
इयान बोथम (Ian Botham) रिटायर झाल्यानंतरच्या तीन दशकांमध्ये इंग्लंड टीमचा ऑल राऊंडरचा शोध सुरु होता. एखाद्या खेळाडूमध्ये थोडी आशा दिसली तरी ब्रिटीश माध्यमं त्याला नवा बोथमचा दर्जा देत. गेल्या तीन दशकांमध्ये इंग्लंडला बोथमचा वारसदार शोभतील असे दोनच ऑल राऊंडर इंग्लंडला मिळाले. पहिला अँण्ड्र् फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) आणि दुसरा बेन स्टोक्स (Ben Stokes). बोथम आणि फ्लिंटॉफ यांनाही जे जमलं नाही ते इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्याचे काम बेन स्टोक्सने केले. स्टोक्सचा आज वाढदिवस (Ben Stokes Birthday) आहे. आजच्याच दिवशी (4 जून 1991) रोजी त्याचा जन्म झाला.
न्यूझीलंडमध्ये जन्म, इंग्लंडमध्ये स्थलांतर
न्यूझीलंडला वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2019) पराभूत करुन बेन स्टोक्स इंग्लंडचा हिरो झाला. त्याच न्यूझीलंडमध्ये स्टोक्सचा जन्म झाला. त्याच्या घरामध्येच खेळाची पार्श्वभूमी होती. त्याचे वडील रग्बी टीमचे कोच होते. स्टोक्सच्या वडिलांना इंग्लंडच्या क्लबची कोच होण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्टोक्स वयाच्या 12 व्या वर्षी इंग्लंडमध्ये शिफ्ट झाला. त्यानंतर तिथेच राहिला. इंग्लंडमध्येच त्याने क्रिकेटमध्ये करियर घडवलं.
बेन स्टोक्सनं वयाच्या 17 व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अगदी सुरुवातीपासूनच त्यानं अस्सल ऑल राऊंडर म्हणून सर्वांचे लक्ष वेधले. स्टोक्सनं सीनियर क्रिकेटममधील पहिल्या मॅचमध्ये तिसऱ्याच बॉलवर अनुभवी मार्क रामप्रकाशला आऊट केले. 2009 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध सेंच्युरी झळकावली. 2011 साली झालेल्या एका फर्स्ट क्लास मॅचमध्ये बॉलिंग करताना 68 रन देत 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आक्रमक सेंच्युरीही झळकावली. यावेळी स्टोक्सनं एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स झळकावण्याचा पराक्रम केला होता.
भारताविरुद्ध जेम्स अँडरसन मोडणार सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
आश्वासक पदार्पण आणि निराशा
स्टोक्सने (Ben Stokes Birthday) 2013 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या अॅशेस सीरिजमध्ये पदार्पण केले. इंग्लंने त्या सीरिजमध्ये पाचही टेस्ट गमावत सपाटून मार खाल्ला. या सीरिजमध्ये स्टोक्सनं पर्थ टेस्टमध्ये 6 व्या क्रमांकावर येत सेंच्युरी झळकावली. तर सिडनी टेस्टमध्ये 99 रन देत 6 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतरही स्टोक्सची ऑल राऊंड कामगिरी इंग्लंड क्रिकेटला दिलासा देणारी होती.
स्टोक्सच्या खेळात आग आहे. पण या आगीचा चटका त्याला देखील बसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध बार्बोडसमध्ये आऊट झाल्यानंतर चिडलेल्या स्टोक्सनं ड्रेसिंग रुममधील लॉकर फोडले होते. स्टोक्सवर शिस्तभंगाची कारवाई झाली. तो बांगलादेशमध्ये 2014 साली झालेला T20 वर्ल्ड कप खेळू शकला नाही. त्याचवर्षी भारताविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये तो सलग तीन वेळा शून्यावर आऊट झाला.त्यानंतर होणाऱ्या श्रीलंका सीरिजमधून त्याला वगळण्यात आले. 2015 च्या वर्ल्ड कप टीमसाठीही त्याचा विचार झाला नाही.
वर्ल्ड कपचा व्हिलन
2015 वर्ल्ड कपनंतर इंग्लंडनं मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये नवी टीम तयार करण्याचं ठरवलं. कॅप्टन इऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) न्यू इंग्लंड टीमचा स्टोक्स हा महत्त्वाचा सदस्य होता. मॉर्गनच्या टीमनं भारतामध्ये 2016 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2016) फायनलमध्ये धडक मारली.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या फायनलमध्ये स्टोक्सवर शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रन वाचवण्याची जबाबदारी होती. स्टोक्सनं हे काम 10 पैकी 9 वेळा आरामात केले असते. पण तो उरलेला एक प्रसंग म्हणजे कोलकातामधील फायनलची रात्र होती. कार्लोस ब्रेथवेटने (Carolos Brathwaite) स्टोक्सला सलग चार सिक्स लगावले. ज्या ट्रॉफीच्या अगदी जवळ इंग्लंडचा हात पोहचला होता, ती ट्रॉफी स्टोक्सच्या चार बॉलमध्ये निसटली. इयन बिशप यांचे ,” Carlos Brathwaite! Remember the name!” हे अजरामर वाक्य इडन गार्डनवर आणि ती मॅच पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घुमत असताना स्टोक्स (Ben Stokes Birthday) मैदानातच कोसळून पडला होता.
ब्रिस्टॉलची रात्र
एखादा सामान्य क्रिकेटपटू कोलकातामधील शेवटच्या ओव्हरमधील घटनेनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभा राहू शकला नसता. पण हा असमान्य स्टोक्स आहे. त्याचा फॉर्म कोलकाताच्या मॅचच्या पूर्वी आणि नंतरही कायम होता. बांगलादेश आणि भारतामध्ये सेंच्युरी, 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी त्याची साक्ष होते.
त्याचवेळी सप्टेंबर 2017 साली ब्रिस्टॉलमधील नाईट क्लबच्या बाहेर दोन जणांशी मारामारी करताना स्टोक्स सापडला. त्याला ती रात्र जेलमध्ये काढावी लागली. त्याच्या विरुद्ध कोर्टात खटला चालला. इंग्लंडचा व्हाईस कॅप्टन बनललेल्या स्टोक्सला त्यानंतर लगेच होणाऱ्या अॅशेस सीरिजमधून सुरुवातीला माघार घ्यावी लागली. 2017 मध्ये घडलेल्या त्या घटनेनं पुढे वर्षभर स्टोक्सला त्रास दिला.
वर्ल्ड कपचा हिरो
14 जूलै 2019, लॉर्ड्स. वर्ल्ड कप फायनलमध्ये 242 रनचा पाठलाग करताना स्टोक्स (Ben Stokes Birthday) मैदानात उभा होता. मॉर्गन आऊट झाल्यानंतर इंग्लंडची अवस्था 4 आऊट 86 अशी झाली होती. मायदेशी वर्ल्ड कप जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न धोक्यात आले होते. त्यावेळी स्टोक्सनं जोस बटलरच्या (Jos Buttler) साथीनं इंग्लंडला सावरले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 110 रनची पार्टनरशिप केली. बटलर आऊट झाल्यानंतरही इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकण्याची 5 ओव्हरमध्ये 45 रनची गरज होती.
इंग्लंडच्या शेवटच्या 5 बॅट्समननं 45 पैकी 12 रनचं योगदान दिलं. शेवटच्या तीन जणांचं यामधील योगदान शून्य होते. त्या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्टोक्स बॅट चालवत होता. ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला 15 रन हवे होते. स्टोक्सचा स्वत:वर विश्वास होता. त्याने पहिल्या दोन बॉलवर एक रन काढणे नाकारले. त्यानंतरच्या दोन बॉलवर दोन सिक्स लगावले.शेवटच्या दोन बॉलवर इंग्लंडचे दोन बॅट्समन रन आऊट झाले. पण तोपर्यंत स्टोक्सनं मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली होती.
स्टोक्सला (Ben Stokes Birthday) मॅच सूपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिलेल्या 4 रनच्या गिफ्टचा वाटा होता, हे नाकारता येत नाही. पण धर्मसेनाच्या त्या चुकीमुळे स्टोक्सच्या नाबाद 84 रनचं महत्त्व कमी होत नाही.
50 ओव्हरच्या खेळात बॅटींग केल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही स्टोक्स पॅड बांधून उतरला. त्याने सुपर ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 8 रन काढले. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) बॉलिंग करत असताना कोलकातामध्ये चटका बसलेल्या स्टोक्सने त्याला शेवटच्या बॉलपर्यंत धीर दिला. त्यामुळे आर्चरने दबावात चांगली बॉलिंग करत न्यूझीलंडला बरोबरीत रोखले आणि इंग्लंडनं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.
साहेबांना वर्ल्ड कप जिंकून देणारा कामगार
बोथमच्या मैदानात ‘स्टोक्स’ भरारी
वर्ल्ड कप विजेतेपदानंतर लगेच इंग्लंड टीमसाठी अॅशेसचा पेपर होता. इंग्लंडचा पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला होता. दुसरी टेस्ट मोठ्या प्रयत्नानंतर ड्रॉ राखण्यात त्यांना यश आले. त्यानंतर हेडिंग्लेमध्ये तिसरी टेस्ट होती. स्टोक्सची पदार्पणापासून ज्याच्याशी सतत तुलना झाली त्या इयान बोथमला 1981 साली झालेल्या हेडिंग्ले टेस्ट नंतरच वलय प्राप्त झाले होते.
बोथमने गाजवलेल्या हेडिंग्लेमध्ये 2019 साली इंग्लंडला कोणतीही आशा वाटत नसताना स्टोक्सने इतिहास घडवला. त्याने जॅक लीच सोबत शेवटच्या विकेटसाठी 76 रनची पार्टरनरशिप केली. या पार्टरनरशिपमध्ये लीच वाटा फक्त 1 रनचा होता.
9 बॅट्समन आऊट झाल्यानंतर 76 रनची आवश्यकता असेल तर जगातील बहुतेक ग्रेट बॅट्समन आणि टीम जिंकण्याची आशा सोडेल. पण तो बेन स्टोक्स होता. त्याच्याकडे टेस्टचं तंत्र आणि T20 चा आत्मविश्वास आहे. 2016 साली सागराच्या तळाशी जाणारी डुबकी मारल्यानंतर तीन वर्षांनी एव्हरेस्टच्या उंची इतकी उसळी मारण्याचा अनुभव त्याच्या पाठिशी होता. याच अनुभवाच्या जोरावर स्टोक्सनं हेंडिग्लेमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले.
शेवटपर्यंत लढणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा नेता
आयुष्यात कितीही मोठं अपयश आलं तरी नियती तुम्हाला पुन्हा एक तरी संधी देते. तुमच्यात जिद्द, संघर्ष करण्याची तयारी आणि हार न स्वीकारण्याची वृत्ती असेल तर तुम्ही यशस्वी ठरु शकता. जगाला तुमच्या यशाच्या सूर्यप्रकाशात अपयशाच्या काळरात्रीचा विसर पडतो. वर्ल्ड कप फायनल असो वा हेडिंग्ले टेस्ट दोन्ही ठिकाणी बेन स्टोक्सनं (Ben Stokes Birthday) तेच तर दाखवून दिले आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.