
मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये मॅच जिंकण्यासाठी भक्कम टॉप ऑर्डर प्रमाणेच उत्तम फिनिशरची आवश्यकता असते. टॉप ऑर्डरचे बॅट्समनकडं भक्कम सुरुवात करुन देण्याचं तर फिनिशरकडं मॅच संपवण्याचं काम असतं. वन-डे क्रिकेटला फिनिशर या शब्दाची खऱ्या अर्थानं ओळख करुन देणारा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मायकल बेव्हन (Michael Bevan). त्याचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी (8 मे 1970) रोजी बेव्हनचा जन्म झाला. टॉप ऑर्डरनं रचलेल्या पायावर बेव्हननं कळस तर चढवलाच. पण अनेकदा अगदी पाया बनवण्यासाठी स्वत:ला गाडून घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयाची इमारत त्यानं उभी केली.
टेस्ट क्रिकेटमध्ये सुरुवात
मायकल बेव्हननं 1989 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली. ऑस्ट्रेलियाचा महान बॅट्समन अॅलन बॉर्डर (Allan Border) रिटायर झाल्यानंतर 1994 साली त्याची टेस्ट टीममध्ये निवड झाली.
पाकिस्तान विरुद्ध कराची टेस्टमध्ये बेव्हननं पदार्पण केलं. पहिल्याच टेस्टमध्ये वासिम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनुस (Waqar Younis) यांचा सामना करत त्यानं 82 रन काढले. त्या सीरिजमध्ये त्यानं नंतर आणखी 2 हाफ सेंच्युरी झळकावल्या. पण शॉर्ट बॉलवर आऊट होण्याच्या बेव्हनच्या सवयीमुळे त्याचं टेस्ट करियर बहरलं नाही. त्यानं 18 टेस्टमध्ये 29.03 च्या सरासरीनं 785 रन केले. 6 हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या बेव्हनला एकही टेस्ट सेंच्युरी झळकावता आली नाही. पण तो दोन वेळा 80 पेक्षा जास्त रन काढून अन्य सर्व बॅट्समन आऊट झाल्यानं नॉट आऊट परतला होता.
वन-डे क्रिकेटमध्ये लौकिक
मायकल बेव्हनला (Michael Bevan) तो कधीही वन-डे क्रिकेटमध्ये यशस्वी होईल असं वाटलं नाही. आपण 100 टेस्ट खेळू असं त्याला वाटलं होतं. पण, त्याला वन-डे क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं लौकिक मिळाला. त्यानं वन-डे मध्ये बहुतेक काळ सहाव्या क्रमांकावर बॅटींग केली. गिलख्रिस्ट, हेडन/मार्क वॉ, पॉन्टिंग, लेहमन, डेमियन मार्टीन, स्टीव्ह वॉ या सारख्या दिग्गज बॅट्समननंतर बेव्हन बॅटींगला यायचा. अनेकदा या सर्वांनी खेळून शिल्लक असलेले कमी बॉल त्याच्या वाट्याला येत. किंवा काही वेळा सगळे लवकर पडल्यावर ‘कार्य सिद्धीस नेण्याची’ सर्व जबाबदारी बेव्हनच्या खांद्यावर येई. तो या दोन्ही परीक्षेत वारंवार यशस्वी ठरला.
त्याच्याकडे गॅपमध्ये बॉल ढकलण्याची हातोटी होती. पायामध्ये एक रनचं दोन रनमध्ये रुपांतर करण्याचा वेग होता. V मध्ये सतत शॉट्स मारणे, मिड विकेटला फोर लगावणे किंवा खणखणीत कव्हर ड्राईव्ह लगावणे हे त्याच्या बॅटींगचं वैशिष्ट्य. त्याचबरोबर ‘चिकी शॉट्स’ लगावण्यातही बेव्हनचा हातखंडा होता. दबावात खेळणे, झटपट निर्णय आणि धोका पत्कारण्याची तयारी हे तीन गुण बेव्हनकडं होते. त्याचमुळे तो सर्वोत्तम फिनिशर बनू शकला.
जिनिअस शब्दही ज्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे असा ब्रायन लारा!
बेव्हन ‘The Finisher’
मायकल बेव्हनच्या करियरमध्ये 1 जानेवारी 1995 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेली मॅच खूप महत्त्वाची आहे. सिडनीमध्ये झालेली ती मॅच पावसामुळे 43 ओव्हरची खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियासमोर मॅच जिंकण्यासाठी 173 रनचं आव्हान होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची परिस्थिती आधी 6 आऊट 38 आणि नंतर 7 आऊट 74 अशी होती.
बेव्हननं पॉल रायफल, शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्रा या बॉलर्सना घेऊन मॅच पुढे रेटली. शेवटच्या ओव्हरमध्ये तर बेव्हनसोबत फक्त मॅग्रा उरला होता. अगदी शेवटच्या बॉलवर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 4 रनची आवश्यकता होती. त्यावेळी बेव्हननं फोर मारत ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून दिली. त्या मॅचमध्ये मायकल बेव्हन ‘The Finisher’ चं दर्शन जगाला पहिल्यांदा झालं.
अविस्मरणीय इनिंग
मायकल बेव्हननं त्याच्या वन-डे करियरमध्ये अनेक अविस्मरणीय इनिंग खेळल्या. मेलबर्नमध्ये 2002 साली न्यूझीलंड विरुद्ध 246 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 6 आऊट 82 होती. बेव्हननं नाबाद 102 रन काढले आणि 2 विकेट्स राखून मॅच जिंकून दिली.
1999 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 आऊट 68 असा स्कोअर असताना बेव्हन बॅटींगला आला. तो अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळला. त्यानं ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जास्त 65 रन केले. त्यामुळे 213 पर्यंत स्कोअर पोहचला. ती मॅच पुढे टाय झाली आणि ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये प्रवेश केला आणि वर्ल्ड कप जिंकला.
2003 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 205 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 आऊट 135 होती. मायकल बेव्हननं (Michael Bevan) अॅण्डी बिचेल सोबत 9 व्या विकेटसाठी नाबाद 73 रनची पार्टरनरशिप केली आणि 2 बॉल बाकी असताना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ही बेव्हनच्या बेस्ट फिनिशरची साक्ष सांगणारी प्रमुख उदाहरणं आहेत.
बेव्हनची आकडेवारी
मायकल बेव्हननं 232 वन-डेमध्ये 53.58 च्या सरासरीनं रन केले. आजही ही वन-डे क्रिकेटमधील 5 व्या क्रमांकाची सरासरी आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना 51.66, दुसऱ्यांदा बॅटींग करताना 56.50 तर जिंकलेल्या वन-डे मध्ये 65.24 अशा चढत्या क्रमानं बेव्हनची सरासरी आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 6 व्या आणि 7 व्या या फिनिशरच्या क्रमांकावर बॅटींगला येत बेव्हननं अनुक्रमे 56.71 आणि 48.22 च्या सरासरीनं रन काढले आहेत.
कारकिर्दीचा शेवट
मायकल बेव्हननं 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करुनही त्याला 2004 साली ऑस्ट्रेलियाच्या वन-डे टीममधून वगळण्यात आलं. त्यानंतरही त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं रन केले. एका सिझनमध्ये 8 सेंच्युरीसह 97.60 च्या सरासरीनं रन करुनही त्याचा विचार झाला नाही. त्यातच दुखापतीमुळे त्याचा तीन वर्षातील बराच काळ वाया गेला.
पहिल्या बॉलपासून जिंकण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन!
2007 च्या वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्यानं बेव्हननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण त्यापूर्वी त्यानं त्याच्याच नावाच्या मायकल हसीकडं (Michael Hussey) बॅटन सोपवलं होतं. सुरुवातीच्या काळात नवा बेव्हन म्हणून ओळखला जाणारा हसी काही वर्षातच ‘मिस्टर क्रिकेट’ म्हणून प्रसिद्ध झाला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.