एखाद्या बॅटरचं तंत्र किती चांगलं आहे हे मोजण्यासाठी तो इंग्लंडमध्ये (England) कसा खेळतो हे पाहण्याची क्रिकेट विश्वात पद्धत आहे. इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या पिचवरचा तो किती तग धरतो यावर त्याच्या दर्जावर अनेक जण शिक्कामोर्तब करतात. इंग्लंडमधील लॉर्ड्स (Lords Stadium, England) ही क्रिकेटपटूंसाठी त्यांचा खेळ दाखवण्यासाठी सर्वोच्च जागा मानली जाते. लॉर्ड्सच्या स्टेडियमवर एक नाही तर सलग तीन टेस्टमध्ये तीन सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम करणाऱ्या दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1956 रोजी त्यांचा जन्म झाला.

लॉर्ड्सवर सलग तीन टेस्टमध्ये सेंच्युरी करणारे ते एकमेव इंग्लंडच्या बाहेरचे बॅटर्स आहेत. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर डॉन ब्रॅडमन (Don Bradman), सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या ‘ऑल टाईम ग्रेटेस्ट’ बॅटर्सना जे जमलं नाही ते वेंगसरकर यांनी केलं आहे.

19 व्या वर्षी बेदी-प्रसन्नाची धुलाई

दिलीप वेंगसरकर मुंबईच्या दादरमध्ये लहानाचे मोठे झाले. दादरच्या राजा शिवाजी शाळेत ते शिकले. या शाळेला क्रिकेटची मोठी परंपरा आहे. माधव मंत्री, विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते हे टेस्ट प्लेयर याच शाळेनं भारताला दिले. वेंगसरकर वयाच्या 11 व्या वर्षी या शाळेच्या टीममध्ये होते. त्यांनी त्यानंतर मुंबईतील हॅरीस शिल्ड स्पर्धेत वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूंचाही यशस्वीपणे सामना केला आहे.

मुंबईत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचं तंत्र हे घोटीव असतं असं त्या काळी समजलं जायचं वेंगसरकर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी ते दाखवून दिलं. मुंबई विरुद्ध शेष भारत (Mumbai vs Rest Of India) यांच्यात नागपूरमध्ये झालेल्या इराणी ट्रॉफीच्या लढतीत वेंगसरकर यांचा समावेश होता.

शेष भारताच्या टीममध्ये बिशनसिंग बेदी आणि इरापल्ला प्रसन्ना हे दोन जागतिक दर्जाचे स्पिनर होते. वेंगसरकर यांनी त्या मॅचमध्ये बेदी आणि प्रसन्ना यांची एखाद्या क्लब बॉलरसारखी धुलाई केली. त्यांनी 113 मिनिटांच्या खेळीत 110 रन काढले. यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्स यांचा समावेश होता. या जबरदस्त खेळामुळे त्यावर्षी न्यूझीलंडमध्ये जाणाऱ्या भारतीय टीममध्ये वेंगसरकर यांची निवड झाली. ही झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट.

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या खेळीनंतर ‘कर्नल’ (Colonel) ही पदवी मिळाली. ज्या नावाने ते आजही ओळखले जातात. कर्नल या नावाचा संबंध ज्येष्ठ भारतीय बॅट्समन सी.के. नायडू यांच्याशी आहे. नागपूरात म्हणजेच मध्य भारतात म्हणजेच सीके नायडू यांच्या परिसरात त्यांनी नायडूंची आठवण करुन देणारे सिक्स लगावले होते. त्यामुळे वेंगसरकर यांना कर्नल हे नाव मिळाले.

अन्यत्र कर्नल, लॉर्ड्सवर कमांडर!

भारतीय टीमचे कर्नल असलेले दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) लॉर्ड्सवर मात्र कमांडर होते. 1979 साली ते लॉर्ड्सवर पहिली टेस्ट खेळले. त्यांची लॉर्ड्सवरची सुरवात खराब झाली. ते पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाले होते. भारताची पहिली इनिंग फक्त 96 रनवर आटोपली. इंग्लंडनं 303 रनची भक्कम आघाडी घेतली. भारतीय टीम पराभवाच्या छायेत होती.

या बिकट परिस्थितीमध्ये वेंगसरकर यांनी त्यांचा सर्वोत्तम खेळ केला. त्यांच्या 103 रनमुळे भारताला ती टेस्ट ड्रॉ करता आली. त्या टेस्टचे आणखी एक हिरो गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांनी 113 रन काढले. वेंगसरकर-विश्वानाथ जोडीनं 210 रनची पार्टरनरशिप केली. वेंगसरकर त्या खेळीच्या दरम्यान 353 मिनिटे, 295 बॉल उभे होते. या खेळीत त्यांनी 13 फोर लगावले. लॉर्ड्सच्या साहेबी बाल्कनीला वेंगसरकर यांच्या क्लासचं घडलेलं ते पहिलं दर्शन होतं.

त्यानंतर 1982 मध्ये त्यांनी 2 आणि 157 रन काढले. तर 1986 साली लॉर्ड्सवर मिळालेल्या भारताच्या पहिल्या टेस्ट विजयात वेंगसरकर यांचं योगदान हे नाबाद 136 आणि 33 असं होतं. 1986 साली भारतानं इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. त्या सीरिजमध्ये दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचं 90 च्या सरासरीनं 2 सेंच्युरीसह सर्वाधिक 360 रन काढले.

टीमचा कर्नल!

वेंगसरकर यांना कर्नल ही पदवी सीके नायडू यांच्यामुळे मिळाली. पण टीम संकटात असताना शेवटपर्यंत लढणारा योद्धा म्हणूनही त्यांनी कर्नल ही पदवी सार्थ ठरवली. तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर बॅटींगला येणाऱ्या वेंगसरकर यांनी अनेकदा अकराव्या नंबरपर्यंतच्या खेळाडूपर्यंत बॅटींग केली आहे.

लॉर्ड्सवर 1986 साली झळकावलेलं तिसरं शतक, 1979 साली नवी दिल्लीमध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या दिवशी 390 चा पाठलाग करताना काढलेले नाबाद 146 रन ही त्याची प्रमुख उदाहरण. सुनील गावसकरांच्या शेवटच्या टेस्टमध्ये पाकिस्तान विरुद्ध बंगळुरुतील प्रचंड वळणाऱ्या पिचवर त्यांनी गावसकरसोबत झुंजार पार्टरनरशिप केली होती. त्यावेळी ती जोडी आणखी थोडावेळ टिकली असती तर गावसकरांना शेवटच्या टेस्टमध्ये टीम इंडियाला विजयी निरोप देता आला असता.

गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दलच्या ‘या’ सात गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

कॅप्टन वेंगसरकर

दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) हे 1983 साली वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचे सदस्य होते. 1987 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलच्या आदल्या रात्री त्यांचं पोट बिघडलं आणि ते सेमी फायनलमध्ये खेळू शकले नाहीत. वेंगसरकरच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर झालेली त्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला.

वेंगसरकर सेमी फायनलमध्ये न खेळण्याचा मोठा फटका भारताला बसला. कारण त्या काळात ते सर्वोच्च फॉर्ममध्ये होते. मोठ्या मॅचमध्ये त्यांचा अनुभव आणि दर्जा भारतीय टीमच्या नक्कीच कामी आला असता.

1987 च्या वर्ल्ड कप पराभवानंतर कपिल देव यांची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी झाली. त्यानंतर वेंगसरकर भारतीय टीमचे कॅप्टन झाले. पहिल्या दोन टेस्टमध्ये दोन सेंच्युरी झळकावत त्यांनी सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर भारतीय टीमची कामगिरी घसरली. 1989 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर बीसीसीआयशी झालेल्या वादानंतर त्यांची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी झाली.

संतापलेल्या गावस्करांनी घेतला होता भयंकर निर्णय; जोडीदाराला दिला होता मैदान सोडण्याचा आदेश! पाहा VIDEO

वेंगसरकर यांनी त्यावेळी टीममधील स्थान गमावले. त्यानंतर त्यांनी टीममध्ये पुनरागमन केलं पण पूर्वीचा ते पूर्वी इतके प्रभावी नव्हते. लॉर्ड्सवर ते 1990 साली चौथी आणि शेवटची टेस्ट खेळले. त्यामध्ये त्यांना सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1992 साली पर्थमध्ये ते शेवटची टेस्ट मॅच खेळले.

गावसकरनंतर वेंगसरकर

वेंगसरकर यांनी 116 टेस्टमध्ये 42.13 च्या सरासरीनं 6868 रन काढले. यामध्ये 17 सेंच्युरी आणि 35 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये वेंगसरकर (Dilip Vengsarkar) रिटायर झाले तेंव्हा भारताकडून फक्त सुनील गावसकर यांच्या नावावर त्यांच्यापेक्षा जास्त रन आणि जास्त सेंच्युरी होत्या.

वेंगसरकर यांनी वन-डे करियमध्ये 129 मॅचमध्ये 34.73 च्या सरासरीनं 3518 रन काढले. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 23 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

सचिन, धोनी, विराट आणि वेंगसरकर!

दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचं भारतीय क्रिकेटमधील योगदान इथंच थांबत नाही. तर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली यांच्या क्रिकेट करियरमध्येही वेंगसरकर यांचं योगदान आहे.

मुंबईच्या रणजी टीमचे कॅप्टन असलेल्या वेंगसरकर यांच्याच आग्रहामुळे सचिनची वयाच्या 15 व्या वर्षी मुंबईच्या टीममध्ये निवड झाली होती. इतकंच नाही तर सचिनला तेंव्हा वेंगसरकर यांच्या विनंतीवरुन कपिल देव, चेतन शर्मा आणि मणिंदर सिंग यांनी नेटमध्ये देखील बॉलिंग केली होती. सचिननं 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

VIDEO: सिडनी टेस्टच्या आठवणी सचिन तेंडुलकर नाबाद 241

2007 च्या T20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय निवड समितीसमोर कॅप्टन कुणाला करायचं हा प्रश्न होता? त्यावेळी वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं महेंद्रसिंह धोनीची कॅप्टन म्हणून निवड केली. या निवडीमुळेच धोनी हा हुशार कॅप्टन भारताला मिळाला.

2008 साली श्रीलंका दौऱ्यात वेंगसरकर यांनीच तरुण विराट कोहलीच्या क्षमतेवर विश्वास दाखवत त्याची भारतीय टीममध्ये निवड केली. अनुभवी खेळाडूंच्या जागी तरुण कोहलीची निवड करण्यावर काही जणांचा आक्षेप होता. वेंगसरकर यांनी त्या दबावाला भीक न घालता विराटला टीम इंडियात पहिली संधी दिली.

दिलीप वेंगसरकर यांच्या झुंजार क्रिकेट कारकीर्दी इतकंच सचिन, धोनी आणि विराट या तीन महान खेळाडूंची क्षमता ओळखून त्यांना तात्काळ संधी देणारी व्यक्ती हे वेंगसरकर यांचं योगदान देखील तितकंच मोठं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

      

error: