फोटो – सोशल मीडिया

मुंबईचा शैलीदार बॅटर वासिम जाफरचा (Wasim Jaffer Birthday) आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी (16 फेब्रुवारी 1978 ) रोजी जाफरचा जन्म झाला. भारतीय फर्स्ट क्लास क्रिकेटमधील बॅटिंगचे बहुतेक सर्व विक्रम जाफरच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटचा सचिन तेंडुलकर असेही म्हंटले जाते.

बस ड्रायव्हरचा मुलगा

जाफरचे वडील बस ड्रायव्हर होते. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या जाफरच्या वडिलांना त्यांच्या चार मुलांपैकी एकाने तरी क्रिकेटर व्हावं अशी इच्छा होती. जाफरच्या घरची परिस्थिती साधारण होती. त्याचे दोन भाऊ लवकरच कामाला लागले. जाफरनं वयाच्या 15 व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये 400 रन्सची खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर तीन वर्षांनीच वयाच्या 18 व्या वर्षी त्याची मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड झाली.

जाफरची दुसरीच रणजी मॅच सौराष्ट्र विरुद्ध राजकोटमध्ये होती. सौराष्ट्रनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 आऊट 595 रन्सचा डोंगर उभा केला. त्याला उत्तर देताना जाफरनं सुलक्षण कुलकर्णीसोबत पहिल्या विकेट्ससाठी 459 रन्सची पार्टनरशिप केली. रणजी क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च पार्टरनशिपचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्यांना फक्त एक सिक्सर कमी पडला. जाफरनं नाबाद 314 रन्स काढले. जाफर – सुलक्षणच्या या पार्टरनरशिपमुळे मुंबईने सौराष्ट्रला 4 आऊट 647 असं खणखणीत उत्तर दिलं. वयाच्या अठराव्या वर्षीच 675 मिनिटांची मॅरेथॉन खेळी करत क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचं टेंपरामेंट असल्याचं जाफरनं (Wasim Jaffer Birthday) त्या मॅचमध्ये दाखवून दिलं.

ब्रॅडमन, गावसकर आणि सचिनला जमलं नाही ते वेंगसरकरांनी केलं!

रणजी क्रिकेटमध्ये विक्रम

जाफरने 26 वर्षांच्या रणजी करियरमध्ये अनेक विक्रम केले. सर्वात जास्त रणजी मॅच, सर्वात जास्त रणजी क्रिकेटमध्ये रन्स, सर्वात जास्त रणजी सेंच्युरी, सर्वात जास्त रणजी हाफ सेंच्युरी, सर्वात जास्त रणजी कॅच, दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त रन्स, इराणी ट्रॉफीत सर्वात जास्त रन्स, दहा वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचा सदस्य असे अनेक विक्रम जाफरनं निवृत्त होताना स्वत:च्या नावावर नोंदवले होते.

मॅच260
रन्स19410
सरासरी50.67
सर्वोच्च314*
100/5057/91
वासिम जाफरची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आकडेवारी. * खूण नाबाद असल्याचे दर्शविते.

स्थानिक क्रिकेटमध्ये रन्सचा डोंगर रचणाऱ्या जाफरला 2000 साली घरच्या मैदानावर म्हणजे मुंबईतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. डोनाल्ड, पोलॉक सारख्या फास्ट बॉलर्ससमोर तो पहिल्या टेस्ट सीरिजमध्ये अपयशी ठरला. जाफरला (Wasim Jaffer Birthday) टेस्ट क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी झळकवण्यासाठी सहा वर्षे वाट पाहावी लागली. त्याने इंग्लंडविरुद्ध 2006 साली नागपूरमध्ये पहिली सेंच्युरी झळकावली.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

भारताने 2006 साली वेस्ट इंडिजमध्ये तब्बल 35 वर्षांनी टेस्ट सीरिज जिंकली. या ऐतिहासिक विजयात जाफरचं मोलाचं योगदान होतं. त्याने संपूर्ण सीरिजमध्ये 53 च्या सरासरीने 372 रन्स केले. टेस्ट करियरमधील सर्वोच्च स्कोअरही जाफरने याच सीरिजमध्ये काढला. त्याने अँटीग्वा टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावत 212 रन काढले. त्यानंतरच्या दोन वर्षात जाफरने 21 टेस्ट खेळल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत सेंच्युरी झळकावली. पाकिस्तानविरुद्ध इडन गार्डनवर 201 रन्स काढले. त्याची बॅटिंगची शैली पाहून अनेकांना मोहम्मद अझहरुद्दीनची आठवण होत असे.

भारतच्या 2007-08 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाफर अपयशी ठरला. त्या दौऱ्यात त्याला सहापैकी पाचवेळा ब्रेट ली ने आऊट केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2008 साली कानपूरमध्ये झालेली टेस्ट ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली.

मॅच31
रन्स1944
सरासरी34.10
सर्वोच्च212
100/505/11
वासिम जाफरची टेस्ट क्रिकेटमधील आकडेवारी. * खूण नाबाद असल्याचे दर्शविते.

पुन्हा फर्स्ट क्लास क्रिकेट

राष्ट्रीय टीममधून वगळल्यानंतरही जाफर स्थानिक क्रिकेटमध्ये रन्स करत होता. त्यानंतरची पुढील सहा वर्ष तो मुंबईकडून खेळला. 2014 साली त्याने विदर्भाच्या टीमकडून खेळण्यास सुरुवात केली. टीम बदलली, फॉर्म हरपला आणि दुखापतीमुळे एक वर्ष वाया गेलं. ‘जाफर आता निवृत्त होणार’ अशी चर्चा सुरु होती. जिद्दी स्वभावाच्या जाफरने हार मानली नाही. मुंबईचे ज्येष्ठ खेळाडू चंद्रकांत पंडित विदर्भाचे कोच बनले होते. त्यांना जाफरचं महत्त्व माहिती होतं. त्यांनी जाफरवर विश्वास (Wasim Jaffer Birthday) दाखवला. त्याला विदर्भाकडून पुन्हा खेळण्याची संधी दिली.

विदर्भाच्या तरुण खेळाडूंना घडवण्याची जबाबदारी जाफरनं स्वत:च्या खांद्यावर घेतली. या टीमनं दोन वर्षात दोनदा रणजी आणि दोनदा इराणी ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. जाफरने मार्च 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्त होण्यापूर्वी मुंबईचाच सहकारी असलेल्या अमोल मुजुमदारचा सर्वाधिक रन्सचा विक्रमही जाफरनं मोडला होता.

वादग्रस्त कोच

जाफर निवृत्तीनंतर क्रिकेट कोचिंगकडे वळाला. ते बांगलादेशच्या अंडर 19 टीमचा बॅटिंग कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशनं 2020 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर उत्तराखंड टीमचा कोच म्हणून त्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली. कोच म्हणून धार्मिक भेदभाव केल्याचा त्याच्यावर आरोप उत्तराखंड क्रिकेट असोसिएशननं केला. जाफरनं हे आरोप फेटाळले. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. या चौकशीमध्ये अद्याप काही साध्य झाले नाही.

चेतेश्वर पुजाराच्या 5 बेस्ट इनिंग, ज्या ठरल्या टीम इंडियाचा आधार!

जाफर नंतर ओडिशा टीमचा कोच बनला. तो पंजाब किंग्जचा (Punjab Kings) या आयपीएल टीमचा बॅटींग कोच देखील होता. त्याच्या कोचिंगमध्ये पंजाबची टीम एकदाही ‘प्ले ऑफ’ मध्ये जाऊ शकली नाही. अनेकदा कोसळणाऱ्या पंजाबच्या मिडल ऑर्डरच्या दुखण्यावर जाफर औषध शोधू शकला नाही. त्याने आता या पदाचाही राजीनामा दिला आहे. जाफर सध्या ओडिशा टीमचा कोच आहे. त्यापेक्षाही सोशल मीडियावर वेगवेगळे मीम पोस्ट करण्यासाठी तो जास्त प्रसिद्ध आहे. विशेषत: आजच्या मिलिनियेम पिढीला जाफरची (Wasim Jaffer Birthday) सोशल मीडियामुळे अधिक ओळख आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: