. इंग्लंडच्या सध्याचा टेस्ट टीमचा कॅप्टन असलेल्या जो रूटला (Joe Root)  2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका बारमध्ये मारहाण केल्याचा आरोप वॉर्नरवर झाला होता. या प्रकरणात त्याला उर्वरित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून निलंबित करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलिया A विरुद्ध दक्षिण आफ्रिका A मॅचमध्ये वॉर्नरचा आफ्रिकेचा त्या मॅचमधील विकेट किपर Thami Tsolekile बरोबर वाद झाला होता. हे प्रकरणही चिघळलं. अपंयारला दोनदा हस्तक्षेप करावा लागला. पण यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न झाल्यानं वॉर्नर बचावला. 2013 साली सिडनीमधील क्लब क्रिकेटची मॅचसाठी वॉर्नर घोडे सवारीचा खेळ पाहण्यासाठी गेल्यानं वेळेत पोहचू शकला नव्हता.

इंग्लंड विरुद्ध 2013-14 साली झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा बॅटर जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) फॉर्ममध्ये नव्हता. ट्रॉट हा कमकुवत मनाचा असल्याची खोचक टीका वॉर्नरनं केली. त्यानंतर काही दिवसांमध्ये ट्रॉटनं मानसिक कारणांमुळे सीरिजमधून माघार घेतली. त्यामुळे वॉर्नरच्या टीकेला गंभीर वळण प्राप्त झालं. चार वर्षांनी वॉर्नरवर बॉल टेम्परिंग प्रकरणात 1 वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर ट्रॉटनं ट्विट करत जुना हिशेब चुकता केला.

आयपीएल स्पर्धेमुळे भारतामध्ये लोकप्रिय असलेल्या वॉर्नरनं भारतीय खेळाडूंशी देखील वाद घातले आहेत. 2014 च्या अ‍ॅडलेड टेस्टमध्ये त्याचा वरुण एरॉन आणि शिखर धवनशी वाद झाला होता. 2015 साली मेलबर्नमध्ये झालेल्या वन-डेमध्ये त्याचा रोहित शर्माशी वाद झाला. रोहित जाणीवपूर्वक हिंदीमध्ये बोलतोय असा आक्षेप घेणारा वॉर्नर नंतर सामनाअधिकाऱ्यांसमोर झालेल्या चौकशीत दोषी आढळला. त्याच्या मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम कापण्यात आली.

वॉर्नरच्या कारकिर्दीमधील सर्वात वादग्रस्त प्रकरण (David Warner Birthday) 2018 साली घडलं. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या केपटाऊनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये कॅमेरुन बॅनक्राफ्ट बॉल टेम्परिंग करताना पकडला गेला. आपण ही कृती डेव्हिड वॉर्नर आणि तत्कालीन ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथच्या सांगण्यावरुन केल्याची त्यानं कबुली दिली. स्मिथ आणि वॉर्नरवर 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली. या सर्व कृत्याचा मास्टरमाईंड वॉर्नर असल्याचा आरोप झाला. त्यानंतर वॉर्नर कधीही ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही, तसंच लिडरशीप ग्रृपचा भाग नसेल अशी घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) केली. वॉर्नरच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीवर बॉल टेम्परिंग प्रकरण हा एक डाग आहे.

Live मॅचमध्ये केली होती गडबड, जुन्या प्रकरणात अडकणार ऑस्ट्रेलियन दिग्गज?

IPL मध्ये वॉर्नर

कोणत्याही आयपीएल टीममध्ये विदेशी खेळाडूच्या जागेसाठी मोठी स्पर्धा असते. ती जागा आपल्याकडं कायम ठेवायची असेल तर सातत्यानं कामगिरी करावी लागते. हा आयपीएल सिझनचा (IPL 2021) अपवाद वगळता, वॉर्नरनं सातत्यानं टॉप ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

आयपीएल इतिहासात सर्वात जास्त (5449) रन करणारा तो विदेशी खेळाडू आहे. 150 इनिंगमध्ये 4 सेंच्युरी आणि 50 हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या वॉर्नरनं आयपीएलमध्येही तीन इनिंगमध्ये एकदा 50 रन करण्याचं सातत्य जपलं आहे. आयपीएल इतिहासात सर्वात जास्त हाफ सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्डही वॉर्नरच्या नावावर आहे. तसंच तीन आयपीए सिझनमध्ये (IPL 2015, IPL 2017, IPL 2019) सर्वाधिक रन काढण्यासाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप पटकावणारा वॉर्नर हा एकमेव बॅटर आहे.

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’

रिटायरमेंट जवळ आली

डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादचाच (SRH) नाही तर आयपीएल इतिहासातील बेस्ट कॅप्टन आहे. हैदराबादच्या टीममध्ये शिखर धवन ते नटराजन, राशिद खान ते केन विल्यमसन या प्रत्येक खेळाडूचा त्यानं योग्य वापर केला. बॉलर्सचा योग्य वापर केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये प्रत्येक बॉलनंतर मैदानातील दुसऱ्या टोकापासून बॉलर जवळ येणारा त्याला धीर देणारा, मार्गदर्शन करणारा वॉर्नर सर्वांनी पाहिला आहे. हैदराबादच्या टीमचं आघाडीवर राहून त्यानं नेहमी नेतत्त्व केलं. 2016 साली आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले. 2015 पासून मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या टीम व्यतिरिक्त एखाद्या टीमनं जिंकलेलं हे एकमेव आयपीएल विजेतेपद आहे. त्यावरुन या विजेतेपदाचं महत्त्व लक्षात येतं.

सनरायझर्स हैदराबादनं 2016 ते 2020 या काळात प्रत्येक आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. यामध्ये 2018 चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी वॉर्नर कॅप्टन होता. या टीमची य़ा आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. वॉर्नरचाही फॉर्म नव्हता. हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटनं स्पर्धा सुरू असतानाच वॉर्नरची टीममधून हकालपट्टी केली. कॅप्टनपदावरुन का काढण्यात आलं हे त्याला सांगितलंच नाही. त्याला मॅच दरम्यान हॉटेलमध्येच राहण्याची सूचना दिली. सीरिज संपल्यावर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याला घेतलं नाही. एक यशस्वी आणि हैदराबादच्या टीमसाठी नेहमी सर्वस्व ओतणाऱ्या वॉर्नरचं टीमसोबतचं नातं असं दुर्दैवी रित्या संपुष्टात आलं.

एक अध्याय संपला! डेव्हिड वॉर्नर आणि SRH नं घेतला एकमेकांचा निरोप

2018 मधील बॉल टेम्पिरिंग प्रकरणानंतर वॉर्नरच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसला. तो मैदानात शांत झाला तसंच त्याची बॅटही शांत झाली. 2019 च्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये त्याला जोफ्रा आर्चरनं वारंवार आऊट केलं. तो सीरिजमध्ये फ्लॉप ठरला. दुखापतीमुळेही तो क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळेच भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये फक्त 2 टेस्ट खेळला. त्यात त्याचा प्रभाव पडला नाही. 2021 मध्ये भारताविरुद्धच्या 2 टेस्टनंतर तो 2021 मध्ये T20 वर्ल्ड कपपूर्वी फक्त आयपीएलमध्ये खेळला. तिथंही तो फ्लॉप गेला. दुखापतीशी आणि फॉर्मशी झगडणाऱ्या वॉर्नरनं (David Warner Birthday) आगामी अ‍ॅशेस सीरिजनंतर वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली तर आश्चर्य वाटायला नको.    

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: