फोटो – ट्विटर /DHONism

लेखक: निरंजन वेलणकर

महेंद्रसिंह धोनी! भारताच्या क्रिकेट जगामधल्या असंख्य दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये एका अर्थाने ‘प्रस्थापित’ नसूनही स्वतःची वेगळी ओळख व स्वतःचा वेगळा क्लास निर्माण करणारा कॅप्टन कूल! असंख्य आव्हाने, खडतर परिस्थिती आणि दडपण ह्यांचा यशस्वी ‘सामना’ करणारा परफेक्शनिस्ट अवलिया कलाकार! धोनीबद्दल बोलायचं तर (MS Dhoni Birthday Special) कुठून सुरुवात करायची हा प्रश्न पडतो. मग आठवतात त्याने सुरुवातीच्या ज्या मालिकांमधून आपल्या आगमनाची घोषणा केली त्या मालिका, विशेषतः श्रीलंकेविरुद्ध व पाकिस्तानविरुद्धची धमाकेदार शतकं, 100 हून ही पुढचा स्ट्राईक रेट, मोठे फटके मारण्यातली सहजता, नजाकत आणि अर्थातच लांब केस!!!

धोनीची पहिली आठवण

पण एक क्रिकेट चाहता म्हणून माझी धोनीची पहिली आठवण अगदी वेगळी आहे! जानेवारी 2005 मध्ये नेहरू स्टेडियमवर एक देवधर करंडक सामना बघायला गेलो होतो. कैफ, सेहवाग अशा दिग्गजांना बघायला मिळणार ह्याचा आनंद होता. मॅचच्या आधीच तिथे पोचलो तेव्हा एक खेळाडू ग्राउंडला पळत फेरी मारत होता. त्याचा वॉर्म अप चालू होता. मी त्याला ओळखलं नाही, सोबतच्या मित्राने मला सांगितलं, अरे हा धोनी! अलीकडेच बांग्लादेशाविरुद्ध पदार्पण केलं नाही का, तो! त्यानंतर लगेचच तो प्रसिद्ध झाला. 2005- 2006 काळ हा धोनी 1.1 चा होता! एका वेळेस तर दीड वर्षाच्या करीअरमध्ये त्याचा वन डेतला स्ट्राईक रेट 108 व सरासरी 53 होती! असा हा धोनी. त्याने श्रीलंका व पाकिस्तानला दिलेला मार ते अजूनही विसरले नाहीत.

सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड, युवराज अशा दिग्गजांच्या काळात त्याला खूप मेहनतीने टीममध्ये स्थान मिळालं व बघता बघता तो टीमचा आधारस्तंभ आणि नंतर कर्णधारही झाला. ह्या सगळ्यांच्या खेळाचा आणि T20 युगाचा परिणाम त्याच्यावर झालेला दिसतो. सचिनचं सातत्य, सेहवागचा वेग, द्रविडची स्थितप्रज्ञता, गांगुलीची कॅप्टन्सी व आक्रमकता व युवराजची चपळाई ह्या सगळ्यांचं एक सुंदर पॅकेज म्हणजे कोणत्याही अनहोनीला ठामपणे नही म्हणणारा धोनी! त्याला लाभलेली टीमही तितकीच दर्जेदार होती. पुढे त्याने स्वतःच्या संघर्षाला लक्षात घेऊन युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आणि टीम पुढे नेली. फिटनेसचं व दडपण झुगारून देण्याचं वर्क इथिक निर्माण केलं.

दॅट्स द वे माही वे !

एक बॅटसमन म्हणून वनडेमध्ये धोनी महान आहेच. टेस्टमध्ये तो महान बॅटसमन नसला तरी चांगला होता. भुवनेश्वर कुमारच्या सोबतीमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले 224 रन्स कोण विसरू शकेल! पण ह्या सर्वांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तो महान विकेटकीपर व कर्णधारही (MS Dhoni Birthday Special) होता!

फक्त थोडी कल्पना करून बघूया- प्रत्येक चेंडू फेकला गेल्यावर उठाबशासारखं खाली वाकून उडी मारून उठायचं. कसोटीमध्ये तर एका दिवसात सहज 300-400 वेळा ही उठबस करायची! सतत बॉलर्स व फिल्डर्सना चीअर करत राहायचं. त्याबरोबर कॅप्टन्सीचा सगळा ताण सहन करायचा. लोकांकडून चांगला खेळ करून घ्यायचा! त्यात झहीर खानसारखे बॉलर्स! बॅटींग येईल तेव्हा मोठ्या इनिंग खेळायच्या! आणि वनडेमध्ये तर मॅचेस संपेपर्यंत बॅटींग करायची! दॅटस द वे माही वे! ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना करूनच दमायला होतंय! हे धोनीने अनेक वर्षं केलं म्हणूनच तो धन्य आहे! त्याला बघून आपणही धन्य झालो आहोत.

Dhoni finishes off in style! आणि भारत पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

ग्रेट प्रोसेस मॅन

धोनीच्याच शब्दांत सांगायचं तर तो काही ग्रेट बॅटसमन नव्हता. पण तो एक ग्रेट पॅकेज नक्कीच होता. एक ग्रेट प्रोसेस मॅन होता! त्याची कोणतीही मुलाखत उघडून बघितली तर हेच शब्द दिसतील- doing the right processes, bowling in the right areas! त्या अर्थाने ‘काबिल बनो, सफलता अपने आप आएगी’ हा त्याचा मंत्र होता! क्रिकेटच्या भाषेत “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हे सांगणारा तो द्रष्टा धुरंधर (MS Dhoni Birthday Special) होता!

बॅटींग निर्वाण- झेन स्थितप्रज्ञता हे शब्द कोहलीबद्दल वापरले गेले, पण त्यांची पहिली झलक धोनीने घडवली होती. कितीही प्रेशर सिच्युएशन असली तरी त्यातही स्थिर चित्त असलेला तो युधि-ष्ठिर होता! राहुल द्रविड आणि लक्ष्मणनंतर बिकट परिस्थितही “साक्षी” राहण्याची इतकी स्थितप्रज्ञता धोनीतच बघायला मिळते. आणि गमतीची गोष्ट म्हणजे ह्यावरून टीकाही झाली की तो कमालीचा थंड असतो, अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेतो वगैरै. किंवा त्याने भारतापेक्षा क्लब क्रिकेटच्या मॅचमध्ये जास्त जान लावली इ. इ. बोललं जातं.

ICC च्या दशकातील सर्वोत्तम टीममध्ये भारतीयांचा दबदबा, धोनी आणि कोहलीला मिळाला सर्वोच्च बहुमान

धोनीनं आपल्याला काय दिलं?

धोनी काय किंवा कोणताही खेळाडू काय, परफेक्ट कोणीच नसतो. पण त्याने त्याच्या imperfect क्षमतांचा परफेक्ट वापर केला. More often than not त्याने त्याच्याकडे असलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून देशाला गौरव मिळवून दिला. आणि ज्या सामान्य जनतेचा- गरीब युवकांचा तो प्रतिनिधी होता, त्यांना त्याने If he can, then I also can ही मोठी प्रेरणा दिली, हा आत्मविश्वास मिळवून दिला. अशा आयुष्याहून मोठा परिणाम घडवून आणणा-या खेळाडूंचं खरं योगदान हेच असतं.

धोनीचा हा सर्व प्रवास आपल्याला त्याच्या आयुष्यावरील चित्रपटातही बघायला मिळतो. तो आपल्यासारखाच होता, तरीही आपल्यासारखा राहिला नाही, ही जाणीव होते. धोनीसारख्या खेळाडू त्यामुळे कधीच “पल दो पल” ची भूतकाळातली आठवण होत नाही. तो नेहमीच आपल्यामध्ये असतो. मनाने “हर एक पल” आपल्यातच असतो. अशा ह्या विलक्षण माहीला वाढदिवसाच्या (MS Dhoni Birthday Special) हार्दिक शुभेच्छा!  

(निरंजन वेलणकर, हे फिटनेसप्रेमी, सायकलिस्ट आणि क्रिकेट फॅन आहेत. तुम्ही त्यांना niranjanwelankar [at] gmail [dot] com या ईमेलवर संपर्क करु शकता. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: