फोटो – ट्विटर

त्याने वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) आऊट करत टीमला विजयाच्या जवळ आणलं. वर्ल्ड कप फायनलमध्ये धोकादायक बेन स्टोक्स (Ben Stokes) समोर शेवटची ओव्हर टाकण्यासाठी कॅप्टननं त्याच्या हातामध्ये बॉल दिला. दोन बॉलवर सिक्स बसल्यानंतरही शेवटच्या 2 बॉलमध्ये इंग्लंडला 3 रन करु दिले नाहीत. आयसीसीचे विचित्र नियम नसते तर त्याने टाकलेल्या सुपर ओव्हरनंतर कदाचित न्यूझीलंडचे हात देखील वर्ल्ड कपला लागले असते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही धोकादायक होत असलेल्या ऋषभ पंतला (Rishbah Pant) निर्णयाक क्षणी आऊट करत टीमला मॅचमध्ये परत आणलं. मोठ्या स्पर्धेतील बाद फेरीत न्यूझीलंडचा चोकर्सचा रेकॉर्ड मोडत न्यूझीलंडला चॅम्पियन बनवणाऱ्या ट्रेंट बोल्टचा आज वाढदिवस (Trent Boult Birthday) आहे. आजच्याच दिवशी (22 जुलै 1989) बोल्टचा जन्म झाला.

गोल्डन जनरेशन बॅचचा खेळाडू

टेंट्र बोल्ट वयाच्या 17 व्या वर्षीच न्यूझीलंडचा सर्वात फास्ट शाळकरी बॉलर बनला होता. ट्रेंटचा मोठा भाऊ जोनो देखील फास्ट बॉलर. ट्रेंट डाव्या हाताने फास्ट बॉलिंग आणि उजव्या हाताने बॅटींग करतो. तर जोनो त्याच्या नेमकं उलटं. उजव्या हाताने बॉलिंग आणि डावखुरा बॅट्समन. बोल्टची प्रथम 2007 साली आधी भारताच्या दौऱ्यावर जाणाऱ्या न्यूझीलंड A टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी तो अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा सदस्य बनला.

2008 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमधून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उदयाला आले. विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, डॅरेन ब्राव्हो, उमर अकमल, रवींद्र जडेजा, दिनशे चंडीमल, ख्रिस वोक्स, स्टीव्ह फिन ही काही प्रमुख नावं. न्यूझीलंडच्या टीममध्ये केन विल्यमसनसह टीम साऊदी, कोरे अँडरसन, आणि ट्रेंट बोल्ट हे प्रमुख खेळाडू या वर्ल्ड कपनंतर उदयाला आले. बोल्ट (Trent Boult Birthday) याच गोल्डन जनरेशनमधील विद्यार्थी आहे. त्याने त्या वर्ल्ड कपमध्ये यजमान मलेशियाच्या विरुद्ध 20 रन देत सात विकेट्स घेतल्या.

संस्मरणीय पदार्पण

ट्रेंट बोल्टला अंडर 19 वर्ल्ड कपनंतर दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो जवळपास दोन वर्ष क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर त्याने न्यूझीलंडचा दिग्गज बॉलर शेन बॉन्ड (Shane Bond) मार्गदर्शनाखाली बॉलिंगची शैली बदलली. याचा त्याला मोठा फायदा झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठे स्पेल टाकण्यासाठी बाँडने बोल्टला तयार केले.

क्रिकेटच्या मैदानातील बॉन्डला दुखापतींचा वेढा

ट्रेंट बोल्टनं 2011 साली होबार्ट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केले. माईक हसी ही त्याची पहिली विकेट. त्या टेस्टमध्ये बोल्टनं एकून 4 विकेट्स घेतल्या. जोरदार चुरशीच्या झालेल्या त्या टेस्टमध्ये न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा 7 रननं पराभव केला. न्यूझीलंडनं शेजारच्या देशाविरुद्ध 1985 नंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकली होती. या संस्मरणीय टेस्टमध्ये बोल्टनं पदार्पण केलं.

जोडी नंबर 1

ट्रेंट बोल्टनं (Trent Boult Birthday) लवकरच न्यूझीलंडच्या टेस्ट टीममध्ये बस्तान बसवले. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत, श्रीलंका या टीमविरुद्ध त्याने चांगली बॉलिंग केली. वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टन टेस्टमध्ये पहिल्यांदा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं केली.

जगात फास्ट बॉलर्स जोडीनं शिकार करण्यासाठी ओळखले जातात. लिली-थॉमसन, वासिम-वकार, वॉल्श – अ‍ॅम्ब्रोज या जोडीची उदाहरण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहेत. बोल्टची त्याचा अंडर 19 वर्ल्ड कप टीममधील पार्टनर टीम साऊदीशी (Tim Southee) जोडी जमली आहे. ही जोडी सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोडी नंबर 1 आहे.

न्यूझीलंडचा अलिकडच्या काळात टेस्ट क्रिकेटमधील खेळ सुधारला आहे. आता तर ही टीम टेस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. यामध्ये या जोडीचा मोठा वाटा आहे. 2017 साली न्यूझीलंडच्या 143 पैकी अर्ध्या म्हणजेच 67 विकेट्स या जोडीनं घेतल्या होत्या. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) साऊदीनं 56 तर बोल्टनं 39 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होण्याची 5 प्रमुख कारणं

बोल्टने आजवर 73 टेस्टमध्ये 292 विकेट्स घेतल्या आहेत. तर साऊदीनं 79 टेस्टमध्ये 314 विकेट्स घेतल्या आहेत. एकाच वयाच्या या जोडीनं शिकार करणाऱ्या बॉलर्सचा न्यूझीलंड क्रिकेटला ‘अच्छे दिन’ आणण्यात मोठा वाटा आहे.

वर्ल्ड कपमध्ये बोल्ट

ट्रेंट बोल्टला वन-डे क्रिकेटसाठी सुरुवातीला योग्य मानले जात नव्हते. पण, टेस्ट क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने वन-डे टीममध्ये जागा मिळवली. न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) याच्या आक्रमक क्रिकेटचा बोल्ट हा महत्त्वाचा सदस्य बनला.

2015 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup) ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 27 रन देत 5 विकेट्स घेतल्या. इतकंच नाही तर 11 व्या नंबरवर आल्यावर तेव्हा आग ओकत असलेल्या मिचेल स्टार्कची ओव्हर बोल्टनं खेळून काढली. पुढील ओव्हरमध्ये विल्यमसननं पॅट कमिन्सला सिक्स लगावत न्यूझीलंडला एक विकेटनं यश मिळवून दिले. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये बोल्टनं मिचेल स्टार्कच्या बरोबरीनं सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या.

ट्रेंट बोल्ट (Trent Boult Birthday) हा वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा न्यूझीलंडचा एकमेव बॉलर आहे. त्याने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019) ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरनड्रॉफ यांना आऊट करत हा रेकॉर्ड केला आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये बोल्टनं एकूण 17 विकेट्स घेतल्या.

आयपीएलमध्ये बोल्ट

ट्रेंट बोल्टला 2015 वर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर सन रायझर्स हैदराबाद (SRH) सर्वात प्रथम करारबद्ध केले. हैदराबादच्या टीममध्ये डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा हे बॉलर असल्यानं बोल्टला पहिल्या सिझनमध्ये 7 मॅचमध्येच संधी मिळाली. त्यात त्याने 9 विकेट्स घेतल्या. बोल्टला 2017 साली दिल्ली डेअरव्हिल्स (DD) ने करारबद्ध केले. 2018 च्या सिझनमध्ये त्याने दिल्लीकडून 14 मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या.

बोल्टला मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) मुंबई इंडियन्सनं (MI) दिल्लीकडून ट्रेड ऑफमध्ये घेतले. या टीममध्ये त्याची जसप्रीत बुमराहशी जोडी जमली. आयपीएल 2020 मध्ये बोल्टनं पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला सातत्याने विकेट्स मिळवून देण्याचे काम केले. बोल्टने मागील आयपीएलमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. ही बोल्टची एका आयपीएल सिझनमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

फास्ट बॉलर्सला आवश्यक असलेला वेग, विविधता, दीर्घ स्पेल टाकण्याची क्षमता आणि फिटनेस या सर्व गोष्टी ट्रेंट बोल्टकडे (Trent Boult Birthday) आहेत. त्यामुळेच क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात तो सध्या यशस्वी आहे. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकाराच स्विच होताना त्याला अडचण येत नाही. बोल्टच्या याच खासियतमुळेच त्याचा भविष्यकाळ उज्जवल आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: