फोटो – स्पोर्ट्स हब

क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडनं अखेर 2019 साली अनेक वळणांचा प्रवास पार केल्यानंतर पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2019) जिंकला. अर्थात हा वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये सर्वच्या सर्व इंग्लंडच्या खेळाडूंचा वाटा नव्हता. जगभरातील वेगवेगळ्या देशातील खेळाडू एकत्र आणून इंग्लिश बोर्डानं इंग्लंडची क्रिकेट टीम बांधली आणि मायदेशात वर्ल्ड कप जिंकला. लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये सुपर ओव्हर टाकणाऱ्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (1 एप्रिल 1995) रोजी जोफ्राचा जन्म झाला.

बोर्बोडस ते इंग्लंड

जोफ्राची आई बार्बोडसची तर वडिल ब्रिटीश. जोफ्रा आयुष्यातील 20 वर्षे बार्बोडसमध्ये (Barbados) होता. वेस्ट इंडिजच्या (West Indies) अंडर 19 टीमचा तो सदस्य होता. याच काळात एका मोठ्या दुखापतीमुळे त्याच्या करियरला ब्रेक बसला. तो तब्बल दोन वर्ष क्रिकेटपासून दूर होता. या काळात तो वेस्ट इंडिज क्रिकेटच्या रडारमधून मागे पडला.

आयुष्याच्या या अवघड टप्प्यात जोफ्राची भेट ख्रिस जॉर्डनशी (Chris Jorden) झाली. जॉर्डन हा देखील जोफ्रा प्रमाणे बार्बोडसचा नंतर इंग्लंडचा झाला. जोफ्राकडे वडिलांमुळे ब्रिटीश पासपोर्ट होता. जॉर्डनच्या सल्ल्यानंतर जोफ्राने 2015 साली क्रिकेटसाठी बार्बोडस सोडून इंग्लंड गाठले.

( वाचा : जोश हेजलवुड, छोट्या शहरातला मोठा हिरो! )

आयपीएलमध्ये एन्ट्री

ससेक्स (Sussex) ही जोफ्रा आर्चरची (Jofra Archer) पहिली कौंटी टीम.  उंचपुऱ्या आणि वेगवान बॉलिंग करणाऱ्या जोफ्रानं पहिल्या दोन वर्षात चांगलं नाव कमावलं. त्यामुळे 2017 साली टॉम करननं माघार घेतल्यानंतर होबार्ट हुरिकेन्सनं जोफ्राला करारबद्द केलं.

जोफ्रानं मेलबर्न रेनग्रेड्स विरुद्ध झालेल्या त्याच्या पहिल्याच बिग बॅश मॅचमध्ये मेडन ओव्हरसह दोन विकेट्स घेतल्या. जोफ्राने संपूर्ण स्पर्धेत 15 विकेट्स घेतल्या. इनिंगच्या शेवटच्या टप्प्यात चांगली बॉलिंग केली. तसंच एक चांगला फिल्डर म्हणूनही तो नावारुपाला आला. जोफ्राची ही कामगिरी पाहून राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 2018 साली त्याला करारबद्ध केले.

( Explained : राजस्थान रॉयल्सनं स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी का केली? )

जोफ्रासाठी नियम बदलला!

जोफ्रा वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडमध्ये आला होता. त्यामुळे इंग्लंडच्या नियमाप्रमाणे त्याला सात वर्षे कौंटी क्रिकेट खेळल्यानंतरच राष्ट्रीय टीमसाठी पात्र होता येणार होते. सात वर्षांची ही मुदत 2022 साली संपणार होती. या दरम्यानच्या काळात इंग्लंडमध्ये एक वर्ल्ड कप होणार होता.

जोफ्राचं नाव वाढू लागलं तसा त्याचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी देखील जोर धरु लागली. अखेर जोफ्रासाठी इंग्लिश क्रिकेट बोर्डाने सात वर्षांचा नियम थेट तीन वर्षांवर आणला वर्ल्ड कपपूर्वीच्या पाकिस्तान सीरिजमध्ये जोफ्राचा इंग्लंडच्या टीममध्ये समावेश झाला.

वर्ल्ड कपमध्ये जोफ्रा

इंग्लंडच्या टीममध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलरची गरज होती. ती गरज जोफ्रानं भरुन काढली. त्याने वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वात जास्त 20 विकेट्स घेतल्या. एकूण विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीतही तो मिचेल स्टार्क (27) आणि लॉकी फर्ग्युसन (21) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होता.

अर्थात जोफ्राची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी ही सुपर ओव्हरमध्ये होते. न्यूझीलंडला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सहा बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता होती. त्यावेळी इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गननं बिग बॅश, आयपीएलमध्ये शेवटच्या ओव्हरच्या दबावात बॉलिंग करण्याचा अनुभव असलेल्या जोफ्राच्या हातात बॉल दिला. जोफ्राने 6 बॉलमध्ये 15 रन दिले. इंग्लंडनं चौकाराच्या नियमावर वर्ल्ड कप जिंकला.

साहेबांच्या देशानं बार्बोडसच्या तरुण मुलासाठी (की कामगारासाठी?) नियम बदलले होते. त्यांची ही नियमातील फेरफार अखेर फळाला आली. इंग्लंडला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारी निर्णायक ओव्हर जन्माने ब्रिटीश असलेल्या नाही तर बार्बोडसमध्ये वयाची 20 वर्ष काढलेल्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने टाकली होती.

आयपीएलमधील MVP

जोफ्रा आर्चरसाठी मागील आयपीएल सिझन (IPL 2020 ) चांगलाच यशस्वी ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 6.55 च्या इकॉनॉमी रेटनं 20 विकेट्स घेतल्या. पॉवर प्लेमध्ये तर त्याचा इकॉऩॉमी रेट 4.34 इतका कमी होता. तसेच यामध्ये त्याने 10 विकेट्सही घेतल्या. त्याच्या 20 पैकी 15 विकेट्स या टॉप थ्री बॅट्समनच्या होत्या. त्याने आठ वेळा बॅट्समनना एक अंकी स्कोअरवरच आऊट केले होते.

त्याचबरोबर बॅटींगमध्येही आर्चरनं 179 च्या स्ट्राईक रेटनं बॅटींग केली. आर्चरच्या या ऑल राऊंड खेळामुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेत आठव्या क्रमांकावर राहन देखील आर्चरला Most Valuable  Player (MVP) पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

आर्चर आता 26 वर्षांचा झाला आहे. मागच्या सहा वर्षात त्याने क्रिकेटमुळे आयुष्यातील टोकाचं स्थित्यंतर बघितलं आहे. इंग्लंडच्या तीन्ही फॉरमॅटमधील अंतिम 11 चा सदस्य असलेल्या मोजक्या प्लेयरमध्ये आर्चरचा समावेश आहे. जगभरातील T20 टीमना तो हवा आहे. आता सलग दोन वर्ष दोन T20 वर्ल्ड कप होणार आहेत. जगभरात T20 चं महत्त्व वाढलं आहे. T10 चे देखील पडघम वाजू लागलेत. या पार्श्वभूमीवर आर्चरचं महत्व आगामी काळात आणखी वाढणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: