फोटो – ट्विटर, आयसीसी

इंग्लंडची टेस्ट टीम (England Cricket Team) यावर्षी पराभवाच्या मोहिमेवर आहे. ते सुरुवातीला भारतामध्ये सलग 3 टेस्ट सपाटून हरले. त्यानंतर न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू अनुपस्थित असून सीरिज गमावली.मायदेशात भारताविरुद्धची सीरिज स्थगित झाली त्यावेळी देखील ते पिछाडीवर होते. ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी तळाला गेलेली इंग्लंड टीम अ‍ॅशेस सीरिजमधील 2 टेस्टनंतर पाताळात पोहचली आहे. इंग्लंडची खराब बॅटींग ही या कामगिरीचे मुख्य कारण आहे. कॅप्टन जो रूट सोडून अन्य कुणामध्येही सातत्य नाही. या परिस्थितीमध्ये इंग्लंडच्या क्रिकेट टीमला एकाच खेळाडूची आठवण होत आहे. त्या खेळाडूचे नाव आहे, अ‍ॅलिस्टर कुक. इंग्लंडचा माजी कॅप्टन असलेल्या कुकचा आज वाढदिवस (Alastair Cook Birthday) आहे. आजच्याच दिवशी (25 डिसेंबर 1984) रोजी कुकचा जन्म झाला.  

अनकॉमन मॅन

अ‍ॅलिस्टर कुक हा सध्याच्या काळातील क्रिकेटमधील अनकॉमन मॅन आहे. मॉर्डन क्रिकेटमध्ये फोरची संख्या आणि सिक्सर्सची लांबी यावरुन क्रिकेटपटूंचे मोठेपण मोजले जाते. त्या काळात संपूर्ण कारकिर्द घालवून देखील कुकनं जुन्या काळातील क्रिकेटची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यामुळेच त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक दीर्घ इनिंग खेळल्या. भक्कम बचाव आणि कमाल संयम या जोरावर त्याने क्रिकेट कारकिर्द फुलवली.

टेस्ट क्रिकेटमध्ये 12472 रन आणि 33 सेंच्युरी झळकावणारा कुक हा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) सर्वाधिक रनचा रेकॉर्ड मोडेल असे गांभिर्याने म्हंटले जात असे. तो मैदानात बॅटींगसाठी उभा असताना त्याच्या खेळात लाराचा दरारा किंवा पीटरसन प्रमाणे फटकेबाजीचा वरचा क्लास कधीच नव्हता. पण त्याच्याकडे जबरी आत्मविश्वास होता.

याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने आव्हानात्मक वातावरणात, खराब पिचवर प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सना दिवसभर बॉलिंग करायला लावत असे. इंग्लंड टीमला पराभवाच्या जबड्यातून बाहेर काढणारी कूकची बॅटींग, त्याची दीर्घकाळ मैदानात उभं राहण्याची सवय इंग्लिश क्रिकेट टीम या वर्षात मिस करत आहे.

Ashes Series: इंग्लंडचा मोठा पराभव, सलग दुसऱ्या टेस्टमध्ये गेली लाज

अवघड देशात बेस्ट

कोणत्याही इंग्लिश बॅटर्ससाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात रन करणे हे त्याचा खेळातील मोठेपणा मोजण्याचे एकक आहे. भारतामधील स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर त्यांची खऱ्या अर्थाने टेस्ट होते. तर अ‍ॅशेस सीरिजचा इतिहास आणि प्रतिष्ठा यामुळे त्याने ऑस्ट्रेलियात रन्स करणे हे इंग्लिश टीमसाठी मस्ट असते. या एककानुसार कुकच्या यशाची फुटपट्टी इतरांपेक्षा चांगलीच उंच आहे.   

कुकला (Alastair Cook Birthday) 2006 साली नागपूर टेस्टमध्ये पदार्पण करण्यासाठी बळंच ढकलण्यात आले. मायकल वॉन सीरिजमधून बाहेर गेला होता. तर ट्रेस्कॉथिकनं अचानक माघार घेतली होती. त्यावेळी स्ट्रॉसचा ओपनिंग पार्टनर म्हणून कुकला संधी मिळाली. त्या टेस्टमध्ये इंग्लंड टीमकडून एख शीख (मॉन्टी पानेसर) भारताविरुद्ध पदार्पण करत होता. त्यामुळे मीडियाचा सर्व फोकस त्याच्यावर होता. कुकने त्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावत त्याचा क्लास जगाला दाखवला.

कुकने भारतामध्ये 5 टेस्ट सेंच्युरी झळकावल्या. 2012 च्या दौऱ्यात कोलकाता टेस्टमधील त्याच्या 190 रनच्या खेळीमुळे इंग्लिश टीमला सीरिज जिंकण्याची प्रेरणा मिळाली. अहमदाबादच्या अवघड पिचवरील त्याचे 176 रन हे भारतामध्ये कोणत्याही विदेशी ओपनरनं केलेली एक सर्वोत्तम खेळी होती. भारतामध्ये सीरिज जिंकण्याचा एक दुर्मिळ रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

इतकचं नाही तर भारताविरुद्ध बर्मिंगहम टेस्टमध्ये त्याने त्याच्या करिअरमधील 294 रनची सर्वोत्तम खेळी खेळली आहे. तर 2018 साली भारताविरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतानाही त्याने सेंच्युरी झळकावली.

ऑस्ट्रेलियात आघाडी

इंग्लंडने गेल्या तीन दशकामध्ये फक्त एकदाच (2010-11) ऑस्ट्रेलियात अ‍ॅशेस सीरिज जिंकली आहे. त्या सीरिजमध्ये कुकने (Alastair Cook Birthday)  7 इनिंगमध्ये 756 रन केले होते. कुकने ऑस्ट्रेलियात 20 टेस्टमध्ये 48.94 च्या सरासरीने 1664 रन केले आहेत. यामध्ये 5 सेंच्युरींचा समावेश आहे.

कुकने कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात अजिबात फॉर्मात नसताना मेलबर्न टेस्टमध्ये नाबाद 244 रनची खेळी केली होती. यावर्षी ड्रीम फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) ऑस्ट्रेलियात आजवरच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही, हा एकच फरक लक्षात घेतला तरी इंग्लंड क्रिकेट टीम सध्या कुकला किती मिस करतीय हे लक्षात येईल.

Ashes Series: पहिल्याच दिवशी दिसला इंग्लंडचा जुना (Joe) ‘Root’!

फक्त भारत आणि ऑस्ट्रेलियाच नाही तर त्याच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडने दौरा केलेल्या सर्व देशातील टेस्टमध्ये कुकने सेंच्युरी झळकावली आहे. इंग्लंडमधील स्विंग वातावरणात ओपनर्सची नेहमीच परीक्षा होते. (खात्रीसाठी एकदा यावर्षीचा इंग्लिश ओपनर्सचा) रेकॉर्ड पाहा या वातावरणात कुकने टेस्टमधील 15 सेंच्युरी आणि 32 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत.

कारकिर्दीतील चढ-उतार

अ‍ॅलिस्टर कुकने (Alastair Cook Birthday) त्याच्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेक चढ-उतात पाहिले. 2010 साली मेलबर्न टेस्टमध्ये त्याने 5000 रनचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा तो सचिननंतरचा सर्वात लहान वयाचा बॅटर होता. त्यानंतर दोन वर्षांनी कोलकातामध्ये 7000 रन करणारा तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान बॅटर बनला. वयाच्या 16 व्या वर्षी टेस्ट क्रिकेट खेळण्यास सुरु केलेल्या सचिनपेक्षा कमी वयात त्याने हा रेकॉर्ड केला होता.

कुकनं वन-डे क्रिकेटमध्येही समाधानकारक कामगिरी केली आहे, हे सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. त्याच्या कॅप्टनसीमध्ये इंग्लंडनं 2013 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. तसंच त्याने वन-डे क्रिकेटमधील 5 पैकी 4 सेंच्युरी या कॅप्टन म्हणून झळकावल्या आहेत.

कुकने कॅप्टन (Alastair Cook Birthday) म्हणून मायदेशात दोन अ‍ॅशेस सीरिज जिंकल्या. पण, त्याच्याच कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियातील अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉशची नामुश्की सहन करावी लागली. त्याच सीरिजमध्ये केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) सोबत त्याचा संघर्ष झाला. या संघर्षातून पीटरसनची टीममधील जागा गेली. कोच अँडी फ्लॉवरने (Andy Flower) राजीनामा दिला. तर या संघर्षाचा बिंदू असलेल्या कुकला 2015 च्या वर्ल्ड कपच्या तोंडावर वन-डे टीमची कॅप्टनसी आणि टीममधील जागा गमवावी लागली.

‘साहेबी’ क्रिकेट संस्कृती बदलणारा ‘परदेसी बाबू’

कुकच्या कॅप्टनसीमध्ये भारतामध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची किमया केली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत 1 टेस्टनं पिछाडीवरून सीरिज 2-1 ने जिंकली. त्याचबरोबर इंग्लंडने कुकच्या कॅप्टनसीमध्येच इतिहासात पहिल्यांदा बांगलागदेश विरुद्ध टेस्ट मॅच गमावली. तर भारतामध्येही 4 टेस्टच्या सीरिजमध्ये 0-4 ने मार खाल्ला. त्या सीरिजमध्ये रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) कुकला सातत्याने बकरा बनवले.

भारताविरुद्ध्या पराभवानंतर कुकने टेस्ट क्रिकेटची कॅप्टनसी सोडली. त्यानंतर तो आणखी वर्षभर टेस्ट क्रिकेट खेळला. या काळात त्याचा फॉर्म हरपला होता. पण भारताविरुद्ध शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये त्याने सेंच्युरी झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप (Alastair Cook Birthday) घेतला.

कुकचे काही विलक्षण रेकॉर्ड

अ‍ॅलिस्टर कुक रिटायर झाला त्यावेळी त्याच्या नावावर काही विलक्षण रेकॉर्ड होते. टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सर्वात जास्त रन त्याच्या नावावर आहेत. हा रेकॉर्ड त्याच्या भक्कम तंत्राची आणि दीर्घकळ क्रिकेट खेळण्याची साक्ष आहे.

पाकिस्तान विरुद्ध 2015 साली झालेल्या टेस्टमध्ये त्याने 836 मिनिट्स बॅटींग करत 236 रन केले. ही मिनिटांचा हिशेब केला तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील  तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब इनिंग आहे. त्याचबरोबर इंग्लंडकडून सर्वाधिक टेस्ट, सर्वाधिक सलग टेस्ट, सर्वात जास्त टेस्ट सेंच्युरी आणि सर्वाधिक टेस्ट हाफ सेंच्युरी हे सर्व रेकॉर्ड कुक रिटायर झाला (Alastair Cook Birthday) त्यावेळी त्याच्या नावावर होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading