फोटो – ट्विटर, ICC

त्याचे बॅटींगचे तंत्र हे क्रिकेटमधील सर्व पुस्तकांना फाट्यावर मारणारे होते. त्याचा खेळ आकर्षक नव्हता. त्यामुळे त्याचा दराराही अनेकांना सुरुवातीला वाटत नसे. हा एकाबाजूला उभा राहिल, फार काही करणार नाही, अशी त्याच्याबद्दलची समजूत होती. त्यांना त्याचा धोका समजेपर्यंत उशीर होई. ब्रायन लाराच्या सावलीत त्याच्याकडं पटकन लक्ष जायचं नाही. पण, लाराच्या बरोबरीनं त्यानं रन काढले आहेत. मैदानात घोरपडीप्रमाणे चिकटून बॅटींग करणे हा त्याचा स्वभाव होता. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पडझडीत, लारा रिटायर झाल्यानंतर, खेळाडू आणि बोर्डाशी कराराचे वाद सुरू असताना प्रत्येक वेळी तो त्यांच्या टीमचा दीपस्तंभ होता. वेस्ट इंडिजचा मिस्टर डिपेंडेबल शिवनायरण चंद्रपॉलचा आज वाढदिवस (Shivnarine Chanderpaul Birthday) आहे. आजच्याच दिवशी (16 ऑगस्ट 1974) चंद्रपॉलचा जन्म झाला.

चंद्रपॉलची आकडेवारी

वेस्ट इंडिज क्रिकेटमधील दुर्लक्षित सुपरस्टार म्हणून चंद्रपॉलची नोंद आहे. त्याला रिचर्ड्स, ब्रायन लारा, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड याप्रमाणे कधीही सुपरस्टारचा दर्जा मिळाला नाही. पण त्याची आकडेवारी त्याच्यातील महानतेची साक्ष देतात.

चंद्रपॉलने 164 टेस्टमध्ये 51.37 च्या सरासरीनं 11867 रन काढले आहेत. यामध्ये 30 सेंच्युरी आणि 66 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीमध्ये सध्या तो आठव्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सलग सात हाफ सेंच्युरी लगावणाऱ्या तीन बॅट्समनपैकी तो एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1051 बॉल आणि सर्वाधिक 1,513 मिनिटे आऊट न होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये सलग दोन वर्ष (2007 आणि 2008) 500 पेक्षा जास्त रन आणि 100 पेक्षा जास्त सरासरी असलेला तो डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा दुसराच बॅट्समन (Shivnarine Chanderpaul Birthday) आहे. संथ खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपॉलनं एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये फक्त 69 बॉलमध्ये सेंच्युरी लगावली आहे. त्याचबरोबर सर्वाधिक टेस्ट हरणाऱ्या टीममध्ये खेळण्याचा दुर्दैवी रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे.

सुरुवातीची कारकिर्द

गयानातील चंद्रपॉलचे रोहन कन्हाय आणि अल्वीन कालीचरण हे दोन आयडॉल. 1991-92 मध्ये त्यानं गयानाकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये 90 रनची खेळी केल्यानंतर तो टीमचा नियमित सदस्य बनला. 1993 साली पाकिस्तान विरुद्धच्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये वेस्ट इंडिज बोर्ड XI कडून त्यानं 168 रनची खेळी केली. या खेळीमुळे 1994 साली इंग्लंड विरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली.

सेंच्युरीची प्रतीक्षा

चंद्रपॉलनं 1994 साली इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या टेस्टमध्ये 62 दुसऱ्या टेस्टमध्ये 50 रनची खेळी केल्यानंतर किंग्स्टन ओव्हलवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये तो पहिल्यांदा टिपकल चंद्रपॉल इनिंग खेळला. या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजची अवस्था 4 आऊट 95 अशी होती तेव्हा तो मैदानात आला. ती लवकरच 7 आऊट 135 अशी खालावली. त्यानंतर अ‍ॅम्ब्रोजसोबत 71 आणि बेंजामिन सोबत 58 रनची त्यानं पार्टनरशिप केली. त्या इनिंगमध्ये चंद्रपॉलनं 231 बॉलमध्ये 77 रन काढले. वेस्ट इंडिजनं ती टेस्ट गमावली. पुढे वेस्ट इंडिजच्या पराभूत टेस्टमध्ये चंद्रपॉलचा एकाकी संघर्ष हा त्याच्या क्रिकेट करिअरचा अविभाज्य भाग बनला.

ब्रायन लारा (Brian Lara) गॅरी सोबर्सचा रेकॉर्ड मोडला त्यावेळी चंद्रपॉल नॉन स्ट्राईकरला होता. त्याच्या जोडीनं लारानं 219 रन काढले. लारा 375 रन काढून आऊट झाल्यानंतर वॉल्शनं वेस्ट इंडिजची इनिंग घोषित केली. त्यावेळी चंद्रपॉल 75 रनवर नाबाद होता. सुरुवातीच्या टेस्टमध्ये हाफ सेंच्युरीचं सेंच्युरीमध्ये रुपांतर करणे त्याला जमत नव्हते. या काळात त्यानं टेस्ट टीममधून जागा देखील गमावली. त्यावेळी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भरपूर रन करत तो पुन्हा टीममध्ये परतला.

जिनिअस शब्दही ज्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे असा ब्रायन लारा!

अखेर त्याच्या कारकिर्दीमधील 19 व्या टेस्टमध्ये 13 हाफ सेंच्युरीनंतर चंद्रपॉलनं पहिली सेंच्युरी झळकावली. भारताविरुद्ध किंग्स्टन ओव्हलच्या आव्हानात्मक पिचवर त्याने नाबाद 137 रन काढले. भारताविरुद्ध पहिली टेस्ट सेंच्युरी करणाऱ्या चंद्रपॉलनं (Shivnarine Chanderpaul Birthday) पुढं नेहमीच भारतीय बॉलर्सना त्रास दिला.

टीम इंडियाची डोकेदुखी

नव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षात 2002 साली भारतीय टीम वेस्ट इंडिजमध्ये गेली होती. त्या टेस्ट सीरिजमध्ये चंद्रपॉलनं भारतीय बॉलर्सच्या तोंडाला फेस आणला. याच सीरिजमध्ये त्यानं लेखामध्ये यापूर्वी उल्लेख केलेला सर्वाधिक बॉल आणि सर्वाधिक मिनिटे आऊट न होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.

चंद्रपॉलने भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये तीन सेंच्युरीसह 140.50 सेंच्युरीसह 562 रन केले. वेस्ट इंडिजने ती सीरिज 2-1 ने जिंकली. पुढील वर्षी भारतामध्ये झालेली टेस्ट सीरिज वेस्ट इंडिजनं 0-2 नं गमावली. पण त्या सीरिजमध्येही त्यानं 65 च्या सरासरीनं 260 रन केले. त्यानं सेंच्युरी झळकावत कोलकाता टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव टाळला. चंद्रपॉलनं भारताविरुद्ध 25 टेस्टमध्ये 63.85 च्या सरासरीनं 2171 रन केले. यामध्ये 7 सेंच्युरींचा समावेश आहे. अन्य कोणत्याही देशापेक्षा त्यानं भारताविरुद्ध सर्वात जास्त सेंच्युरी लगावल्या आहेत.

69 बॉलमध्ये सेंच्युरी

ऑस्ट्रेलियाची टीम स्टीव्ह वॉच्या (Steve Waugh) नेतृत्त्वाखाली 2003 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. त्या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजची अवस्था 5 आऊट 50 अशी झाली होती. त्यावेळी चंद्रपॉलनं ऑस्ट्रेलियन टीमवर जोरदार प्रतिहल्ला केला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्सची धुलाई करत फक्त 69 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. ही तेंव्हा टेस्ट क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची जलद सेंच्युरी होती. चंद्रपॉलच्या (Shivnarine Chanderpaul Birthday) या खेळीनंतरही वेस्ट इंडिजचा त्या टेस्टमध्ये 9 विकेट्सनं पराभव झाला.

चार टेस्टच्या त्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली होती. चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी 418 रनचं लक्ष्य होतं. वेस्ट इंडिजची अवस्था 4 आऊट 165 झाली असताना चंद्रपॉलने रामनरेश सरवान (Ramnaresh Sarwan) सोबत भागिदारी करत वेस्ट इंडिजच्या विजयाचा मार्ग तयार केला. वेस्ट इंडिजनं 418 रनचं आव्हान यशस्वी पूर्ण केलं. त्यामध्ये चंद्रपॉलचा 104 रनचा वाटा होता.

लॉर्ड्सवरील झुंज

इंग्लंड विरुद्ध 2004 साली लॉर्ड्सवर झालेली टेस्ट चंद्रपॉलच्या झुंजार खेळीमुळे लक्षात आहे. इंग्लंडच्या 568 रनला उत्तर देताना वेस्ट इंडिजची अवस्था 4 आऊट 139 अशी नाजूक होती. पण ही परिस्थिती चंद्रपॉलसाठी नेहमीची होती. त्यानं त्यानंतर एक बाजू लावून धरत 270 बॉलमध्ये नाबाद 127 रन काढले. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजला पहिल्या इनिंगमध्ये 416 रन करता आले.

दुसऱ्या इनिंगमध्ये मायकल वॉनच्या आणखी एक सेंच्युरीमुळे इंग्लंडनं वेस्ट इंडिजला विजयासाठी 478 रनचं टार्गेट दिलं. त्यानंतर चंद्रपॉलनं पुन्हा एकदा पाचव्या दिवशी नेटानं किल्ला लढवला. त्यानं 231 मिनिटं तळ ठोकत नाबाद 97 रन काढले. तळाच्या बॅट्समनच्या मदतीनं वेस्ट इंडिजचा पराभव लांबवला. फास्ट बॉलर्सचे वार अंगावर झेलले. पण तरीही त्याला टीमचा मोठा पराभव टाळता आला नाही.

कॅप्टन चंद्रपॉल

वेस्ट इंडिजच्या टीममधील ब्रायन लारासह 7 प्रमुख जणांचा स्पॉनरशिपच्या मुद्यावरुन 2005 साली बोर्डाशी वाद झाला. वेस्ट इंडिज बोर्डानं त्या सर्वांची हकालपट्टी करत चंद्रपॉलची (Shivnarine Chanderpaul Birthday) कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. कॅप्टन म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी केली. हा रेकॉर्ड करणारा तो पहिला वेस्ट इंडियन कॅप्टन होता. चंद्रपॉल इतक्यावरच थांबला नाही त्यानं त्या टेस्टमध्ये नाबाद 203 रन काढले. कॅप्टन म्हणून पहिल्याच टेस्टमध्ये डबल सेंच्युरी करणारा चंद्रपॉल हा दुसराच क्रिकेटपटू ठरला.

हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला, मॅकग्राला भिडला आणि बोर्डाशी भांडला!  

ब्रायन लारा आणि कंपनी पुढील टेस्टमध्ये परतली. संपूर्ण सीरिजमध्ये कॅप्टन चंद्रपॉलनं 2 सेंच्युरीसह 450 रन काढले. तरीही वेस्ट इंडिजनं ती सीरिज 0-2 या फरकानं गमावली. त्यानंतर काही महिन्यांमध्ये त्याने बॅटींगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनसी सोडली. चंद्रपॉल एक वर्षापेक्षा कमी काळ वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता.

जबरदस्त फॉर्मची वर्ष

चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul Birthday) 2007 आणि 2008  या वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये होता. भारताविरुद्धच्या नागपूर वन-डेमध्ये 339 रनचा पाठलाग करण्यासाठी चंद्रपॉल ख्रिस गेलसह (Chris Gayle) ओपनिंगला उतरला. या दोघांनी 80 रनची आक्रमक पार्टनरशिप केली. गेल आऊट झाल्यानंतरही चंद्रपॉल खेळत होता. त्यानं एका बाजूनं भारतीय बॉलर्सची धुलाई करत नाबाद 149 रन काढले. पण, दुसऱ्या बाजूनं भक्कम साथ न मिळल्यानं वेस्ट इंडिजचा 14 रननं पराभव झाला.

त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चंद्रपॉलनं 148.67 च्या सरासरीनं 446 रन काढले. चंद्रपॉलच्या या जबरस्त फॉर्मनंतरही वेस्ट इंडिजनं ती सीरिज 0-3 नं गमावली. चंद्रपॉलचा त्या वर्षी ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

श्रीलंकेविरुद्ध 2008 साली झालेल्या वन-डेमध्या चामिंडा वासच्या शेवटच्या दोन बॉलमध्ये त्यानं 10 रन काढत टीमला विजय मिळवून दिला. त्यानंतर पुढील 9 टेस्ट इनिंगमध्ये त्यानं 8 वेळा 50 चा टप्पा ओलांडला. त्यावर्षी चंद्रपॉलचा आयसीसीनं ‘प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारानं सन्मान केला.

दुर्दैवी शेवट

2007 साली पहिला T20 वर्ल्ड कप झाला. त्यानंतर पुढील वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेनं मारधाड क्रिकेटची लोकप्रियता वाढली. त्या काळातही चंद्रपॉल टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा नेहमीचा खेळ करत होता. तो टीमची गरज होता. सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar)  2013 साली मुंबईत 200 वी टेस्ट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. ती चंद्रपॉलची 150 वी टेस्ट होती.

6 मार्च 2013 या दिवशी वेस्ट इंडिजमधील फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चंद्रपॉल त्याच्या मुलासह क्रिकेटच्या मैदानात उतरला. फर्स्ट क्लास क्रिकेट एकत्र खेळलेली ही क्रिकेटच्या मैदानावरील पिता पुत्रांची ही दुसरी जोडी होती. चंद्रपॉलच्या मुलानं त्या मॅचमध्ये 42 आणि 29 रन काढले. पण चंद्रपॉलनं मुलापेक्षा सवाई खेळ करत 73 आणि 60 रनची खेळी केली.

चंद्रपॉल त्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. तो आता 12000 रनच्या जवळ आला होता. ब्रायन लारालाही तो टप्पा ओलांडाता आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2015 साली केपटाऊनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं 50 आणि 46 रन काढले. त्यावेळी त्याला लाराला मागे टाकण्यासाठी 119 रन हवे होते.

जगभरातील बॅट्समनचा घाम काढणाऱ्या वेस्ट इंडिजच्या दिग्गजला 2 वेळेसचे जेवण महाग!

इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये 4 इनिंगमध्ये चंद्रपॉलला फक्त 33 रन काढता आले. त्यानंतर वेस्ट इंडिज बोर्डानं त्याला पुन्हा कधीही टेस्ट क्रिकेटमध्ये संधी दिली नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळ करत चंद्रपॉलनं (Shivnarine Chanderpaul Birthday) पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण, त्याच्यासाठी टीमचे दरवाजे पुन्हा उघडले नाहीत. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या या दुर्लक्षित सुपरस्टारला दुर्दैवी पद्धतीनं रिटायर व्हावं लागलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: