भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक स्टायलिश बॅट्समनपैकी एक असलेले गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांचा आज वाढदिवस. आजच्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी 1949 रोजी त्यांचा जन्म झाला. शैलीदार खेळ आणि सभ्य वावर याच्या जोरावर 1970 चं दशक गाजवणाऱ्या विश्वनाथ यांच्याबद्दलच्या 7 खास गोष्टी ‘Cricket मराठी’ तुम्हाला सांगणार आहे.

1) एकमेवाद्वितीय

पहिल्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये डबल सेंच्युरी आणि पहिल्या टेस्टमध्ये सेंच्युरी असा पराक्रम करणारे गुंडप्पा विश्वनाथ हे क्रिकेटविश्वातील एकमेव आहेत. त्यांनी 1967 साली म्हैसूर (Mysore) कडून आंध्रप्रदेविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 230 रन्स काढले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी कानपूर टेस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये गुंडप्पांनी सेंच्युरी झळकावली. विशेष म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये ते शून्यावर आऊट झाले होते.

2) भारत कधीही हरला नाही

गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांनी टेस्टमध्ये 14 सेंच्युरी झळकावल्या. त्यापैकी 4 टेस्टमध्ये भारतीय टीम विजयी झाली तर अन्य 10 टेस्ट ड्रॉ झाल्या. त्यांनी सेंच्युरी झळकावलेल्या एकाही टेस्टमध्ये भारतीय टीम पराभूत झाली नव्हती.

3) सभ्य गृहस्थ

‘जंटलमन्स गेम’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटमधील ते कदाचित सर्वाधिक सभ्य खेळांडूंपैकी एक असावेत. विश्वनाथ इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये भारतीय टीमचे कॅप्टन होते. त्यावेळी इंग्लंडचे कॅप्टन असलेल्या बॉब टेलर (Bob Taylor) यांना अंपायरने चुकीच्या पद्धतीने आऊट दिले. विश्वनाथ यांनी त्यावेळी हस्तक्षेप करत टेलर यांना परत बोलवावून खेळण्यास सांगितले. पुढे टेलरच्या खेळामुळेच इंग्लंडने ती टेस्ट जिंकली. पण, खिलाडूवृत्तीमुळे विश्वनाथ यांनी सर्वांचेच मन जिंकले होते.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचे घावं सोसणारा पाया! )

4) मद्रासचे हिरो

मद्रास (Madras) (चेन्नईचे तेंव्हाचे नाव) शी गुंडप्पा विश्वनाथ यांचे वेगळेच नाते होते. मद्रासमध्ये त्यांचा खेळ विशेष बहरत असे. 1975 च्या मद्रास टेस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर भारताचे सर्व बॅट्समन नांगी टाकत असताना विश्वनाथ यांनी झुंजारपणे 97 रन्सची खेळी केली. भारताच्या 190 रन्समध्ये त्यांचा निम्यापेक्षा जास्त वाटा होता. विशेष म्हणजे ते शेवटपर्यंत नाबाद राहिले. 1981-82 च्या इंग्लंड सीरिजमध्ये मद्रासमध्येच त्यांनी त्यांच्या करियरमधील सर्वाधिक 222 रन्स काढले.

5) मेलबर्न स्टार

गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1978 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्नमध्ये (Melbourne Test) सेंच्युरी झळकावली होती. डेनिस लिली (Dennis Lillee) आणि कंपनीसमोर मेलबर्नच्या उसळत्या पिचवर त्यांनी 114 रन्स काढले. भारतीय बॅट्समनने ऑस्ट्रेलियात झळकावलेल्या सर्वोत्तम सेंच्युरीपैकी ती एक सेंच्युरी आहे.

6) गावस्कर यांच्याशी नातं

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) ही भारतीय टीमसाठी संकटमोचक नाव होती. त्यांनी अनेकदा टीमला अडचणीतून बाहेर काढलं. दोघांचीही उंची साधारण सारखी. दोघांमध्येही जगातील कोणत्याही बॉलर्सचा सामना करण्याची क्षमता. त्यामुळे गावस्कर श्रेष्ठ की विश्वनाथ ? असा वाद त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगत असे. प्रत्यक्षात गावस्कर आणि विश्वनाथ हे दोघे घट्ट मित्र आहेत. त्याचबरोबर पुढे गावस्कर यांच्या बहिणीशी विश्वनाथ यांनी लग्न केले. त्यामुळे ते एकमेकांचे नातेवाईक देखील बनले.

( वाचा : ‘अंपायरमुळे नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उद्दामपणामुळे मैदान सोडलं होतं’, 1981 च्या ‘वॉक आऊट’ चं गावस्करांनी सांगितलं सत्य! )

7) सेकंड इनिंग

गुंडप्पा विश्वनाथ यांचा निवृत्तीनंतरही क्रिकेटशी संबंध कायम आहे. त्यांनी निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटचे व्यवस्थापक, सामानाधिकारी तसंच निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. त्याचबरोबर बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) शी देखील ते संलग्न होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: