फोटो – ट्विटर

असमान्य गुणवत्तेला शांत स्वभवाची जोड असेल तर ती व्यक्ती आयुष्यात मोठी भरारी घेऊ शकते. गुणवत्ता आणि शांतता यांच्या जोडीनं ती व्यक्ती त्याच्या क्षेत्रातील असमान्य व्यक्ती होऊ शकते. मेहनत आणि चिवट वृत्ती याच्या जोरावरही एखाद्या क्षेत्रात टिकून राहता येतं. स्वत:ची गुणवत्ता कष्टाच्या जोरावर वाढवता येते. पण, प्रचंड गुणवत्तेला संतापी आणि उतावीळ स्वभावाची जोड असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या क्षमते इतकं यश मिळवता येत नाही. टीम इंडियाच्या अशाच एका अनलकी सुपरस्टारचा आज वाढदिवस आहे. त्या अनलकी सुपरस्टारचं नावं आहे अंबाती रायुडू. रायुडूचा आज वाढदिवस (Ambati Rayudu Birthday) आहे. आजच्याच दिवशी (23 सप्टेंबर 1985) रोजी त्याचा जन्म झाला. त्याच्या करिअरमध्ये त्याचा तापट स्वभाव आणि राजकारण हे दोन मोठे अडथळे ठरले.

16 व्या वर्षी इंग्लंड विरुद्ध 177

रायुडूनं वयाच्या 13 व्या वर्षीच हैदराबादच्या क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या कोचला प्रभावित केले होते. त्याच्यामधील गुणवत्तेमुळे तो आधी हैदराबादच्या अंडर – 15 आणि नंतर अंडर- 19 टीमकडून खेळू लागला. मोठ्या वयाच्या बॉलरचा सहज सामना करणाऱ्या रायुडूची टीम इंडियाच्या अंडर 15 टीममध्ये निवड झाली. त्या स्पर्धेत त्यानं सर्वात जास्त रन काढले. तसंच पाकिस्तान विरुद्ध झालेल्या फायनलमध्ये तो ‘मॅन ऑफ द मॅच ठरला.

रायुडूचा हा फॉर्म पाहून त्याची वयाच्या 16 व्या वर्षीच हैदराबादच्या रणजी टीममध्ये निवड झाली. एक रणजी मॅच खेळून लगेच तो इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या अंडर-19 टीममध्ये निवडला गेला. या दौऱ्यात रायुडूनं 3 वन-डेमध्ये 291 रन काढले. यापैकी त्याची सर्वोत्तम खेळी तिसऱ्या वन-डेमध्ये आली.

त्या मॅचमध्ये इंग्लंडनं टीम इंडियासमोर 304 रनचं आव्हान ठेवलं होतं. ओपनिंगला आलेला रायुडू एका बाजूनं उभा होता, पण टीमची अवस्था 6 आऊट 132 अशी झाली होती. त्यानंतर रायुडूनं (Ambati Rayudu Birthday) 169 बॉलमध्ये नाबाद 177 रन काढत भारताला 1 विकेटनं एकहाती विजय मिळवून दिला.

…जेव्हा संजय मांजरेकरनं घाबरुन लॉर्ड्स टेस्ट खेळणे टाळले!

रणजी क्रिकेटमध्ये विक्रम

रायुडूनं 2002-03 च्या रणजी सिझनमध्ये  आंध्र प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 210 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 159 रन काढले. रणजी क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. त्या रणजी सिझनमध्ये रायुडूनं 69.80 च्या सरासरीनं 698 रन काढले. सर्वाधिक रन काढणाऱ्या बॅट्समनच्या यादीमध्ये तो तिसरा होता.

रायुडूच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे 2004 साली बांगलादेशमध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप टीमचा तो कॅप्टन होता. त्याच्या कामगिरीमध्ये टीम इंडियानं सेमी फायनलपर्यंत धडक मारली. शिखर धवन, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, इराफन पठाण आणि आर.पी. सिंह हे भविष्यकाळातील टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्याच्या टीममध्ये होते. त्या टीमचा कॅप्टन असलेल्या रायुडूनं या सर्वांच्या नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

वादग्रस्त वळण

अंबती रायुडूचं (Ambati Rayudu Birthday) 2004 च्या T20 वर्ल्ड कपपर्यंत करिअर जोरात सुरू होतं. तो काळ सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण या रशी-महारथी बॅट्समनचा होता. त्यांचा वारसदार म्हणून रायुडूकडं पाहिलं जात होतं. पण त्यानंतर त्याच्या करिअरला वादग्रस्त वळण लागलं.

हैदराबादचे कोच राजेश यादव यांच्याशी त्याचा वाद झाला. त्यामुळे त्यानं हैदराबादची टीम सोडली आणि आंध्र प्रदेशकडून खेळू लागला. वर्षभरात 2005 मध्ये तो पुन्हा हैदराबादमध्ये परतला. यावेळी त्याचा माजी ऑफ स्पिनर आणि हैदराबाद क्रिकेटचे बॉस शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुनशी वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की अर्जुन रायुडूच्या अंगावर स्टंप घेऊन धावला होता. त्यानंतर काही मॅचमध्ये अंपायरशी देखील रायुडूचा वाद झाला. शिवलाल यादव यांच्या डोळ्यात रायुडू खुपत होताच. रायुडूच्या तापट वर्तनामुळे त्यांच्या हाती कोलित मिळालं. त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) राजकारणाला कंटाळून रायुडूनं वयाच्या 22 व्या वर्षी 2007 साली भारतीय क्रिकेट सोडलं  आणि झी समुहाच्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये (ICL) तो दाखल झाला.

वादात अडकल्यानं करिअर भरकटलं, अन्यथा त्याच्यासारखा कुणीच नव्हता!

ICL ते IPL

हैदराबाद क्रिकेटच्या राजकारणाला कंटाळून रायुडू बीसीसीआयच्या क्रिकेट सिस्टममधून बाहेर पडला होता. विदेशी खेळाडूंच्या सोबत खेळायला मिळेल आणि आपला खेळ टीव्ही मुळे घरोघरी पोहचेल अशी त्याची अपेक्षा होती. आयसीएलमधील हैदराबाद हिरोज टीमचा तो सदस्य होता.

बीसीसीआयनं आयसीएलवर बंदी घातली. क्रिकेटमधील वजन वापरुन सर्व देशांच्या बोर्डाला तोच निर्णय घेण्यास भाग पाडले. बीसीसीआयच्या विरोधापूढे आयसीएल स्पर्धा टिकू शकली नाही. रायुडूचं करिअर संकटात सापडलं. त्यावेळी बीसीसीआयनं आयसीएल खेळणाऱ्या काही तरुण खेळाडूंवरील बंदी उठवत त्यांना पुन्हा क्रिकेट सिस्टममध्ये प्रवेश दिला. त्याचा फायदा रायुडूला झाला. रायुडूला 2009 साली बीसीसीआयकडून माफी मिळाली. त्यानंतर 2010 साली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीममध्ये त्याची निवड झाली.

प्रचंड क्षमतेचा पण वादग्रस्त ऑल राऊंडर!

मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ

आयपीएल 2010 पर्यंत मुंबई इंडियन्सची बॅटींग ही फक्त सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एक खांबी आधारावर उभी होती. रायुडूनं (Ambati Rayudu Birthday) त्याच्या पहिल्याच सिझनमध्ये (IPL 2010) सचिनला चांगली साथ दिली. त्यानं पहिल्या सिझनमध्ये 356 तर दुसऱ्या सिझनमध्ये (IPL 2011) 395 रन काढले.

मुंबईच्या मॅनेजमेंटचा त्याच्यावरचा विश्वास वाढला. रायुडूनं देखील त्यांना भक्कम रिटर्न दिले. नंबर 3 नंबर 8 पर्यंत कोणत्याही क्रमांकावर, कोणत्याही परिस्थितीमध्ये रायुडूनं चपखल खेळ केला.

शेवटच्या बॉलवर सिक्स आणि हरभजनशी वाद

रायुडू 2017 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. 2013, 2015 आणि 2017 या मुंबईच्या तीन विजेतेपदामध्ये त्यानं मोलाचं योगदान दिलं. टीमच्या गरजेनुसार विकेट किपिंगचा भार खांद्यावर घेतला. 2011 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला विजयासाठी 176 रन हवे होते. मुंबईची अवस्था 18 ओव्हरनंतर 5 आऊट 137 अशी झाली होती.

त्यावेळी रायुडू आणि जेम्स फ्रँकलीन ही जोडी मैदानात होती. त्यांनी हार न मानता मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंजक केली. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला जिंकण्यासाठी 21 रन हवे होते. लक्ष्मीपती बालाजीच्या त्या ओव्हरमध्ये फ्रँकलीननं पहिल्या 4 बॉलवर 4 चौके लगावले. तर पाचव्या बॉलवर त्याला 1 रन काढता आला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 4 रन हवे असताना रायुडू स्ट्राईकवर होता. त्यानं थेट सिक्स खेचत मुंबई इंडियन्सला थरारक विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्सचा आणखी एक सिनिअर खेळाडू असलेल्या हरभजन सिंगशी त्याचा आयपीएल 2016 मध्ये (IPL 2016) वाद झाला. रायझिंग पुणे सुपर जायंट्स (RSPG) विरुद्धच्या लढतीमध्ये हरभजनच्या बॉलिंगवर सौरभ तिवारीनं मारलेला बॉल रायुडूला अडवता आला नाही. त्यामुळे संतप्त हरभजननं रायुडूला मैदानातच सुनावलं. रायुडू ही शांत बसणारा क्रिकेटपटू नव्हता. त्यानंही त्याला उत्तर दिलं. मुंबई इंडियन्सचे हे दोन सिनिअर खेळाडू मैदानातच एकमेकांशी भिडले होते.

 टीम इंडियात एन्ट्री

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अखेर 2013 साली रायुडूची टीम इंडियात एन्ट्री झाली. झिम्बाब्वे दौऱ्यात कॅप्टन धोनीसह अनेक सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये रायुडूनं (Ambati Rayudu Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच वन-डेमध्ये नाबाद हाफ सेंच्युरी झळकावली. तर विराटसोबत शतकी पार्टनरशिप केली. त्यानंतर काही काळ टीम इंडियाच्या आत-बाहेर असणारा रायुडू 2015 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील (Cricket World Cup 2015) टीम इंडियात देखील होता. पण तिथं त्याला एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नाही.

2015 च्या वर्ल्ड कपनंतर रायुडूनं वन-डे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. तो दर 2 ते 3 वन-डेमध्ये एखादी हाफ सेंच्युरी लगावत होता. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटही सोडलं. 2019 च्या सुरुवातीला त्याची वन-डे क्रिकेटमधील सरासरी ही 50 पेक्षा जास्त होती. तो 2018 साली नंबर 4 वर सातत्यानं खेळत होता. वर्ल्ड कप स्पर्धेतही तोच नंबर 4 असेल असा रायुडूसह अनेकांचा अंदाज होता.

रायुडूचा फॉर्म नेमका 2019 साली घसरला. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या 10 वन-डे मॅचमध्ये त्यानं फक्त 1 हाफ सेंच्युरी झळकावली. त्यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्च्या शेवटच्या 3 वन-डेमध्ये त्यानं 13, 18 आणि 2 रन काढले. या खेळीनंतर त्याची वर्ल्ड कपमध्ये निवड झाली नाही. तो रायुडूसाठी मोठा धक्का होता.

3 D वाद

अंबाती रायडूसाठी वर्ल्ड कप टीममध्ये (Cricket World Cup 2019) निवड न होणं हा मोठा धक्का होता. त्याच्या ऐवजी वर्ल्ड कपमध्ये नवोदित विजय शंकरची (Vijay Shakar) निवड झाली. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी शंकरच्या निवडीचे समर्थन करताना तो बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रात योगदान देणारा 3D  प्लेयर आहे, असा युक्तीवाद केला होता. रायुडूला हे स्पष्टीकरण आवडले नाही. त्यानं वर्ल्ड कप मॅच पाहण्यासाठी 3 D ग्लास ऑर्डर केल्याचं ट्विट केलं.

रायुडूचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं. त्याची ही टीका निवड समितीला पटली नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान सुरुवातीला शिखर धवन जखमी झाला. त्याच्या जागी ऋषभ पंतची टीममध्ये निवड झाली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात विजय शंकर दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्या जागी मयांक अग्रवाला पाठवण्यात आलं. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचं रायुडूचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. पण, काही दिवसांमध्ये रायुडूनं तो निर्णय मागं घेतला.

विजय शंकरला सोशल मीडियावर हवं तितकं Troll करण्यापूर्वी हे नक्की वाचा

कराकिर्दीचा उत्तरार्ध

रायुडूला 2018 च्या आयपीएल लिलावात (IPL 2018) चेन्नई सुपर किंग्स (CSK) निवड केली. त्यानं 2018 चा सिझन गाजवला. त्यानं त्या सिझनमध्ये 402 रन केले. आयपीएल कारकिर्दीमधील पहिली सेंच्युरी झळकावली. चेन्नईच्या विजतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.

या आयपीएल नंतर त्याची कामगिरी खालावली. त्यानं काही चमकदार खेळी केल्या. पण त्यात सातत्य नव्हते. अगदी या आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धात (IPL 2021) मुंबई इंडियन्स विरुद्ध एकही खराब शॉट न मारता रायुडूनं  27 बॉलमध्ये नाबाद 72 रनची वादळी खेळी केली होती. रायुडूची ही खेळी त्याच्यातील गुणवत्तेची साक्ष देणारी आहे. आता आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धातही तो सीएसकेच्या मिडल ऑर्डरचा महत्त्वाचा सदस्य आहे.

महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’

आता आयपीएल स्पर्धेत पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे. नव्या टीममध्ये वर्षभर स्पर्धात्मक क्रिकेट फार न खेळणारा आणि फिटनेसची समस्या असणाऱ्या रायुडूला कोणी खेरदी करेल का?  हा प्रश्न आहे. चेन्नईच्या भावी नियोजनातही तो असण्याची शक्यता कमी आहे. रागीट वर्तन आणि राजकारणाचा बसलेला फटका यामुळे टीम इंडियाच्या भावी सुपरस्टारची कारकिर्द बहरली नाही. त्यामुळे एक अनलकी क्रिकेटपटू म्हणूनच अंबाती रायुडू (Ambati Rayudu Birthday) ओळखला जाणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: