फोटो – BCCI

आधुनिक काळातील अनेक बॅट्समन्सनी शालेय क्रिकेटमध्ये भरपूर रन केले आहेत. मुरली विजय (Murali Vijay) त्याबाबतीत अपवाद आहे. त्याची शालेय स्तरावरील कामगिरी इतकी साधारण होती की त्यामुळे त्याला सतत शाळा बदलाव्या लागल्या. दहा वर्षात आठ ते नऊ शाळेत शिकलेल्या विजयला वयाच्या 13 व्या वर्षानंतर शालेय क्रिकेट खेळायलाच मिळाले नाही. तो थेट 17 व्या वर्षी लेदर बॉलने खेळू लागला. प्राथमिक अवस्थेत क्रिकेटचे शास्त्रीय धडे न गिरवता ही सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर ओपनर म्हणून भारताकडून सर्वात जास्त सेंच्युरी झळकावणाऱ्या मुरली विजय याचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (1 एप्रिल 1984) रोजी विजयचा जन्म झाला.

पहिला रणजी सिझन जोरदार

विजयनं 17 व्या वर्षी क्लब लेव्हलला क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याला 22 व्या वर्षी 2006 साली तामिळनाडूकडून रणजी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सिझनमध्ये विजयनं तामिळनाडूकडून सर्वात जास्त रन काढले. कर्नाटकचा रॉबिन उथप्पा आणि बंगालचा मनोज तिवारीनंतर त्या सिझनमध्ये सर्वात जास्त रन करणारा तो तिसरा बॅट्समन बनला.

अभिनव मुकंद (Abhinav Mukund) सोबत 462 रनची ओपनिंग पार्टरनरशिप केल्यानंतर विजयचं नाव खऱ्या अर्थानं चर्चेत आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2008 साली झालेल्या नागपूर टेस्टमध्ये गौतम गंभीरवर एका टेस्टची बंदी आल्यानं विजयला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली.

( वाचा : ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’ )

बदली खेळाडू ते नंबर 1 ओपनर

विजय भारतीय टीममध्ये जागा बनवत होता त्या काळात अनेक दिग्गज खेळाडू टीम इंडियाकडून खेळत होते. यापैकी कुणी जखमी झाले तरच विजयला सुरुवातीला संधी मिळाली. गौतम गंभीरच्या अनुपस्थितीमुळे त्याचे पदार्पण झाले. तर 2010 साली बांगलादेशच्या दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये लक्ष्मण जखमी झाल्यामुळे पाचव्या तर नंतर राहुल द्रविड जखमी झाल्यानं तिसऱ्या क्रमांकावरही विजयनं (Murlai Vijay) बॅटींग केली आहे. 2010 साली बंगळुरुमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या पहिल्या टेस्टमध्ये विजयनं पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. सचिनसोबत 300 पेक्षा जास्त रनची पार्टरनरशिप केली. तरीही त्याची टेस्ट टीममधील जागा नक्की नव्हती.

गौतम गंभीरचा फॉर्म हरपल्याने 2013 साली विजय टेस्ट टीममध्ये परतला. त्यानंतर विजयनं टीममधील जागा घट्ट केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्या सीरिजमध्ये विजयनं सलग दोन टेस्टमध्ये 150 पेक्षा जास्त रन काढले. त्यानंतर पुढच्या वर्षी ट्रेंट ब्रिजमध्ये इंग्लंड विरुद्ध 146 रन काढत परदेशातील पहिली सेंच्युरी झळकावली.

कसबी कारागीराची बॅट

विजय रंगात असताना फ्रंट फुट आणि बॅक फुट या दोन्ही आघाड्यांवर तो सहजगत्या खेळू शकतो. मिडविकेटला बॉल फ्लिक करताना भारतीय बॅट्समनमधील कलात्मक सौंदर्य त्याच्या बॅटमध्ये दिसतं. बॅक कट खेळताना जगातील सर्वात जास्त वेळ त्याच्याकडे असतो. तसेच अगदी T20 मॅचमध्ये स्पिनर्सला भिरकावून देताना त्याची बॅट कधीही हातोडा वाटली नाही.

बंगळुरु, हैदराबाद, मोहाली, लॉर्ड्स, ट्रेंट ब्रिज, ब्रिस्बेन, अँडलेड आणि दरबन या क्रिकेट विश्वातील वेगवेगळ्या भागात विजय उभा राहिला आणि त्याने रन काढले. डिसेंबर 2013 ते जानेवारी 2015 या काळात भारतानं दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात क्रिकेट खेळले. या काळात मुरली विजय (Murali Vijay) सर्वात जास्त बॉल खेळलेला भारतीय बॅट्समन होता. त्याने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त रन काढले तसंच 40 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या तीन भारतीय बॅट्समपैकी तो एक आहे.

लॉर्ड्समध्ये 2014 साली विजयनं याच कसबी कारागीराच्या बॅटने 95 रन काढले आणि भारताला टेस्ट मॅच जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. शिखर धवन आणि केएल राहुल या टीम इंडियातील त्याच्या स्पर्धक बॅट्समनपेक्षा विजय टेस्ट क्रिकेटमध्ये किती तरी पुढे होता.

( वाचा : ON THIS DAY : नजफगडचा नवाब बनला मुलतानचा सुलतान )

विजयचा बॅडपॅच

‘टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून यशस्वी होण्यासाठी तुम्हाला विरेंद्र सेहवाग किंवा एलिस्टर कुक व्हावं लागेल’ अशी विजयची (Murali Vijay) फिलॉसॉफी होती. भारतीय क्रिकेटमधील धोनी युग संपून कोहली युग आलं तरी विजयचा खेळ पहिल्या वर्षी चांगला होता. 2017 च्या अखेरीस भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेला गेली आणि त्यानंतर विजयचा बॅडपॅच सुरु झाला.

1,13,46,9,8,25,20,6,0, 0 अशी विजयची कामगिरी घसरत गेली. 2018 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये विजयला दोन्ही डावात भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे त्याची टीममधून हकालपट्टी झाली.

आता संधी अवघड

इंग्लंड दौऱ्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात विजयला टीममधून वगळण्यात आले. याच दौऱ्यात पृथ्वी शॉचा उदय झाला. नंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मयांक अग्रवाल टीममध्ये आला आणि विजय मागे पडला. आता रोहित शर्मा हा टेस्टचा ओपनर म्हणून स्थिरावला आहे. त्याला जोडीदार म्हणून शुभमन गिल, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यात स्पर्धा आहे. वन-डे आणि T20 टीमचा सदस्य असलेला शिखर धवन देखील टेस्टच्या टीममधून बाहेर पडला आहे. तर फक्त टेस्ट स्पेशालिस्ट असलेल्या आणि आज वयाची 37 वर्ष पूर्ण करणाऱ्या विजयसाठी टीम इंडियाचे दार हे जवळपास बंद झाले आहे.

( वाचा : इशांत शर्मा @ 100, ‘वो तो है अलबेला, हजारों मे अकेला’! )

विजयसाठी भारतीय टीममधील कमबॅक हे स्वप्नवत आहे, पण त्याची कसबी करागीरासाराखी बॅटींग आणि गावसकर-सेहवाग नंतर 10 टेस्ट सेंच्युरी झळकावणारा भारतीय ओपनर या दोन गोष्टींसाठी मुरली विजय (Murali Vijay) नेहमी लक्षात राहणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: