फोटो – ट्विटर

ब्रेट ली आणि शोएब अख्तर प्रमाणे त्याच्या वेगाची कधी ‘हवा’ झाली नाही. त्यानं इतर फास्ट बॉलर्स प्रमाणे बॅट्समनला कधीही खून्नस दिलं नाही. उलट तो टीममधील सर्वात सभ्य खेळाडूंपैकी एक होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला सिनिअर बॉलर्समुळे आणि नंतरच्या टप्प्यात दुखापतीमुळे तो बराच काळ टीम बाहेर होता. तरीही आजही तो वन-डे क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा यशस्वी बॉलर असून 300 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव भारतीय फास्ट बॉलर आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला त्यानं त्यांच्याच वेगाचं औषध पाजलं. म्हैसूर एक्स्प्रेस (Mysore Express)  म्हणून प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा आज वाढदिवस (Javagal Srinath Birthday) आहे. आजच्याच दिवशी (31 ऑगस्ट 1969) रोजी श्रीनाथचा जन्म झाला.

भारताबाहेर यशस्वी सुरूवात

टीम इंडिया 1991-92 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. टेस्ट आणि तिरंगी मालिकेचे सँडविच असलेल्या त्या सीरिजमध्ये श्रीनाथनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ब्रिस्बेनमध्ये तो पहिली टेस्ट खेळला. त्यानं पहिल्या टेस्टमध्ये 3 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

त्यानंतर पर्थमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या वन-डेमध्ये टीम इंडिया 126 रनवर ऑल आऊट झाली होती. श्रीनाथ त्यापूर्वी भारतीय उपखंडात मोजक्याच वन-डे मॅच खेळला होता. भारताला वेस्ट इंडिजला रोखण्यासाठी विकेट्सची आवश्यकता होती. श्रीनाथनं मोक्याच्या क्षणी कार्ल हुपर आणि किथ आथरटन यांना आऊट केलं. त्यानं 10 ओव्हर्समध्ये फक्त 27 रन देत ती मॅच टाय करण्यात योगदान दिले.

श्रीनाथकडं सुरुवातीपासूनच कपिल देवचा (Kapil Dev) वारस म्हणून पाहिले गेले. तो विदेशातील पिचवर टीम इंडियाचा तिसरा फास्ट बॉलर होता. पण भारतीय पिचवर कपिल देव आणि मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) या दोन सिनिअर बॉलर्समुळे त्याला जागा नव्हती. त्यामुळे तो भारतामध्ये पहिली टेस्ट त्याच्या पदार्पणानंतर अडीच वर्षांनी 1994 साली कपिल रिटायर झाल्यानंतर खेळला.

असं असलं तरी, कपिल देवच्या मावळतीच्या काळात तो भारताबाहेर टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा आधार होता. 1992 साली दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम पहिल्यांदा गेली होती. त्यावेळी केपटाऊन टेस्टमध्ये केपलर वेसल्स, हडसन, हॅन्सी क्रोनिए आणि डॅरेल कुलीलन ही दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डर त्यानं परत पाठवली होती. त्या इनिंगमध्ये श्रीनाथच्या बॉलिंगचं विश्लेषण होतं 27 ओव्हर्स 10 मेडन 33 रन आणि 4 विकेट्स !

इशांत शर्मा @ 100 : ‘वो तो है अलबेला, हजारों में अकेला’!

दक्षिण आफ्रिकेची वाताहत

दक्षिण आफ्रिकेची टीम 1996 साली भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी क्रिकेट विश्वातील एक बलाढ्य टीम म्हणून ती प्रस्थापित झाली होती. त्यांच्या टीममध्ये 4 तगडे फास्ट बॉलर्स होते. असं असलं तरी अहमदाबादची पहिली टेस्ट श्रीनाथच्या फास्ट बॉलिंगनं गाजली.

चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 170 रनची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेकडं वेळ खूप होता. भारताला 10 झटपट विकेट्सची गरज होती. श्रीनाथनं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. त्या धक्क्यातून सावरत दक्षिण आफ्रिकेनं 4 आऊट 96 पर्यंत मजल मारली. त्यानंतर श्रीनाथनं आणखी 4 विकेट्स घेत आफ्रिकेला 105 रनवर ऑल आऊट केले.

भारतानं टेस्ट क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या पहिल्या विजयाचा श्रीनाथ (Javagal Srinath Birthday) हिरो होता. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये 21 रन देऊन 6 विकेट्स घेतल्या. त्या इनिंगमंध्ये तीन वेळा त्यानं सलग दोन बॉलवर विकेट्स घेतल्या होत्या.

भारतीय पिचवरही प्रभावी

श्रीनाथ अस्सल फास्ट बॉलर असला तरी विदेशातील पिच प्रमाणेच भारतीय पिचवरही तितकाच प्रभावी होता. त्याची भारतामधील सरासरी (26.61) ही विदेशातील सरासरीपेक्षा (33. 76) 7 ने कमी आहे. त्यानं विदेशात आणि मायदेशात दोन्ही ठिकाणी एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी प्रत्येकी 5 वेळा केली आहे.

श्रीनाथनं त्याच्या टेस्ट करिअरमधील सर्वोत्तम कामगिरीही मायदेशातच केली. पाकिस्तान विरुद्ध कोलकातामध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 5 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 8 अशा एकूण 13 विकेट्स घेतल्या. पण सईद अन्वरचे (Saeed Anwar) नाबाद 188 रन्स आणि बॅट्समननं केलेली निराशा यामुळे तो टीम इंडियाचा पराभव टाळू शकला नाही.

श्रीनाथच्या प्रभावी बॉलिंगला दुसऱ्या बाजूनं साथ न मिळल्यानं त्यानं भेदक स्पेल करुनही भारताला टेस्टमध्ये विजय मिळाले नाहीत. श्रीनाथनं एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी 10 वेळा केली. त्यापैकी फक्त 2 वेळाच टीम इंडियाला विजय मिळाला आहे.

पाकिस्तानला 0 रनमध्ये 5 विकेट्सचा ‘प्रसाद’ देणारा बॉलर!    

सच्चा मित्र

जवागल श्रीनाथ (Javagal Srinath Birthday) हा टीमसाठी 100 टक्के योगदान देणारा खेळाडू होता. त्यानं बॉलिंग किंवा पिंच हिटर म्हणून नेहमीच टीमसाठी पूर्ण योगदान दिले. पाकिस्तान विरुद्ध दिल्ली टेस्टमध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याच्या ऐतिहासिक विक्रमाच्या जवळ होता. त्यावेळी श्रीनाथनं शेवटच्या जोडीला जाणीवपूर्वक स्वैर बॉलिंग केली. श्रीनाथमधील सच्चा मित्रानं अनिल कुंबळेला केलेली ती मदत होती. श्रीनाथच्या या मदतीमुळेच कुंबळेला तो रेकॉर्ड करता आला.

पिंच हिटर आणि बंगळुरुतील पराक्रम

जवागल श्रीनाथचा 1990 च्या दशकात एक पिंच हिटर म्हणूनही टीम इंडियानं वन-डे क्रिकेटमध्ये वापर केला. त्यानं टेस्टमध्ये 4 तर वन-डेमध्ये एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1996 साली बंगळुरुमध्ये झालेल्या टायटन कपच्या वन-डे मॅचमध्ये त्यानं अनिल कुंबळेसोबत केलेली पार्टनरशिप कुणीही विसरु शकणार नाही.

बंगळुरुतील त्या मॅचमध्ये 11 पैकी 6 जण हे स्थानिक खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाच्या 216 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था 8 आऊट 164 झाली होती. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 88 रनवर आऊट झाल्यानंतर बहुतेक प्रेक्षकांनी भारत जिंकण्याची आशा सोडली होती. त्यावेळी श्रीनाथ आणि कुंबळे ही स्थानिक जोडी एकत्र आली.

या दोघांनी शांतपणे एकेरी दुहेरी रन करत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. त्यानंतर मैदानात सेट झाल्यानंतर श्रीनाथनं फटकेबाजी केली. श्रीनाथ – कुंबळे जोडीनं 9 व्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 52 रनच्या पार्टनरशिपमुळे भारताने तो विजय खेचून आणला. त्या विजयात श्रीनाथचे (Javagal Srinath Birthday) योगदान 23 बॉलमध्ये नाबाद 30 रन असे होते.

वन-डेमधील श्रीनाथ

जवागल श्रीनाथ हा टेस्ट प्रमाणेच वन-डेमध्येही यशस्वी झालेला भारतीय बॉलर आहे. तो वन-डे क्रिकेटमध्ये आजही सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय फास्ट बॉलर आहे. त्याचबरोबर एका इनिंगमध्ये सर्वाधिक वेळा 5 किंवा जास्त विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सच्या यादीत श्रीनाथ हरभजन सिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो अनिल कुंबळे नंतरचा दुसरा भारतीय बॉलर आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्यानं 18 विकेट्स घेतल्या होत्या. द्विपक्षीय वन-डे सीरिजमध्ये कोणत्याही भारतीय बॉलर्सनं घेतलेल्या त्या सर्वाधिक विकेट्स होत्या. त्याचा रेकॉर्ड नंतर अमित मिश्रानं (Amit Mishra) झिम्बाब्वे विरुद्ध मोडला.

श्रीनाथनं 2002 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली होती. पण तेव्हाचा टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) आग्रहामुळे त्यानं वन-डे क्रिकेटमधील रिटायरमेंट 2003 च्या वर्ल्ड कपपर्यंत (Cricket World Cup 2003) लांबवली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये श्रीनाथनं 16 विकेट्स घेतल्या. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय बॉलर्सनी केलेल्या कामगिरीमुळेच टीम इंडियानं 1983 नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठली.

‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’

श्रीनाथ (Javagal Srinath Birthday) 2003 च्या वर्ल्ड कपनंतर रिटायर झाला. पण त्यानं क्रिकेटमधील योगदान बंद केलं नाही. तो कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा (KCA) काही काळ सचिव होता. तसेच सध्या तो आयसीसीचा सामनाधिकारी म्हणून काम करतो.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: