
वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हीव रिचर्ड्स (Viv Richards) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदराने घेतलं जातं. ते वेस्ट इंडिजच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार होते. त्यांनी क्रिकेट खेळताना कोणत्याही बॉलर्सची कधी दया केली नाही. रिटायमेंटनंतरही त्यांनी क्रिकेटबद्दलची मतं स्पष्टपणे मांडली आहेत. रिचर्ड्स यांचे क्रिकेटमधील स्थान लक्षात घेता त्यांची मतं आदराने स्वीकारली जातात. मात्र वेस्ट इंडिजच्याच एका क्रिकेटपटूला रिचर्ड्स यांची टीका चांगलीच झोंबली होती. दिनेश रामदीन (Denesh Ramdin) असं त्या क्रिकेटपटूचं नाव. त्याने रिचर्ड्स यांचा भर मैदानातच निषेध केला होता. रिचर्ड्स यांना भर मैदानात खुन्नस देणाऱ्या रामदीनचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (13 मार्च 1985) रोजी त्याचा जन्म झाला.
वेस्ट इंडिजची टीम 2012 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर (West Indies vs England Series 2012) होती. त्या टेस्ट सीरिजमध्ये रामदीनचा फॉर्म खराब होता. रामदीनने पहिल्या चार इनिंगमध्ये 1,43,1 आणि 6 असे फक्त 51 रन्स काढले होते. रिचर्ड्स तेंव्हा या सीरिजसाठी कॉमेंट्री करत होते. त्यांनी रामदीनच्या खराब खेळावर जोरदार टीका केली.
“रामदीनचा खेळ पहिल्यांदा पाहिला तेंव्हा त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मला वाटले होते. सध्या तो पूर्णपणे हरवलेल्या मुलासारखा दिसत आहे,’’ या शब्दात रिचर्ड्स यांनी रामदीनच्या खराब खेळावर नाराजी व्यक्त केली होती.
रिचर्ड्सची ती टीका रामदीनला चांगलीच झोंबली. त्याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये जिद्दीनं खेळ करत सेंच्युरी झळकावली. त्या सेंच्युरीनंतर रामदीनने आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी खिशातून कागद काढून ड्रेसिंग रुमच्या दिशेने दाखवला. त्या कागदावर रिचर्ड्स यांच्या टीकेला रामदीनने यांनी दिलेलं उत्तर होतं. ‘Yeah Viv talk nah’ असं लिहलेला कागद रामदीनने त्यावेळी फडकावत निषेध व्यक्त केला होता.
( वाढदिवस स्पेशल : रिची रिचर्डसन, वेस्ट इंडिजच्या सुवर्णयुगाचा अखेरचा शिलेदार!)
रामदीनच्या मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम या कागदबाजीमुळे कापण्यात आली. स्वत: रामदीननेही या प्रकाराबद्दल नंतर दिलगिरी व्यक्त केली होती. “मी रिचर्ड्स यांचा खूप आदर करतो, त्यांच्या टीकेमुळे मी दुखावला गेलो होतो त्यामुळे भावनेच्या भरात मी ती कृती केली,’’ असे रामदीनने नंतर सांगितले.
रिचर्ड्स यांच्या या टीकेचा रामदीनच्या क्रिकेट करियरवर सकारात्मक परिणाम झाला. पुढील दीड वर्षात त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये तीन सेंच्युरीसह 53.61 च्या सरासरीने रन्स केले. तसेच तो वन-डे क्रिकेटमध्येही यशस्वी ठरला.
डॅरेन सॅमीनंतर 2014 साली रामदीनला (Denesh Ramdin) टेस्ट टीमचं कॅप्टन करण्यात आले होते. त्याने वेस्ट इंडिजचे 13 टेस्टमध्ये नेतृत्व केले. यापैकी चार टेस्ट वेस्ट इंडिजने जिंकल्या. तर सात टेस्टमध्ये त्यांची टीम पराभूत झाली. उर्वरीत दोन टेस्ट ड्रॉ झाल्या. वेस्ट इंडिजकडून वन-डे क्रिकेटमध्ये 2000 रन करणारा तो पहिला विकेट किपर होता. खराब फॉर्ममुळे त्याची वन-डे आणि टेस्ट टीममधील जागा गेली. त्यानंतरही तो आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट खेळत होता. भारत दौऱ्यावर 2019 साली आलेल्या वेस्ट इंडिज टीमचाही (West Indies Tour of India 2019) रामदीन सदस्य होता. भारताविरुद्ध त्या सीरिजमध्ये हैदराबाद इथं तो शेवटची आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळला. सध्या तो जगभर वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये खेळतो. पण भर मैदानात व्हिव रिचर्ड्सना खुन्नस देणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव कायमचे लक्षात राहणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.