
ऑस्ट्रेलियानं भारतामध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली त्याचा हिरो हा पॉन्टिंग, मार्क किंवा स्टीव्ह वॉ अथवा स्टीव्ह स्मिथ देखील नव्हता. तर त्या सीरिजचा हिरो होता मायकल क्लार्क (Michael Clarke). मायकल क्लार्कचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (2 एप्रिल 1981) रोजी क्लार्कचा जन्म झाला.
मायकल क्लार्कला त्या काळातील इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा लवकर म्हणजे वयाच्या 23 व्या वर्षीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची परवानगी मिळाली. रिकी पॉन्टिंग जखमी झाल्यानं 2004 च्या बंगळुरु टेस्टमध्ये तो थेट अंतिम 11 मध्ये खेळला. त्याने पहिल्याच इनिंगमध्ये सायमन कॅटीच (Simon Katich) सोबत पाचव्या विकेटसाठी पार्टरनरशिप केली. पुढे याच कॅटीचशी क्लार्कचे मोठे मतभेद झाले. क्लार्कच्या कॅप्टनसीवर कॅटीचनं अनेक प्रश्न उपस्थित केले.
रिकी पॉन्टिंग आणि निवड समितीचा पाठिंबा मिळूनही क्लार्कला ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये तितकी लोकप्रियता मिळाली नाही. तो ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये चार नंबरचा सर्वाधिक रन काढणारा खेळाडू आहे. तरीही त्याला बॉर्डर, पॉन्टिंग किंवा स्मिथ इतका ग्रेट कधीही मानण्यात आले नाही. एक वर्षात (2012) एक ट्रिपल सेंच्युरीसह चार डबल सेंच्युरी क्लार्कने लगावल्या. तरही त्याला कधी लारा-सचिन-पॉन्टिंग या त्रिमुर्तीच्या गटात स्थान मिळाले नाही.
वादग्रस्त करियर
या उलट त्याच्यावर (Michael Clarke) सतत स्वत:ला पाचव्या क्रमांकावर ब्लॉक करण्याचे आरोप झाले. स्वत: पाचव्या क्रमांकावर खेळून ऑस्ट्रेलियाच्या अनअनुभवी बॅट्समन्सना वर ढकलण्याचे आरोप त्याच्यावर झाले. 2013 मधील भारत दौऱ्यात चार खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा त्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. फक्त सायमन कॅटीच नाही तर सायमंड्स, माईक हसी, मिचेल जॉन्सन, शेन वॉट्सन या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी देखील त्याच्या कॅप्टनसीच्या पद्धतीवर कधी ना कधी नाराजी व्यक्त केली.
( वाचा : मॅग्राची उंची, ब्रेट ली चा वेग आणि अक्रमचा स्विंग )
जिंकण्यासाठी खेळणारा कॅप्टन
हे जरी असलं तरी टीमला महत्त्व देणारा कॅप्टन म्हणून त्याची नेहमी नोंद होईल. अनेकदा त्याने अगदी प्रोअँक्टीव्ह पद्धतीनं कॅप्टनसी केली. मैदानात गेल्यावर पहिल्या बॉलपासून तो मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्याच कॅप्टनसीखाली ऑस्ट्रेलियानं टेस्ट क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नंबर 1 रँकिंग मिळवले. इंग्लंडला 5-0 असे पराभूत केले. त्याचबरोबर 2015 चा क्रिकेट वर्ल्ड कप देखील जिंकला.
मायकल क्लार्कला त्याचे संपूर्ण करियरमध्ये पाठदुखीने छळले. टेस्ट सीरिजच्या दरम्यान त्यासाठी तो रोज पहाटे पाच वाजता डॉक्टरकडून पाठ दुखीवर उपचार करुन घेत असे. त्यासाठी रात्री साडेआठ वाजता झोपण्याची सवय त्याने लावून घेतली होती. या सवयीमुळे तो अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये फार मिसळलाच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचे गैरसमज वाढले.
मित्राला अनोखी मानवंदना
मायकल क्लार्कमधील (Michael Clarke) लपलेला माणूस फिलिप ह्युजेस (Philip Hughes) याच्या अपघाती मृत्यूनंतर जगाला दिसला. ह्युजेस हा क्लार्कचा अगदी जवळचा मित्र होता. त्याच्या मृत्यूचा मोठा धक्का त्याला बसला. तरीही त्याच्या मृत्यूच्या वेळी क्लार्कने केलेलं भाषण त्याच्या धैर्यशील वृत्तीची साक्ष देणारं आहे. ह्युजेसच्या मृत्यूनंतर लगेच भारताविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये त्याने सेंच्युरी झळकावत आपल्या प्रिय मित्राला अनोखी मानवंदना दिली.
शेन वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाचा सुरु झालेला स्पिनरचा शोध हा नॅथन लायनपाशी (Nathan Lyon) संपला. नॅथन लायनला टीममध्ये स्थिर करण्यात क्लार्कच्या कॅप्टनसीचा मोठा वाटा होता. त्याने लायनचा उत्तम वापर केला. त्याला वेगवेगळ्या वेळी बॉलिंगसाठी तयार केलं. पीटर सीडल, रायन हॅरीस या बॉलर्सनाही क्लार्कने तयार केले.
( वाचा : गावसकर, सेहवाग नंतरचा यशस्वी भारतीय ओपनर! )
क्लार्क आला तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. त्याचा बॅटींगमधील दर्जा आणि वय पाहता पॉन्टिंगनंतर क्लार्ककडे कॅप्टनसी सोपवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घेतला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची घसरण पॉन्टिंगच्या काळातच सुरु झाली होती. ती थांबवण्याचा प्रयत्न क्लार्कनं केला. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप देखील जिंकला. पण बॅटींगमधला खराब फॉर्म, इंग्लंड विरुद्ध अँशेसमध्ये पराभव आणि फिलिप ह्युजेसच्या मृत्यूनंतर आलेलं एकाकीपण यामध्ये क्लार्क अडकला आणि अखेर रिटायर झाला. पण पहिल्या बॉलपासून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन म्हणून तो (Michael Clarke) कायम ओळखला जाईल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.