फोटो – स्पोर्ट्स कीडा

टीम इंडियाने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्नमध्ये (Melbourne) झालेली बॉक्सिंग डे टेस्ट जिंकली आहे. भारतीय टीम जेंव्हा-जेंव्हा मेलबर्नच्या मैदानावर उतरते त्या प्रत्येक वेळी कपिल देव यांच्या भन्नाट स्पेलमुळे टीम इंडियाने 1981 साली ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या अविस्मरणीय विजयाच्या आठवणी ताज्या होतात. तापाने फणफणाऱ्या कपिल देवनं त्या मॅचमध्ये तब्येतीची पर्वा न करत ‘पेन किलर’ घेत भारताला विजय मिळवून (Kapil Dev Melbourne Test) दिला होता.

मेलबर्न जिंकणे होते आवश्यक

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टेस्टमधील सिडनीमध्ये झालेली पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्या 174 रन्सच्या खेळीमुळे भारताने ॲडलेड टेस्ट ड्रॉ केली. त्यामुळे सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या टीमला सीरिज बरोबरीत सोडवण्यासाठी मेलबर्न टेस्ट जिंकणे आवश्यक होते.

मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांनी टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा बॅटिंगचं निमंत्रण दिलं. गुंडप्पा विश्वनाथ यांच्या 114 रन्सच्या खेळीनंतरही भारताला पहिल्या इनिंगमध्ये 237 पर्यंतच मजल मारता आली होती. ऑस्ट्रेलियाने ॲलन बॉर्डरच्या सेंच्युरीच्या जोरावर पहिल्या इनिंगमध्ये 187 रन्सची आघाडी (Kapil Dev Melbourne Test) घेतली.

टेस्ट क्रिकेटच्या काळातील T20 स्टार! एका खराब फटक्याची मोजली किंमत

भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवात तर चांगली केली. सुनील गावस्कर-चेतन चौहान जोडीनं 165 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली होती. त्यावेळी गावस्कर यांना LBW आऊट देण्याचा अंपायर्सचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. गावस्कर यांनी त्यावेळी चेतन चौहान यांना घेऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. टीम मॅनेजमेंटने त्यांची समजूत घातल्याने पुढील अनर्थ टळला. भारताची दुसरी इनिंग 324 रन्सवर संपुष्टात आली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला मेलबर्न टेस्टसह ती सीरिज जिंकण्यासाठी 143 रन्स हवे होते.

ग्रेग चॅपेलच्या ऑस्ट्रेलियासाठी ते किरकोळ आव्हान होतं. भारतीय फॅन्सनाही विजयाच्या फार आशा नव्हत्या. पण, कपिल देवच्या मनात वेगळेच होते. हरयाणाचा कपिल कमी कालावधीत भारतीय फास्ट बॉलिंगचा मुख्य चेहरा बनला होता. मेलबर्न टेस्टमध्ये कपिलची ती ओळख आणखी ठळक होणार (Kapil Dev Melbourne Test) होती.

तापाणे फणफणत होता कपिल….

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगच्या वेळी कपिल देव तापाने फणफणत होता. त्याने मैदानावर न उतरता विश्रांती घेतली असती तरी ते अगदी स्वाभाविक होतं. पण तो कपिल देव होता. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 आऊट 24 अशी झाल्यानंतर त्यांच्यावर निर्णायक घाव घालण्यासाठी कॅप्टन गावस्करला कपिल हवा होता. कपिल अक्षरश: ‘पेन किलर’ घेऊन खेळत होता.

खराब तब्येतीचा कपिलच्या बॉलिंगवर काही परिणाम झाला नाही. उलट त्यामुळे त्याचा लढण्याचा निर्धार आणखी दृढ झाला. कपिलनं 16.4 ओव्हर्समध्ये 28 रन्स देत पाच विकेट्स घेतल्या. त्यामध्ये पहिल्या इनिंगचा शतकवीर ॲलन बॉर्डरच्या विकेटचा ही समावेश होता. कपिलच्या या बॉलिंगमुळे भारताने ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 83 रन्समध्येच गुंडाळली, आणि मेलबर्न टेस्ट 59 रन्सने जिंकली.

‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज!

भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणाऱ्या गुंडप्पा विश्वनाथ यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. सर्व क्रिकेट फॅन्सच्या मनातील ‘मॅन ऑफ द मॅच’ मात्र कपिल देव होता. क्रिकेटमधील ‘कपिल देव युगा’ला मेलबर्नमधील विजयानंतर (Kapil Dev Melbourne Test) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: