
गौतम या शब्दाचा एक अर्थ अंधार दूर करणारा असा आहे. गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटसाठी तेच केलं. अंधाऱ्या प्रवासात हातामध्ये टॉर्च घेऊन त्यानं भारतीय क्रिकेटला नेहमी प्रकाशात ठेवलं. 2007 च्या वर्ल्ड कपनंतर खचलेल्या भारतीय क्रिकेटला लगेच काही महिन्यात T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. वन-डे वर्ल्ड कप विजेतेपदाचा अंधार 28 वर्षांनी दूर केला. टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्यानं रन काढले. ओपनिंग जोडीचा प्रश्न सोडवला. भारतीय क्रिकेटसाठी नेहमी सर्वस्व ओतणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस (Gautam Gambhir Birthday) आहे. आजच्याच दिवशी (14 ऑक्टोबर 1981) रोजी गंभीरचा जन्म झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
दिल्लीकर गौतम गंभीरनं 1999-2000 च्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्या वर्षी बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीची (NCA) स्थापना झाली. त्यामध्ये प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या बॅचच्या खेळाडूंमध्ये गंभीरचा समावेश होता. गंभीरच्या कारकिर्दीमधील वळण 2002 साली मिळालं.
गंभीरनं त्यावर्षी अध्यक्षीय टीमकडून खेळताना झिम्बाब्वे विरुद्ध 218 रन काढले. या खेळीनं निवड समितीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. 2003 साली त्याची टीम इंडियात निवड झाली. बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये गंभीर 71 रनची खेळी करत ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला. गंभीरला पुढच्या वर्षी मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अवघ्या तीन दिवसांमध्ये संपलेल्या त्या टेस्टमध्ये गंभीरनं पहिल्या इनिंगमध्ये 3 तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 1 रन काढले.
In-Out, In- Out! दिनेश कार्तिकच्या करियरची गोलाकार गोष्ट
रिटायरमेंटचा विचार
गौतम गंभीरनं (Gautam Gambhir Birthday) दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 96 रन काढले. चौथ्या टेस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध सेंच्युरी झळकावली. त्यानंतरचं वर्ष त्याच्यासाठी साधारण ठरलं. त्यामुळे तो टीमच्या बाहेर गेला. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर रन करत टीममध्ये कमबॅक केलं. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप टीममध्ये (Cricket World Cup 2007) निवड होण्याची त्याला अपेक्षा होती. पण निवड समितीनं त्याच्या जागी त्या काळात काही चांगल्या वन-डे इनिंग खेळलेल्या रॉबिन उथप्पाला संधी दिली.
वर्ल्ड कप टीममध्ये संधी न मिळाल्यानं गंभीर निराश झाला होता. त्यावेळी तो क्रिकेटमधून रिटायर होण्याच्या विचारात होता. रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरुन तो मागं फिरला. वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर लगेच बांगलादेश विरुद्ध झालेल्या वन-डेमध्ये त्यांनं सेंच्युरी झळकावली. त्याचवर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पहिल्या T20 वर्ल्ड कपसाठी त्याची निवड झाली.
टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देणारे वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात?
वर्ल्ड कपमध्ये बेस्ट
दक्षिण आफ्रिकेतील T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) गंभीरच्या कारकिर्दीमधील टर्निंग पॉईंट ठरला. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 7 मॅचमध्ये 37.83 च्या सरासरीनं 227 रन काढले. तो भारताकडून सर्वाधिक रन करणारा बॅटर होता. पाकिस्तान विरुद्धच्या हाय प्रेशर फायनलमध्ये त्यानं 54 बॉलमध्ये 75 रनची खेळी केली. गंभीरच्या या खेळीनंच टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा पाया रचला.
गंभीरचा वर्ल्ड कपमधील फॉर्म 2011 च्या वर्ल्ड कपमध्येही (Cricket World Cup 2011) कायम होता. सचिन-सेहवाग ही सिनिअर जोडी ओपनिंगला असल्यानं तो संपूर्ण वर्ल्ड कप तीन नंबरवर खेळला. त्यानं 9 मॅचमध्ये 43.66 च्या सरासरीनं 393 रन काढले. तो वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या बॅटरच्या यादीत सहाव्या तर भारताकडून सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा खेळाडू होता.
गंभीर त्याच्या कारकीर्दीमधील बेस्ट इनिंग (Gautam Gambhir Birthday) वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला. श्रीलंकेविरुद्ध 275 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात धक्कादायक झाली. दुसऱ्याच बॉलवर वीरेंद्र सेहवाग आऊट झाला. त्यामुळे गंभीरला पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटींगला उतरावं लागलं. त्यानंतर सचिनही आऊट झाल्यानं भारताची अवस्था 2 आऊट 31 झाली होती.
गंभीरनं या अवघड परिस्थितीमध्ये टीम इंडियाला सावरलं. पहिल्यांदा विराट कोहली (Virat Kohli) आणि नंतर महेंद्रसिंह धोनीसोबत (MS Dhoni) वर्ल्ड कप जिंकून देणारी पार्टनरशिप केली. वर्ल्ड कप फायनलमधील त्याची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. पण तो आऊट झाला तेव्हा भारत 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकणार हे स्पष्ट झाले होते.
गोल्डन पॅच
2008 ते 2011 हा गंभीरच्या कारकिर्दीमधील गोल्डन पॅच होता. ऑस्ट्रेलियात 2008 साली झालेल्या तिरंगी मालिकेत सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा यासारख्या दिग्गजांना मागं टाकत गंभीरनं सर्वात जास्त रन केले.
2004 साली पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावलेल्या गंभीरला दुसऱ्या टेस्ट सेंच्युरीसाठी 4 वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर फक्त 9 दिवसांमध्ये त्यानं पुढील सेंच्युरी झळकावली. गंभीरनं 13 टेस्टमध्ये 8 सेंच्युरी झळकावल्या. यापैकी 5 सलग होत्या. या काळात त्यानं सलग 11 इनिंगमध्ये 50 रनचा टप्पा पार केला.
गंभीर त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधील सर्वोत्तम इनिंग न्यूझीलंड विरुद्ध नेपियरमध्ये खेळला. जेस्सी रायडरच्या डबल सेंच्युरीमुळे न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगमध्ये 619 रन केले. टीम इंडियावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर गंभीर तब्बल 10 तास 43 मिनिटं मैदानावर ठाण मांडून होता. त्यानं 436 बॉलचा सामना करत 137 रन काढले. गंभीरच्या या मॅरेथॉन इनिंगमुळेच टीम इंडियाला ती टेस्ट वाचवता आली.
पडता काळ
गौतम गंभीर (Gautam Gambhir Birthday) हे नाव 2011 साली महेंद्रसिंह धोनीच्या बरोबरीनं घेतलं जात होतं. टीम इंडियातील दिग्गज रिटायरमेंटला झुकलेले होते. त्यामुळे गंभीरकडंच टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जात होतं. पण, याच काळात गंभीरचा आंतरष्ट्रीय क्रिकेटमधील फॉर्म घसरला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव झाला. या दोन्ही सीरिजमध्ये तो फेल गेला. त्यानंतर 2012 साली त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले.
2014 साली इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड झाली. पण तिथं 4 इनिंगमध्ये त्यानं फक्त 25 रन काढले. त्यामुळे त्याला पुन्हा टीममधून वगळण्यात आले. शिखर धवन आणि मुरली विजय या नव्या दमाच्या खेळाडूंमुळे त्याला टेस्ट टीममधून जागा गमावावी लागली. T20 टीममधून 2012 साली तर वन-डे टीममधून त्याला 2013 साली वगळण्यात आले होते.
दुलिप ट्रॉफीतील काही चांगल्या खेळीमुळे गंभीर 2016 साली पुन्हा एकदा अतिरिक्त ओपनर म्हणून टीममध्ये परतला, पण त्याला फारशी कमाल करता आली नाही. त्यानंतर 2018 साली त्यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली.
यशस्वी आयपीएल कॅप्टन
गौतम गंभीर आयपीएलचे पहिले 3 सिझन दिल्लीकडून होता. दिल्लीकडून चांगली कामगिरी केल्यानंतरही 2011 साली त्याला दिल्लीनं करारमुक्त केलं. त्यानंतर 2011 साली त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं मोठी किंमत देऊन करारबद्ध केलं. टीमचा कॅप्टन केलं.
आयपीएलमधील विस्कळीत टीम असलेल्या कोलकाताचं गंभीरनं (Gautam Gambhir Birthday) लढाऊ टीममध्ये रुपांतर केलं. स्वत: आघाडीवर राहून टीमचं नेतृत्त्व केलं. कोलकाताच्या पिचचा कल्पकतेनं वापर केला. खेळाडूंच्या नावावर नाही तर त्यांची क्षमता ओळखून त्यानं टीम बांधली. रॉबिन उथप्पा, मनिष पांडे, पियूष चावला, उमेश यादव, रजत भाटीया सूनिल नरीन, आंद्रे रसेल या सर्वांनी गंभीरच्या काळात चांगली कामगिरी केली. जॅक कॅलिस, मॉर्ने मॉर्कल या आंतरराष्ट्रीय स्टार्सकडून चांगला खेळ करुन घेतला.
स्वत: गंभीर सध्याच्या केकेआरच्या कॅप्टन प्रमाणे फक्त मिरवला नाही, तर त्यानं आघाडीवर राहून टीमसाठी सातत्यानं रन काढले. तो विकेट मिळवण्यासाठी चाली रचणारा तशी परिस्थिती निर्माण करणारा कॅप्टन होता. कॅप्टन कोण होणार हे बोर्ड रूममध्ये ठरु शकतं. पण नेता हा जन्मावा लागतो. गंभीर हा तसा नेता होता. धोनीला आऊट करण्यासाठी टेस्ट क्रिकेटसाठी लावलेली फिल्डिंग हे गंभीरच्या हुशार कॅप्टनसीचं लक्षण होतं.
भारताचा बेस्ट आणि जगातील ‘ऑल टाईम ग्रेट’
Unsung Hero
गंभीर टीम इंडियासाठी नेहमीच आघाडीवर राहून खेळ केला. पण त्याला त्याचं क्रेडिट फारसं मिळालं नाही. 2007 च्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यानं सर्वात जास्त 75 रन काढले. त्याच्या खेळीपेक्षा ‘मॅन ऑफ द मॅच’ इरफान पठाणची बॉलिंग आणि जोगिंदर शर्माची शेवटची ओव्हर जास्त लक्षात आहे. 2011 च्या फायनलमध्ये टीम इंडियाची फसलेली गाडी त्यानं बाहेर काढली. सर्वात जास्त 97 रन काढले. पण धोनीच्या खेळीला आजही जास्त क्रेडिट मिळते.
भारतीय टेस्ट क्रिकेटला वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) नवी ओळख दिली. सेहवागच्या आक्रमक खेळाची आठवण आजही काढली जाते. गंभीरनं सेहवागला भक्कम साथ देत त्याच्या बरोबरीनं रन काढले. या जोडीनं 87 इनिंगमध्ये 4412 रन काढले. टेस्टमध्ये 4 हजार पेक्षा जास्त रन एकत्र काढणाऱ्या ओपनिंग जोडीमध्ये गंभीर-सेहवाग जोडीची सरासरी सर्वात जास्त आहे. समोरच्या एका भन्नाट खेळीमध्ये गंभीरची इनिंग झाकली जात असे.
वर्ल्ड कप विजेतेपदाचा पाया रचणारा जगातील सर्वात आक्रमक बॅट्समन
वीरेंद्र सेहवागनं गंभीरचं वर्णन टेस्ट क्रिकेटमधील टीम इंडियाचा सुनील गावसकर यांच्यानंतरचा बेस्ट ओपनर असं केलं आहे. गंभीर भरात होता तेव्हा त्याच्या खेळीत सेहवागची आक्रमकता होती. सचिनचं सातत्य होतं. द्रविड आणि लक्ष्मण सारखी चिकाटी होती. पण निर्णायक क्षणी, सर्वात मोठ्या मॅचमध्ये आणि टीम इंडियाला सर्वाधिक गरज असताना खेळ उंचावण्याची क्षमता ही गंभीरकडंच होती. त्यानं खेळ उंचावल्यामुळेच टीम इंडियाला एक नाही तर दोन वर्ल्ड कप जिंकता आले. गंभीरचं भारतीय क्रिकेटमधील हे योगदान (Gautam Gambhir Birthday) कधीही विसरता येणार नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.