फोटो – ट्विटर/विस्डेन क्रिकेट

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1992) इंझमाम उल हकनं (Inzamam Ul Haq) बॉल पाईंटला टोलावला. त्याच्या पार्टनरनं  रन काढण्यासाठी नकार दिला. इंझमाम मागं वळाला. त्यावेळी इंझमामनं मारलेला तो बॉल अडवलेल्या फिल्डरनं काही मिली सेकंदाच्या आत थेट स्टंपवर झेप घेतली. इंझमामसह सर्व जग त्याचे फिल्डिंग कौशल्य पाहून थक्क झाले. हा प्रकार यापूर्वी कधीही कुणी क्रिकेटमध्ये पाहिला नव्हता. पुढील काळात त्याने केलेल्या अनेक अविश्सनीय फिल्डिंगची ती सुरुवात होती. क्रिकेट विश्वातील पहिला फिल्डिंग सुपरस्टार असलेल्या जॉन्टी ऱ्होडसचा आज वाढदिवस (Jonty Rhodes Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 जुलै 1969) जॉन्टीचा जन्म झाला.

फिल्डिंगची व्याख्या बदलली

जॉन्टी ऱ्होडसपूर्वी देखील अनेक चांगले फिल्डर होते. पण ते फक्त फिल्डिंगसाठी कधीही लक्षात राहिले नाहीत. बॅटींग आणि बॉलिंगप्रमाणेच फिल्डिंग हे देखील क्रिकेटमधलं तिसरं महत्त्वाचं अंग आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत असे. फक्त फिल्डिंगच्या जोरावर कुणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं नाही. जॉन्टीपूर्वी कुणाच्याही फिल्डिंगचे पोस्टर्स जगभर लागले नाहीत. त्यांना फिल्डिंगच्या जोरावर जाहिरीती मिळाल्या नाहीत. कोणत्याही टीमला स्वतंत्र फिल्डिंग कोच ठेवावा वाटला नाही. हे सर्व क्रिकेट विश्वात फक्त जॉन्टी ऱ्होडसमुळे आलं.

पॉईंट किंवा बॅकवर्ड पॉईंटला जॉन्टी फिल्डिंग करत असे. त्या दिशेला बॉल गेला की बॅट्समन रन काढण्यासाठी घाबरत. सचिन तेंडुलकरपासून ते 11 व्या नंबरपर्यंतच्या कोणत्याही बॅट्समनपर्यंत अनेकांना जॉन्टीकडं बॉल गेल्यावर रन काढण्याचा प्रयत्न केल्याची शिक्षा मिळाली आहे.

जॉन्टी क्रिकेटप्रमाणेच हॉकी देखील उत्तम खेळत असे. हॉकीमध्ये सेंटर फॉरवर्ड ही मोक्याची त्याची जागा होती. त्याची 1992 साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली होती. मात्र त्यावेळी आफ्रिका मुख्य स्पर्धेला पात्र झालीच नाही. त्यानंतर 1996 साली म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतरही अटलांटा ऑलिम्पिकसाठी त्याचे नाव शॉर्टलिस्ट झाले होते. त्यावेळी त्यानं दुखापतीमुळे माघार घेतली.

जॉन्टीचा जलवा

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध जॉन्टीनं घेतलेला रॉबर्ट क्राफ्टचा कॅच आठवतोय? (खालील व्हिडीओमधील पहिला कॅच पाहा) क्लुसनरच्या बॉलवर क्राफ्टनं तो शॉट मारताना काहीही चूक केली नव्हती. जॉन्टी अचानक हवेत झेपावला. तो कॅच जॉन्टीलाही पहिल्या प्रयत्नात पकडता आला नाही. बॉल जॉन्टीच्या मागे गेला. त्यावेळी डोळ्याचं पातं हलण्यापूर्वीच तो हवेतच 180 अंश कोनातून मागे वळाला. त्याने मागे वळून तो अविश्वसनीय कॅच घेतला.  

फिल्डिंग करणे ही देखील फॅशन असू शकते हे जॉन्टीनंच क्रिकेटला शिकवलं. ऐकेकाळी दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा जॉन्टीकडं जास्त जाहिराती होत्या. तो उडत्या पक्ष्याप्रमाणे मैदानात वावरत असे. क्रिकेटची आणि फिल्डिंगची मनापासून आवड असल्यानंच जॉन्टी सातत्यानं या अचाट गोष्टी करु शकला. फिल्डिंग ही एकमेव गोष्ट त्याला क्रिकेटच्या मैदानात दिवसों-दिवस, वर्षानुवर्षे सक्रीय ठेवण्यासाठी उपयोगी पडली. फिल्डिंगच्या प्रॅक्टीसमध्ये हरवलेल्या जॉन्टीमुळे (Jonty Rhodes Birthday) अनेकदा दक्षिण आफ्रिकेच्या टीमची बस सुटण्यास उशीर झाला आहे.

बॅट्समन जॉन्टी

52 टेस्टमध्ये 35.36 च्या सरासरीनं 2532 रन. 245 वन-डेमध्ये 35.11 च्या सरासरीनं 5935 रन ही जॉन्टीची बॅटींगमधील आकडेवारी फार ग्रेट नाही. पण तो एक उपयुक्त बॅट्समन होता. बॉब वुल्मर कोच झाल्यानंतर त्यांनी जॉन्टीच्या बॅटींगवर काम केले. त्याच्या खेळातील तांत्रिक दोष सुधारला. त्यानंतरच्या वर्षात त्याची टेस्टमधील सरासरीही 50 पेक्षा जास्त झाली.

जॉन्टीनं 1992 साली भारताविरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण केले. पहिल्या टेस्टमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) रन आऊट केले. क्रिकेट इतिहासात थर्ड अंपायरनं दिलेला तो पहिला रन आऊट. त्यानंतर जॉन्टीच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 आऊट 26 अशी झाली होती. त्यावेळी त्यानं केलेल्या 91 रनच्या खेळीमुळे आफ्रिकेला 292 पर्यंत मजल मारता आली.

त्याची टेस्टमधील पहिली सेंच्युरी देखील अशाच अडचणीच्या परिस्थितीमधील आहे. श्रीलंकेविरुद्ध चौथ्या इनिंगमध्ये 365 रनचा पाठलाग करताना आफ्रिकेची अवस्था आधी 3 आऊट 47 आणि नंतर 5 आऊट 126 झाली होती. त्यावेळी जॉन्टीनं 107 बॉलमध्ये नाबाद 101 रनची खेळी करत ती टेस्ट ड्रॉ केली. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर 117 रनची खेळी करत आफ्रिकेला ती टेस्ट जिंकून देण्याची कामगिरी देखील जॉन्टीनं केली आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये 2002 साली डर्बनमध्ये मॅकग्रा, गिलस्पी, शेन वॉर्न या बॉलिंग अटॅकसमोर   जॉन्टीनं 70 बॉलमध्ये 76 रन काढले. पाकिस्तान विरुद्ध त्याच मैदानात चार वर्षांपूर्वी 95 बॉलमध्ये नाबाद 94 रनची खेळी केली होती. सुरुवातीच्या काळात हिरो कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध 42 बॉलमध्ये 40 रन आणि नंतर पाच कॅच अशी दुहेरी कामगिरी जॉन्टीनं (Jonty Rhodes Birthday) केली आहे.

पाकिस्तानला 2 बॉलमध्ये 1 रन आणि संपूर्ण ‘बॉल आऊट’ झेपलं नाही!

रिटायरमेंटनंतरचा जॉन्टी

दक्षिण आफ्रिकेत 2003 साली वर्ल्ड कप होता. केनिया विरुद्धच्या मॅचमध्ये मॉरीस ओडूंबेचा कॅच घेताना जॉन्टी जखमी झाला. त्या दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. निराश जॉन्टीनं त्याचवेळी तडकाफडकी क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर इंग्लिंश कौंटीमध्ये जॉन्टीनं एका सिझनमध्ये 1000 पेक्षा जास्त रन करण्याचा रेकॉर्ड केला.

चुकलेल्या गणितासाठी लक्षात राहणारा ऑल राऊंडर!

जॉन्टी ऱ्होडस आयपीएलमध्ये आधी मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच होता. सध्या पंजाब किंग्जचा आहे. आजही तो त्याच्या टीममधील फिल्डर्सपेक्षा जास्त फिट वाटतो. जॉन्टीला तीन मुलं आहेत. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी त्यानं पितृत्वाची रजा घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या प्रकारची रजा घेणारा तो पहिला क्रिकेटपटू होता. पण, या तीन मुलांपेक्षा फिल्डिंगचा पालक म्हणून जॉन्टी ऱ्होडस (Jonty Rhodes Birthday) नेहमी लक्षात राहणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

   

error: