श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (Lasith malinga) क्रिकेटविश्वात अंगठातोड यॉर्करसाठी ओळखला जातो. मलिंगा ऐन भरात असताना त्याच्या बॉलिंगची क्रिकेटविश्वात दहशत होती. त्याचा यॉर्कर कधी स्टंप किंवा पायचा वेध घेईल याची चिंता बॅट्समन्सला असे. T20 मॅचमध्ये 11 ओव्हर्सनंतर 2 आऊट 38 अशा अवस्थेत टीम असताना ऐन भरातल्या लसिथ मलिंगाला पाच सिक्सर्स मारणाऱ्या खेळाडूंचं नाव तुम्हाला माहिती आहे?  त्याने ही किमया कोणत्याही मॅचमध्ये केली असती तरी तो आदरस्थानी असेल. पण त्याने हे T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये साध्य केलंय. मलिंगाच्या बॉलिंगवर पाच सिक्सर, प्रत्येक सिक्सर हा आधीच्या सिक्सरपेक्षा लांब मारणाऱ्या त्या खेळाडूचे नाव आहे मार्लन सॅम्युअल्स. सॅम्युअल्सचा (Marlon Samuels) आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी ( 5 फेब्रुवारी 1981) रोजी त्याचा जन्म झाला.

सॅम्युअल्सने 2012 साली श्रीलंकेत झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ( T20 World Cup 2012) हा अचाट पराक्रम केला होता. T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये यजमान श्रीलंकेसमोर वेस्ट इंडिजचं आव्हान होतं. श्रीलंका विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. जॉन्सन चार्ल्स पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाला. त्यांच्या बॅटिंगचा मुख्य आधारस्तंभ असलेला ख्रिस गेलला (Chis Gayle) 3 रन्स काढण्यासाठी 16 बॉल लागले. T20 क्रिकेटसाठी अविश्वसनीय वाटणारी ही खेळी वेस्ट इंडिजचा बॅट्समन तो देखील ख्रिस गेल खेळून आऊट झाला होता. कोलंबोच्या पिचवर फॉर्मातल्या अंजथा मेंडिसचे (Ajantha Mendis) बॉल समजतच नव्हते.

( वाचा : 41 वर्षांचा ख्रिस गेल म्हणतो,’आणखी पाच वर्ष क्रिकेट खेळणार’ ‘युनिव्हर्सल बॉस’ ची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!)

या सर्व गोंधळात एरवी आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला मार्लन सॅम्युअल्स शांतपणे खेळत होता. त्याने सुरुवातीला संयम दाखवला. इतका संयम की वेस्ट इंडिजचे 11 ओव्हरनंतर 38 रन्सच झाले होते. तो शांत होता पण पराभूत नव्हता. योग्य बॉलर्सची वाट पाहत होता. ख्रिस गेल प्रमाणेच T20 क्रिकेटचा तेंव्हाचा चेहरा असलेल्या लसिथ मलिंगाची त्याने प्रतिहल्ला करण्यासाठी निवड केली.  

मलिंगावर केला हल्ला!

श्रीलंकेचा तेंव्हाचा कॅप्टन महेला जयवर्धने मलिंगाला 13 वी ओव्हर दिली. समोरचा बॅट्समन गोंधळात पडेल असे यॉर्कर आता मलिंगा टाकणार होता. मलिंगानं आजवर प्रत्येक मॅचमध्ये तेच तर केलं होतं. त्याने पहिला बॉल ब्राव्होला यॉर्करच टाकला. ब्राव्होनं एक रन काढून सॅम्युअल्सला स्ट्राईक दिली. मलिंगाने लेगस्टंपवर टाकलेला पुढचा बॉल सॅम्युअल्सनं चपळाईनं बॅटवर घेत मिडविकेटवरुन सिक्सर खेचला.

आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या वेस्ट इंडिज टीमला बॅटनं पहिला रन काढण्यासाठी 17 बॉल लागले होते. फायनलच्या दबावात हरवलेली आक्रमक वेस्ट इंडिज टीम त्या सिक्सरनंतर मॅचमध्ये परत आली. मार्लन सॅम्युअल्सने त्यांना परत आणलं होतं. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर फायनल मॅचमध्ये श्रीलंकेच्या समर्थकांनी गच्च भरलेल्या मैदानात सॅम्युअल्स आता त्यांच्या मुख्य बॉलर्सची हजेरी घेणार होता. मलिंगाच्या त्या ओव्हरपूर्वी सॅम्युअल्स 37 बॉलमध्ये 26 रन्स काढून खेळत होता. ओव्हरनंतर सॅम्युअल्स तीन सिक्सर्सच्या मदतीनं 41 बॉल्समध्ये 45 रन्सवर पोहचला.

अजंथा मेंडिसनं पुढच्या ओव्हरमध्ये आधी ब्राव्होला आऊट केलं. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये त्याने पोलार्ड आणि रसेलला सलग दोन बॉलवर आऊट केलं. सॅम्युअल्स दुसऱ्या बाजूने खेळत होता. त्याने दरम्यान एक मेंडिसला सिक्सरही लगावला. त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : रिची रिचर्डसन, वेस्ट इंडिजच्या सुवर्णयुगाचा अखेरचा साक्षीदार! )

जयवर्धनेनं सतरावी ओव्हर मलिंगाला दिली. मलिंगाच्या त्या ओव्हरमध्ये सॅम्युअल्सने एक फोर आणि दोन सिक्सर्ससह 19 रन्स काढले. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये सॅम्युअल्स 56 बॉलमध्ये 6 सिक्सर आणि 3  फोरच्या मदतीनं 78  रन्स काढून आऊट झाला. वेस्ट इंडिजनं फायनल 36 रन्सने जिंकली. 1979 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजनं क्रिकेटमधला कोणता वर्ल्ड कप जिंकला होता.

गेल, ब्राव्हो, पोलार्ड आणि रसेल हे T20 क्रिकेटमध्ये जगभर पुढे नावजलेले आक्रमक बॅट्समन त्या टीमध्ये होते. या सर्वांना मागे सारत त्या मॅचचा एकमेव हिरो होता मार्लन सॅम्युअल्स!   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: