फोटो – ट्विटर

तो दिवस होता 18 एप्रिल 2008.  त्या दिवशी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर एक वादळ आलं. या वादळानं फक्त 73 बॉलमध्ये 13 सिक्ससह नाबाद 158 रन काढले इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेचा ओपनिंग शो सुपर हिट झाला. त्यानंतर या स्पर्धेनं नेहमीच लोकप्रियतचे नवे विक्रम केले. फक्त आयपीएल स्पर्धाच नाही तर T20 क्रिकेट त्या एका रात्रीत पुढे गेलं. हे क्रिकेट पुढे घेऊन जाणारा आक्रमक खेळाडू ब्रँडन मॅकलमचा आज वाढदिवस (Brendon McCullum Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 सप्टेंबर 1981) मॅकलमचा जन्म झाला.

… तर इतिहास घडला नसता!

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्त्वाखाली आणि शाहरुख खान मालक असलेली कोलकाता नाईट रायडर (KKR) ही पहिल्या आयपीएलमधील एक ग्लॅमरस टीम होती. या टीममध्ये गांगुलीसह ख्रिस गेल आणि रिकी पॉन्टिंग यांच्या नावाची चर्चा होती. वर्ल्ड क्रिकेटमध्ये दिग्गज असलेले हे केकेआरचे टॉप थ्री होते. मॅकलमचा बॅटींग ऑर्डरमधील क्रमांक चौथा होता. स्टार खेळाडूंचा भरणा असणाऱ्या या टीममध्ये काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडमधील स्पर्धेत 52 बॉलमध्ये सेंच्युरी करणाऱ्या मॅकलमकडं कुणाचं फारसं लक्ष नव्हतं.

ख्रिस गेल आयपीएल स्पर्धेत उशीरा आला नसता तर त्या दिवशी गांगुलीसोबत मॅकलमला ओपनिंगला जाण्याची संधी मिळाली नसती. पण तो सर्वस्वी मॅकलमचा दिवस होता. हे नवं T20 क्रिकेट कसं असेल? हे हिट होईल का? या स्पर्धेचं वेगळेपण काय आहे? असे अनेक प्रश्न पडणाऱ्या मंडळींना मॅकलमच्या प्रत्येक सिक्सनंतर एक-एक उत्तर मिळत गेलं. मॅकलम 158 रन काढून परतला तेव्हा फक्त एका स्टारचा नाही तर जगातील सर्वात बलाढ्य T20 लीग स्पर्धेचा जन्म झाला होता. क्रिकेट हा खेळ पुढे गेला होता.

घरातच क्रिकेट

21 व्या शतकातील आक्रमक क्रिकेटपटू अशी ओळख असलेल्या ब्रँडन मॅकलमच्या घरातच क्रिकेट होते. त्याचे वडिल स्टुअर्ट आणि मोठा भाऊ नॅथन हे दोघेही फर्स्ट क्लास क्रिकेटपटू होते. विकेट किपर असलेल्या स्टुअर्टनं 75 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या. तर मोठा भाऊ नॅथन य न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमकडून वन-डे आणि T20 क्रिकेट खेळला. मॅकलम बंधू एकेकाळी न्यूझीलंडच्या टीमचा हिस्सा होते.

2000 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा सदस्य असलेल्या मॅकलमनं त्यानंतर दोन वर्षांनी सिडनी वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी 2004 साली त्यानं विकेट किपर बॅट्समन म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट खेळला.

यशस्वी विकेट किपर

ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum Birthday)  हा त्याच्या आक्रमक बॅटींगमुळेच ओळखला जातो. त्यातच त्यानं कॅप्टन झाल्यानंतर विकेट किपिंग करणे सोडले होते. त्यामुळे त्याच्या विकेट किपिंगच्या यशाची फारशी चर्चा होत नाही. मॅकलम हा न्यूझीलंडचा टेस्ट क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी विकेट किपर आहे. 168 कॅच आणि 11 स्टंपिंग असे स्टंपमागे 179 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

वन-डे क्रिकेटमध्ये तर तो न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी विकेट किपर असून 227 कॅच आणि 15 स्टंपिंग त्याच्या नावावर आहेत. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात संगकारा, गिलख्रिस्ट, धोनी, बाऊचर आणि मोईन खान या फुल टाईम विकेट किपर नंतर कारकिर्दीच्या ऐन भरात विकेट किपिंग सोडलेल्या मॅकलमचं नाव आहे. मॅकलमनं विकेट किपिंग सोडली आणि त्याच्यातील ग्राऊंड फिल्डर जगाला दिसला. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये अनेक उत्तम कॅच या मॅकलमच्या नावावर आहे. न्यूझीलंडची टीम ही उत्तम फिल्डिंगसाठी ओळखली जाते. त्यातही मॅकलमचा दर्जा हा वरचा होता.

जागतिक क्रिकेटमधील पहिला फिल्डिंग सुपरस्टार!

भारतासाठी डोकेदुखी

ब्रँडन मॅकलम सुरुवातीला टेस्ट क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर बॅटींग करत असे. पहिल्या चार वर्षात त्यानं फक्त बांगलादेश आणि झिम्बाब्वे या कमकुवत टीमविरुद्ध सेंच्युरी केली होती. हे चित्र त्याच्या करिअरमधील पाचव्या वर्षी बदललं. टीम इंडियाविरुद्ध त्यानं नेपियर टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली. मॅकलमला भारतात आणि भारताविरुद्ध खेळण्यास नेहमी आवडत असे. त्याची ही सेंच्युरी याची सुरुवात होती.

2010 साली हैदराबाद टेस्टमध्ये त्यानं मॅच वाचवणारी 225 रनची खेळी केली. त्यानंतर चार वर्षांनी ऑकलंड टेस्टमध्ये मॅकलमनं रेकॉर्ड केला. त्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची टीम 192 रनच करु शकली होती. टीम इंडियानं 438 रन काढत भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची अवस्था 5 आऊट 94 अशी झाली होती. त्यानंतर मॅकलमनं इतिहास रचला.

टेस्ट क्रिकेटमधील मॅकलमनं ज्याच्याकडं विकेट किपिंगचे ग्लोज सोपवले त्या वॅटलिंगसोबत त्यानं 6 विकेट्ससाठी 348 रनची पार्टनरशिप केली. वॅटलिंग 124 रन काढून आऊट झाला. पण तरीही मॅकलम खेळत होता. त्यानं 775 मिनिटे आणि 559 बॉलमध्ये 302 रन काढले. न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. मार्टिन क्रोची 299 रनवर आऊट होण्याची दुर्दैवी आठवण न्यूझीलंड फॅन्सच्या मनातून मागं पडली.

मॅकलम तो पर्यंत T20 क्रिकेटमधील सुपरस्टार झाला होता. पण आपण टेस्ट क्रिकेटमध्ये नांगर टाकून मॅच वाचवणारी इनिंग खेळू शकतो त्याचवेळी रनही करु शकतो हे मॅकलमनं (Brendon McCullum Birthday)  दाखवून दिलं. या खेळीनं त्यानं न्यूझीलंड क्रिकेटला पुढं नेलं.

Captain leading from the front

युद्धामध्ये आघाडीवर राहून आपल्या पलटनसाठी त्वेषानं आणि डोकं वापरुन कॅप्टन लढत असतो. मॅकलमनं हे काम क्रिकेटच्या मैदानात केलं. त्यामुळेच तो गेल्या दशकातील एक सर्वोत्तम कॅप्टन बनला.वास्तविक मॅकलमकडं 2012 साली अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये टीमची नेतृत्त्व आलं होतं.

न्यूझीलंडचे तेव्हाचे कोच माईक हेसन यांनी रॉस टेलरला (Ross Taylor) वन-डे आणि T20 टीमची कॅप्टनसी सोडून फक्त टेस्ट क्रिकेटच्या कॅप्टनसीवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना दिली होती. नाराज रॉस टेलरनं सर्वच प्रकाराच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला इतकंच नाही तर पुढील सीरिज खेळणार नसल्याचं जाहीर केलं. न्यूझीलंड क्रिकेटमधील या बिकट परिस्थितीमध्ये मॅकलम कॅप्टन बनला. त्याचे आणि रॉस टेलरचे संबंध सुरुवातीला ताणले गेले होते. पण नंतर ते सामान्य झाले. मॅकलमनं टेलरला खेळण्याचं स्वातंत्र्य दिले. कॅप्टनसीचं प्रेशर गेल्यानं टेलरची बॅटींग पुन्हा बहरली.

शोएब अख्तरचे करियर संपवणारा बॅट्समन!

मॅकलमच्या कॅप्टनसीसाठी 2014 हे वर्ष जबरदस्त यशस्वी ठरलं. त्याचवर्षी त्यानं भारताविरुद्ध ऐतिहासिक ट्रिपल सेंच्युरी झळकावली. शारजामध्ये पाकिस्तान विरुद्ध 186 बॉलमध्ये डबल सेंच्युरी झळकावली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध तो टेस्ट क्रिकेटमधील सर्वात फास्ट डबल सेंच्युरीच्या अगदी जवळ आला होता. त्या टेस्टमध्ये 136 बॉलमध्ये 195 रन काढून तो आऊट झाला. त्यामुळे त्याचा हा रेकॉर्ड हुकला.

मॅकलम कॅप्टन झाल्यानंतर (Brendon McCullum Birthday) बॅट्समन म्हणून आणखी बहरला. त्यानं कॅप्टन नसताना टेस्ट क्रिकेटमध्ये 2004 ते 12 या काळात 35.63 च्या सरासरीनं 70 टेस्टमध्ये 6 सेंच्युरी झळकावल्या होत्या. त्यानंतर पुढील चार वर्षात 31 टेस्टमध्ये 45.28 च्या सरासरीनं 6 सेंच्युरी झळकावल्या. वन-डे क्रिकेटमध्ये  29.13 च्या सरासरीनं खेळणाऱ्या मॅकलमची सरासरी कॅप्टन झाल्यावर 33.69 अशी किंचित सुधारली. पण त्याचा स्ट्राईक रेट जो पूर्वी 88.50 होता तो थेट 120.11 झाला.

मॅकलमचे रेकॉर्ड

मॅकलमनं खेळताना फास्टेट बॅटींगचे अनेक विक्रम केले. त्याने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात फास्ट हाफ सेंच्युरी 18 बॉलमध्ये पूर्ण केली. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं (25 बॉल 77 रन) वर्ल्ड कप इतिहासात अर्धशतकी खेळी करणारा मॅकलम हा एकमेव बॅट्समन आहे.

मॅकलमनं त्याच्या कारकिर्दीमधील शेवटच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 54 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात फास्ट सेंच्युरी आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स झळकावण्याचा रेकॉर्डही मॅकलमच्या नावावर आहे. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणापासून सलग 100 टेस्ट खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू  (Brendon McCullum Birthday) आहे.

युनिवर्स बॉस’ ची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

T20 क्रिकेटमध्ये धमाका

मॅकलम क्रिकेट विश्वात सुपरस्टार झाला तो T20 क्रिकेटमुळे. आयपीएलमधील त्याच्या 158 रनच्या खेळीचा उल्लेख लेखाच्या सुरूवातीला झालाच आहे. त्यानंतर सात वर्षांनी इंग्लंडमध्ये बर्मिंगहमकडून खेळताना पुन्हा एकदा T20 क्रिकेटमध्ये 158  रनची खेळी केली. त्यानं 2008 साली हे रन काढण्यासाठी 73 बॉल घेतले होते. त्यानं 2015 साली 64 बॉल घेतले.

आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 2 सेंच्युरी आणि 2 हजार रन करणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर  तो रिटायर झाला तेव्हा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स त्याच्याच नावावर होते. न्यूझीलंडसह भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील T20 लीगमध्ये तो खेळला. त्या लीगही त्यानं आक्रमक बॅटींग आणि कॅप्टनसीच्या जोरावर गाजवल्या.

वर्ल्ड कप हिरो

मॅकलमच्या कॅप्टनसीखालीच 2015 साली न्यूझीलंडची टीम पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2015) गेली. मॅकलमनं त्या वर्ल्ड कपमध्ये 9 मॅचमध्ये 4 हाफ सेंच्युरीसह 310 रन काढले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट होता 188.50!  त्यानं इंग्लंड विरुद्ध 25 बॉलमध्ये 77 रनची खेळी केली. तर पावसाचा अडथळा आलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला 43 ओव्हर्समध्ये 298 रन हवे होते. त्यावेळी मॅकलमनं 26 बॉलमध्ये 59 रनची खेळी करत विजयाचा पाया रचला.

मॅकलमनं संपूर्ण न्यूझीलंड टीमला आक्रमक बनवलं. आक्रमक क्रिकेट खेळत त्यांनी वर्ल्ड कप फायनल गाठली. पण याच आक्रमकतेनं त्याचा फायनलमध्ये घात केला. मिचेल स्टार्कचा बॉल पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात तो शून्यावर आऊट झाला. त्या धक्क्यातून न्यूझीलंडची टीम पुढे सावरलीच नाही. ‘एखाद्या बॉलवर फटका मारण्यापूर्वी तो बॉल नीट पाहिला पाहिजे, हे क्रिकेटमधील सर्वात बेसिक तत्व मी विसरलो होतो.’ अशी कबुली मॅकलमनं दिली.

मॅकग्राची उंची, ब्रेट ली चा वेग आणि अक्रमचा स्विंग!

2015 च्या वर्ल्ड कपनंतर त्याच वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. त्यानंतर काही वर्ष तो जगभर T20 लीगमध्ये खेळत होता. आता तो T20 टीमचा कोच आहे. त्या टीमच्या खेळाडूंनाही आक्रमक फटकेबाजी करत स्वत:ला सिद्ध करण्याचे स्वातंत्र्य तो देतो. खेळाडू आणि कॅप्टननंतर आता कोच म्हणूनही मॅकलम (Brendon McCullum Birthday)  क्रिकेटला पुढे नेत आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading