न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी बॉलर, झुंजार ऑलराऊंडर अशी ओळख असलेल्या डॅनियल व्हिटोरीचा (Daniel Vettori) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी ( 27 जानेवारी 1979 ) रोजी त्याचा जन्म झाला. व्हिटोरीनं वयाच्या अठराव्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंडकडून (New Zealand) सर्वात कमी वयात टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. चष्मा घालून खेळणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचा सुरुवातीचा लूक पाहून अनेकांना हॅरी पॉटरची आठवण यायची. आपल्या 18 वर्षाच्या कारकीर्दीत या ‘न्यूझीलंडच्या हॅरी पॉटर’नं त्याच्या जादूई पोतडीतून टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

व्हिटोरी हा शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुरलीधरन (Muralitharan) यांचा समकालीन. क्रिकेट विश्वातील हे दोन्ही स्पिनर्सचा बॉल वळवण्यात हातखंडा होता. व्हिटोरीची शैली भिन्न होती. डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करणारा व्हिटोरीचा अचूकतेवर भर होता. बॉलला उंची देण्यासही तो घाबरत नसे. त्याच्या या अचूकतेमुळेच सर रिचर्ड हॅडलींना मागे टाकत तो न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी बॉलर बनला. न्यूझीलंडच्या स्विंग बॉलिंगला मदत करणाऱ्या गवताळ पिचवर व्हिटोरीनं बहुतेक काळ बॉलिंग केली. त्याला भारतीय उपखंडातील किंवा ऑस्ट्रेलियातील स्पिनला मदत करणाऱ्या पिचची साथ मिळाली नाही. त्यामुळे त्याचा हा रेकॉर्ड आणखी उठून दिसतो.

( वाचा : IPL 2021 : न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूवर आहे, CSK ची नजर, KKR देखील शर्यतीत! )

व्हिटोरी उत्तम बॅट्समनही होता. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 30 च्या सरासरीने 4531 रन्स काढले. यामध्ये 6 सेंच्युरी आणि 23 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येणारा व्हिटोरी तळाच्या बॅट्समन्सच्या मदतीनं चिवट झुंज देण्यासाठी ओळखला जात असे. एखाद्या कसलेल्या बॅट्समन्सप्रमाणे त्याची विकेट मिळवण्यासाठी बॉलर्सना प्रयत्न करावे लागत.  टेस्ट क्रिकेटमध्ये 300 विकेट्स आणि 4 हजार रन्स करणारा व्हिटोरी हा तिसरा खेळाडू आहे. व्हिटोरीपूर्वी हा विक्रम फक्त कपिल देव आणि इयान बोथम यांनी केला आहे.

खडतर काळात कॅप्टन

न्यूझीलंड क्रिकेटच्या खडतर काळात व्हिटोरी टीमचा कॅप्टन बनला. तो कॅप्टन झाला तेंव्हा स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) आणि ख्रिस क्रेन्स (Chris Cranes) निवृत्त झाले होते. तर शेन बॉन्ड आणि डॅरियल टफी या दिग्गज बॉलर्सनी इंडियन क्रिकेट लीग (ICL) चा मार्ग स्विकारत बंडाचा झेंडा उभारला होता. या कठीण काळात न्यूझीलंड क्रिकेटला स्थैर्य देण्याचं काम त्याने केलं. व्हिटोरीच्या कॅप्टनसीखाली अनेक तरुण खेळाडू न्यूझीलंड क्रिकेटमध्ये स्थिरावले. त्याच्या कॅप्टनसीखाली न्यूझीलंडने 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये तर 2015 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारली.

( वाचा : NZ vs PAK: केन विल्यमसनची सलग तिसऱ्या टेस्टमध्ये सेंच्युरी, अनेक रेकॉर्ड्सना गवसणी )

‘वन मॅन आर्मी’

व्हिटोरी एकेकाळी न्यूझीलंड क्रिकेटचा ‘वन मॅन आर्मी’ होता. टीमच्या कॅप्टनसी बरोबरच आघाडीचा बॉलर, झुंजार बॅट्समन आणि निवड समितीचा सदस्य या सर्व भूमिका त्याने एकाच वेळी सांभाळल्या. या सर्व भूमिका सांभाळताना त्याने कधीही मैदानावर तोल ढळला नाही. मैदानावरील खेळाडू, अंपायर आणि मीडिया या सर्वांना तो नेहमीच शांतपणे सामोरे जात असे.

डॅनियल व्हिटोरी 2015 च्या वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup 2015) नंतर निवृत्त झाला. क्रिकेट कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या व्हिटोरीने त्या वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट्स घेत टीमला फायनलपर्यंत पोहचवण्यात मोलाचं योगदान दिलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीत थर्ड मॅनला उभ्या असलेल्या व्हिटोरीनं सीमारेषेजवळ उंच उडी मारत मार्लन सॅम्युल्सचा एक अप्रतिम असा कॅच पकडला होता.

न्यूझीलंडची टीम वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाली. वर्ल्ड कप विजेतेपदासह क्रिकेटचा निरोप घेण्याचं व्हिटोरीचं स्वप्न अपूरं राहिलं. वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं व्हिटोरीचं स्वप्न भंगलं. पण न्यूझीलंड क्रिकेटचा हा हॅरी पॉटर हा त्याची सभ्यता आणि झुंजार वृत्तीसाठी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: