
त्याच्या खेळात एबी डिव्हिलियर्स सारखी अद्भुत फटकेबाजी नसते. हाशिम अमलाप्रमाणे सातत्य नाही. तरीही त्याच्या बॅटींगमध्ये एक खमकेपणा आहे. अवघड परिस्थितीमध्ये खेळण्याची कणखर मानसिकता आहे. चोकर्सचा शिक्का बसलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) टीमचा तो संकटकालीन आधार आहे. त्याने पहिल्याच टेस्टमध्ये ते दाखवून दिलं. त्यानंतरही वारंवार सिद्ध केलं. दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन फाफ ड्यू प्लेसीचा आज वाढदिवस (Faf du Plessis Birthday) आहे. आजच्याच दिवशी (13 जुलै 1984) रोजी त्याचा जन्म झाला.
डीव्हिलियर्सचा जिगरी दोस्त, इंग्लंडहून परतला
फाफ ड्यू प्लेसी आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) हे दोघे शाळेपासूनचे जीवलग मित्र. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटींगची धुरा वाहणारे हे दोघे हॉस्टेलमधील रूम पार्टनर देखील होते. डीव्हिलियर्सनं स्पोर्ट्स सायन्स शिकण्यासाठी विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर ड्यू प्लेसी देखील तिथे प्रवेश घेण्यासाठी गेला होता. पण, तेथील मोठी रांग पाहून तो परतला. त्याने स्पोर्ट्स सायन्स शिकण्याऐवजी स्पोर्ट्सवर सर्व फोकस करण्याचे ठरवले. पुढे डीव्हिलियर्सने देखील तो कोर्स अर्धवट सोडला.
दक्षिण आफ्रिकेच्या अनेक क्रिकेटपटूंनी कोलपॅक करार (Kolpak Deal) करुन इंग्लंडचा रस्ता पकडला आहे. ड्यू प्लेसी इंग्लंडहून आफ्रिकेत परतला आहे. तो अगदी सुरुवातीला इंग्लिश कौंटी क्रिकेट खेळला आहे. तो 21 वर्षांचा होता त्यावेळी या कराराचे काही नियम बदलले. त्यावेळी त्याने तो करार पुढे न करत आफ्रिकेत परतण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
ड्यू प्लेसीनं 2010 साली देशांतर्गत क्रिकेट गाजवले. त्याने त्या सिझनमधील 10 मॅचमध्ये 510 रन केले. त्यामुळे जानेवारी 2011 मध्ये वर्ल्ड कपच्या काही महिने आधी भारताविरुद्ध झालेल्या वन-डे मॅचमध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या वन-डेमध्येच त्याने 60 रनची खेळी केली. त्याची ही खेळी वर्ल्ड कप टीममध्ये (Cricket World Cup 2011) निवड होण्यासाठी पुरेशी ठरली.
ड्यू प्लेसी त्या वर्ल्ड कपमध्ये अगदी नवखा खेळाडू होता. भारताविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या वन-डेमध्ये त्याने निर्णायक क्षणी नाबाद 25 रन काढत विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाफ सेंच्युरी झळकावली. न्यूझीलंड विरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये 222 रनचा पाठलाग करताना त्याची आणि डीव्हिलियर्सची जोडी जमली होती. त्यावेळी त्या दोघांमध्ये रन काढताना गफलत झाली. डीव्हिलियर्स रन आऊट झाला. त्यानंतर आफ्रिकेचं पराभवासह वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले.
6 वर्षांपूर्वीची धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचे कारण?
पहिल्याच टेस्टमध्ये इतिहास
फाफ ड्यू प्लेसी (Faf du Plessis Birthday) क्रिकेट विश्वात नेहमीच त्याने पहिल्या टेस्टमध्ये केलेल्या पराक्रमासाठी लक्षात राहील. 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड टेस्टमध्ये त्याने पदार्पण केले. त्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 550 रनचा मोठा स्कोअर केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था 7 आऊट 250 अशी झाल्यावर जखमी जॅक कॅलीस (Jacques Kallis) सोबत त्याने प्रतिकार केला. ड्यू प्लेसीनं 159 बॉलमध्ये केलेल्या 78 रनच्या खेळीमुळेच आफ्रिकेला ‘फॉलो ऑन’ टाळता आला.
दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या इनिंगमध्ये 430 रनचा पाठलाग करताना 4 आऊट 45 अशी अवस्था होती. त्यावेळी ड्यू प्लेसी- डीव्हिलियर्स जोडी मॅच वाचवण्यासाठी मैदानाला अक्षरश: चिकटली. डीव्हिलियर्सनं 33 रन काढण्यासाठी 220 बॉल खेळले. तो आऊट झाल्यानंतरही पराभवाचा धोका टळला नव्हता.
त्यावेळी टेस्टमध्ये पदार्पण करणारा ड्यू प्लेसिस उभा राहिला. त्याने जॅक कॅलिस आणि अन्य तळाच्या बॅट्समनच्या मदतीनं आफ्रिकेचा पराभव टाळला. दुसऱ्या इनिंगमध्ये ड्यू प्लेसीने 376 मिनिटे आणि 466 बॉल झुंज देत नाबाद 110 रन काढले.
भारताविरुद्ध पुनरावृत्ती
ड्यू प्लेसिसनं अॅडलेड टेस्टमधील कामगिरीची भारताविरुद्ध 2013 साली पुनरावृत्ती केली. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये 280 रन केल्यानंतरही आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) 153 आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) 96 रनच्या जोरावर टीम इंडियाने आफ्रिकेसमोर 458 रनचं टार्गेट ठेवलं.
या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना ड्यू प्लेसीनं (Faf du Plessis Birthday) पुन्हा एकदा डीव्हिलियर्सच्या साथीनं कणखर खेळ दाखवला. 4 आऊट 197 या परिस्थितीमधून त्या दोघांनी आफ्रिकेला बाहेर काढले. दोघांनही सेंच्युरी झळकावली. डीव्हिलियर्स आऊट झाल्यानंतरही ड्यू प्लेसिसचा प्रतिकार सुरु होता. भारतीय बॉलर्सना त्याला आऊट करणे जमत नव्हते. अखेर अजिंक्य रहाणेचा डायरेक्ट थ्रो टीम इंडियाच्या कामी आला. ड्यू प्लेसिस आऊट झाला, पण तोपर्यंत मॅच वाचवण्याचा विश्वास आफ्रिकेच्या तळाच्या बॅट्समनना आला होता. पाचव्या दिवशी मॅच थांबली त्यावेळी आफ्रिका 458 च्या टार्गेटपासून फक्त 8 रन दूर होती.
भारताविरुद्ध 2015 साली झालेल्या दिल्ली टेस्टमध्येही ड्यू प्लेसी-डीव्हिलियर्स जोडीनं नांगर टाकला होता. पण त्यावेळी चौथ्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजाच्या वळणाऱ्या बॉलनं ड्यू प्लेसिसचा बचाव भेदला. तो 10 रनवर आऊट झाला. डीव्हिलियर्सची 297 बॉलमध्ये 93 रनची खेळी आफ्रिकेचा पराभव टाळू शकली नाही.
ICC स्पर्धांमधील ड्यू प्लेसी
ICC स्पर्धांमध्ये चोकर्स हा शब्द दक्षिण आफ्रिकेचा नेहमी पाठलाग करतो. हा शब्द बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये ड्यू प्लेसीचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये 2014 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये ड्यू प्लेसी कॅप्टन होता. त्याच्या कॅप्टनसीमध्ये आफ्रिकेनं सेमी फायनलपर्यंत सहज प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये देखील 4 आऊट 172 रनची खेळी केली. त्या इनिंगध्ये ड्यू प्लेसीनं सर्वात जास्त 58 रन काढले होते. आफ्रिकेनं हे रन वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या आणखी एका स्पेशल इनिंगपुढे ते निरुत्तर ठरले. आफ्रिका पराभूत झाले. पण या पराभवाबद्दल कुणी C या शब्दानं त्यांचा उद्धार केला नाही.
ड्यू प्लेसीनं (Faf du Plessis Birthday) 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 380 रन काढले. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये त्यानेच आफ्रिकेकडून सर्वाधिक 82 रन काढले होते. आफ्रिकेसाठी निराशाजनक ठरलेल्या 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही त्याने 387 रन काढले. शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरी झळकावत ड्यू प्लेसीनं आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.
टेस्ट क्रिकेटमधून रिटायर
ड्यू प्लेसी 2016 साली दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन बनला. त्यानं एकूण 36 टेस्टमध्ये टीमची कॅप्टनसी केली. यामध्ये 18 टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला तर 15 टेस्ट गमावल्या. तीन टेस्ट ड्रॉ झाल्या. ऑस्ट्रेलियाला तीन्ही फॉरमॅटमध्ये पराभूत करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला कॅप्टन आहे. फाफनं कॅप्टन म्हणून सुरुवातीला चांगलं यश मिळवलं. त्यानं पहिल्या 27 टेस्टपैकी 17 टेस्ट जिंकल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात त्याचा रेकॉर्ड बिघडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं केलेल्या भारत दौऱ्याचाही समावेश आहे. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सीरिजही आफ्रिकेनं त्यांच्या घरात 0-2 अशी गमावली होती. इंग्लंड विरुद्ध 2020 साली 3-1 नं सारिज गमावल्यानंतर त्यानं टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली होती.
यावर्षी त्याने श्रीलंकेविरुद्ध 199 रनची सर्वोच्च खेळी केली. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यावरही तो खेळला. या दौऱ्यानंतर आगामी काळात होणाऱ्या दोन T20 वर्ल्ड कपवर फोकस करण्यासाठी तो टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाला.
डीव्हिलियर्सच्या वाढदिवशीच त्याच्या जिवलग मित्राची अचानक निवृत्ती!
सीएसकेचा ड्यू प्लेसी
दक्षिण आफ्रिकेक़डून T20 क्रिकेटमध्ये दुसरी सेंच्युरी झळकावणारा ड्यू प्लेसी हा चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा 2012 पासून सदस्य आहे. त्याला चेन्नईकडून अनेक सिझन नियमित संधी मिळाली नाही. जी संधी मिळाली त्यावेळी त्याने बॅटींग आणि फिल्डिंगमध्ये टीमसाठी पुरेपूर योगदान दिले आहे.
आयपीएल 2018 चा सिझनमध्ये ड्यू प्लेसी बराच काळ बाहेर होता. प्ले ऑफमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध त्याने निर्णायक क्षणी खेळ उंचावत टीमला विजय मिळून दिला. तो महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) विश्वासू सहकारी आहे. मागील वर्षी (IPL 2020) सीएसकेच्या निराशाजनक कामगिरीतही ड्यू प्लेसीनं किल्ला लढवला. टीमच्या मोजक्या विजयात त्याचा वाटा होता. या सिझनमध्येही (IPL 2021) स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सर्वात जास्त रन काढणारा विदेशी बॅट्समन फाफ ड्यू प्लेसी (Faf du Plessis Birthday) आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएल सिझनमध्येही त्याच्याकडून सीएसकेला मोठ्या अपेक्षा आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.