फोटो – ट्विटर/ICC

ऑस्ट्रेलियन (Australia) क्रिकेट टीमला फास्ट बॉलर्सची मोठी परंपरा आहे. आग ओकणाऱ्या फास्ट बॉलर्सच्या जोरावरच त्यांनी जवळपास दीड दशकं क्रिकेट विश्वावर राज्य केलं. सलग 16 टेस्ट जिंकण्याचा विक्रम केला. यंदा इंग्लंडला अ‍ॅशेस सीरिजमध्ये 4-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यापूर्वी अनेकांचे अंदाज चुकवत T20 वर्ल्ड कपचंही विजेतेपद पटकावले.ऑस्ट्रेलियानं 2015 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील (ICC Cricket World Cup 2015) ‘मॅन ऑफ द सीरिज’ असलेल्या मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc Birthday) आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी (30 जानेवारी 1990) रोजी त्याचा जन्म झाला.

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सच्या मांदियाळीत मिचेल स्टार्क या डावखुऱ्या बॉलरचं नाव गेल्या दहा वर्षांपासून सतत गाजतंय. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा महान बॉलर ग्लेन मॅकग्राची (Glenn McGrath) उंची आहे. मॅकग्राचा सहकारी ब्रेट ली (Brett Lee) चा वेग आहे. त्याचबरोबर स्विंगचा सुलतान वासिम अक्रम (Wasim Akram) सारखा स्विंग देखील आहे. शालेय स्तरावर विकेट किपर आणि पार्ट टाईम बॅट्समन असलेला स्टार्क ज्युनिअर लेव्हलच्या कोचच्या सांगण्यावरुन फास्ट बॉलिंगकडं वळला.

Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे!, तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभाव

स्टार्कनं वयाच्या 19 व्या वर्षीच न्यू साऊथ वेल्स या ऑस्ट्रेलियातील सर्वात पॉवरफुल टीमकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 2009-10 च्या सिझनमध्ये 21 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियातील स्थानिक वन-डे सीरिजमध्ये त्यानं सहा मॅचमध्ये 8.12 च्या सरासरीनं 26 विकेट्स घेत देशांतर्गत क्रिकेटमधील दबदबा कायम ठेवला. 2017 साली शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना स्टार्कनं एकाच मॅचमध्ये दोन हॅटट्रीक करत एक अनोख्या इतिहासाची नोंद केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी

जोश हेजलवुड (Josh Hazlewood) जखमी झाल्यानं 2010 च्या शेवटी भारताविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्याचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश झाला. भारताविरुद्ध विशाखापट्टणम वन-डेमध्ये त्यानं वन-डे मध्ये त्यानं पदार्पण केलं. तर वर्षभरानी न्यूझीलंड विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये त्याला टेस्ट क्रिकेटची संधी मिळाली. टेस्ट करियरमधील पहिल्या दोन टेस्टमध्ये त्याला चार विकेट्स मिळाल्या. त्यामुळे त्यानंतर भारताविरुद्च्या पहिल्या दोन टेस्टसाठी त्याला वगळण्यात आलं होतं.

छोट्या शहरातील हिरोने केले देशाचे मोठे स्वप्न पूर्ण!

मिचेल स्टार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावत असताना ऑस्ट्रेलियाकडून आणखी एक मिचेल (जॉन्सन) (Mitchell Johnson) मैदान गाजवत होता. जॉन्सनप्रमाणेच मिचेल स्टार्क देखील त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध होता. अगदी पहिली टेस्ट खेळण्यापूर्वी काही दिवस आधी त्याचा स्थानिक क्रिकेटमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नशी (Shane Warne) देखील त्याचा आंतरराष्ट्रीय करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात वाद झाला.

वर्ल्ड कप 2015

ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये 2015 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्टार्कनं त्याच्या क्षमतेला न्याय दिला. 23 वर्षांपूर्वी ऑस्ट्रिलियन भूमीवर झालेल्या वर्ल्ड कपमध्ये कांगारूंना सेमी फायनल गाठण्यातही अपयश आलं होतं. 23 वर्षांनी त्यांनी ते अपयश विजेतेपदानं धुतलं. या विजेतेपदात स्टार्कचा सिंहाचा वाटा होता.

त्यानं संपूर्ण स्पर्धेत 10.18 च्या सरासरीनं 22 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या (AUS vs NZ) साखळी मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम फक्त 151 रनवर ऑल आऊट झाली होती. 152 च्या टार्गेटचं संरक्षण करताना स्टार्कनं भन्नाट बॉलिंग केली. त्यानं 28 रन देत 6 विकेट्स घेतल्या. स्टार्कच्या या प्रयत्नामुळे न्यूझीलंडनं ती मॅच 1 विकेटनं धडपडत जिंकली.

न्यूझीलंड विरुद्धच झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यानं या मॅचचा बदला घेतला. स्टार्कनं पहिल्याच ओव्हरमध्ये (Mitchell Starc Birthday) न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅकलमला शून्यावर आऊट केलं. या धक्क्यानंतर न्यूझीलंडची टीम सावरलीच नाही. ऑस्ट्रेलियानं फायनल 7 विकेट्सनं जिंकली आणि वर्ल्ड विजेतेपदावर नाव कोरलं.

2015 प्रमाणे 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही त्यानं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

स्टार्कनं ऑस्ट्रेलियाकडून 61 टेस्ट, 96 वन-डे आणि 35 आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं अनुक्रमे 255, 184 आणि 47 विकेट्स घेतल्या आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यानं मागील वर्षी झालेल्या आयपीएलमधून (IPL 2020) माघार घेतली होती. या माघारीनंतरही स्टार्कनं भारत विरुद्धच्या सीरिजमध्ये कमाल केली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील झाली.

स्टार्कचे कमबॅक

अ‍ॅशेस सीरिज सुरू होण्यापूर्वी स्टार्कच्या टीममधील जागेवर प्रश्न उपस्थित झाला होता. माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननं (Shane Warne) स्टार्कवर जोरदार टीका केली होती. स्टार्कनं सर्व टीकाकारांना मैदानात उत्तर (Mitchell Starc on Cricket) दिले. त्याने अ‍ॅशेस सीरिजमध्ये 25.36 च्या सरासरीनं 19 विकेट्स घेतल्या.

फॉर्ममध्ये चढ-उतार होऊ शकतो, पण क्लास हा नेहमी कायम असतो. हाच क्लास क्रिकेटपटूंना संकटकाळी तारतो. त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. स्टार्कनं देखील हे मागच्यावर्षी हे सिद्ध केले आहे. त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियानं प्रतिष्ठेचे अ‍ॅलन बॉर्डर मेडल (Allan Border Medal) जाहीर केले आहे. स्टार्कच्या लढाऊ वृत्तीची ही पावती आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा T20 वर्ल्ड कप कायम राखण्यासाठी स्टार्कची भूमिका (Mitchell Starc Birthday) महत्त्वाची असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: