
1990 च्या दशकातील टीम इंडियामध्ये उपयुक्त बॅटिंग आणि चपळ फिल्डिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अजय जडेजाचा (Ajay Jadeja Birthday) आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी (1 फेब्रुवारी 1971) रोजी जडेजाचा जन्म झाला. अजय जडेजानं 1996 च्या वर्ल्ड कप (Cricket World Cup 1996) क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 25 बॉल्समध्ये 45 रन्सची अविस्मरणीय खेळी केली होती. तब्बल दोन दशकांनंतरही त्याची ती खेळी क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आहे.
हाय व्होल्टेज लढत!
तो दिवस होता 9 मार्च 1996. स्थळ – बंगळुरुमधील चिन्नास्वामी मैदान. भारत आणि पाकिस्तानची टीम क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदाच आमने-सामने आले होते. यजमान भारताला त्यांच्याच मैदानात हरवून 1992 च्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याच्या निर्धाराने पाकिस्तानची टीम मैदानात उतरली होती.
पाकिस्तानचा कॅप्टन वासिम अक्रमने (Wasim Akram) दुखापतीचं कारण देत मॅचमधून माघार घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या बॉलिंगची धुरा ही वकार युनुसच्या (Waqar Younis) खांद्यावर होती. बंगळुरुच्या मॅचपूर्वी वकारनं 117 वन-डे मध्ये 198 विकेट्स घेतल्या होत्या. आघाडीच्या बॉलर्सला आवश्यक असलेला यॉर्कर, इनस्विंग, रिव्हर्स स्विंग आणि मेंदू या सर्व गोष्टी वकारकडं होत्या. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा होता. डेथ ओव्हर्समध्ये तर त्याची बॉलिंग आणखी खतरनाक पडत असे.
VIDEO: ‘रिव्हर्स स्विंगसाठी वकार युनूस लबाडी करत होता’ पाकिस्तानच्या बॉलरचा घरचा आहेर
अजय जडेजानं चार वर्षांपूर्वी 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं होतं. लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅट्समन आणि चपळ फिल्डर म्हणून त्याची ओळख होती. पण, स्वत:चा ठसा उमटवण्याची संधी त्याला कधी मिळाली नव्हती.
जडेजा 42 व्या ओव्हरमध्ये अझर आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आला. त्यापूर्वी नवजोत सिंग सिद्धूनं 115 बॉल्समध्ये 93 रन्सची खेळी केली होती. अझरपाठोपाठ विनोद कांबळी आणि नयन मोंगिया आऊट झाल्यानं टीम इंडियाला 250 पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी जडेजावर आली होती.
वाढदिवस स्पेशल : विनोद कांबळी, हरवलेला सुपरस्टार!
वकारची धुलाई
अजय जडेजा – अनिल कुंबळे जोडी मैदानात होती. पाकिस्तानला कमबॅक करण्याची संधी होती. त्यांचा सर्वात अनुभवी बॉलर वकार युनुस 48 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. जडेजानं पहिल्या बॉलवर तीन रन्स काढले. त्यानंतर कुंबळेनं सलग दोन फोर लगावले. चौथ्या बॉलवर कुंबळेनं एक रन काढत पुन्हा जडेजाला स्ट्राईक दिली. वकारनं पाचवा बॉल यॉर्कर टाकण्याच्या नादात त्याच्या पॅडवर टाकला. जडेजानं फ्लिक करत मिडविकेटच्या दिशेनं चौकार लगावला. आता वकारचं टेन्शन वाढलं होतं. तरीही वकारचा स्वत:च्या यॉर्करवर विश्वास होता. त्याने शेवटचा बॉल पुन्हा यॉर्कर टाकण्याचं ठरवलं. जडेजा त्यासाठी तयार होता. जडेजाच्या डाव्या पायाजवळ बॉल पडणार होता तितक्यात त्याने चपळाईन पाय बाजूला घेत सिस्कर खेचला. फक्त चिन्नास्वामी मैदानात नाही तर ती मॅच टीव्हीवर पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या घरात जडेजाच्या नावाचा जयघोष (Ajay Jadeja Birthday) सुरु झाला होता.
अनिल कुंबळे 49 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा वकार – जडेजा आमने-सामने आले. मागील ओव्हर्सच्या अनुभवातून वकार आणखी सावध झाला होता. आता तो यॉर्कर नाही तर बाऊंसरचा प्रयोग करण्याची शक्यता होती. वकारनं कोणताही प्रयोग केला असता तरी तो दिवस जडेजाचा होता. वकारनं पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. जडेजाने त्यावर फोर लगावला. वकारनं दुसरा बॉल बाऊंसर टाकला. जडेजानं एक पाय बाजूला खांद्यापर्यंत वर येणाऱ्या त्या बॉलवर बेसबॉल स्टाईल सिक्सर मारला. तो जडेजाचा त्या मॅचमधील सर्वोत्तम शॉट होता. त्यानंतरच्या बॉलवर वकारनं जडेजाला आऊट केलं. पण, तोपर्यंत जडेजानं 25 बॉल्समध्ये 45 रन्स काढले. त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर 288 रन्सचं टार्गेट ठेवलं.
भारतानं पाकिस्तानला 39 रन्सनं पराभूत करुन वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारताकडून 93 रन्सची खेळी करणाऱ्या नवजोत सिंग सिद्धूचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सर्व प्रेक्षकांसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ अजय जडेजा (Ajay Jadeja Birthday) होता.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.