काही इनिंग मॅच जिंकून देतात, काही इनिंग रेकॉर्ड करतात तर काही इतिहास घडवतात. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1983) कपिल देवने (Kapil Dev) झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेल्या 175 रन्सच्या इनिंगने असाच इतिहास घडला आहे. आज कपिल देव यांचा वाढदिवस. आजच्याच दिवशी (6 जानेवारी 1959) रोजी कपिल देवचा जन्म झाला. कपिलच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटमधील सर्वात सोनेरी इनिंगला (Kapil Dev 175*) पुन्हा एकदा उजाळा देऊ या

1983 च्या वर्ल्ड कपपूर्वी भारतीय टीम ही क्रिकेटमधील साधारण टीम समजली जात असे. यापूर्वीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये भारताने फक्त एक मॅच जिंकली होती. 24 वर्षांच्या कपिलच्या टीममध्ये अनेक ऑलराऊंडर होते. त्या टीमने वेस्ट इंडिजला पहिल्याच मॅचमध्ये पराभूत केलं. त्यापाठोपाठ झिम्बाब्वेलाही हरवलं. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत झाल्याने भारताला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध विजय आवश्यक होता.

‘कपिल देव का जबाब नही’ – पेन किलर घेत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला केले होते पराभूत!

‘करो वा मरो’ लढत

भारतासाठी ‘करो वा मरो’ असलेल्या त्या लढतीत कपिल देवने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. पण या निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ कपिलवर आली होती. गावस्कर आणि श्रीकांत हे ओपनर भोपळाही न फोडता आऊट झाले. त्यापाठोपाठ मोहिंदर अमरनाथ (5) आणि संदीप पाटील (1) रन काढून परतले. कपिल बॅटिंगला आला तेंव्हा भारताची अवस्था 4 आऊट 9 अशी होती. कपिल मैदानात स्थिर होण्याच्या पूर्वी यशपाल शर्मा (9) आऊट झाला. भारत 5 आऊट 17. भारतीय टीमवर मानहानीकारक स्कोअरचे काळे ढग साठले होते.

कपिल देव एका बाजूने सावधपणे खेळत होता. रॉजर बिन्नीने थोडी साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील 22 रन्स काढून परतला. भारत 6 आऊट 77.  त्यापाठोपाठ रवी शास्त्री फक्त 1 रन काढून आऊट. भारत 7 आऊट 78.  भारताने मॅच जिंकण्याची शक्यता दूरपर्यंत कुठेही दिसत नव्हती. नवव्या क्रमांकावर मदनलाल खेळायला आला. मदनलालने कॅप्टनला साथ दिली. त्या दोघांनी 62 रन्सची पार्टरनरशिप केली. मदनलाल 17 रन्स काढून आऊट झाला. भारत 8 आऊट 140.  भारतानं मानहानीकारक स्कोअर टाळला होता,पण विजय जवळपास नव्हता. भारताचा आणखी एका वर्ल्ड कपचा शेवट खराब होण्याची शक्यता जास्त होती.

कपिलच्या मनात वेगळेच होते…

कॅप्टन कपिलच्या मनात वेगळेच होते. तो उत्तम पद्धतीने खेळत होता. आपल्याला निर्धारीत साठ ओव्हर्स पूर्ण खेळायच्या आहेत इतकेच त्याने दहाव्या क्रमांकावर आलेल्या सय्यद किरमाणीला बजावले. किरमाणीने कॅप्टनचा आदेश पाळला. त्या दोघांनी दहाव्या विकेट्ससाठी 126 रन्सची नाबाद पार्टनरशिप केली. त्यामध्ये किरमाणीचा वाटा 24 रन्सचा होता. भारताच्या इनिंगमधील दुसऱ्या क्रमांकाचा स्कोअर किरमाणीचाच होता.

कपिल देवनं दुसऱ्या बाजूने सर्व प्रकारची पडझड होत असतानाही सकारात्मकता आणि आक्रमकता सोडली नाही. त्याने मैदानाच्या सर्व बाजूला फटकेबाजी केली. भारताकडून वन-डे क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी त्याने मॅचच्या 49 व्या ओव्हरला झळकावली. त्यानंतर पुढील 11 ओव्हर्समध्ये आणखी आक्रमक खेळ करत 75 रन्स काढले. टी-20 सोडा ज्या काळात वन-डे क्रिकेटही फारसे खेळले जात नसे त्या काळात कपिल देवने नाबाद 175 रन्स फक्त 138 बॉल्समध्ये काढले. या खेळीत (Kapil Dev 175*) कपिलने 16 फोर आणि 6 सिक्सर्स लगावले होते.

‘अंपायरमुळे नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उद्दामपणामुळे मैदान सोडलं होतं’, 1981 च्या ‘वॉक आऊट’ चं गावस्करांनी सांगितलं सत्य! )

 भारत-झिम्बाब्वे मॅच बीबीसीच्या टेलिव्हजन कव्हरेजच्या वेळापत्रकात नव्हती. त्यामुळे कपिलच्या अविस्मरणीय खेळीचा व्हिडिओ उपलब्ध नाही. त्यामुळे ती खेळी आता कुणालाही कधीही पुन्हा पाहता येणार नाही. मैदानात उपस्थित असलेल्या भाग्यवान प्रेक्षकांनाच ती इनिंग अनुभवता आली. आता त्या खेळीला चार दशकं होतं आली तरीही त्याचे विस्मरण झालेले नाही. त्या खेळीच्या आठवणी या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होतात. कपिल देव नाबाद 175 ही इनिंग आता एक खरी असलेली फँटसीच बनलेली आहे.

कपिल देवच्या इनिंगची वैशिष्ट्ये

भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये झळकावलेली पहिली सेंच्युरी
BBC च्या धोरणामुळे मॅचचा व्हिडिओ कुठेही उपलब्ध नाही
कपिल देवची वन-डे क्रिकेटमधील पहिली आणि एकमेव सेंच्युरी
भारताकडून एका वन-डे इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड कपिलच्या नावावर सोळा वर्षे होता. सौरव गांगुलीने 1999 साली तो रेकॉर्ड मोडला
कपिल – किरमाणी जोडीनं नवव्या विकेट्ससाठी 126* रन्सची पार्टरनरशिप करत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. मॅथ्यूज- मलिंगा जोडीनं 27 वर्षांनी 2010 साली तो रेकॉर्ड मोडला
वन-डे क्रिकेटमध्ये सहा किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर बॅटिंगला येऊन सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आजही कपिल देवच्याच नावावर आहे.

संपूर्ण देश जोडला!

कपिल देवच्या त्या खेळीनं प्रभावित होऊन भारतानं झिम्बाब्वेला त्या मॅचमध्ये पराभूत केलं आणि पुढे वर्ल्ड कपमधील सर्व मॅच जिंकून विजेतेपद पटकावले. सचिन तेंडुलकरसह अनेक जण वर्ल्ड कप विजेतेपद पाहून प्रभावित झाले. भारतीयांचा क्रिकेट हा धर्म बनला. पुढे याच धर्माला सचिन तेंडुलकर हा देव मिळाला. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवने झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेल्या 175 रन्सच्या (Kapil Dev 175*) इनिंगने संपूर्ण भारताला क्रिकेटशी जोडण्याचे काम केलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: