फोटो – ट्विटर/ICC

सचिन तेंडुलकरनं ग्लेन मॅकग्राची केलेली धुलाई, युवराज सिंहचे स्टुअर्ट ब्रॉडला लगावलेले 6 सिक्स, धोनीचा वर्ल्ड कप जिंकून देणारा सिक्स, विराटची मलिंगाविरुद्धची आक्रमक इनिंग या भारतीय बॅटींगमधील कधीही न विसरणाऱ्या खास आठवणी आहेत. भारतीय बॉलर्सच्या अशाच अविस्मरणीय कामगिरीची यादी करायची असेल तर ती यादी वर्ल्ड कपमध्ये उद्दामपणा करणाऱ्या आमिर सोहेलला (Aamir Sohail) बोल्ड करणाऱ्या व्यंकटेश प्रसादच्या (Venkatesh Prasad) बॉलशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. टीम इंडियातील या जिगरबाज बॉलरचा आज वाढदिवस (Venkatesh Prasad Birthday) आहे. आजच्याच दिवशी (5 ऑगस्ट 1969) प्रसादचा जन्म झाला.

प्रसादचे वैशिष्ट्य

उत्तम उंची आणि शरीरयष्टी लाभलेल्या प्रसादने जवागल श्रीनाथच्या (Javagal Srinath) मदतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. तो 1996 ते 2001 या कालखंडात टीम इंडियाचा मुख्य बॉलर होता. प्रसादकडे बॉल दोन्ही बाजूला स्विंग करण्याची क्षमता होती. तसंच त्याचा स्लो कटर देखील प्रभावी होता.

फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या विदेशातील पिचवर प्रसाद नेहमीच प्रभावी ठरला. भारतीय उपखंडाच्या बाहेर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज या तीन देशांमधील टेस्टमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली. वन-डे क्रिकेटमध्ये तर तो आणखी उपयुक्त बॉलर होता. पाकिस्तानला दोन वर्ल्ड कपमध्ये हरवण्यात त्याचा स्पेल निर्णायक ठरला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या 0 रनमध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यानं केला आहे.

सुरुवातीचा कालखंड

व्यंकटेश प्रसादनं 1990-91 च्या सिझनमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीची काही वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर देवधर ट्रॉफीतील उत्तर विभागाच्या मॅचनं प्रसादनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्या मॅचमध्ये साऊथ झोनची टीम पहिल्यांदा बॅटींग करताना 37.5 ओव्हर्समध्ये फक्त 82 रनवर ऑल आऊट झाली होती.

व्यंकटेश प्रसाद हा एकमेव मुख्य फास्ट बॉलर साऊथ झोनच्या टीममध्ये होता. प्रसादनं 23 रन देत नॉर्थ झोनच्या 6 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर साऊथ झोनला 14 रननं अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. त्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्येही त्यानं नॉर्थ झोनला पुन्हा एकदा टार्गेट केले. 38 रन देत 7 विकेट्स घेतल्या. भारतीय क्रिकेटमधील कपिल युग अस्ताला गेले होते. त्यावेळी जवागल श्रीनाथ आणि मनोज प्रभाकर यांचा तिसरा साथीदार म्हणून प्रसादची टीम इंडियामध्ये निवड झाली.  

सोहेलची विकेट, देशाचा हिरो!

व्यंकटेश प्रसादनं 1994 साली न्यूझीलंड विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. सुरुवातीच्या काळात प्रसादची कारकिर्द सामान्य होती. तो तिसऱ्या पसंतीचा फास्ट बॉलर होता. पाकिस्तान विरुद्ध 96 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1996) झालेल्या क्वार्टर फायनलनंतर ते चित्र बदललं. क्वार्टर फायनलच्या काही दिवस आधी सनथ जयसूर्यानं मनोज प्रभाकरची धुलाई केली होती. त्यामुळे प्रभाकरची क्रिकेट कारकिर्द संपली. त्यामुळे आता प्रसाद हा श्रीनाथचा ओपनिंग पार्टनर होता.

बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रसादच्या घरच्या मैदानात आमिर सोहेलनं आक्रमक हाफ सेंच्युरी केली होती. त्यानंतर त्याच्यातली मस्ती बाहेर आली. 15 व्या ओव्हरमध्ये प्रसादला फोर मारल्यानंतर त्यानं मस्तवापणे प्रसादकडं पाहात हातवारे केले. प्रसादनं पुढच्याच बॉलवर सोहेलला आऊट केले. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेता 27 रन देणाऱ्या प्रसादनं पुढच्या 8 ओव्हर्समध्ये 18 रन देत 3 विकेट्स घेतल्या. सोहलसह एजाज अहमद आणि इंझमाम उल हकला आऊट करत प्रसादनं भारताला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात निर्णयाक भूमिका बजावली. प्रसाद (Venkatesh Prasad Birthday)  संपूर्ण देशाचा हिरो बनला.

टेस्टमध्ये पदार्पण

96 च्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंड दौऱ्यातील एजबस्टन टेस्टमध्ये भारताच्या चार आणि इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी पदार्पण केले. प्रसाद त्यापैकी एक होता. व्यंकटेश प्रसादनं पहिल्याच टेस्टमध्ये जवागल श्रीनाथच्या मदतीनं इंग्लंडच्या अनुकूल वातावरणाचा फायदा घेत अचूक बॉलिंग केली. इंग्लंडची पहिल्या इनिंगमध्ये 8 आऊट 215  अशी अवस्था झाली होती. नासिर हुसेनच्या झुंजार सेंच्युरीमुळे इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी मिळवता आली.

त्यानंतरची लॉर्ड्स टेस्ट द्रविड-गांगुलीच्या पदार्पणामुळे गाजली. प्रसादनं (Venkatesh Prasad Birthday)  त्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 5 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंड विरुद्धच्या त्या टेस्ट सीरिजमध्ये प्रसादनं 15 विकेट्स घेत आपण टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी योग्य असल्याचं दाखवून दिलं.

VIDEO : आमिर सोहेलनं सुरु केलं, व्यंकटेश प्रसादनं संपवलं! ऐतिहासिक घटनेची 25 वर्ष

टेस्टमधील बेस्ट

प्रसादची 33 टेस्टमध्ये 96 विकेट्स ही आकडेवारी त्याच्या उपयुक्ततेचं वर्णन करण्यासाठी योग्य नाही. त्यानं एका इनिंगमध्ये 5 विकेट्स 7 वेळा तर 1 वेळा टेस्टमध्ये 10 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. टीमला अनेकदा मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी प्रसादमुळे मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातामध्ये गॅरी कस्टर्न आणि हडसन यांच्या धडाक्यामुळे आफ्रिकेची स्थिती 2 आऊट 339 अशी भक्कम होती. त्यानंतर प्रसादच्या भेदक स्पेलमुळे आफ्रिकेच्या पुढील 8 विकेट्स 84 रनमध्ये गेल्या. प्रसादनं त्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेत दरबन टेस्टमध्ये डोनाल्डच्या 9 विकेट्समुळे टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 100  तर दुसऱ्या इनिंगमध्ये 66 रनवर ऑल आऊट झाली. त्या टेस्टमध्ये प्रसादनं दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 5 अशा 10 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेत 1956-57 नंतर एका टेस्टमध्ये 10 विकेट्स 10 विकेट्स घेणारा प्रसाद पहिला विदेशी बॉलर बनला.

पाकिस्तानला ‘प्रसाद’

व्यंकटेश प्रसादनं (Venkatesh Prasad Birthday) पाकिस्तान विरुद्ध नेहमीच सर्वोत्तम बॉलिंग केली. 1996 च्या ऐतिहासिक मॅचचा उल्लेख यापूर्वी केला आहे. पाकिस्तानविरुद्ध कारगील युद्धाचं टेन्शन सुरु असताना 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 5 विकेट्स घेत टीमला विजय मिळवून दिला. 1997 साली कोलंबोमध्ये आशिया कप स्पर्धेत प्रसादनं पहिल्या 5 ओव्हर्समध्येच 17 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. प्रसादच्या या स्पेलमुळे पाकिस्तानची 9 ओव्हर्समध्ये 5 आऊट 30 अशी अववस्था झाली होती. त्यानंतर पावसामुळे ती मॅच रद्द झाली आणि पाकिस्तानचा पराभव टळला.

प्रसादनं टेस्टमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी पाकिस्तान विरुद्धच नोंदवली. 1999 साली चेन्नईमध्ये झालेली भारत विरुद्ध पाकिस्तान ही टेस्ट अनेक कारणांमुळे ऐतिहासिक आणि तितकीच हाय टेन्शन होती. सचिनच्या एका अविस्मरणीय सेंच्युरीसाठी ती टेस्ट कधीही विसरली जाणार नाही. प्रसादनं त्या टेस्टमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 33 रन देत 6 विकेट्स घेतल्या. यापैकी 5 विकेट्स त्यानं एकही रन देता घेतल्या. प्रसादच्या स्पेलमुळेच 5 आऊट 278 वरुन पाकिस्तानची दुसरी इनिंग 286 रनवर संपुष्टात आली.

कारकिर्दीचा शेवट

नव्या शतकाच्या सुरुवातीला झहीर खान आणि अजित आगरकर यांच्या उदयानंतर प्रसादची टीममधील जागा अस्थिर बनली. नैरोबीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मिनी वर्ल्ड कप फायनलमध्ये झहीर-आगरकर जोडीला एकही विकेट मिळाली नाही, पण प्रसादनं 27 रन्समध्ये 3 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले.

प्रसादला 2001 साली अर्जुन पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनीच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कँडी टेस्टमध्ये प्रसादचा अगदी शेवटच्या क्षणी समावेश करण्यात आला. त्या टेस्टमध्ये प्रसादनं एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यानंतर प्रसाद फक्त एकच टेस्ट खेळला. पुढे 2005 साली त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली.

‘काहीही झालं तरी ‘Spirit of Cricket’ जपलं पाहिजे

रिटायरमेंटनंतरचा प्रसाद

प्रसादनं रिटायरमेंटनंतर अगदी लगेच कोचिंगला सुरुवात केली. 2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा तो कोच होता. प्रसादच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीमनं त्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. 2007 साली वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर त्याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली.

प्रसादनं बॉलिंग कोच म्हणून झहीर खानला आणखी तयार करण्याचं काम केलं. इशांत शर्माला सुरुवातीचे धडे दिले. खेळाडू म्हणून त्याला जे करता आलं नाही त्या गोष्टी त्यानं बॉलिंग कोच म्हणून मिळवून दाखवल्या. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. मात्र 2009 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर प्रसादची तडकाफडकी कोचपदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या विदेशी पत्रकाराचा व्यंकटेश प्रसादने ‘आमिर सोहेल’ केला

टीम इंडियाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad Birthday) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॉलिंग कोच बनला. प्रसाद सीएसकेसोबत असतानाच 2010 साली टीमनं पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावले. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचाही काही काळ बॉलिंग कोच होता. सध्या प्रसाद कॉमेंट्रीमध्ये व्यस्त आहे. तसेच तो सोशल मीडियावरही सक्रीय असतो. त्याची एक ताजी जाहिरात देखील चांगलीच गाजली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

     

error: