फोटो – सोशल मीडिया

त्यानं अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप गाजवलं होतं. तो देशाचा नवा उगवता स्टार होता. वयाच्या 16 व्या वर्षी तो देशाची T20 लीग गाजवणारा क्रिकेटपटू बनला होता. आक्रमक बॅटर आणि गरज पडल्यावर विकेट किपर या दोन्ही गोष्टी करण्यासाठी तो पुढे असे. क्रिकेटपटू म्हणून अख्खी कारकिर्द डोळ्यासमोर होती. त्याचवेळी त्याच्या कारला अपघात झाला. वयाच्या 20 वर्षी क्रिकेटचं मैदान गाजवण्याच्या ऐवजी तो व्हिलचेअरवर होता. त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. डॉक्टरांनाही तो क्रिकेट खेळेल याची खात्री नव्हती. पण, त्यानं जिद्दीनं कमबॅक केलं आणि आज तो आक्रमक बॅटर आणि चपळ फिल्डर म्हणून ओळखला जातो. वेस्ट इंडिज क्रिकेटचं भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकोलस पूरनचा आज वाढदिवस (Nicholas Pooran Birthday) आजच्या दिवशी (2 ऑक्टोबर 1995) रोजी त्याचा जन्म झाला.

चॅम्पियन टीमचा सदस्य

वेस्ट इंडिजच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago) या बलाढ्य T20 टीमचा पूरन सदस्य. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayane Bravo) हे जागतिक T20 स्टार याच टीमचे. त्रिनिदादनं त्याला वयाच्या 18 व्या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगसाठी (CPL) कराबद्ध केलं. त्यानं या स्पर्धेतील त्याच्या पदार्पणाच्या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 54 रनची आक्रमक खेळी केली होती. 2014 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पूरननं सर्वप्रथम जगाचं त्याच्याकडं लक्ष वेधलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये तो बॅटींगला आला तेव्हा वेस्ट इंडिजची अवस्था 3 आऊट 7 अशी होती. त्यानंतर ती 8 आऊट 70 अशी झाली. पूरननं त्यानंतर ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर प्रतिहल्ला चढवत 160 बॉलमध्ये 143 रनची खेळी केली. वेस्ट इंडिज टीमच्या 208 रनपैकी 143 एकट्या पूरननं (Nicholas Pooran Birthday) काढले होते.

वयाच्या 20 वर्षी अपघात

पूरन 2015 साली क्रिकेट अकदामीमधून घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. शुद्धीवर आल्यानंतर ‘मी पुन्हा क्रिकेट खेळेन का?’ असा त्याचा पहिला प्रश्न होता. या प्रश्नाचे डॉक्टरांकडंही उत्तर नव्हते. पूरन सुमारे दीड वर्ष व्हील चेअरवर होता. डॉक्टरांचे उपचार आणि त्याच्या मनातील जिद्द यामुळे तो बरा झाला. नुसता बराच नाही तर क्रिकेट खेळण्यासाठी फिट झाला.

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड हा पूरनच्या टीमचा खेळाडू. त्याची आणि पूरनची जुनी ओळख. या काळात पोलार्डनं त्याला बरीच मदत केली. पूरन निराश होणार नाही, याची काळजी त्यानं घेतली. त्याच्या उपचारावर लक्ष ठेवले. तो दीड वर्षांनी बरा झाला. पुन्हा क्रिकेटची प्रॅक्टीस करु लागला. पण दरम्यानच्या काळात क्रिकेट विश्व पुढे गेलं होतं. वेस्ट इंडिज क्रिकेटचं हे उज्ज्वल भविष्य अकाली संपणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला होता.

पोलार्डची भक्कम साथ!

पूरनची क्रिकेटमधील गुणवत्ता वाया जाणार नाही. यासाठी देखील पोलार्ड पुढे आला. त्यानं शब्द टाकल्यामुळे कॅरेबीयन प्रीमियर लीगमधील (CPL ) बार्बोडोसच्या टीमनं पूरनला करारबद्ध केलं. पूरनलाही पोलार्डनं केलेल्या या मदतीची जाणीव आहे. तो पोलार्डला मोठा भाऊ मानतो. त्यानं केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तो (Nicholas Pooran Birthday) कधी थकत नाही.

गुन्हेगारी दलदलीतून तयार झाला चॅम्पियन पोलार्ड

वर्ल्ड कपमध्ये कमाल

वेस्ट इंडिजची टीम 2018 साली भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी पूरननं चेन्नईमध्ये झालेल्या T20 मॅचममध्ये 24 बॉलमध्ये नाबाद 53 रनची खेळी केली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी (Cricket World Cup 2019) काही महिने आधी पूरननं वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. या खेळाडूंच्या उपस्थितीमध्येही नवोदीत पूरनला बॅटींगसाठी चौथा क्रमांक देण्यात आला. वेस्ट इंडिजसाठी तो वर्ल्ड कप निराशाजनक ठरला. पण, नवोदीत पूरननं क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेत नाव कमावलं.

अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध त्यानं हाफ सेंच्युरी झळकावली. श्रीलंकेविरुद्ध 339 रनचा पाठलाग करत असताना त्यानं एकहाती किल्ला लढवत 118 रनची खेळी केली. पूरनचे हे प्रयत्न (Nicholas Pooran Birthday) कमी पडले. वेस्ट इंडिज श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाली. या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 52.47 च्या सरासरीनं 367 रन काढले. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या बॅटरपेक्षा तो 93 रननं पुढं होता.

आयपीएलमध्ये पूरन

मोठ्या अपघातामधून वाचलेला पूरन क्रिकेटच्या मैदानात जिद्दीनं परतला. त्याची T20 क्रिकेट खेळण्याची भूक मोठी आहे. वेस्ट इंडिजसह पाकिस्तान, बांगलादेश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि यूएई या सर्व देशांच्या T20 लीगमध्ये तो खेळला आहे. पण त्याला खरी प्रसिद्धी इंडियन प्रीमियर लीग (IPL ) स्पर्धेत मिळाली.

पूरनला सर्वप्रथम मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) करारबद्ध केलं होतं. पण तिथं त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर पंजाब किंग्जनं (Punjab Kings) त्याला मोठी रक्कम देऊन करारबद्ध केलं. आज तो पंजाब किंग्जच्या मिडल ऑर्डरचा मुख्य खेळाडू बनला आहे.

IPL 2021: दिनेश कार्तिकला चॅम्पियन करणाऱ्या खेळाडूबद्दल कुंबळे म्हणतो, ‘हा तर आमचा पोलार्ड’

पूरनसाठी मागील वर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2020) चांगली ठरली. सीपीएस स्पर्धेतील त्याची पहिली सेंच्युरी झळकावून तो या आयपीएलमध्ये आला होता. पंजाबकडून IPL 2020 मध्ये त्यानं 170 च्या स्ट्राईक रेटनं 353 रन काढले. मॅचच्या मिडल ओव्हर्समध्ये त्यानं स्पिन बॉलर्सवर वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर बाऊंड्री लाईनवर दमदार फिल्डिंग केली.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध संजू सॅमसनचा सिक्स त्यानं (Nicholas Pooran Birthday) अफलातून झेपावत अडवला. 6 रनचे 2 रनमध्ये रुपांतर केले. त्याच्या या फिल्डिंगला पंजाबचा फिल्डिंग कोच आणि जगातील सर्वश्रेष्ठ फिल्डर जॉन्टी ऱ्होडसनं उभं राहून दाद दिली होती. तसंच सचिननंही, ‘ मी माझ्या आयुष्यात पाहिलेला बेस्ट सेव्ह’ अशी दाद पूरनला दिली होती.

यंदा निराशा… पण

निकोलस पूरनसाठी ही आयपीएल स्पर्धा (IPL 2021) निराशाजनक ठरली आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात तो शून्याच्या चक्रात अडकला होता. तर दुसऱ्या टप्प्यातही त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सेट झालेला असताना तो शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झाला आणि त्यानंतर पुढे पंजाबच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला.

वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय

पूरनला आयपीएलमध्ये अपयश येत असले तरी पंजाबच्या मॅनेजमेंटचा त्याच्यावरील विश्वास कायम आहे. ते त्याला सातत्यानं संधी देत आहेत. आयपीएलच्या दोन टप्प्यातील काळात वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पोलार्डच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं टीमची कॅप्टनसी देखील केली आहे. पोलार्डचा वारसदार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात आहे. आता उर्वरित आयपीएलमध्ये आणि त्यानंतर येणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये पूरननं (Nicholas Pooran Birthday) त्याच्या लौकिकानुसार दमदार खेळ करावा हीच सर्वांची अपेक्षा आहे.    

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: