
T20 क्रिकेटच्या फास्ट फुड युगात टेस्ट क्रिकेटचं सात्विकता जपणारा बॅट्समन म्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara). पुजाराचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (25 जानेवारी 1988) रोजी पुजाराचा जन्म झाला. कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर त्याचा पाया हा मजबूत असणे आवश्यक आहे.
संपूर्ण इमारतीचा भार सोसणाऱ्या पायाकडं त्या इमारतीच्या वैभवानं मोहित झालेल्या मंडळींचं सहसा लक्ष जात नाही. इमारतीच्या बाहेरची किंवा अंतर्गत सजावट, आतमधील अत्याधुनिक सोयी, आभाळाला हात पोहचणारे वरचे मजले आणि संपूर्ण शहरासह आसमंतामध्ये दृष्टी जाईल अशी सोय असलेली गच्ची याच गोष्टी सर्वांच्या लक्षात राहतात. हा मानवी स्वभाव आहे. पण, त्या इमारतीचा पाया भक्कम नसेल तर हे सर्व वैभव ‘जमीनदोस्त’ होण्यास वेळ लागत नाही. तो असतो तेंव्हा कधी जाणवत नाही. तो कोसळला तर ती भव्य इमारत अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली पडते. चेतेश्वर पुजाराचं भारतीय टीममधलं हे महत्त्व आहे.
भारताचा (Team India) 2018-19 चा किंवा नुकताच संपलेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराशिवाय भारतीय टीमला टेस्ट सीरिज जिंकणं शक्य नव्हतं. 71 वर्ष आणि 11 दौऱ्यामध्ये जे जमलं नाही, ते मागील दोन दौऱ्यामध्ये भारतीय टीमला ते जमलं कारण या दोन्ही दौऱ्यात भारतीय टीमच्या यशाचा पाया रचण्याचं काम पुजारानं केलं.
( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )
पुजारा संथ खेळतो?
चेतेश्वर पुजारा संथ खेळतो. त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे. त्याच्या टीकारांच्या नेमक्या शब्दात सांगायचं तर तो ‘इंटेट’ दाखवत नाही. कोहली-शास्त्री जोडीचा देखील सुरुवातीला असाच गैरसमज झाला होता. त्यामुळे त्यांनी एकदा पुजाराला टेस्ट टीममधून काढण्याची चूक केली होती. त्यानंतर त्यांनी ती चूक दुरुस्त केली. आज विराट कोहली (Virat Kohli) नंतर भारतीय टेस्ट टीममध्ये पक्की असलेला बॅट्समन म्हणून त्याचाच नंबर आहे.
कोणताही बॅट्समन सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरुन बाहेर पडताना ‘आज मी असं खेळणार’ हे ठरवून खेळू शकत नाही. त्याचा स्वभावधर्म हा बॅटिंगमध्ये उतरतो हे मान्य आहे. पण त्याचबरोबर समोरचा बॉलिंग अटॅक, पिचची परिस्थिती, मॅचमधील टीमची अवस्था, त्याच्या खेळण्याची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची खेळण्याची क्षमता या गोष्टी त्याचा खेळ नक्की करण्यात महत्त्वाच्या ठरतात.
गेल्या तीन वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे भारतानं टेस्ट क्रिकेटमध्ये आठ ओपनिंग जोड्या वापरल्या आहेत. पुजारा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ओपनिंगला झालेलं नुकसान भरुन काढण्याचं काम त्याला करावं लागतं. राहुल द्रविडच्यावेळी (Rahul Dravid) देखील हीच परिस्थिती होती. त्यामुळेच पुजाराप्रमाणेच त्याचाही स्ट्राईक रेट कमी होता. रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) सारखा आक्रमक बॅट्समन 3 नंबर हवा असेल तर जस्टीन लँगर (Justin Langer) आणि मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) यांच्यासारखी ओपनिंग जोडी हवी. टीम इंडियानं रोहितला (Rohit Sharma) टेस्टमध्ये तीन नंबरला पाठवून ‘पॉन्टिंग प्रयोग’ करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अंगाशी आला.
( वाचा : ‘आता तरी ‘या’ तिघांचं महत्व समजेल,’ सिडनी टेस्टनंतर गांगुलीनं टिकाकारांना सुनावलं! )
ब्रिस्बेनच्या विजयात पुजाराचं योगदान
भारतानं ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) जिंकून इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक विजयाचा पाया देखील चेतेश्वर पुजारानं रचला. पुजारा पाचव्या दिवशी बॅटिंगला आला तेंव्हा भारतानं रोहित शर्माला गमावलं होतं. पावसाळी हवामान, पाचव्या दिवसाचं आव्हान, आग ओकणारा बॉलिंग अटॅक आणि विजयासाठी ‘काय वाट्टेल ते’ करणारी ऑस्ट्रेलियन टीम या सर्व गोष्टी भारताच्या विरुद्ध होत्या.
ब्रिस्बेनमधील खेळात पुजाराच्या हेल्मेटला बॉल लागला. त्याच्या छातीला बॉल लागला. त्याच्या बॅट पकडणाऱ्या बोटांना बॉल लागला. त्या वेदनांनी पुजारा व्हिव्हळला, पण थांबला नाही. अखेर अंपायरच्या कॉलचा आधार घेत त्याला LBW आऊट देण्यात आलं. तेंव्हा भारताला जिंकण्यासाठी शेवटच्या तासामध्ये 99 रनची आवश्यकता होती. मॅच वाचवण्याची आणि पराभव टाळण्यासाठी प्रार्थना करण्याची वेळ ऑस्ट्रेलियन टीमवर आली होती.
आकडे काय सांगतात?
चेतेश्वर पुजारानं टेस्ट क्रिकेटमध्ये सहा हजार रन्सचा टप्पा पार केला आहे. त्याच्याकडं आता दहा वर्ष आणि 81 टेस्टचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीची अन्य मोठ्या खेळाडूंच्या कारकीर्दीशी तुलना करणे शक्य आहे.
पुजाराचा टेस्ट क्रिकेटमधील स्ट्राईक रेट (ज्यावर सतत बोंब मारली जाते) तो 45.02 आहे. राहुल द्रविडचा स्ट्राईक रेट हा 42.51 इतका आहे. पुजाराची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी ही 47.74 आहे. जी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) आणि सौरव गांगुलीपेक्षा (Sourav Ganguly) जास्त आहे. पुजारानं 134 इनिंगमध्ये 6000 टेस्ट रन्स पूर्ण केले. यामध्ये त्यानं गांगुली आणि अझहरुद्दीन या भारतीय बॅट्समन्ससोबतच मायकल क्लार्क आणि एबी डीव्हिलियर्स या अन्य देशातील दिग्गजांपेक्षा कमी इनिंग घेतल्या आहेत. पुजाराच्या 18 टेस्ट सेंच्युरीमध्ये फक्त दोन वेळा भारताला पराभव सहन करावा लागला आहे.
( वाचा : वाढदिवस स्पेशल : राहुल द्रविडच्या परदेशातील पाच अविस्मरणीय टेस्ट इनिंग! )
पुजाराच्या अविस्मरणीय खेळी
पुजारानं 2010 साली बंगळुरुमध्ये (Bengaluru) पदार्पण केलं. पहिल्या इनिंगमध्ये तो द्रविड आणि सचिननंतर पाचव्या क्रमांकावर आला. भारताच्या दुसऱ्या आणि मॅचमधील चौथ्या इनिंगमध्ये 207 रन्सचा पाठलाग करताना त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. त्या इनिंगमध्ये त्यानं भारताकडून सर्वात जास्त 72 रन काढले होते. पुजाराची ती पहिल्याच टेस्टमधील अविस्मरणीय खेळी होती.
कोलंबोमध्ये नाबाद 145 रनची खेळी करत त्यानं टीम इंडियाला सीरिजमध्ये परत आणलं होतं. विराट कोहलीला कॅप्टन म्हणून पहिली टेस्ट सीरिज जिंकून देण्यात ती खेळी महत्त्वाची ठरली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2018-19 मध्ये पहिल्या टेस्टमध्ये पुजारानं सेंच्युरी मारत सीरिजची दिशा स्पष्ट केली होती.
नॉटींगहॅमध्ये 2018 साली त्यानं जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडचा सामना करत 208 बॉलमध्ये 72 रन काढले होते. त्याच वर्षी जोहान्सबर्गच्या पिचवर त्यानं 178 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली होती. तर 2017 साली बंगळुरुच्या टर्निंग पिचवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजारानं 92 रन काढले. त्याच्या त्या खेळीमुळे टीम इंडियानं ती टेस्ट आणि पुढे सीरिज जिंकली. मालिकेत 0-1 अशा पिछाडीवर असताना पुजारानं ती अविस्मरणीय खेळी केली होती. सिडनी टेस्टमधील दोन्ही इनिंगमधील हाफ सेंच्युरी आणि ब्रिस्बेनमध्ये शेवटच्या दिवशी झळकावलेली हाफ सेंच्युरी देखील याच अविस्मरणीय गटामधील खेळी आहेत.
पुजारा कोण आहे?
क्रिकेट बाहेरच्या आणि क्रिकेटच्या मैदानावरील परिस्थितीनं विचलित न होता सातत्यानं मॅरेथॉन इनिंगचा जॉब पूर्ण करणारा डिपेंडेबल म्हणजे चेतेश्वर पुजारा. तो अगदी अॅथलेट नसेल पण त्याचं शरीर लाबंच-लांब इनिंग खेळण्यासाठी आणि फास्ट बॉलर्सनं केलेले सर्व घाव झेलण्याइतकं टणक आहे. त्याचबरोबर एक सेफ फिल्डर म्हणून देखील तो ओळखला जातो.
( वाचा : नवदीप सैनी : दर मॅचसाठी 200 रुपये मानधन ते सिडनी टेस्टमधील टीम इंडियाचा सदस्य! )
सभोवताली कसलीही परिस्थिती असो संयम न सोडता, टीकेची पर्वा न करता, सर्व घाव सोसून आपलं काम चोखपणे आणि अगदी सर्वस्व ओतून करणाऱ्या पंथाचा चेतेश्वर पुजारा हा उपासक आहे. तो मैदानात भिंतीसारखा उभा राहतो. त्याच्यावर आघात करुन बॉलर थकतात. त्याचा फायदा अन्य बॅट्समना होतो आणि ते मुक्तपणे खेळू शकतात. (आठवा ब्रिस्बेन टेस्टमधील गिल आणि पंतची खेळी) राहुल द्रविडनंही वर्षानुवर्ष हेच तर काम केलं. द्रविडच्या रिटायरमेंटनंतर त्याचा अतिशय अवघड असा वारसा टेस्ट क्रिकेटमध्ये पुजारा चालवत आहे.
पुजाराच्या क्रिकेट कारकीर्दीला तसंच भावी आयुष्याला ‘Cricket मराठी’ च्या खूप खूप शुभेच्छा.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.